EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

असहिष्णुतेचा आविष्कार

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1148
  • 0 Comment

जम्मू-काश्मीरमधील तरुण मुलींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रॉक बँडमुळं ‘इस्लाम खतरे में आला आहे’, असं तिथले मुख्य धर्मगुरू बशीरुद्दीन यांना वाटलं. मुलींनी बुरख्यातच राहावं, इस्लामला असलं संगीत नामंजूर आहे, असे त्यांचे आक्षेप. इंग्रजी चॅनेलवरच्या तरुण मुलामुलींच्या प्रतिक्रिया बघितल्या, तर त्यांना सुरांच्या या प्रवाहाला बांध घालणं बिलकुलच मंजूर नाही.

पंछी बनूँ उडती फिरूँ
मस्त गगन में
आज मैं आझाद हूँ
दुनिया के चमन में

अशी मनोवस्था असणाऱ्या यंगिस्तानमधल्या या पाखरांना अडवावंसं कोणाला वाटेल? धर्माच्या नावानं असे खेळ खेळणाऱ्यांची मनं किती कुजली आहेत!...

त्याच्या आधी विख्यात लेखक सलमान रश्दींना कोलकात्याला जायचं होतं. पण ममता बॅनर्जी सरकारनं त्यांना येऊच नका, म्हणून फर्मावलं. गेल्या वर्षी जयपूर लिटटरी फेस्टिव्हलमध्ये रश्दींना बंदी करण्यात आली. ज्यांनी त्यांच्या साहित्याचं वाचन केलं, त्या लेखकांना जयपूरबाहेर पिटाळण्यात आलं. परवा रश्दी एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले की, मला आता या सगळ्याचा वीट आलाय. एक तर माझ्यावर निर्बंध घातले जातात. त्यात वादग्रस्त लेखक अशी संभावना होऊन माझ्याबद्दलचे वाद वा इतर गोष्टी छापून येतात. शिव्या देण्यापूर्वी माझं साहित्य तरी वाचा! पण तेच कुणी वाचत नाही. तरीसुद्धा मी वर्तमानपत्री लेखबिख न लिहिता कादंबरी लेखनच करणार आहे.

कमल हासनला ‘विश्वरूपम’च्या निमित्तानं त्रास सोसावा लागला. तो म्हणाला की, सिनेमा न बघताच लोक शेरेबाजी करतात! माझं वय बघता मला माझी शक्ती व्यर्थ घालवायची नाही. मी मला वाटेल ते महत्त्वाच्या विषयांवरचे सिनेमे बनवतो नि यापुढंही तेच करणार आहे. आयुष्य कमी आहे नि करायचं तर खूप काही राहिलंय...

रश्दी वा कमल हासन हे गंभीर कलावंत आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून पाहिलं तर लक्षात येईल की, ते चुकतील-माकतील; पण सवंगपणा करणार नाहीत. मात्र धर्मातले मुखंड, पाद्री, मौलवी वा धर्माचे ठेकेदार आणि राजकीय नेते कलेसारख्या विषयात नाक खुपसतात. नको ते बोलतात. एक-दोघांच्या कलाकृतीमुळं देश-धर्म-जातीवर संकट येतं, असं त्यांना वाटतं. खरं तर यांनाच सवंग राजकारण करून प्रसिद्धी हवी असते. काही जण नुसतं मतप्रदर्शन (मग ते चुकीचं वा भंपक का असेना!) करून स्वस्थ बसत नाहीत. ते नाटक / चित्रपट बंद पाडू, पुस्तक जाळू, लेखकाला बडवू अशा धमक्या देतात.

खुद्द मला गेल्या महिन्यात असाच अनुभव आला. ‘न बोलायचं काय घ्याल’ अशा शीर्षकाचा लेख मी ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत लिहिला. त्यात ओवेसी, सरसंघचालक मोहन भागवत, आसारामबापू, राज ठाकरे यांचा समाचार घेतला होता. त्यांच्या वक्तव्यांवर मी कठोर टीका केली होती. यापैकी सरसंघचालक सोडल्यास इतर कोणाच्याही समर्थकानं यास आक्षेप घेतला नाही. परंतु रा. स्व. संघाचे स्वयंसेवक / कार्यकर्ते असल्याचं सांगून अनेकांनी मला धमक्यांचे फोन केले. हरामखोरा, डुकरा, नालायका, कुत्र्या अशा शब्दांत लाखोली वाहिली. चार दिवसांत माफी मागा अथवा परिणाम भोगायला सिद्ध व्हा, अशी धमकी संघ परिवारातील मंडळींनी दिली. शेकड्यात फोन, ईमेल व एसएमएस आले. शेवटी मला पोलिसात तक्रार दाखल करावी लागली. त्यांनी तत्परतेनं तपास सुरू केला.

माझ्या लेखाबद्दल आक्षेप असणाऱ्यांनी त्याचा प्रतिवाद करण्याऐवजी हा मार्ग अवलंबला. सरसंघचालकांच्या विधानावर देशभर बातम्या आल्या, इंग्रजीत त्यांच्यावर भरपूर टीका झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर इंग्रजी चॅनेलवरून त्यांच्या एकूण राजकारणावर काही विश्लेषकांनी सणसणीत टीका केली होती. आपल्याकडं काही नेत्यांना दैवी अवतार समजलं जातं आणि त्यांच्यावर प्रहार झाल्यास धिंगाणा घातला जातो वा धमकावलं जातं, हे भयानक आहे.

जयपूर फेस्टिव्हलमधील आशीष नंदींच्या विधानांचा गैरअर्थ लावून त्यांना झोडपलं गेलं. त्यात कधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या, तर कधी युतीच्या कळपात राहून लाचारी करणारे नेतेही होते. नंदींचं विधान एखाद्याला मान्य नसेल, तर त्याने टीका जरूर करावी. पण काहींनी त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेतली. पोलिसांनी तर गुन्ह्याची नोंद केली... खरं तर नंदींनी ना हिंसाचारास प्रोत्साहन दिलं होतं ना जातीयवादास.

सेक्युलॅरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता. सगळ्या धर्मांतील लोकांना सारखी वागणूक. पण आपल्याकडं सगळ्याच धर्मांच्या मार्तंडांसमोर लोटांगण घातलं जातं. मुस्लिम मतपेटीचं राजकारण केलं जातं. जातीच्या मतपेट्या जपताना त्यांच्या नेत्यांसमोर (उदाहरणार्थ, ‘आरक्षण’च्या वेळी छगन भुजबळांनी दंड थोपटले होते) लोटांगण घातलं जातं. धर्माचे-जातीचे नेते देतील तेवढंच तुम्हाला स्वातंत्र्य! गेल्या वर्षात कलावंत कुठे स्वतंत्र झाले आहेत?

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.