EasyBlog

This is some blog description about this site

सिरोंचा ते सीरिया...

हवामानाचा लहरीपणा वाढतोय

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1840
  • 2 Comments

भारतातील काही भागांत थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी गारठून अनेकांचा बळी गेलाय. थंडी प्रमाणापेक्षा जास्त पडणं हा ऋतुचक्रातील बदलाचा परिणाम असल्याचं हवामान शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या उन्हाळ्यात अनेक शहरांचं तपमान ४५ अंशांवर गेलं होतं. आता हिवाळ्यात हेच तपमान एक डिग्रीपर्यंत घसरलंय. ही परिस्थिती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे.

२०१२ हे वर्ष इंग्लंडमध्ये तीव्र हवामानाचं वर्ष ठरलंय. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये तीव्र दुष्काळ आणि त्यापाठोपाठ पूरपरिस्थिती निर्माण झाली. इंग्लंडवासीयांनी पहिल्यांदाच असं हवामान अनुभवलं. मात्र जगभरातील अनेक देशांत कमीअधिक फरकानं अशीच परिस्थिती आहे.

आशियात थंडीची लाट

चीनमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडलीय. गेल्या 30 वर्षांत एवढी थंडी पडली नव्हती, असं चीनी लोक म्हणतायत. दुसरीकडं ब्राझीलमध्ये कडक उन्हाळा सुरू आहे. तर पूर्व रशियामध्ये तपमान 50 अंशाखाली आलंय. याकुत्झ शहरात तर हिमवर्षावामुळं ट्राफिक सिग्नल यंत्रणाही कोलम़डून पडलीय.

ऑस्ट्रेलियामध्ये भीषण उन्हाळा

तिकडं ऑस्ट्रेलियामध्ये सध्या भीषण उन्हाळा सुरू आहे. वाढत्या तपमानामुळं देशभरातील जंगलामध्ये वणवे पेटतायत. आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यात काही भागात पूर आला होता. तर मध्य पूर्व आखाती देशांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आला. त्य़ापाठोपाठ हिमवर्षावही सुरू झालाय. अमेरिकेत तपमानात प्रचंड वाढ झाल्यानं नागरिकांना घरातून बाहेर पडणं अशक्य झालंय. परिस्थिती एवढी भीषण आहे की, वेधशाळेच्या सल्ल्यानंतरच लोक घरातून बाहेर पडतात. अमेरिकेत २०१२ हे वर्ष सर्वात जास्त उष्म वर्ष असल्याचं हवामान शास्त्रज्ञ सांगतात.

एरवी वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळं जगभरातील वेगवेगळ्या देशांना विविध प्रकारच्या तीव्र हवामानाचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी वेगळंच घडतंय. जगभरात एकाच वेळी टोकाचं हवामान अनुभवायला मिळतंय. जिनेव्हा इथल्या जागतिक वेधशाळेचे अधिकारी ओमर बदोर यांचं म्हणणं, "सध्या ऑस्ट्रेलियात तीव्र उन्हाळा सुरू आहे, तर इंग्लंड आणि मध्य पूर्वेत एकाच वेळी पूर, हिमवर्षावाची परिस्थिती आहे. अशा प्रकारे हवमानातले बदल दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत.

ब्रिटनवासीयांसाठी आतापर्यंत पावसाळा हा केवळ कॉम्प्युटर स्क्रीनवर वॉलपेपर म्हणून पाहायला मिळायचा. तो आता त्यांच्या शहरांमध्ये धिंगाणा घालू लागलाय. २०१२ला ब्रिटनच्या अनेक भागांना पावसानं झोडपलं. उत्तर वेल्समध्ये तर पावसामुळं रेल्वे, रस्ते वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती. पूर आल्यानं काही भागांतले पब्स बंद करावे लागले होते.”

इंग्लंडच्या वेधशाळेनं २०१२ हे वर्ष देशातील आत्तापर्यंतचं सर्वात मोठं ओलं (पावसाचं) वर्ष असल्याचं जाहीर केलंय. २००९ आणि २०१२च्या पुरामुळं इथल्या विमा कंपन्यांना तब्बल ६.५ अब्ज डॉलरचा फटका बसलाय.

ऑस्ट्रेलियामध्ये प्रखर उन्हाळ्यामुळं जंगलात सर्वत्र वणवा धगधगतोय. यापूर्वी सलग दोन वर्षं देशात तीव्र पावसाळ्याची परिस्थिती होती. मात्र या वर्षी सर्वत्र कडक उन्हाळा आहे. काही आठवड्यांपूर्वी राजधानी सिडनी शहरातील तपमान ४३ अंशांवर गेलं. 1910 नंतर सिडनी शहरानं अनुभवलेलं हे सर्वात उच्चांकी तपमान आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून पहिल्या आठवड्यात सिडनीचं तपमान सर्वात जास्त होतं. १९५० नंतर नोंदवण्यात आलेलं हे सर्वात मोठं तपमान असल्याचं वेधशाळेचा अहवाल सांगतोय.

दुसरीकडं रशिया आणि उत्तर युरोपमध्ये प्रखर हिवाळा सुरू झालाय. स्टॉकहोम, हेलसिंकी आणि मॉस्को शहरात जोरदार हिमवर्षाव सुरू आहे. विशेष म्हणजे सीसिली आणि दक्षिण इटलीमध्ये दुसऱ्या महायुध्दानंतर पहिल्यांदाच हिमवर्षाव झालाय.

स्वयंपाक गॅसशिवाय जीवन

सायबेरियामध्ये तर थंडीच्या प्रकोपामुळे गॅसोलीन (नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या) पाईपलाईनला तडे गेलेत. त्यामुळं अनेक ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅसशिवाय नागरिकांना राहावं लागतंय. हिमवर्षावामुळं रस्ते खचून जात असल्यानं प्रशासनानं बससेवा बंद केल्यात. नागरिकांना खाजगी वाहनं घराबाहेर न काढण्याचा सल्ला देण्यात आलाय. डिझेल गोठून कार रस्त्यात बंद पडताहेत.

चीनमध्ये भीषण थंडी पडलीय. काही भागात तर हिमवर्षावानं घरं कोसळलीत. तर मंगोलियात कडाक्याच्या थंडीमुळं एक लाख ८० हजार गुरं गारठून ठार झाली आहेत. थंडीचा परिणाम पिकांवरही झालाय. भाजीपाला आणि अन्नधान्यांच्या किमती आकाशाला भिडल्यात.

ब्राझीलमध्ये विजेचं रेशनिंग

दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत सध्या भीषण उन्हाळ्याची परिस्थिती आहे. ब्राझीलमध्ये तर विजेचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळं सरकारनं विजेचं रेशनिंग सुरू केलंय. प्रखर उन्हाळा आणि पाऊस न पडल्यानं २००२ नंतर पहिल्यांदाच ब्राझीलमध्ये ही परिस्थिती उद्भवलीय. ब्राझीलची राजधानी रियो दी जेनेरियो शहराचं तपमान ४३ अंशावर आलंय. १९१५ नंतर हा शहरातला तपमानाचा उच्चांक आहे.

मध्य पूर्वेतील देश जॉर्डनमध्ये सध्या वादळवाऱ्यासह मुसळधार पाऊस त्यानंतर हिमवर्षाव आणि पुराची परिस्थिती अशी एकापाठोपाठ एक सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर जॉर्डनवासीय अशी परिस्थिती अनुभवत आहेत. पूरपरिस्थिती एवढी गंभीर आहे की, ओमान शहरात सर्व व्यवस्था कोलमडून पडल्यात. रस्ते वाहतूक ठप्प झालीय, तर सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याची वेळ सरकारवर आलीय.

जेरुसलेममध्ये आठ इंच बर्फाचे थर

इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये हीच परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि त्यानंतर थंडीची लाटच या भागात पसरलीय. त्यानंतर जोरदार हिमवर्षाव सुरू झालाय. सध्या जेरुसलेममध्ये आठ इंच बर्फाचे थर ठिकठिकाणी दिसतायत.

इस्त्रायलमधील ही परिस्थिती अभूतपूर्व म्हणावी लागेल, असं हवामान तज्ज्ञ अमिर गिवाती सांगतायत. आतापर्यंत देशात हिमवर्षाव केवळ उत्तर भागापुरता मर्यादित होता. तो आता दक्षिणेतील वाळवंटातही पोहोचलाय. सध्या डिमोना या शहरात अभूतपूर्व हिमवर्षाव सुरू आहे.

लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. काळा समुद्रालगतच्या शहरात पुराची परिस्थिती निर्माण झालीय. शहरातील कित्येक रस्ते जलमय झालेत. पूरपरिस्थितीनं अनेकांचा बळी घेतलाय. गृहयुध्द सुरू असलेल्या सीरियातून लाखो नागरिकांनी या ठिकाणी आश्रय घेतलाय. याचा मोठा फटका शरणार्थी शिबिरातील लोकांना बसलाय.

युरोप आणि मध्य पूर्वेतील देशातील हवामानांवर मुख्यत: अॅटलांटिक महासागराचा परिणाम आणि प्रभाव आतापर्यंत कायम होता. मात्र सध्याची परिस्थिती बघता महासागराचा या देशांतील हवामानावरचा प्रभाव कमी झालेला दिसतो, असं हवामान तज्ज्ञ बॅरी लीन सांगतात. त्या म्हणतात, "सध्या पडलेल्या थंडीची तीव्रता मोठी आहे आणि ती अधिक तीव्र होत जातेय. ही धोक्याची घंटा आहे. आपण ती ऐकली पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी आपण आपल्या परीनं प्रयत्न करायला पाहिजे.”

People in this conversation

Comments (2)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

`भारत4इंडिया`चे इनपूट एडिटर. दहा वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत. विविध वृत्तपत्रांत लिखाण. ई-टीव्ही, मी मराठी, आयबीएन-लोकमत या चॅनेल्समध्ये काम.