EasyBlog

This is some blog description about this site

ग्लोबल व्हिलेज

जयपूर लिटररी फेस्टिव्हल

 • Font size: Larger Smaller
 • Hits: 2004
 • 2 Comments

रतन सिंग हा ३८ वर्षांचा शेतकरी. त्याला पाच मुलं आहेत. वर्षातील १० महिने शेती आणि दोन महिने सायकल रिक्षा चालवणं या पद्धतीनं तो काम करतो. जयपूरमध्ये फेस्टिव्हलच्या निमित्तानं गेलो असता तो भेटला. जयपूरमध्ये आजही सायकल रिक्षा चालतात. यात दोन माणसं बसू शकतात. १५ वर्षांपूर्वी दिल्लीत अशा सायकल रिक्षा पाहिल्या तेव्हा त्यात बसणं अवघड वाटलं होतं. पण आता इंधन टंचाई, महागाई यावर सायकल रिक्षा हा इकोफ्रेंडली उपाय वाटतो. रतन सिंग ग्रॅज्युएट आहे. आर्ट्सला सोशियॉलॉजी आणि साहित्य घेऊन त्यानं पदवी मिळवली. रिक्षा चालवून त्याला दिवसाला ४०० रुपये मिळतात. हे पैसे तो शेतीवर खर्च करतो. सरसो, बाजरी आणि ज्वारी ही तीन पिकं तो घेतो. त्यावर वर्षाला एक लाख रुपये मिळतात.

 

रुचिर शर्मा हा इन्वेस्टमेंट बॅँकर आहे. 'ब्रेकाआऊट नेशन' हे त्याचं पुस्तक सध्या गाजतंय. मॉर्गन स्टॅनलेमध्ये उच्चपदस्थ विश्लेषक म्हणून तो काम करतो. अनेकदा रतन सिंगच्या वार्षिक उत्पन्नाइतके पैसे तो एका दिवशी खर्च करतो. वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाऊन तिथली परिस्थिती पाहून गुंतवणूक करता येते का, याचा सल्ला उद्योजकांना देणं हे त्याचं काम आहे. यासाठी तो दर महिन्याला एक आठवडा विकसनशील देशांमध्ये काढतो. यात थायलंड, इंडोनेशिया, आफ्रिकेतील नायजेरिया हे देश येतात.

जयपूरमध्ये एकाच दिवसात भेटलेली ही दोन माणसं. पूर्ण वेगळ्या स्तरावर मनानं आणि परिस्थितीनं जगणारी. रुचिर शर्मा सांगतात, अनेक देशात मी जातो. मला तिथं आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं. कारण जे देश मला राहायला, सुट्टी घालवायला आवडतात ते देश इन्व्हेस्टमेंट करायला चांगले असतातच असं नाही. शर्मांचं म्हणणं असं की, ज्या देशात बिलीयनर्स म्हणजे शंभर कोटी डॉलर्स संपत्ती असलेले लोक १० टक्के आहेत. त्यांची यादी वाढत नसेल तर तो देश काही गुंतवणुकीसाठी चांगला नाही. दुसरा मुद्दा असा की जे देश खनिज तेल, ग्राहकोपयोगी वस्तू यावर भर देतात आणि नव्यानं संपत्ती निर्माण करणारी साधनं निर्माण करत नाहीत, तेही देश गुंतवणुकीसाठी फारसे चांगले नसतात. तिसरा मुद्दा असा की सामान्य स्तरावरही काही निकष तुम्हाला देशाची परिस्थिती अजमावयाला उपयोगी पडतात. उदा. हॉटेलच्या भाड्यांमध्ये किती स्पर्धात्मकता आहे. उदाहरण देऊन ते सांगतात. फोर सीजनच्या रशियातील एका दिवसाचं भाडं एक हजार डॉलर असतं, तर थायलंडमध्ये तेच भाडं दोनशे डॉलर आहे. ही गोष्ट थायलंड गुंतवणुकीसाठी चांगली आहे हे दाखवते.

अनन्या वायपेयी ही अमेरिकेत प्राध्यापिका म्हणून काम करणारी अभ्यासिका आता पुन्हा भारतात येऊन स्थायिक झालेली आहे. दलित चळवळीबद्दल ती रिसर्च करते आहे. जयपूरमध्ये दोन सत्रात तिचा सहभाग होता. एक गांधीजींवरच्या चर्चासत्रात, तर दुसरा संस्कृत भाषेवरच्या चर्चेमध्ये. ती सांगते गांधीजींनी आयुष्यभर भगवदगीतेचा अभ्यास केला आणि आश्चर्य म्हणजे भगवदगीतेचं मोल अर्जुनाला हिंसा करायला सांगतं. पण गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा भगवदगीतेवरून घेतली. अनन्या वाजपेयी यांनी 'चारायटर्स रिपब्लिक्ज' हा ग्रंथ लिहिलाय. हॉवर्ड विद्यापीठातर्फे तो प्रकाशित झाला आहे. त्यात गांधी, नेहरूंबरोबरच टिळक, गोखले यांच्याही स्वातंत्र्य चळवळीतील कामगिरीचा वेध तिनं घेतला आहे. जयपूरचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णत: भिन्न संस्कृतीत वेगळ्या प्रकारे वाढलेली माणसं तिथं भेटतात. मग त्यात भालचंद्र नेमाडे, मकरंद साठे असे मराठी लेखक असोत किंवा ख्रिस्तोफोर रिक्ससारखा ऑक्सफर्ड डॉन असो, किंवा मायकेल सेंडलसारखा हॉवर्डचा फिलॉसॉफर असो.

ख्रिस्तोफोर रिक्स हे ऑक्सफर्डमध्ये विभाग प्रमुख आहेत. वर्षानुवर्षं ऑक्सफर्ड विद्यालय हे त्यांच्या पुराणमतवादासाठी प्रसिद्ध आहे. साहजिकच नव्याचं स्वागत करण्यात ऑक्सफर्डचा हात नेहमीच आखडता असेल. पण या ख्रिस्तोफोर रिक्स यांनी एका वेगळ्याच कवीवर ५०० पानी पुस्तक लिहिलं आणि खळबळ उडवून दिली. कारण त्या कवीला कवी नाही, तर गीतकार आणि गायक मानलं जायचं. हा कवी होता बॉब डीलन. बॉब डीलन त्याच्या च्ब्लोइंग इन द विंड्ज, च्तांबोरीन मॅनज्, च्टाईम्स दे आर चेंजिंग्ज अशा गाण्यांसाठी लोकप्रिय आहे. ही गाणी तो स्वत:च लिहितो आणि गातो. अफाट लोकप्रियता लाभलेल्या बॉब डिलनला समीक्षकांनी कधी कवी मानलंच नाही. पण रिक्स यांच्या ग्रंथानं त्याला ती मान्यता दिली.

मायकेल सॅंडल यांनी 'च्जस्टीस्ज' आणि 'च्मोराल लिमिट्स ऑफ मार्केटिंग-व्हॉट मनी कॅन नॉट बायज्' ही पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं व्याख्यान इथं झालं. त्यांचं म्हणणं असं की, मार्केटिंगमध्ये एखादी गोष्ट का खपेल किंवा एखाद्या गोष्टीची किंमत कशी वाढेल हे मार्केटिंग रिजनिंग देऊन सिद्ध केलं जातं. पण हे रिजनिंग नैतिक बाबतीत कुचकामी ठरतं. उदा. स्वित्झर्लंडमध्ये आण्विक कचरा टाकण्यासाठी सरकारनं बऱ्याच वस्त्यांमध्ये विचारणा केली. साधारणपणं ५१ टक्के वस्त्यांमधून होकार आला. नंतर सरकारनं असं जाहीर केलं की, ज्या वस्तीजवळ हा कचरा टाकण्यात येईल त्यांना घरामागे ८ हजार डॉलर मिळतील. हे सांगून सॅंडल यांनी विचारलं की, तुम्हाला काय वाटतं? पैसा देऊ केल्यावर टक्केवारी किती वाढली असेल? प्रेक्षकांनी म्हटलं ६५ टक्के, ७० टक्के, ८० टक्के वगैरे. सॅंडल म्हणाले, ही टक्केवारी कमी होऊन ३१वर आली याचं कारण काय असावं. अर्थात, सरकार पैसे देतं म्हणजे काहीतरी धोका आहे, असं कारण काहींनी दिलं. पण सरकारनं कचरा पूर्ण निर्धोक आहे हे पटवून दिलं तरीही टक्केवारी कमी का झाली. त्याचं उत्तर नंतर सॅंडल यांनी दिलं की, नागरिकांना ते लाच घेतल्यासारखं वाटत होतं. अशी बरीच उदाहरण देऊन त्यांनी म्हटलं, जेव्हा नैतिक मूल्यांचा प्रश्न येतो तेव्हा इथं मार्केटिंगमधील कारणमीमांसा चालत नाही, आणि आज आपल्या भोवतीच्या राजकारण आणि समाजकारणातील चर्चांचा स्तर खालावला आहे, कारण त्यात मार्केटिंग रिजनिंगचा वापर होत आहे.

तर जयपूरमध्ये भेटलेली ही काही माणसं. सरतेशेवटी सिमॉन सिंगचा उल्लेखही आवश्यक आहे. या ब्रिटनवासी भारतीयानं गेल्या काही वर्षांत फर्माचा सिद्धांत, कोडची पद्धत, क्वॉंटम फिजिक्स, आणि बिग बँग यावर पुस्तकं लिहिली आहेत. त्याचंही बिग बँग या विश्वरचनेच्या सिद्धांतावर एक व्याख्यान इथं झालं. या व्याख्यानानंतरच्या प्रश्नोत्तरात अगदी शाळकरी मुलांनीही भाग घेतला.
अर्थातच, आपल्या वादग्रस्त विधानानं गदारोळ उडवणारे आशीष नंदी इथं होते. शबाना आझमी, जावेद अख्तर, राहुल द्रविड आणि अर्थात, दलाई लामा. या साऱ्यांना भेटण्याची, ऐकण्याची आणि क्वचितच संवाद करण्याची संधी देणारा हा फेस्टिव्हल होता. एका वेळी इथं पाच वेगवेगळे कार्यक्रम चालू असत. अशी दिवसभरात साधारण सात-आठ सत्रं होती. जवळजवळ शंभरपेक्षा अधिक विषयांवर इथं चर्चा झाली. अगदी कामसूत्रापासून गांधी विचारांपर्यंत आणि हिंदी, इंग्रजीपासून संस्कृतपर्यंत भाषांच्या भवितव्याबाबत चर्चा झाली. त्या जोडीला अमजद अली खान यांच्या पुत्रांच्या सरोदवादनापासून हिंदी सिनेमा संगीतापर्यंत. विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम इथं होते. आणि मुख्य म्हणजे जी लेखक मंडळी इथं हजर होती त्यांची पुस्तकं अगदी शोधून शोधून इतं स्टॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. त्यात मकरंद साठे यांचं 'नाटकाच्या तीस रात्री'सारखं मराठी पुस्तकही होतं.

People in this conversation

Comments (2)

 • या माहितीबद्दल धन्यवाद. सूक्ष्म निरिक्षण व लिहायची शैली उत्तम. तू आता काहीतरी मोठे लिखाण का करत नाहीस?

 • साहित्य जगतात गेली काहीच वर्षे 'जयपूर' शहराचे नाव उल्लेखनीय झाले आहे. निमित्त अर्थातच 'जयपूर लिटररी फेस्टिवल'चे!
  या उत्सवावर आपल्या मराठीतून क्वचितच कुठे लिहून येते. आले तर तिथे झालेल्या वाद-कारणाचे निमित्त असते.
  परंतु त्या उत्सवावरचे आपले टिपण वाचले आणि ती उणीव थोडी दूर झाली पण ती उणीव होती याची जाणीव रुंदावली, ठळक झाली.
  हे आपले टिपण ज्या पृष्ठावर दिसते त्या 'भारत फॉर इंडिया' या शीर्ष-नामाने प्रश्न सहज मनात येतात ते विचारतो :

  * हा साहित्योत्सव भारताचा की इंडियाचा? कुणासाठी? भारत की इंडिया? त्यात 'भारत' दिसतो का? दिसला का?
  टिपणातील आपला पहिला परिच्छेद खूप बोलका आहे.
  * तिथे झालेल्या सर्व सत्रांची काही लिखित नोंद होते? प्रकाशित होते? उपलब्ध आहे?
  * तिथे संस्कृत भाषेच्या भवितव्यावर चर्चा झाल्याचे तुम्ही लिहिले आहे, त्या बाबत अधिक तपशील कुठे मिळेल?
  आपण स्वतः तिथे उपस्थित असल्याचे लिहिले आहे, कधीतरी आपल्याला भेटायला, गप्पा मारायला...खरे तर ऐकायला आवडेल. मिळेल...?
  आपले अन्य लेखन आवर्जून वाचतो.म्हणूनही भेटीची उत्कंठा आहे.
  -प्रमोद बापट
  ९८२१९७९८७१
  bapatpramod@yahoo.co.in

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

२२ वर्षं पत्रकारितेत असून चित्रकला, चित्रपट, साहित्यावर सातत्यानं लिखाण. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, चित्रलेखा यातून लेखन. वॉल स्ट्रीट जर्नल, फ्रान्स 24, टाइम साप्ताहिक या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांसाठी काम केलंय. दुर्मिळ पुस्तकांच्या व्यवसायाच्या माध्यमातून केलेल्या ग्रंथप्रसाराबद्दल पुरस्कार मिळालाय. स्वतःची दोन एकल चित्रप्रदर्शनं भरवली आहेत. दीपलक्ष्मी दिवाळी अंकाचं, तसंच औदुंबर, पुस्तकांच्या सहवासात, जनसंघ ते भाजप अशा पुस्तकांचं संपादन केलंय. लोकेशन NCPA मधून चालणाऱ्या साप्ताहिक काव्यवाचन गटाचं सहसंचालकपद भूषवलंय.