EasyBlog

This is some blog description about this site

मराठवाडी तडका

भटकतोय वाघ!

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1654
  • 2 Comments

एकेकाळी मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. जी शिवसेनेची चलती मुंबईला आहे ती शिवसेनेची चलती १९८७ ते २००६ पर्यंत मराठवाड्यातही होती. २००६ नंतर मात्र मराठवाड्यातील हे भगवं वादळ कायमस्वरूपी शमणार की काय, अशा अवस्थेत येऊन पोहोचलं. मनसेचं त्यातच ग्रहण लागलं. उद्धव ठाकरेंसमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे ‘खूशमस्करे’ कायमस्वरूपी बाजूला ठेवण्याचा. नेत्यांनी शिवसेना उभी केली आणि उपनेत्यांनी वाट लावली. ती कशी? याचाही अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे.

औरंगाबादला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ला पहिली सभा घेतली होती. त्यापाठोपाठ परभणीलासुद्धा बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. या दोन्ही सभा तत्कालीन काँग्रेसला सळो की पळो करून सोडणार्‍या होत्या; किंबहुना त्याचा रिझल्टसुद्धा शिवसेनेला भरपूर मोठ्या अशा स्वरूपात पुढं मिळाला. १९८७ पासून मराठवाड्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली ती बाळासाहेब ठाकरेंनी.
 
बाळासाहेब ठाकरेंचं कायमस्वरूपी सातत्य होतं. मग विधानसभा असो, लोकसभा असो, की वेगवेगळ्या निवडणुका! बाळासाहेबांच्या सभेवरच अर्धं काही जिंकलं जायचं. पुढे एकेक शिवसैनिक जोडला गेला आणि त्यामुळं शिवसेना इतकी मजबूत झाली की, इतर पक्षांना मोठ्या ताकदीनिशी शिवसेनेमध्येच फोडाफोडीचं राजकारण करून सेनेला हरवण्याबाबतचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे, ज्यात बहुतांश वेळा हरण्याशिवाय पर्याय नव्हता. २००० नंतर मराठवाड्यातील शिवसेना हळूहळू अंतर्गत गट-तट आणि केवळ नेत्यांनीच घरं भरल्यामुळं अडचणीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. जे आमदार, खासदार पत्र्यांच्या घरांतून सोनेरी महालात गेले त्यांच्याकडं आज १०० कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती नाही. या आमदार-खासदारांनी गळ्यात भगवी दस्ती टाकून रात्री-बेरात्री लोकांच्या प्रश्नांसाठी लढणार्‍या शिवसैनिकांचा कधी विचार केला नाही.
 
जिल्हा कार्यकारिणीपर्यंत येऊन पोहोचलेले शिवसैनिक मागोमाग झालेल्या कारवायांमुळं कोर्टाच्या चकरा मारण्यातच हैराण आहेत, तर दुसरीकडे जे जिल्हा कार्यकारिणीमध्ये आहेत ते स्वतःच्याच पक्षातील आप्त-स्वकीयांशी भांडण्यात मश्गुल आहेत. नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली हे जिल्हे यासाठी उत्तम उदाहरणं आहेत. ज्या संपर्कप्रमुखांकडं त्या त्या जिल्ह्यातील सेना वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात येतं. ते संपर्कप्रमुख तिथं कुठल्या कुठल्या गोष्टींना प्रोत्साहित करतात आणि त्यातून पुढं काय येतं, हे नांदेडमध्ये असलेल्या तत्कालीन संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांच्यासारख्या संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून समोर आलं आहे. पूर्वी राजाच्या दरबारी एक ‘खूशमस्करे’ नावाचं पदच होतं. सातत्यानं राजाला वाहवाऽ वाहवाऽ करायचं आणि राजाला पाहिजे त्या पद्धतीचा ‘इंतेजाम’ तातडीनं करायचा. ही सगळी ‘खूशमस्करे’पद्धती शिवसेनेमध्ये वाढली. त्यामुळं निष्ठावंत लोकांना डावलून संपर्कप्रमुखांचे केवळ ‘चोचले’ पुरवणार्‍यांना पदं ‘बहाल’ करण्याची मोहीम सातत्यानं आखली जाऊ लागली आहे. याच मोहिमेअंतर्गत उस्मानाबादला शिवसेनेमध्ये बदल झाले, नांदेडलाही तसंच झालं आणि परभणीलाही तेच अनुभवलं गेलं.

जालन्यामध्ये मारामारी आजही सुरू आहे. या सगळ्या गोष्टींची कारणं संपर्कप्रमुखांच्या, उपनेत्यांच्या अवतीभवती फिरत आहेत. औरंगाबादला विश्वनाथ नेरूरकर, नांदेडला सुहास सामंत, हिंगोलीला बबन थोरात यांसारखे चांगले संपर्कप्रमुखसुद्धा मराठवाड्यात आहेत; पण त्यांच्या विरोधातही ‘काड्या करा’ मोहीम सातत्यानं होते आणि मग होत्याचं नव्हतं व्हायला अधिक वेळ लागत नाही. गटा-तटांची वाळवी आणि पक्षांतर्गत असलेलं राजकारण यामुळं शिवसेनेची मराठवाड्यात रोवली गेलेली पाळंमुळं उखडली जात आहेत. मनसेमुळं शिवसेना विभागली गेली. शिवसेनेचे चांगले, लढाऊ तसंच अनेक कर्तबगार मनसेमध्ये गेले. मराठवाड्यामध्ये ज्या अनेक निष्ठावंतांनी शिवसेना उभी केली होती असे अनेक आजही मनसेचे सल्लागार म्हणून राज ठाकरेंच्या आग्रहाखातर उभे आहेत, ज्यांना काही अंशी मराठवाड्यात यशही मिळू लागलं आहे.

बीडमध्ये अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, सुनील धांडे हे शिवसेनेचे तीन दमदार नेते आज तिन्ही दिशांना तोंड करून उभे आहेत. कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही. या तिघांच्या अंतर्गत भांडणांमुळे बीडमध्ये ‘कमळ’ फुलू लागलंय. अगदी जोरात! बीडमध्ये गेल्या ५ ते ६ वर्षांपासून संपर्कप्रमुख म्हणून असलेले सध्याचे मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांचं फारसं लक्ष नाही. त्यामुळं शिवसेनेवर खरं प्रेम करणारे शिवसैनिक यांचं नियोजन लावण्याची जबाबदारी कुणावर द्यायची? हा प्रश्न बीडमध्ये उभा आहे. बीडचं प्रत्येक आंदोलन, बीडच्या सामाजिक समस्या उचलण्यामध्ये एकेकाळी सर्वात आघाडीवर होती ती शिवसेना. वरिष्ठ पातळीवरही ही आंदोलनं खूप गाजायची. शिवसेनाही या आंदोलनाची वेळोवेळी दखल घ्यायची; मात्र आज शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना इथल्या ‘अंतर्गत’ वादाची दखल घेण्याची वेळ आली आहे.

बदनामीच्या फेर्‍यात शिवसेना अक्षरशः अखेरच्या घटका मोजते की काय? असा प्रश्न बीडमध्ये उपस्थित होऊ लागला आहे. तीच अवस्था उस्मानाबाद म्हणजे शिवसेनेच्या भाषेत ‘धाराशिव’ इथं आहे. धाराशिवमध्ये एकेकाळी शिवसेनेचे ४-४ आमदार होते. अनिल खोसरेंसारख्या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याकडं जिल्हाप्रमुखपदाची सूत्रं होती. जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिकेचं राजकारण असेल; तिथे पद्मसिंह पाटलांसारख्या मोठ्या माणसाला शिवसेना मागं नव्हती; पण अंतर्गत वादामुळं आणि वरिष्ठ पातळीवरील पक्षीय नियोजनाअभावी शिवसेनेची अक्षरशः वाताहत सुरू झाली. खोसरेंना डावलून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. ओमराजे निवडून आले ते आपल्या स्वतःच्या नावावर, तिथल्या कारखान्याच्या राजकारणावर. भविष्यात ते निवडून येतील का नाही? यावर स्वतंत्रपणं चर्चा होऊ शकते. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. ती कुठली आणि ती या काळात का उद्भवली? असे अनेक प्रश्न तिथं उपस्थित केले जाऊ शकतात. खोसरेंच्या जागी रवी गायकवाड यांना जिल्हाप्रमुख केलं. रवी गायकवाड म्हणजे एकेकाळी सचिव राहिलेले व्यंकटराव गायकवाड यांचे भाऊ, ज्यांना शिवसेनेमध्ये फारसा रस नाही. रवी गायकवाड यांचा संपर्क प्रमुख यांचं तसं फारसं देणं-घेणं नाही. संपर्कप्रमुखांचे फोन ते घेत नाहीत, अशा तक्रारी मागं अनेक वेळा झाल्या होत्या, तर बाकी शिवसैनिकांची आणि पदाधिकार्‍यांची काय अवस्था असेल, हे विस्तारानं सांगण्याची गरज नाही. विजय कदमसारख्या व्यक्तीनं उस्मानाबाद, धाराशिवची जबाबदारी संपर्कप्रमुख म्हणून स्वीकारली खरी; पण त्यांना तिथं फारसं संघटन उभं करण्यात यश आलं नाही एवढं मात्र नक्की! तिथल्या स्थानिक पातळीवरील नेत्यांची भांडणं सोडवण्यातच कदम यांचा पूर्ण वेळ जात आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

अवघ्या मराठवाड्यात चर्चेत आहे ते नांदेड. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना सातत्यानं ‘टक्कर’ देण्यात शिवसेना कधी खचली नाही; पण अलीकडे शिवसेनेमधीलच मातब्बर आपल्या स्वार्थासाठी काँग्रेसशी वारंवार हातमिळवणी करू लागले आहेत. त्यामुळं शिवसैनिकांसमोर
प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे ‘मॅनेज’ होणार्‍या नेत्यांसोबत आपण राहायचं कशासाठी? भाऊराव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं काही मित्र पक्षासोबत आपलं पॅनल उभं केलं. या पॅनलमुळं अशोकराव चव्हाणांना जागोजागी सभा घ्याव्या लागल्या. आता हेच अशोकराव भाऊरावसाठी नवीन कारखान्याचं युनिट घेताना शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांच्या घरी ‘प्रीतीभोजन’ करण्यास जातात, यातून शिवसैनिकांनी काय बोध घ्यायचा? आणि कुठल्या नव्या राजकारणाला पुढं आणायचं? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात.

हेमंत पाटील, दिलीप ठाकूर, प्रकाश कौडगे, प्रकाश मारावार, बाळू खोमणे यांसारखे एक नव्हे तर पायलीचे पन्नास शिवसेनेत असलेले स्थानिक नेते स्वतःच्या गटा-तटाभोवतीच चिकटलेले आहेत. यांची ‘एकी’ झाली तर कुठलाही पक्ष इथं तग धरणार नाही आणि त्यांची एकी होऊ नये, यासाठी अनेकांनी लावलेला ‘जाळ’ इकडं लातूरपर्यंत आणि इकडं हिंगोलीपर्यंत ‘धगधगत’ पेटलेला आहे. श्रीकांत पाठक, धनू वाघमारे, वैजनाथ देशमुख यांसारखे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेत असलेले निष्ठावंत मनसेमध्ये गेले. त्याची कारणं शोधण्यासाठी शिवसेनेच्या कुठल्याही स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांकडं वेळ नाही. जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांच्या वॉर्डातून लातूरचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले जातात, दुसरे शहराचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांचे भाऊ राजेंद्र कौडगे चौथ्या क्रमांकावर फेकले जातात. गेल्या १५ वर्षांपासून ज्या जनतेनं खेडकर घराण्यावर आपला जीव ‘फिदा’ केला होता त्या दिवंगत प्रकाश खेडकर यांचे चिरंजीव महेश खेडकर, त्यांचे भाऊ बंडू खेडकर, त्यांचे मेहुणे जवळगांवकर या सगळ्यांना चारीमुंड्या चीत व्हावं लागलं. या सगळ्या पराभवाची कारणं राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अन्य दुसरा कुणी नाही तर खुद्द ‘शिवसेना’च आहे, हे इथं प्रकर्षानं नमूद करावंसं वाटतं.

नांदेडमध्ये तर शिवसेनेनं एकमेकांना संपवण्याची ‘सुपारी’च घेतली की काय, असं वाटत आहे. परभणी आणि जालन्यामध्ये तर विचारायलाच नको. खासदार गणेशराव दुधगांवकर आणि आसाराम बोराडे यांची जाहीरपणं झालेली मारामारी, या भांडणाला वैतागून काँग्रेसमध्ये विशेषतः माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक झालेले सुरेश जेथलीया यांनी वेळीच शिवसेना सोडली. जालना जिल्हा परिषद शिवसेनेकडं होती; पण आता ती काँग्रेसकडं गेली. अर्जुन खोतकरांसारखी निष्ठावंत मंडळी सातत्यानं दुखावली जात आहे. संघटनात्मक ‘खिळखिळी’ इतकी वाढली की, विचारायलाही सोय नाही.

परभणीमध्ये राजू कापसे यांच्याकडून जिल्हाप्रमुखपद काढून घेतलं आणि बंडू जाधव यांनी स्वतःच आपल्या भावाकडं ते दिलं. मीरा रेंगे, बंडू जाधव, दुधगांवकर हे तिघं जण तिन्हींकडं आहेत. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे यांसारखी निष्ठावंत मंडळी शिवसेनेला ‘बायबाय’ करून केव्हाच निघून गेली. औरंगाबादमध्ये ‘त्रिमुखी’ झालेल्या शिवसेनेचं कसं होणार, असा प्रश्न निष्ठावंत शिवसैनिकांना निश्चितच पडला आहे. खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि प्रदीप जयस्वाल या तिघांचे तीन गट शिवसेनेला आतमधून अक्षरशः पोखरू लागले आहेत, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. खासदार खैरे यांनी जयस्वालांची कोंडी केली. त्यामुळं जयस्वाल यांनी आपला स्वतंत्र मार्ग निवडला.

विश्वनाथ नेरूरकरांसारख्या नेत्यानं ‘पकड’ बसवण्याचा प्रयत्न केला म्हणून शिवसेनेचा संभाजीनगर बालेकिल्ला आजही शाबूत दिसू लागला. जोपर्यंत इथं अंतर्गत असणारे वाद-तंटे मिटणार नाहीत तोपर्यंत शिवसेनेची विस्कळीत झालेली घडी बसणार नाही, हेही तेवढंच खरं. लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या काळात शिवसेनेला थोडंही डोकं वर काढता आलं नाही. आता शिवसेनेला तिथं उभं राहण्याची पूर्ण संधी आहे. जिल्हाप्रमुख सुभाष काटे यांनी संघटनात्मक बांधणी चांगल्या प्रमाणात तिथं केलेली आहे; पण ती पुढे वाढली नाही. चांगले संपर्कप्रमुख दिले तर तिथंही संघटन वाढेल, यात शंका नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाड्याकडं स्वतः लक्ष दिलं म्हणून शिवसेना वाढली; पण उद्धव ठाकरेंच्या काळात तसं अजिबात झालं नाही. उपनेत्यावर सेनावाढीचा ‘भार’ टाकण्यात आला. त्यांनी आपल्या ‘मर्जी’तल्यांना पाहिजे ते देऊन टाकलं आणि बाकीच्यांवर अन्याय केला. उद्धव ठाकरेंना आता ही ‘मर्जी’ टाकणारी मोहीम मोडीत काढावी लागणार आहे, तरच मराठवाड्यात शिवसेना वाढेल, भगवा झेंडा अभिमानानं फडकेल; नाहीतर अलीकडं शिवसेनेच्या ‘पाचवी पुजलेला’ इतिहास कायम राहील, यात शंका नाही.

"शिवसेनेमध्ये पूर्वीसारखी ऊर्मी आज दिसून येत नाही. एकेकाळी शिवसेनेमध्ये जी तीव्रता होती, त्यांची काम करण्याची पद्धत होती. ती आज अद्याप शिल्लक नाही. शिवसेनेला पोषक असं वातावरण त्यांच्याच पक्षामधून मिळत नाहीत. त्याची कारणं कोणती, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे."
- संजीव उन्हाळे
ज्येष्ठ पत्रकार, औरंगाबाद


People in this conversation

Comments (2)

  • श्री.संदीप,
    तुमचा लेख आज वाचला.छान आणि अभ्यासपूर्ण आहे.पण आजच्या मराठी राजकीय वातावरण ह्यामध्ये, निष्ठा, श्रद्धा, ह्यांचा अभाव, फितुरी आणि स्वार्थासाठी काहीही करण्याची तयारी हे रिपु मनसोक्त वावरत आहेत.असे जाणवत राहते. मी काही राजकीय क्षेत्रातील नाही. पण एक वाचक म्हणून आणि निवृत्त मुख्याध्यापिका असल्यामुळे ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

  • प्रिय संदीप , खुप खूप शुभेच्छा !!!!!

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारा तरुण तडफदार पत्रकार म्हणून ओळख. गेल्या 10 वर्षांपासून संदीप पत्रकारितेत. शिक्षण, राजकारण आणि ग्रामीण विकास हे आवडीचे विषय. 'सर्व शिक्षा अभियानातील घोटाळा', 'बोगस विद्यार्थी संख्या' हे विषय महाराष्ट्राच्या समोर आणले. त्याबद्दल यंदाचा बाबा दळवी पुरस्कार.