EasyBlog

This is some blog description about this site

गणराज्य

मंचरच्या विकासाची मानचिन्हं

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2459
  • 0 Comment

वास्तविक पाहता आंबेगाव मंचर परिसर हा दुष्काळी भाग होता. १९९० मध्ये आंबेगाव-मंचर  परिसराच्या लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी जनतेनं जेव्हा माझ्यावर सोपवली तेव्हा पाणी प्रश्‍न मार्गी लावण्याचं ठरवलं. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. पाण्याशिवाय शेती आणि शेतीशिवाय शेतकरी जगू शकणार नाही, ही बाब समोर ठेवत त्यांनी प्रथम सिंचन जाळं प्रकल्प उभारण्याकडं विशेष लक्ष दिलं. याचा पहिला टप्पा म्हणजे कुकडी प्रकल्पांतर्गत घोडनदीवर डिंभे धरणाची उभारणी केली.

फक्त धरणानं हा प्रश्‍न सुटणार नव्हता. त्यामुळं घोडनदीवर २० बंधारे आणि डिंभे धरणावर आठ बंधारे बांधले; तसंच उपसा सिंचन योजनाही राबवल्या. यथावकाश या अवर्षणप्रवण भागाचा कायापालट होऊ लागला. तालुक्यात पावसाची सरासरी ८६० मिमी असली तरी पाऊस पडण्यात सातत्य नसल्यामुळं पिकांचं बरंच नुकसान होत असे. या अवर्षणप्रवण परिस्थितीचा सामना आपल्या गावातील शेतकर्‍यांना करता यावा या हेतूनं परिसरात सिंचन प्रकल्पांचं जाळं उभारण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेला. आधी या भागात ज्वारी, बाजरी, मटकी, गहू, हरभरा यासारखी पिकं घेतली जात असत. परंतु सिंचन योजनांमुळं ऊस, टॉमॅटो, बटाटा या नगदी पिकांबरोबरच आंबा, द्राक्ष, सीताफळ यासारख्या फळांचंही उत्पादन घेतलं जातं. तसंच या सिंचन प्रकल्पामुळं शेतकर्‍यांना जरबेरा, कार्नेशिया आणि गुलाब यासारख्या फुलांचं उत्पादन घेणं शक्य होत आहे. शेतकर्‍यांच्या शेतात फुललेल्या या फुलांना आज परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

पाणी प्रश्‍न सुटल्यानं आपोआपच गावातील शेतीचा प्रश्‍न सुटला आणि त्याचबरोबर शेतीसोबतच्या दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम उद्योगांनाही चालना मिळाली. शेतीला पुरेसं असं पाणी मिळाल्यानं जनावरांना मुबलक चारा मिळू लागला. त्यामुळं दुग्धव्यवसायात वाढ झाली. १९९०च्या सुमारास आंबेगाव तालुक्यात पाण़ी आणि चार्‍याअभावी जेमतेम १८ ते १९ हजार लिटर दुधाचं संकलन होत असे. परंतु सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळं जनावरांना मुबलक चारा मिळाल्यानं येथील दुग्धव्यवसायही भरभराटीला आला आहे. आता सुमारे सहा लाख लिटर दुधाचं संकलन केलं जातं.

नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल
देशाची प्रगती ही शेतीवर जितकी अवलंबून असते तितकीच ती शिक्षणावरही अवलंबून असते. ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला उत्तम प्रकारचं इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळावं यासाठी नालंदा इंग्लिश स्कूलची सुरुवात करण्यात आली. नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीपासून दहावीपर्यंत शिक्षण दिलं जातं. मराठी, हिंदी, इंग्रजीसह संस्कृत आणि फ्रेंच या भाषेचंही शिक्षण दिलं जातं. अद्ययावत अशा या शाळेत डिजिटल स्वरूपाचे वर्ग मुलांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अभ्यासाप्रमाणं मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत योगा, मल्लखांब, नृत्य, नाटक, फुटबॉल, स्केटिंग, कराटे अशा विविध खेळांचंही प्रशिक्षण शाळेत दिलं जातं. तसंच दिवाळी, गणेशोत्सवासारखे सण साजरे करून मुलांना भारतीय संस्कृतीबद्दलही माहिती देण्याचं काम शाळेतील प्रशिक्षित शिक्षकांकडून केलं जातं. भविष्यकाळात इथं कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे.

अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालय
ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहराची वाट धरावी लागते. या गोष्टीचा विचार करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रविषयक उच्च शिक्षण गावातच मिळावं, या उद्देशानं अवसरी खुर्द इथं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतनची सुरुवात झाली आहे. या महाविद्यालयात यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य, संगणक, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान अशा विविध शाखांचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चोवीस तास इंटरनेट आणि ग्रंथालयाची सोय या महाविद्यालयात करण्यात आली आहे. तसंच होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळं शिक्षणपासून वंचित राहावं लागू नये म्हणून अनेक विधायक योजनाही महाविद्यालयात राबवल्या जातात. या महाविद्यालयामुळं ग्रामीण भागातील मुलांना थेट उद्योगधंद्यात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

मंचर ग्रामीण रुग्णालय
ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी शहरात धाव घ्यावी लागू नये, त्यांना गावातच तातडीची सेवा मिळावी यासाठी आंबेगाव तालुक्यातील रहिवाशांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मंचर इथं अद्ययावत ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. महिलांचं आरोग्य दृष्टीसमोर ठेवून या रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी ५० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसंच सोनोग्राफी, रक्तसंकलन आणि ब्लडबँकेसारख्या अद्ययावत सुविधाही या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसंच मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करून गावातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देऊन मार्गदर्शन केलं जातं. तसंच कर्करोगासारखा मोठा आजार आढळल्यास संबंधित रुग्णाला आर्थिक मदतही पुरवली जाते. गावातील जनतेच्या आरोग्याच्या हितानं उचललेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे.

भीमाशंकर साखर कारखाना
कोणत्याही भागाचा विकास हा रोजगार संधीवर आणि पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. आपल्या परिसरातील नागरिकांचा विकास व्हावा, गावातील शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी २००० मध्ये आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर साखर कारखाना सुरू केला. हा कारखाना अद्ययावत अशा संगणकीय स्रोत नियोजनाच्या साहाय्यानं पुढारलेला आहे. या कारखान्यात साखर उत्पादनासह वीजनिर्मितीही केली जाते. तसंच या साखर कारखान्याच्या माध्यमातून फक्त साखर उत्पादन न करता अंतर्गत भाग विकासनिधी योजनाही राबवली जाते. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना आधुनिक शेतीविषयक माहिती पुरवणं, बाजारात आलेलं नवीन बी-बियाणं, खतं यांबद्दल माहिती पुरवणं, तसंच सिंचन योजना राबवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जातं. या कारखान्यास उत्कृष्ठ साखर कारखान्याचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

गोवर्धन डेअरी प्रकल्प
मंचरचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं आहे ते तेथील गोवर्धन डेअरी प्रकल्पानं. दही, दूध, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीपेक्षा चीज, बटर अशा आधुनिक पदार्थांच्या निर्मितीचं धाडस पराग मिल्क प्रॉडक्ट्सच्या देवेंद्र शहा यांनी केलं, आणि त्यातूनच साकारला गोवर्धन डेअरी प्रकल्प. या प्रकल्पामुळं सुमारे सव्वा लाख शेतकर्‍यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या डेअरीचं वेगळेपण असं, की या डेअरीत तीन हजारपेक्षा जास्त गाई असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे काऊ मिल्क फार्म तयार करण्यात आले आहेत. या फार्ममध्ये गाईंची तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य निगा राखली जाते. उत्तम दर्जाचं दूध मिळावं यासाठी या गाईंना वेळोवेळी सकस आहार दिला जातो. दिवसातून तीनदा त्यांना मिल्किंग विभागात नेलं जातं आणि संपूर्ण यांत्रिकरीत्या या विभागात गाईंचं दूध काढलं जातं.

गो चीज प्रकल्प
गोवर्धन डेअरी प्रकल्प उभा करून जसं आंबेगाव मंचरला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याप्रमाणंच या डेअरीनं गो चीजसारख्या उच्च दर्जाच्या चीजचं उत्पादन करून शहा यांनी आशियात महाराष्ट्राचं नाव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. आशियातील सर्वांत मोठा चीज प्रकल्प म्हणून गो चीज प्रकल्पाकडं पाहिलं जातं. डेअरीत बनणार्‍या श्रीखंड, दही, पेढे या पदार्थांप्रमाणंच इथं बनणार्‍या बटर, चीजला भारताप्रमाणं भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हे चीज बनवताना वापरण्यात येणार्‍या युएचटी (अल्ट्रा व्हायरस टेम्परेचर) तंत्रज्ञानामुळं सामान्य वातावरणातही हे चीज सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतं. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञान आणि कंपनीची उत्पादन गुणवत्ता लक्षात घेत न्यूझीलंडनं आयएसओ प्रमाणपत्र देऊन गोवर्धनला प्रमाणित केलं आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित. ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचं नेतृत्व करतात.