EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

सिटी लाईफ

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1313
  • 0 Comment

एके काळी चित्रपटांची नावं 'गँवार', 'गाँव हमारा शहर तुम्हारा', 'भोलाभाला', 'अनाडी' अशी असत. गावात राहणारा निरागस, भाबडा नायक शहरात आला की, भांबावून जायचा. शहरातले एकजात सर्व लोक चोर, लूटारू, बदमाष असतं. या लोकांना धडा शिकवून नायक अखेर आपल्या लाडक्या गावी लाडक्या नायिकेसह परते!

सध्याच्या व्यापारी जगाची लागण खेड्यांनाही लागली असून, तिथल्या माणसांना 'गरीब बिचारा' राहून चालत नाही. कारण उद्योगपती आणि सरकार दोघंही त्यांच्या जमिनी ओरबाडून खाण्यासाठी टपलेले आहेत. ग्रामीण भागात स्त्रियांना जगणं अगोदरपासूनच कठीण झालंय.  कारण सरंजामी आणि शोषणयुक्त व्यवस्थेची तीच प्रमुख बळी ठरते. बरं कोणी अब्रू घेतली तरी परंपरेच्या ओझ्यामुळं बोलायची भीती. शहरात विकृत प्रेमवीर, उनाड पोरं, गुंडपुंड यांना रान मोकळं आहे. पोलीस, वकील, डॉक्टर, न्यायालय कोणाचीच खात्री नसल्यामुळं गेल्या काही वर्षांत शहरांमधून बलात्कारांचा कहर झालाय. शहरं असुरक्षित, जीवघेणी आणि बकाल बनत चाललीत. पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, मुंबई... सर्व महानगरपालिकांचा भ्रष्टाचार कॅगनं चव्हाट्यावर आणला आहे. शहरातील शाळा-कॉलेज, इस्पितळं, घरं, वाहतूक, नोकऱ्या, कायदा-सुव्यवस्था ही परिस्थिती सुधारली नाही, तर जनता दिल्लीसारखी रस्त्यावर येऊन प्रश्न विचारील.

'भारत खेड्यात राहतो,' असं महात्मा गांधी म्हणत असत. अलीकडं तो मोठ्या प्रमाणात शहरातच राहतो, असं म्हणावं लागेल! जगभरच ही परिस्थिती असून, शहरांमधील सोयी वाढवण्यास अग्रक्रम दिला जातो. प्राचीन इतिहासात डोकावून पाहिलं, तर नगरांमधल्या प्रजेची काळजी वाहिली जात असे. जेम्स द ग्रेटर हा स्पेनचा पॅट्रन सेंट किंवा तारक संत होय. त्याचं समाधी मंदिर सांदियागोला असून, (सांदियागो म्हणजेच स्पॅनिशमधील सेंट जेम्स) तिथं दिंडीनं जाण्याची प्रथा फ्रान्समध्ये लोकप्रिय होती. यात्रिकांचे चार रस्ते रूढ झाले होते. इसवी सनाच्या बाराव्या शतकात या पाच वाटांचा उल्लेख सापडतो. स्वित्झर्लंड आणि इटलीतून अशाच वाटा येऊन सांतियागोला मिळत. या वाटांवर यात्रेकरूंचे तांडे वाढले, तेव्हा ठिकठिकाणी स्थानिक राज्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी विश्रांतिगृहं बांधली, रुग्णालयांची सोय केली आणि धर्मपीठही स्थापलं.

भारतातील प्रथम इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांचा विचार केला तो ब्रिटिशांनी. त्यातून शहरीकरणास चालना मिळाली. लक्ष्मीबाई टिळकांनी रेल्वेगाडीच्या डब्याबद्दल प्रथम ऐकलं, तेव्हा त्यांची समजूत झाली की,  लाडवाच्या डब्यासारखे हे डबे असतील नि त्यात उतारू बसले की वरून झाकण लावत असतील! 1815मध्ये लॉर्ड एल्डन यांनी डायरीत लिहिलं की, 'रेल्वेगाडीच्या संभाव्य वाहतुकीमुळं लोक प्रक्षुब्ध होते.' अगदी ब्रिटनमध्ये जॉर्ज स्टीफन्सननी लिव्हरपूल-मँचेस्टर रेल्वेचा आराखडा सादर करताच हलकल्लोळ माजला. 'देश धुरानं काळवंडून जाईल,' असा इशारा देण्यात आला! आज जागतिकीकरणामुळं 'शहरं गावाला खायला उठतील,' अशी भीती व्यक्त केली जाते. त्याच वेळी पुण्यासारख्या ठिकाणी कित्येक गावं पालिका हद्दीत जाण्यास उत्सुक असतात... शहरीकरणाचा ग्लोबल चेहरा निरखताना आपल्याला अशी मुळापासून सुरुवात करावी लागते. एका पाश्चात्त्य नगररचनातज्ज्ञानं म्हटलंय की,
“Urbanization is not morely a modern phenomenon, but a rapid and historic transformation of human social roots on a global scale. Whereby predominantly village culture is leeing rapidly replaced by predominantly urban culture.”  

आशिया खंडाचा विचार केला तर ढाका, कराची, मुंबई, दिल्ली, मनिला, सोल, बीजिंग इथं प्रत्येकी दीड ते दोन कोटी लोक राहतात. शांघाय आणि टोकियोत पुढील दशकात प्रत्येकी चार कोटी लोक राहत असतील. मेक्सिको, सॅन पावलो, न्यूयॉर्क, लागोस आणि कैरो ही दोन कोटी रहिवासी असण्याच्या दिशेनं वाटचाल करणारी शहरं. एकोणिसाव्या शतकात शिकागोची, विसाव्या शतकाच्या मध्यास टोकियो आणि मुंबईची वाढ ही मुख्यत: स्थलांतरितांमुळं झाली. आर्थिक संधींसाठी माणसं येतात आणि शहरं फोफावतात. गावातली शेती कुंठितावस्थेत असते, त्यात पोट भरत नसल्यानं, उदरनिर्वाहासाठी शहरांकडं ओघ वाढतो. अनेकांना गावातलं साचलेपण, तिथलं संकुचित वातावरण नाही रुचत. त्यांना शहरांचं मुक्त अवकाश खेचून नेतं.

'यूएन वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्टस् रिपोर्ट' नुसार, 1900मध्ये जगातली शहरी लोकसंख्या एकूणाच्या 13टक्के (22 कोटी) होती. 1950मध्ये ती 29टक्के (73 कोटी) आणि 2005 मध्ये 49टक्के (320 कोटी) झाली. 2030मध्ये जगातील 60टक्के माणसं (490 कोटी) शहरी असतील, असा नियोजनकारांचा होरा आहे.

'यूएन स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट' उद्बोधक आहे. 'अर्बन मिलेनियम' किंवा 'शहरांचे सहस्रक' हा शब्दप्रयोग त्यातच सापडतो. विशेष म्हणजे, जगातल्या शहरीकरणाच्या विकासवेगात 93टक्के वाटा विकसनशील देशांचा, त्यातही 80टक्के हिस्सा आशिया आणि आफ्रिका खंडाचा असेल, असा अंदाज आहे. परंतु सध्या तरी चीन, भारत, स्विझर्लंड आणि नायजेरियापेक्षा, अमेरिका आणि ब्रिटनमधील शहरीकरण अधिक आहे. काही देश उपनगर आणि शहरी क्षेत्रं, अशी विभागणी करतात. अमेरिकेतलं शहरीकरण जॅक्सन होल, वायोमिंग, कोलाराडो, न्यू मेक्सिको, डग्लस कंट्री इथं त्याप्रमाणात पोहोचलं नाही. ब्रिटनमध्ये स्वीडन, वुल्टर्शायर, मिल्टन केन्स, बार्मिंगहॅमशायर इथं नवं शहरीकरण झालं. युरोपातील सर्वाधिक विकासदर तिथलाच.

शहरांमध्ये दैनंदिन खर्च जास्त असतो. ताणतणाव असतो. एकटेपणा येतो आणि 'सोने में जतन आँख मैं तूफान सा क्यू है, इस शहर में हर शक्स परेशा सा क्यूं है',  अशी भावनावस्था होते. अगदी महानगरांमध्येही मुख्य भागातून (गिरगाव) दूरस्थ भागात (मुलुंड, बोरिवली) असं स्थलांतरण होतं. यास 'उपनगरीकरणाची प्रक्रिया' असं म्हणतात. मोठ्या शहरात भांडवल, बाजारपेठ, सेवा, नोकऱ्या, स्पर्धा हे सर्व काही असतं. व्यापार, धंदा, पर्यटनाच्या शोधात माणूस तिथं जातो. जिथं बंदर असेल, बँकिंग सुविधा असतील, तिथं नागरिक आकर्षिले जातात.
   
ग्रामीण भागात दुष्काळ, पूर ही संकटं येतात; तसंच शेतीउपन्न कमी असल्यामुळं लगेच गाव सोडून शहराचा रास्ता धरतात. उदाहरणार्थ, थाई शेतकरी गरीब, अडाणी आणि रोगट आहे. तरुण थाई माणूस शेती सोडत असल्यानं, भातशेतीचं पारंपरिक ज्ञान कमी होत आहे. त्याबरोबरच शहरी दुर्गुण गावच्या मातीत रुजायला लागले आहेत. शेजारच्यांना लावणी-छाटणीत, झोपडी-घरकुल बांधायला मदत करण्याची वृत्ती लोप पावत आहे. माणुसकी, कृतज्ञता कमी होत असल्यानं निरीक्षण पाहण्यातून समोर आलंय. माणसांमध्ये स्थूलत्व वाढलंय.

अमेरिकेत शेतीच्या औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळं लहान-मध्यम शेतीस फटका बसला. त्यामुळं ग्रामीण शेतमजूर संपले. शहरीकरणाचे असेही तोटे असतात.

इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या संशोधक मधुरा स्वामिनाथन यांनी अभ्यासांती काढलेल्या निष्कर्षानुसार, शहरी अर्थव्यवस्थेत उत्पन्न खूप, तेवढाच खर्चही जास्त असतो. त्यामुळं शहरात आल्याचा फायदा होतो की तोटा हे सांगणे महाकठीण आहे!

शहरं वसवायची, वाढवायची तर जमीन हवी. चीनमध्ये सेझसाठी वगैरे सक्तीनं भूमिसंपादन करण्यात आलं. हुकूमशाही असल्यानं लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतात. आपल्याकडच्या सनातनी डाव्यांना हे दिसत नाही. भारतातलं कुसळ मात्र त्यांना दिसतं. भारतात29टक्के तर चीनमध्ये 51टक्के शहरीकरण झालंय.

चीनच काय, कोलंबियातील बोगोटामधील लोकांना त्यांच्या शेतामधून हाकलण्यात आलं. शहरांमध्ये उत्तम शाळा कॉलेज, इस्पितळं असतात. ज्येष्ठांच्या दृष्टीनं शहरं सोयीची असतात.

काही शहरं मागे पडतात, काही सुसाट वेगानं पुढे जातात. जपानमध्ये मंदी असतानाही टोकियोनं इतर शहरांना मागे टाकलं ते आपल्या चैतन्यशीलतेच्या बळावर! डेट्रॉइट, फिलाडेल्फिया या जुन्या कारखानदारी नगरीपेक्षा न्यूयॉर्कने प्रगती केली आणि त्यामुळं तिथली लोकसंख्याही फुगली.

एरिक हॉबसन्सचं 'एज ऑफ रिव्हॉल्यूशन' हे पुस्तक गाजलं आहे की, 1790 ते 1845पर्यंत जगात झालेला शहरांचा विकास वर्गावर्गातील भेदांना ठळक करणारा होता. म्हणजे सरकारमधले अधिकारी गण, व्यापारी व उद्योजक यांच्या वस्त्या वेगळ्या आणि श्रमिकांच्या निराळ्या. युरोपात good west end, poor east end अशी विभागणी होती. मोठ्या शहरांतील गरिबांच्या वस्त्यांमध्ये नैऋत्येकडील शहरं पसंत करत. गरिबांना मात्र 'चॉ़इस' कमी होता.

मागास आणि विकसनशील देशांत विषमता तीव्र असते. त्यामुळं कुशल-अकुशल मजुरांना सामावून घेणाऱ्या धोरणांचा पुरस्कार करण्यात आला. परंतु वास्तवात ती अंमलात आणली जात नाहीत. त्यामुळंच मुंबईतील गिरण्या बंद होऊ देण्यात आल्या. गिरण्यांच्या जमिनी बिल्डरांनी लाटल्या आणि त्यांना मुंबईत घरं देण्याचं आश्वासन देऊन, प्रत्यक्षात मुंबईबाहेरच्या घरांचं गाजर दाखवण्यात येत आहे.

मगाशी ज्या न्यूयॉर्कचा उल्लेख केला, तिथं एकोणिसाव्या शतकाअखेरीस पूर्व आणि दक्षिण युरोपातून लोक स्थलांतरित होऊ लागले. ते भाड्याच्या घरात राहत. कनिष्ठ वर्गीयांसाठी असलेली ही घरं अंधारी, कोंदट आणि अस्वच्छ होती. त्यानंतर प्रागतिक पर्वात (म्हणजे 1900-1920) हे चित्र पालटू लागलं. 'टेनामेंट हाऊस कमिशन' नेमण्यात आलं आणि त्यानं अनेक सुधारणा सुचवल्या. स्थलांतरित आणि झोपडवासीयांसाठी सेंटलमेंट हाउसेस बांधण्यात आली. या 'हाउसेस'च्या परिसरात, प्रत्येक घरात लहान मुलांसाठी स्वतंत्र खोली, त्यांना खेळण्यासाठी अंगण, क्लब रूम्स, अग्निअवरोधक यंत्रणा वगैरे सोई करण्यात आल्या.
   
मूळ जर्मनीचा असलेल्या फेलिक्स अॅंडरसननं 'सोसायटी फॉर एथिकल कल्चर'ची स्थापना केली. तो कॉर्नेल विद्यापीठात हिब्रू शिकवायचा. त्यानं न्यूयॉर्क आणि इतरत्र उद्यानं आणि मैदानं विकसित करण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळं 1908च्या आसपास न्यूयॉर्कमध्ये सहा ते सात हजार एकर हे केवळ मैदानाचं क्षेत्र होतं. आपले राज्यकर्ते मात्र मुंबईसारख्या ठिकाणी मैदानांचा बळी घेऊन नागरिकांना गुदमरवून टाकत असतात. कधी पंचतारांकित क्लबसाठी, खाजगी संस्थेसाठी वा कधी एखाद्या स्मारकासाठी मैदानांचा घास घेतला जात असतो.

अॅंडरसननं आणखी एक गोष्ट केली, ती म्हणजे त्याने होमोजिनस किंवा एकसाची अमेरिकन संस्कृतीस विरोध केला. अमेरिकेत विविध ठिकाणांहून लोक आले आहेत, त्यांची संस्कृती, भाषा जपण्याची आणि विविधतेतून एकता साकारण्याची भूमिका त्यानं घेतली. परप्रांतीय दिसला की त्याला हाण, असं तिथलं धोरण नव्हतं!

1865च्या नागरी युध्दानंतर अमेरिका एकत्र आणि सामर्थ्यशील देश म्हणून उभा राहिला. देश उभा करण्यात तीन कोटी युरेपियनांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मेहनतीतून शेती आणि उद्योगधंदे उभे राहिले. एकोणिसाव्या शतकाअखेरीस अमेरिकेत टेलिग्राफ, पोलाद, रेल्वेजाळ्यातून विकासप्रक्रिया गतिमान झाली. कोळसा, लाकूड, तेल आणि शेतीच्या साधनसंपत्तीतून दुसरी उद्योगक्रांती झाली.

थोडक्यात, प्रगत देश असोत की मागास, तेथील विकास हा स्थलांतरण आणि वाढतं शहरीकरण या मार्गानंच होतो. चीनमध्ये शहरांमधील पायाभूत सुविधांवर भर दिला जातो. सार्वजनिक वाहतूक प्रकल्प बांधून ते ऑपरेट करणाऱ्या कंपन्यांना सवलतीत वीजपुरवठा केला जातो. करसवलती दिल्या जातात. बीजिंगमध्ये रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्यानं छोटी प्रवासी वाहनं द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यावरून विनाअडथळा सोडण्याचा उपाय योजण्यात आला. चीनमधील हायस्पीड पॅसेंजर ट्रान्सपोर्ट नेटवर्क 2015 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यात चार पूर्व-पश्चिम आणि चार उत्तर-दक्षिण मिळून एकूण 18 हजार कि.मी.चं हायस्पीडचं जाळं विणलं जाणार आहे. चीनमध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीचे स्वतंत्र रेल्वेमार्ग केले जात असून, त्यामुळं वाहतूकक्षमता वाढणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत रेल्वेगाड्यांचा वेग सहापटीनं वाढवण्यात आलाय. जगातील 'बिझिएस्ट' प्रवासी रेल्वे चालवणारा हा देश आहे.
   
भारतात सर्वाधिक शहरीकरण महाराष्ट्रात झालंय. आपल्याकडंही शहरांमध्ये सुधारणा करण्याचे काही प्रयोग होत असतात. उदाहरणार्थ, पुण्यात कागद, काचपत्र, कष्टकरी पंचायतीच्या माध्यमातून स्वच्छताकार्यात प्रगती झाली. कचरावेचक व्यक्तींना ओळखपत्र देण्यात आलं. अमरावती महानगरपालिकेनं 24x7 पाणीपुरवठा करण्यात यश मिळवलं. त्यासाठी बेकायदा नळ कनेक्शन्सचा बंदोबस्त केला आणि उत्पन्न वाढवलं. गरिबांना सवलतीत पाणीपुरवठा केला, असे आणखी प्रयोग झाले पाहिजेत.
   
भारतात 1950-51मध्ये जीडीपीतील शहरांचा वाटा 29 टक्के होता, जो आज 65टक्क्यांवर गेलाय. तरीसुध्दा चीन (32टक्के), इंडोनेशिया (37 टक्के), जपान (78 टक्के), दक्षिण कोरिया (83 टक्के) आणि पाकिस्तानपेक्षा (30 टक्के) भारतातील नागरीकरण (28 टक्के) कमी आहे. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनच्या माध्यमातून सुधारणा राबवल्या जात आहेत. पण त्यात भ्रष्टाचार आणि दिरंगाईचं प्रमाण मोठं आहे.
   
'मॅकेन्सी' या जगविख्यात आर्थिक सल्लागार कंपनीच्या मते, आगामी 15 वर्षांत नागरीकरण वाढेल ते मुख्यत: पूर्व तसंच आग्नेय देशातच. त्यातही चीन आणि भारत आघाडीवर असतील. ही आघाडी घेताना शहरं बकाल न बनता सुस्थिर आणि समृध्द जीवन बहाल करतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.