EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

तिची वर्दी...

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2327
  • 1 Comment

प्रत्यक्ष युद्धात सामील होण्यास अमेरिकेतील महिलांवर असलेली बंदी पेंटॅगॉननं गेल्याच महिन्यात उठवली. आता अमेरिकन लष्करातील महिलांना युद्धात सहभागी होता येईल. हा निश्चितच एक निर्णय महत्त्वाचा आहे. अमेरिकेतील लष्करात जवळजवळ 14 टक्के महिलांचा भरणा आहे, त्यामुळं हा नवा निर्णय फारच लक्षणीय ठरणारा आहे. महिलांना प्रत्यक्ष युद्धाचा अनुभवही मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तिथे होत होती. मात्र त्यास विरोधही होताच. पण आता नवीन पाऊल उचलून महिलांना त्यांची इच्छा असेल तर युद्धात सहभागी होता येईल, असा नियमबदल करण्यात आला आहे. यापूर्वी इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धास महिलांचं मोठं योगदान लाभलं होतं; पण त्यांच्या कामाचं स्वरूप मर्यादित होतं. युद्धसीमेवर ड्रायव्हर, डॉक्टर, तंत्रज्ञ अशा भूमिकांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत्या. अंदाजे दोन लाख महिलांनी या दोन युद्धांमध्ये या तऱ्हेचा सहभाग घेतला होता. आपल्याला प्रत्यक्ष युद्धाचाही अनुभव मिळायला हवा, अशीही त्यांची मागणी बराच काळ राहिली आहे. त्यांनी दाखवलेल्या कर्तृत्वाची दखल घेऊन अखेरीस पेंटॅगॉननं बऱ्याच चर्चेनंतर नवा नियम लागू केला.

 

यामुळं महिलांना लष्करातील सेवेत पदोन्नती मिळण्यातला अडथळाही दूर झाला आहे. कारण युद्धाचा अनुभव नसल्यामुळं त्यांना सहजासहजी पुढं जाता येत नव्हतं. पेंटॅगॉनच्या पहिल्या फोरस्टार महिला जनरल अॅन डनवुडी यांना 2008पर्यंत बढती देण्यात आली नव्हती. पेंटॅगॉननं नुकतंच पुढचं पाऊल टाकून युद्धसंबंधित चौदा हजार पदं महिलांसाठी खुली केली आहेत. त्यातली बहुतेक पदं लष्करासाठीची असून, नवीन धोरणामुळं अशी लष्कर व नौदलातली सुमारे दोन लाख पदं महिलांना खुली होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय.

अमेरिकेत ही स्थिती असताना भारताच्या लष्करी दलांची अवस्था कशी आहे हे जाणून घेणं योग्य ठरेल. मुळात स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत दुर्बल समजण्याची मानसिकता इथं खोलवर रुजलेली आहे. सैन्यदलांसाठी बळकटपणा, कणखरपणा आवश्यक मानला जातो आणि म्हणूनच स्त्रियांनी त्यापासून दूर राहावं अशी अपेक्षा असते. पण भारतीय सैन्यदलांत स्त्रिया पूर्वीपासून सहभागी होत आल्या आहेत, तर भारतीय सैन्यात पहिली महिला जवान होण्याचा मान शांती टिग्गा यांच्याकडं जातो. भारतीय रेल्वेच्या तुकडीतून शांती टिग्गा लष्करात आली, ती पुरुष सहकाऱ्यापेक्षा सरस कामगिरी बजावत. क्षमतेच्या वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये तिनं आपल्या पुरुष सहकाऱ्यांना मागं टाकलं. ही गोष्ट दोन वर्षांपूर्वीची. तसा लष्करी क्षेत्रात महिलांचा प्रवेश झाला तो 1968 मध्ये. पुनीता अरोरा या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून लष्करात दाखल झालेल्या पहिल्या महिल्या ठरतात. पुढे त्या लेफ्टनंट जनरल आणि नौदलाच्या व्हाईस अॅडमिरल या पदापर्यंत पोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.

वायुदलातही वैमानिक म्हणून महिलांनी काम केलं आहे, पण इतक्या साऱ्या पदांवर जाऊनही प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याची संधी महिलांना मिळाली नव्हती. दोन वर्षांपूर्वी प्रथम ही संधी शांती टिग्गाला लाभली. त्यापूर्वीही, वैद्यकीय विभागाचं नेतृत्व करण्याची संधी स्त्रियांना मिळाली नव्हतीच. गेल्या काही वर्षांत मात्र परिस्थिती बदलली आहे. अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या मुली लष्करात जाण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत. हेलिकॉप्टर पायलट, कॅप्टन अशा विविध पदांवर महिला दिसू लागल्या आहेत. लष्करी आणि निमलष्करी दलांमधून काम करणाऱ्या महिलांची संख्या सुमारे बारा हजार असेल. या महिलांना काही सवलतीही दिल्या जातात. उदा. सीमेवर गस्त घालण्याचं काम असेल तर त्यांना फक्त दिवसाच तिथं नेमलं जातं इत्यादी. शिवाय त्यांच्या कामाचे तासही पुरुष सहकाऱ्यांपेक्षा थोडे कमी असतात. महिलांचा समावेश असलेल्या ठिकाणी वरिष्ठांनाही ती एक जबाबदारी वाटते. पुरुष अधिकाऱ्यांची मानसिकता विशिष्ट असल्यानं, ते या महिलांच्या सुरक्षेबाबत जास्तच सावध बनून परिस्थिती हाताळतात. अर्थात, समानतेचं तत्त्व पाळलं न गेल्यानं या महिलांवर एक वेगळा अन्याय होतो, हेतू काहीही असो...

महिलांना भारतीय लष्करात प्रवेश मिळून बरीच वर्षं झाली असली, तरी त्यांना कायम पदांवर नियुक्ती मिळण्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागला आहे. शिवाय पुरुषी मानसिकतेशी सामना करत पुढं जावं लागलं आहे ते वेगळंच. एरवीही हे घडत असतंच, पण लष्करात आलेल्या महिलेला समान पातळीवरून वागवण्याची मानसिक तयारी असणारे पुरुष अधिकारी तयार झालेले नसल्यानं त्यांना वेळोवेळी असा संघर्ष करणं भागच पडलं आहे. महिलेकडून एखादी चूक झालीच, तर तिला ती स्त्री आहे याबद्दल प्रथम बोलणी खावी लागतात आणि तिनं जर विशेष कर्तृत्व दाखवलं, तर तिनं जादा कष्ट केले म्हणून हे श्रेय मिळालं असं म्हटलं जातं. (तिथं मग ती स्त्री असल्याचा गौरव केला जात नाही.) न्यायालयीन लढा देऊन पदरात पाडून घेतलेली कायम स्वरूपाची नियुक्ती महिलांच्या वाट्याला आजही सरसकट येतच नाही, अशी खंत अनुपमा जोशी या भारतीय वायुदलात विंगकमांडर म्हणून निवृत्त झालेल्या महिलेनं व्यक्त केलीय.

महिलांना विवाहानंतर संसार आणि मुलं यांच्याकडं लक्ष द्यावं लागतं, आणि त्यातून काही वर्षांनी त्या सुट्या होतात, तोच त्यांना लष्करातली नोकरी गमवावी लागते. पर्मनंट कमिशन नसलेल्या पुरुषांबाबतही हे होतं, पण फरक हा की, त्यांना घरसंसारासाठी मधली वर्षं गुंतून राहावं लागत नाही. म्हणूनच लष्करात स्त्रियांना कायम पदावर नेमणूक मिळणं आवश्यक ठरतं. अर्थात, निर्णय महिलांच्या बाजूनं लागला, तरी सरसकट सर्व महिलांना त्याचा लाभ मिळत नाही, कारण स्त्रियांना नेमताना अधिक पारखून घेतलं जातं. त्यांच्या अंगी विशेष गुणवत्ता असली तरच कायम पदांची शक्यता असते...

सैन्यदलांमधून काम करणं म्हणजे शारीरिक बलाबरोबरच मानसिक सक्षमताही महत्त्वाची ठरते. मानसिक ताणतणावाखाली वावरताना स्त्री असो वा पुरुष; त्याच्याशी प्रत्येकाला टक्कर देतच पुढं जावं लागतं. लष्करातही असे तणाव बरेच असतात आणि महिलांना तिथं स्वीकारण्याची तयारी मुळात पुरुषांकडं नसल्यानं त्यांच्याबाबत भेदभाव होण्याची शक्यता अधिक असते. यातूनही काही प्रश्न निर्माण होतात आणि आफल्याकडं तसं ते झाल्याची उदाहरणं आहेत. आठेक वर्षांपूर्वी, लेफ्टनंट सुष्मिता चक्रवर्ती हिनं स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना इथं आठवते. त्यावेळी तिनं लष्करी कामाचा ताण सहन न झाल्यानं हे पाऊल उचललं, असा पवित्रा तेव्हा सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यानं घेतला आणि ‘महिलांवाचून लष्कराचं काही अडलेलं नाही’, असं विधान केलं. मुळात सत्य वेगळं होतं. सुष्मिताला पार्ट्यांचं आयोजन करण्याचं वगैरे काम नेहमी देण्यात आल्यामुळं आपल्याबाबत भेदभाव केला जातो, अशा भावनेतून आलेल्या नैराश्यातून तिनं आत्महत्या केली, असं म्हटलं जात होतं. तिला त्याआधी वैज्ञानिक संशोधक म्हणून काम करतानाही डावलण्यात आलं होतं आणि नंतर ती लष्करात आली होती. तिथंही पुन्हा तोच अनुभव आल्यानं तिला नैराश्य आलं असावं. तिच्यासारखा अनुभव घेणाऱ्या इतर काही महिलांना मात्र तिनं या गोष्टीचा उगाच बाऊ केला असं वाटत होतं.
 
असं दिसतं की मुळातच लष्करातली शिस्त, कार्यशैली महिलांना पेलवत नाही हे पुरुषांच्या मनात ठाम बसलेलं असतं. कमी कुवतीची, विशिष्ट प्रकारची कामं महिलांना दिली जातात. आपल्याला समान वागणूक, समान काम मिळावं, अशी या महिलांची रास्त मागणी असूनही, विशिष्ट मानसिकतेपोटी त्यांच्यावर अन्याय होत राहतो. पूर्वी तर शॉर्ट कमिशन तत्त्वावर नियुक्त झालेल्या महिलांना पुरुषांपेक्षा वेतनही कमी दिलं जात होतं. अलीकडच्या काळात मात्र त्यांना समान पगार आणि इतर फायदे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महिलांना लेफ्टनंट पदावर नेमणूक, त्यानंतर दर दोन वर्षांनी कॅप्टन पदावर बढती आणि सहा वर्षांनंतर मेजर आणि 13 वर्षांनंतर लेफ्टनंट कर्नलच्या पदावर महिला अधिकाऱ्यांना बढती मिळू शकेल, असं हा निर्णय सांगतो. काही वर्षांपूर्वी प्रियंवदा मर्डीकर या महिला लेफ्टनंटची पदावनती करण्यात आली होती. त्याचं कारण पुढं करताना अशी पदोन्नती फक्त पुरुषांनाच मिळते, असं सांगण्यात आलं होतं. लष्करातलं हे पद पटकावणारी पहिली महिला म्हणून तिचं कौतुक झालं होतं आणि तिलाच नियमावर बोट ठेवून पदावनत करण्यात आलं. आता यापुढं तरी असा अन्याय होणार नाही अशी अपेक्षा...

मुळात स्त्रियांकडं विशिष्ट फूटपट्ट्या लावूनच बघितलं जातं, म्हणून अशा घटना घडतात. ताणाला कंटाळून पोलीस वा सुरक्षा दलातले पुरुषही कधी कधी आत्महत्या करताना दिसतात. म्हणून काही साऱ्या पुरुषांना कोणी मानसिकदृष्ट्या दुर्बल ठरवत नाही. महिलांबाबत तर ताण असणं स्वाभाविक आहे, कारण त्यांना वेगळी वागणूक दिली जातेच. लष्करात स्त्रियांशी वागताना अदब बाळगली जाते, सौजन्याचे संकेत पाळले जातात हेही खरं आहे. पण ते वरवरचं झालं. प्रत्यक्षात स्त्रिया बरोबरीच्या पदावर काम करू लागतात तेव्हा काय होतं, हे महत्त्वाचं आहे. अशा स्थितीत, प्रत्यक्ष रणांगणावर काम करायला महिलांना उतरवणं इथे कितपत खुलेपणानं स्वीकारलं जाईल याबद्दल शंका वाटते. कारण महिला म्हणजे, त्यांना जर शत्रूनं पकडलं तर छळ झाल्यास त्या कसं सहन करतील? त्यांच्यावर बलात्कार होण्याची भीतीही आहे, अशा शंका उपस्थित केल्या जातील. महिलांनी तयारी दाखवली, तरी त्यांना समान पातळीवर बघण्याचं आणि मानण्याचं धैर्य पुरुषी मानसिकतेत आहे का, हा खरा प्रश्न आहे!

तर दुसरीकडं महिलांनी रणांगणावर कर्तृत्व गाजवल्याची भारतीय इतिहासातली उदाहरणं प्रसिद्ध आहेत. मर्दानी झाशीवाली म्हणून प्रसिद्ध झालेली झाशीची राणी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पलटणीचं बिरूद बनून गेली. राणी झाशी रेजिमेंट, तिची कॅप्टन लक्ष्मी आणि या पलटणीतल्या रणरागिणी यांची नावं इतिहासात कोरली गेलीत. महिलांविना आझाद हिंद फौज अपुरी असेल, असं सुभाषबाबू म्हणाले होते. त्याचं स्मरण सध्याच्या लष्करी भरतीबाबत निर्णय घेताना ठेवायला हवं.

People in this conversation

Comments (1)

  • Nandinitai,tumacha lekh mahitipurna aahe.striyanchi senemadhye yenyachi prabal ichha asunahi tyana prese mahtva det nahit he vachun vait vatale.khar tar jya striya manane kankhar astil tyana tari nidan tyanchya ichhepramane kam denyas kay harakt aahe?tyanchi abiliti pahun tyana protsahit karavaya pahije.ithun pudhe tari baki itar goshtit amerikeche anukaran karat aahotch.mag ashya hi babtit kariala pahije.aata honarya matani aaplya gharatil mulala hyababtitil sanskar pramparik na karata navyane vichar dharana hoil ase sanskar karnyas suruvat keli pahije.stri aani purush hyamdhye konatahi bhed-bhav na karata abilitypramane strila sandhi aani puraskar hyanchi prapti karun dyavayas havi.

    meghana jog.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.