EasyBlog
This is some blog description about this site
इतिस्त्री
अनुष्कानं छेडलेली तार...
यंदा व्हॅलेंटाईन दिनाला जगभर ‘वन बिलियन रायझिंग’ हा कार्यक्रम स्त्री-सन्मानार्थ साजरा करण्यात आला. स्त्रियांच्या मनातली भावना आणि त्यांच्याबाबत होणारा भेदभाव या अनुषंगानं आता मोठ्या प्रमाणात जागृती होऊ लागली आहे. हाच मुद्दा पुढं नेणारा हा उपक्रम होता. महिला आणि मुलींना समाजात वा घरात पदोपदी जो डावललं जाण्याचा आणि अन्यायाचा अनुभव येतो, त्याविरुद्ध आपला निषेध नोंदवत महिलांनी 14 फेब्रुवारी या दिवशी विशिष्ट वेळेला बाहेर येऊन आपलं मन मोकळं करावं, अशी या कार्यक्रमामागची संकल्पना होती. स्त्रियांना बोलतं करण्याची, त्यांना आपल्या मनात दडलेलं बाहेर काढण्याची संधी देणारी ही एक जागतिक स्तरावरची मोहीमच होती. विशेषतः महिलांच्या संदर्भात जो अत्याचार होतो त्यावर बोट ठेवणारी ही मोहीम दिल्लीत घडलेल्या सामूहिक पाशवी बलात्काराच्या पार्श्वभूमीवर होती. भारतातही ठिकठिकाणच्या अनेक संघटना आणि संस्था ‘वन बिलियन रायझिंग'मध्ये सामील झाल्या. जगभराप्रमाणं भारतातही परवाच्या व्हॅलेंटाईन दिवशी ‘वन बिलियन रायझिंग’चा नाद घुमला. भाषणबाजी आणि निषेधाच्या घोषणांच्या पलीकडं जाऊन, नाटकं, गाणी, पोस्टर्स, बलून्स अशा माध्यमांतून देशोदेशी स्त्रियांचा आवाज दुमदुमला... सोशल नेटवर्किंग साइट्सचा सुंदर उपयोग करून घेत ‘वन बिलियन रायझिंग’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला. लिंगभाव, स्त्री-पुरुष समता या गोष्टींची चर्चा त्यावर झडली आणि या संदर्भातली जागरूकता वाढण्यास मदत झाली.
‘व्हजायना मोनोलॉग्ज’ या दीर्घस्वगताची लेखिका इव्ह एन्सलर हिनं सुरू केलेली ही मोहीम आता मूळ धरू लागलीय. मुळात स्त्रियांच्या लैंगिकतेवर खुलं भाष्य करत, या बाऊ मानल्या गेलेल्या विषयावर स्त्रियांना बोलतं करत इव्ह एन्सलरनं हे स्वगतवजा नाटक लिहिलं आणि त्याचा अनुवाद तसंच प्रयोग जगभरच्या भाषांमधूनही झाला. चारेक वर्षांपूर्वी हे नाटक मराठीतही आलं आहे. वंदना खरे हिनं केलेला ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हा त्याचा मराठी अनुवाद. स्वगताकडून गुजगोष्टींपर्यंतचा प्रवास करून हे मोनोलॉग्ज मराठी प्रेक्षकांना (स्त्री व पुरुष दोन्हींना) स्त्रीलैंगिकतेबाबत एक वेगळी दृष्टी देणारे ठरले. त्याचे आजवर शंभर प्रयोग झाले आहेत. अशा चारचौघात उच्चारही न करण्याचा संकेत असलेल्या विषयाला रंगमंचावर आणण्याचं धाडस करणाऱ्या संबंधित सर्वांचं कौतुक करावंसं वाटतं. स्त्रीलैंगिकता हा विषय फक्त स्त्रियांच्या उपस्थितीतही बाऊ मानला जातो. इतकंच काय, स्त्री स्वतःच्या मनाशीही या संदर्भात मोकळी नसते. म्हणूनच, आपल्याबाबत जर लैंगिक अत्याचार वा विनयभंगाची घटना घडली तरी त्याबद्दल कुणाकडं बोलण्यासही मुली वा स्त्रिया कचरतात.
पुष्कळदा जवळच्या किंवा विश्वासातल्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडूनच मुलींचं लैंगिक शोषण होत असतं. त्याबद्दल वडील माणसांना कसं सांगायचं, असं मुलींना वाटतं. त्या ही गोष्ट लपवून ठेवतात आणि अत्याचार सहन करत राहतात. मुलांवरही ही वेळ येऊ शकते आणि अशांच्या कहाण्या आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या रिअॅलिटी शोमधून लोकांसमोर आल्या आहेत. मनातली गोष्ट मोकळेपणानं बोलून टाकल्यास, नको असलेल्या कृतीचा निषेध नोंदवल्यास असं कृत्य करणारी व्यक्ती बहुधा हटते आणि अन्याय करणं बंद करते. पण तसा निषेध करण्याचं धाडस लहान मुलामुलींपाशी नसतं, म्हणून ती अन्याय सोसत राहतात. जर आसपास चौकशी केली, तर सहज लक्षात येईल की, बऱ्याच जणांना बालपणात लैंगिक अत्याचार वा विनयभंगाला सामोरं जावं लागलेलं असतं. यातून बड्या घरची मुलंही सुटत नाहीत...
या वर्षी ‘वन बिलियन रायझिंग’चा गवगवा झाल्यामुळं म्हणा किंवा दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेमुळं म्हणा, अनेक जण आपले अनुभव इतरांना सांगून मनातली वेदना आणि भावना उघड करू लागले आहेत. अशा अत्याचाराबद्दल गप्प राहून चालणार नाही; उलट त्याविषयी बोललं पाहिजे, ही भावना लोकांमध्ये रुजू लागली आहे. प्रख्यात सतारवादक दिवंगत रविशंकर यांची कन्या अनुष्का हिलाही आपल्यावर बालपणीच्या काळात झालेल्या अत्याचाराची वाच्यता करावीशी वाटली. तिनं म्हटलं आहे की, आपणही बालपणी अशा अत्याचाराच्या बळी ठरलो आहोत. अनुष्काच्या आईवडिलांनी ज्याच्यावर विश्वास ठेवला अशा एका माणसानं नको तिथे स्पर्श करणं, वासनेनं कुरवाळणं, अश्लील संभाषण करणं असा पद्धतीचं वर्तन अनुष्काशी बरीच वर्षं केलं. इतक्या वर्षांनंतर तिला त्याबद्दल सांगावंसं वाटलं. आपण मोकळेपणानं आपला अनुभव सांगितला तर इतरांनाही एक बळ मिळून त्यांना आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडावीशी वाटेल, अशी अनुष्काची यामागची भावना आहे. हे खरंच आहे की, बरेचदा मुलं पालकांना अशा घटनांबद्दल सांगतात, पण मुलांवर कधी कधी विश्वास ठेवला जात नाही. तर कधी पालकच कमकुवत मनाचे असतात आणि आपल्या मुलांच्या मागं उभं राहण्याचं धैर्य त्यांच्यात नसतं. बाललैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये तर 90 टक्के घटना या ओळखीच्या व्यक्तीकडूनच होतात, असं आजवर अनेकदा वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झालंय. अनुष्का शंकरनं पुढं येऊन स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलणं म्हणूनच खूप महत्त्वाचं ठरतं. चुप्पी तोडून तिनं खूप मोठं काम केलं आहे. थँक यू अनुष्का!