EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

ये काम तो है हमदर्दों का!

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1313
  • 0 Comment

स्त्री-अत्याचार आणि त्याची वेगवेगळी रूपं प्रखरपणं माध्यमांमधून पुढं येत आहेत. दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या संदर्भात जे काही प्रतिकूल, अन्यायकारी घडत असेल, त्याबद्दल निदान आवाज तरी उठवला जाऊ लागला आहे. अर्थात, त्यामुळं अत्याचारांमध्ये खंड पडला आहे असं नाही, स्त्रीकडं बघण्याचा एकूणच समाजाचा दृष्टिकोन किती दूषित आहे याचीही चर्चा विशेषत्वानं होऊ लागली आहे. कलांच्या आविष्कारातही ही दूषित नजर आढळते यावरही भर दिला जाऊ लागला आहे. दिल्ली घटनेनंतर विशेषतः आक्षेप घेतला गेला, तो हनी सिंग या पंजाबी गायकाच्या गाण्यांना. खास करून त्यातील शब्द आणि आशयाला.

 

‘मैं हूँ बलात्कारी’ आणि ‘केंदे पेचायिया’ या दोन गाण्यांवर तर प्रखर टीका होत आहे. ही गाणी अतिशय अश्लील, उत्तेजक शब्दकळेची आणि हिणकस मनोवृत्ती दर्शवणारी आहेत, असा आरोप करत लखनौतील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी हनी सिंगवर भारतीय दंड विधानाच्या 292, 293 आणि 294 या कलमांतर्गत खटलाही दाखल केला आहे. दिल्लीत ती घटना घडल्यानंतर कल्पना मिश्र यांनी change.org या संस्थेतर्फे हनी सिंगवर ऑनलाईन याचिका दाखल केली. त्याची गाणी आणि त्यांतील शब्द हे सभ्य समाजानं नाकारावेच असेच आहेत. महिलांबाबतचा तिरस्कार आणि अन्याय यांना खतपाणी घालणाऱ्या या गाण्यांवर तीव्र नापसंती या याचिकेत दर्शवण्यात आली होती. ही गाणी ऐकून लोक बहकू शकतात, असं या कल्पना मिश्र म्हणतात. कोण आहे हा हनी सिंग आणि का लिहितो तो महिलांचा अपमान करणारी, स्त्रियांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांना प्रेरित करणारी गाणी?

पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातल्या एका गावचा असलेला हनी सिंग आपल्या व्द्यअर्थी गाण्यांमुळं लोकप्रिय झाला. मग तो इंग्लिश रॅप गाऊ लागला. नंतर पंजाबी गाण्याकडं वळला. अश्लीलता असलेली त्याची गाणी (ज्यांचे शब्द इथं देता न येण्यासारखे आहेत) मुलींबद्दल गैर गोष्टी आणि जहरी विचार पसरवणारी होती आणि आहेत. ‘’ब्राऊन रंग और हाय हील्स’सारखी गाणी प्रचंड हिट झाली आणि लग्नाच्या पाटर्यांमध्ये आणि पब-डिस्कोमध्ये ती वाजू लागली. त्याने ‘रेस 2’, ‘कॉकटेल’, ‘खिलाड़ी 786’, ‘सन ऑफ सरदार’ आणि इतर काही चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. पंजाबी मानसिकतेच्या पुरुष वर्गाला, विशेषतः तरुणांना हनी सिंगची गाणी आवडतात, कारण हा तरुण पुरुष म्हणे आजच्या शिकल्यासवरल्या, आर्थिक-वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रीमुळं त्रस्त आहे, त्याला तिचं भय वाटतं आणि या असुरक्षिततेच्या भावनेमुळं, स्त्रीला तिची जागा दाखवून दिली पाहिजे, अशी त्याची मानसिकता बनली आहे; या पद्धतीची मांडणी केली जाते. हनी सिंगला जे व्यावहारिक यश मिळालं आहे ते पाहता त्याची लोकप्रियता लक्षात येतेच. पण दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर ‘मैं हूँ बलात्कारी’ हे त्याचं गाणं गाजवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा मात्र हे प्रकरण त्याच्या अंगाशी आलं. कारण लोकांच्या भावना भडकलेल्या असल्यानं त्याच्यावर खटलाच दाखल झाला.

यानंतर या खटल्यास कसं वळण मिळतं आणि हनी सिंगवर काही कारवाई होते की नाही याबद्दल आताच नेमकं सांगता येणार नाही. तसंच इतके दिवस महिलांचा अपमान करणारी गाणी गाऊन हनी सिंगनं नाव आणि पैसा मिळवला, हेही विसरून चालणार नाही. मात्र, त्याच्या गाण्यांना तीव्र आक्षेप घेण्याचं पाऊल उचललं जातंय, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. काही जण तर हनी सिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावलेत आणि गाण्याच्याच माध्यमातून हनी सिंगसारख्या विघातक गीतकार-गायकांवर प्रश्नचिन्ह उमटवणारी गाणी लोकांसमोर ते घेऊन येत आहेत. रवींद्र रंधावा आणि स्वरा भास्कर ही अशीच एक जोडी. दिल्ली घटनेतल्या त्या मुलीवर ओढवलेला प्रसंग भयंकर आणि क्रूर होताच. तिचा त्यात दुर्दैवी मृत्यूही झाला. पण या मुलीकडं फक्त एक बळी म्हणून न पाहता, तिनं अत्याचाऱ्यांशी केलेला संघर्ष महत्त्वाचा होता, ही गोष्ट डोळ्यांसमोर ठेवून या दोघांनी आपलं गाणं रचलं आहे. तिच्या मृत्यूबद्दल शोक करण्यापेक्षा त्या मुलीच्या धैर्याला सलाम करत हे गाणं त्यांनी लिहिलं आहे...

मा नी मेरी मैं नी डरना
तेरे वरगा मैं नी बणना

हे ते गाणं त्या मुलीची व्यथा मांडणारं आहे. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाला आई, वडील, पोलीस, नेते सारेच जबाबदार कसे आहेत, ही भावना व्यक्त करणारं हे गाणं सध्या खूप गाजतं आहे. आईला ही मुलगी विचारते की तू मला घाबरायला का शिकवलंस, पण मी नाही आता घाबरणार.

मा न मेरी मिट्टी मूरत
मैं नी गूँगा पत्थर बणना

वडिलांना ती म्हणते, तुम्ही मला नेहमी सांगायचात की लवकर घरी ये, पोलिसांनाही ती दोष देते की, त्यांची मानसिकता जुनाटच आहे. इज्जतीला जपण्यासाठी मुलीनं घरीच बसावं असं ते सांगतात. नेतेमंडळींची मानसिकताही तशीच, असा तिचा आरोप आहे. पुरुषावर हल्ला झाला तर त्याच्या जीवावर बेततं, पण मुलीवर हल्ला झाला तर मात्र तिच्या आणि कुटुंबाच्या इज्जतीचा सवाल का असतो, असाही प्रश्न ती विचारते. मी तर लढून आले, मी हरले नाही, असं ती अभिमानानं सांगतेय...

देख माये, मैं लड के आई
नाज़ है मुझको अपने उपर
बेबस उनको करके आई
बेबाकी से हँसने आई
मैं तो वापिस बसने आई...

त्या मुलीवरच्या प्रसंगाला सारा समाज कसा जबाबदार आहे, हे सूत्र मांडणारं हे गाणं ठाम भूमिका घेतं, ठोस आरोप दाखल करत अवतरतं. सारेच जण त्या अत्याचारात एक प्रकारे सामील होते, असं मत नोंदवतं –

उन छः में शामिल तुम भी थे
ये काम तो है हमदर्दों का

अत्याचाराला सामोरं जावं लागणाऱ्या असंख्य मुलीबाळींची आणि महिलांची व्यथा मांडणारं हे गाणं म्हणजे दिल्लीतल्या त्या मुलीच्या धैर्याला आणि शौर्याला दिलेली सलामीच आहे. आता असा प्रश्न विचारता येऊ शकतो की, अशा गाण्यांमुळं काही फरक पडतो का वा अन्यायाला आळा बसू शकतो का? पण जर हनी सिंगसारख्याची गाणी जर पुरुषांच्या मनातल्या भावना उद्दीपित करत असतील, तर अशा प्रेरक आणि विचार करायला लावणाऱ्या गाण्यांमुळे लोक आत्ममग्न, अंतर्मुख होऊन का नाही विचार करणार!

भाषणांपेक्षा अनेकदा गाण्याचं माध्यम प्रभावी ठरू शकतं हे आजपर्यंतचं सत्य आहे. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमधून जिची गाणी मोठ्या जमावापर्यंत गेली, ती कमला भसीन समाजाला जागं करणारी, अन्यायाला वाचा फोडणारी गाणी लिहिण्या-गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या ‘संगत’ या संस्थेच्या माध्यमातून ती स्त्रियांसाठी अनेक उपक्रम राबवत आली आहे.

स्त्रीभ्रूणहत्या असेल, वा मुलींना अन्यायकारक पद्धतीनं मिळणारी वागणूक असेल, समाजात त्याबद्दल जागृती यायलाच हवी. ‘बेटी हूँ मैं बेटी, मैं तारा बनूँगी’सारखं गाणं मुलींना ताकद देणारं आणि त्यांना वाढवणाऱ्या पालकांनाही दिलासा देणारं आहे. नारायण सुर्वे यांनी ‘असं पत्रात लिवा’ हा हिंदी गाण्याचा केलेला अनुवाद आणि ‘ऐसा ख़त में लिखो’ हे मूळ गाणं महिला चळवळीतलं एक प्रेरक गाणं बनून गेलं. दया पवारांचं ‘बाई, मी धरण बांधते, माझं मरण कांडते’ हे गाणं मोठ्या धरणांविरुद्धच्या लढ्याला एक नवा आवाज देणारं ठरलं.

समूहाला हाक घालताना, जमावाच्या भावनांना साद घालताना गाण्यातून संदेश पोचवणं हे प्रभावी ठरतं. या साऱ्याच्या पलीकडं जाऊन असंही म्हणावंसं वाटतं की, अशी गाणी किंवा कोणतीही कलाकृती जेव्हा समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करते, काही संदेश देण्याचा हेतू ठेवून अवतरते तेव्हा तिचं मूल्यवर्धन होतं. आणि तसंही, कला केवळ मनोरंजनासाठी, चार घटकांच्या पोकळ करमणुकीसाठी नसतंच मुळी. प्रतिगामी मूल्यांशी झगडताना, अन्यायाशी लढताना अशी गाणी मनाला उभारी देतात. मानवी जीवनातलं सत्य, शिव आणि सुंदर कला मांडू पाहत असते आणि हे करताना असुंदरावरही ती बोट ठेवत असते हे आपण कधीही विसरता नये. ‘ये काम तो है हमदर्दों का’ ही स्वरा-रवींद्रच्या गाण्याची ओळ गाण्यातील आरोपाच्या सुरापेक्षा एक वेगळा आणि आश्वासक सूर घेऊन तसंच दिलासा बनून लोकांना जागं करणारी ठरावी! ठरेल का?

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.