EasyBlog
This is some blog description about this site
ताड की फाड
परशुराम : मूलनिवासींच्या देवाचं रहस्य
चिपळूणच्या साहित्य संमेलनाचा जो पंचनामा चालला आहे तो अत्यंत योग्यच आहे. या संमेलनामुळं साहित्य क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या राजकीय दलालांचं खरं स्वरूपच उघडं पडलं आहे. चवलीचा खर्च साहित्यिकांवर आणि अधेलीचा खर्च मांडवावर अशा पद्धतीचा नियोजनशून्य खर्च करून राजकीय नेत्यांशी हातमिळवणी केलेल्या दलालांनी कोट्यवधी रुपयांची चांदी केली. हा सारा पैसा सार्वजनिक आहे, जनतेचा आहे. तो अशा पद्धतीनं उधळला जाणं हे साहित्यातील नैतिकतेच्या कल्पनेला मुळीच शोभणारं नाही. अशी प्रवृत्ती साहित्य क्षेत्रात सुरू झाली तर ती घातक ठरेल. तेव्हा याविरुद्ध ठामपणं आवाज उठवणं आवश्यक आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचा भरणा झाला, वैचारिक आणि चारित्र्याचे दिवाळे वाजलेल्या नेत्यांना व्यासपीठावर बसवून साहित्यातील नैतिकतेचा लिलाव मांडला यांची शरम तर वाटते. पण आता हा घातक पायंडा पडू नये म्हणून साहित्यप्रेमाची झूल पांघरलेल्या राजकीय नेत्यांच्या दलालांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा ताबा घेऊन करोडो रुपये सरकारी तिजोरीतून हडप करू नयेत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. चिपळूणचं संमेलन मात्र याच घातक प्रकारांसाठी गाजणार आहे आणि कुप्रसिद्ध होणार आहे.
दुसरा मुद्दा आहे तो या संमेलनांच्या निमित्तानं परशुराम नामक अवतार मानल्या जाणाऱ्या दैवतावर झालेल्या टीकेचा! मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांनी संमेलनाच्या बोधचिन्हात लेखणीला जोडलेला परशु या चित्रावर घेतलेला आक्षेप तर योग्यच आहे. कारण त्याचा काही निश्चित संदेश नाही, अर्थ नाही. परशुरामाचा परशु म्हणून तो वापरला तर परशुरामानं युद्धात त्याचा वापर केला, असा कोणताही साफ पुरावा नाही. मुळात ब्राह्मणी पुरोहित वर्गानं मूलनिवासी आर्येतर वर्गाचे अनेक देव पळवून त्यांना आपलं मानलं. इथल्या मूलनिवासींनी आर्यांना आपल्यात सामावून घेतलं आणि तेव्हा मूलनिवासी दैवतांचं पूजन ब्राह्मणांनी सुरू केलं. त्यात रुद्र आणि पशुपती महादेव, गणपती या दैवतांचा; तसंच अनेक मातृदेवांचा समावेश आहे. प्रारंभी आर्यांचा आणि मूलनिवासींचा संघर्ष आणि नंतर त्याचं सामंजस्य अशी ही प्रक्रिया आहे. ब्राह्मण पुरोहितांनी मूलनिवासी देवतांची लोकप्रियता पाहून त्यांना आपलं मानून बळकावलं.
आपल्या दैवतकथा आणि मूलनिवासींच्या दैवतकथा यांना परस्परात मिसळून नव्या दैवतकथा रचल्या. या प्रक्रियेचे संपूर्ण शास्त्रीय विवेचन इतिहासकार डी. डी. कोसांबी आणि लोकायत या भारतीय इहवादी विचार परंपरेचं विवेचन करणाऱ्या महान द्रष्टे लेखक देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी केलं आहे. गणपती आणि शंकराची आर्येतर ओळख तर आजही टिकून आहे. अभ्यासक ती शोधून काढतात. तशीच परशुरामाची आर्येतर पाळंमुळं शोधली गेली तर त्याची एक वेगळी ओळख समोर येते. परशुरामाचे उपासक मातंग-मांग, महार, कोळी, कुणबी, आदिवासी अशा अत्यंत मागास आणि चातुवर्ण्याच्या बाहेरच्या जाती कशा, असा प्रश्न मला नेहमी पडत आहे. कोणत्याही ब्राह्मण कुळांची परशुराम ही कुलदेवता नाही. कोकण किनाऱ्यावर येऊन पडलेल्या मृतदेहांना परशुरामानं पुन्हा प्राण दिले. त्यातून चित्पावन ही ब्राह्मणांची पोटजात निर्माण झाली अशी कथा आहे. पण चित्पावनांनी आपलं कुलदैवत म्हणून स्वीकार केला नाही. ही कथा असं सांगते की ते ब्राह्मण मूळ या देशातील नाहीत. ते इराणमधून आले. ते कदाचित ज्यूंप्रमाणे सेमेटिक वंशाचे असावेत. परशुरामामुळं त्यांना इथं आसरा लाभला. परशुरामानं त्यांचं चित्त पावन केलं म्हणून ते चित्पावन झाले. तर महार-मांगासारख्या अतिमागास, ज्यांना चातुर्वर्ण्यातही स्थान नव्हतं आणि जे अतिशूद्र होते त्यांचा परशुराम आणि त्याची माता रेणुका ही दैवतं कशी? तर तो मूळ त्यांचाच देव होता. त्यानं आर्य क्षत्रियांचं आक्रमण रोखण्यासाठी सहस्रार्जुनादी क्षत्रियांशी युद्ध केलं. जर त्यानं क्षत्रियांचा वंशसंहार केला तर मग त्यानंतर राम आणि पांडव हे क्षत्रिय कसे झाले? तेव्हा त्यानं वंशसंहार केला नाही. अ. ज. करंदीकर यांनी तर त्यांच्या महाभारत आणि पश्चिम आशिया या ग्रंथात कमालीची विस्मयजनक माहिती दिली आहे. त्यांच्या मते हा परशुरामाचा भृग वंश थेट रोमपर्यंत पसरला होता. त्यानं आशिया मायनर व्यापला होता. या वंशाची फार मोठी देणगी ही गोपूजा ही होती. गोवंशाची हत्या करणाऱ्याला देहदंड देण्याची प्रथा रोमन लोकांमध्ये होती. रोम या मुख्य शहराची देवता कुबेले ही गोमातेची मूर्तीच होती. तिचं नवं मंदिर बांधलं तेव्हा केलेल्या अत्यंत भव्य उत्सवाचं वर्णन लेव्ही यानं आपल्या रोमच्या इतिहासात केलं आहे. तिथं एशिया मायनरमध्ये भृगूंना फृगीयन किंवा बृगीयन असं नाव आहे. या लढवय्यांनी अनेक घनघोर लढाया करून हिटाईट साम्राज्याचा विध्वंस केला. यामुळं त्याला विध्वंसक राम (टर्मिनेटर) मानलं जातं. बृगीयनांनी हिटाईट साम्राज्य उद्ध्वस्त केलं त्याचाच उल्लेख नि:क्षत्रिय पृथ्वी केली असा केला जातो. परशू ही कल्पना पर्शियन भागात विध्वंसक अशी आहे, तर कुठार (कुऱ्हाड) हे देवाचं प्रतीक एशिया मायनरमध्ये मानलं जातं. हे बृगू अग्निपूजक आणि गोमातेची पूजा करणारे होते. त्यांचा एशिया मायनरपासून भारतापर्यंत पसरलेल्या प्रदेशातील मूलनिवासी समाजाशी संबंध होता. म्हणून त्याची आक्रमक क्षत्रियांची युद्धं झाली. युरोपमध्ये जसा मध्ययुगात पुरोहितवर्ग विरुद्ध सत्ताधीश क्षत्रियवर्ग असा संघर्ष झाला, तसाच तो प्राचीन भारतात झाला असला पाहिजे. त्यात परशुरामानं क्षत्रियांच्या विरोधात भूमिका घेतली असणार. याचं कारण क्षत्रिय आक्रमक मूलनिवासी समाजाचं शोषण करत होते. त्याचबरोबर ब्राह्मणांना त्याचा आधार वाटला असावा. तेव्हा परशुरामामुळं त्या काळात ब्राह्मण-शूद्र-अतिशूद्र असं सोशल इंजिनियरिंग झालं.
मातृहत्येची कथा त्याच्या चारित्राला जोडली आहे ती विचित्र आहे. पण वडिलांच्या आज्ञेनं हा भयानक प्रकार त्यानं केला. याचा अर्थ पितृसत्ताक समाजव्यवस्था म्हणजे त्याचे वडील आणि मातृसत्ता व्यवस्था म्हणजे माता! पण त्याला मातृभक्त मानलं आहे. वडिलांची मनधरणी करून त्यानं मातेला पुन्हा जिवंत केलं अशीही कथा आहे. म्हणजे मातृसत्ताक व्यवस्था जोपासण्याची जबाबदारी त्याच्या समाजानं घेतली. कारण तीच मूलनिवासी मातृसत्ताक पद्धती होती. यामुळंच मातृसत्ताक व्यवस्था असलेले समाज त्याचे अनुयायी आहेत. मांग, महार, आदिवासींमध्ये तीच मातृसत्ताक पद्धती होती. एकवीरा ही कार्ले येथील देवता ही परशुरामाची माता रेणुकेचं रूप आहे. तसंच सौदत्तीची यल्लम्मा, वणीची सप्तशृंगी ही सारी त्याच्या मातेची रूपं आहेत. हजारो वर्षं या मातृदेवतांची आराधना करणाऱ्या आजच्या वंचित समाजाचा परशुराम हा देव होता. तो त्यांचा वॉरगॉड – युद्धदेव होता. त्याला नंतर आक्रमक आर्य क्षत्रियांशी लढावं लागलं. त्यात पुरोहितशाही विरुद्ध क्षत्रिय राजांची सत्ता यांच्या संघर्षाचा पदरही आहे. परशुरामाला नंतर दाशरथी रामाशी लढावं लागलं. याचा अर्थ ती क्षत्रियविरोधी लढाई चालूच राहिली. पण नंतर पुरोहितवर्गानं चलाखीने क्षत्रिय सत्ताधीशांशी जुळवून घेतलं तेव्हा त्यांनी मूलनिवासींचा हा देव आपला मानला. असे उद्योग त्यांनी गणपती, हनुमान, शंकर यांच्या बाबतीतही केले आहेत. साहित्य संमेलनात सध्या सत्ताधीश आपला प्रभाव दाखवत आहेतच. तेव्हा पुन्हा सत्ताधीश मराठे आणि मूलनिवासींचा परशुराम हायजॅक करणारे ब्राह्मण यांचा हा संघर्ष आहे.