EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

टाळीची टाळाटाळ

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1478
  • 0 Comment

‘राज्यात कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा विचार नाही आणि स्वबळावर लढून जिंकायचं आहे. त्यासाठी राज्य काबीज करण्याच्या हेतूनं दौऱ्याला सुरुवात केली आहे,’ अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरमधील जंगी सभेत केली. 2014च्या विधानभा निवडणुकीनंतर मनसेचं सरकार येण्याची सुतराम शक्यता नाही. 2019च्या निवडणुकीत तरी सत्ता मिळवण्याएवढं वा लक्षणीय यश मिळवायचं असेल, तर मनसेला आपला बाज बदलावा लागेल. त्याकरता आर्थिक-सामाजिक प्रश्नांकडं वळावं लागेल.

 

‘दुष्काळग्रस्तांसाठी पाहणी दौरे हा भंपकपणा असून, दौरे करणाऱ्यांचं थोबाड पाहून प्रश्न सुटणार नाहीत,’ असा शेरा राज यांनी मारला. दुष्काळाची तीव्रता, पिकांची आणेवारी, पाण्याचा साठा आणि शेतकऱ्यांचं दुःख समजावून घेण्यासाठी पाहणी करावीच लागते. खुद्द राजनंही आपल्या कार्यकर्त्यांना चाऱ्याचे ट्रक्स घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात किती ट्रक्स गेले? शेतकऱ्यांना इतर मदत केली गेली का? हे प्रश्न उरतातच. मग ही स्टंटबाजी नव्हे का?

 

राज्यातील काही भाग वर्षानुवर्षं दुष्काळी आहे, पण या भागात तेच ते लोक निवडून कसे येतात याबद्दल राजनं आश्चर्य व्यक्त केलं. याचं कारण एक तर ‘त्याच त्या लोकांनी’ काही चांगलं काम केलं असावं वा त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नसावा. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सहकारी चळवळीतून समृद्धी आणली. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला विविध संस्थांच्या माध्यमातून बांधून ठेवलं. शिवसेना वा मनसेनं आजवर काय केलं आहे? शाळा, महाविद्यालयं, इस्पितळं, प्रक्रिया कारखाने, साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी भांडारं, दूधसंस्था या कामास काहीच अर्थ नाही काय? सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज, इचलकरंजी इथलं परिवर्तन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केलं. या संस्थांतून संस्थानिक निर्माण झालं आणि सहकारी सरंजामशाही तयार झाली हे खरं. परंतु त्यांनी पहिल्या टप्प्यात तरी काही विधायक गोष्टी केल्या आहेत. दिवसाला डीव्हीडीवर दोन सिनेमे बघायचे आणि चॅनेलवाल्यांच्या साक्षीनं मासिक इशारा-प्रयोग करायचं यापेक्षा हे चांगलं नाही का?
राज ठाकरेंनी सभेत टोलचा प्रश्न उपस्थित केला; परंतु टोलपासून अनेक मुद्द्यांवरची आंदोलनं मध्येच स्थगित होत असतात. परप्रांतीयांचा चावून चोथा झालेला विषय राज पुन्हा पुन्हा चघळतात. पण उद्या मनसेची समजा सत्ता आली, तर ते देखील ही ‘समस्या’ सोडवू शकणार नाहीत.

 

करवीरमधील सभेत राज म्हणाले, '‘शिवसेनेतून बाहेर पडल्यावर माझ्याबरोबर या, असे फोन मी कोणालाही केले नाहीत. सर्व नेते आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर आपणहून आले." थोडक्यात, मी कोणावर अवलंबून नाही आणि माझ्यावर मात्र सर्व जण अवलंबून आहेत, हे सांगण्याचा हा प्रकार होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, ‘मी आमच्या नेत्यांपैकी कोणालाही मुख्यमंत्री बनवू शकलो असतो. पण मी पंतांना ही संधी दिली. मी, मी दिली ती संधी!' असं त्यांनी जाहीरपणं सांगितलं होतं. आपला लोकशाहीवर विश्वास नाही, हे त्यांचं लाडकं वाक्य होतं. तरीही शिवसेनेनं निवडणुका लढवल्या. पण सत्ता हाती आल्यावर तिचा रिमोट कंट्रोल स्वतःकडंच राहील, हे बाळासाहेबांनी पाहिलं. पंतांनी नव्या विमानतळासंबंधी, परदेशात असताना हिंदुजांशी परस्पर सामंजस्याचा करार केला, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना तो रद्द करण्यास भाग पाडलं. एन्‍रॉन प्रकल्पाच्या मुख्याधिकारी रिबेका मार्क यांनाही ‘मातोश्री’ला भेट द्यावी लागली. मगच या प्रकल्पास हिरवा कंदील मिळाला. उद्या संधी मिळाल्यास राज हेच करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या स्मारकाचे वगैरे दाखले देऊन सत्ताधारी भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. परंतु स्वतः राज मराठीच्या नावाखाली याच प्रकारचं राजकारण करत आहेत. शिवाय परप्रांतीयांविरुद्ध द्वेष पसरवत आहेत. दिल्लीतील बलात्काराचा विषय परप्रांतीयांशी जोडण्याचा पराक्रमही त्यांनी केला. ‘भय्यां’विरुद्ध एकदा राजनं बोलायचे आणि तिकडे नितीशकुमार-मुलायम सिंग यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायची. दोन्ही गटांना याचा फायदा मिळतो. करायचं काहीच नाही, फक्त चॅनेलसमोर येऊन एकेकाला फायरिंग स्क्वॉडखाली घ्यायचं. शिवाय राजू श्रीवास्तवप्रमाणं कधी रामदास आठवलेंची, तर कधी अजितदादा पवार वा जयंत पाटलांची नक्कल करायची. बाकी नकलांचं हे काम मात्र राज मस्तपैकी करतात. गंमत म्हणजे समाजवादी पक्षानं श्रीवास्तवला आगामी लोकसभा निवडणुकीत कानपूरमधून तिकीट देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं नकलाकारांना राजकारणात भवितव्य आहेच...
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मनसेवाल्यांना तासगावात धमक्या दिल्या जात आहेत, हा राज यांचा आरोप खरा असेलही. पण तशा तक्रारी पोलिसांकडे वा खुद्द गृहमंत्र्यांकडं जाऊन करता येतील. त्याऐवजी, प्रसंगी आबांच्या घरच्यांना धमक्या देऊ, असं दरडावणं हा गंभीर आहे. गृहमंत्र्यांनी या विधानाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. एरवी अशा धमक्या देणाऱ्या चिल्लर गुंडांना लगेच आत घेतलं जातं. पण बड्या नेत्यांवर कधी ठोस कारवाई मात्र होत नाही. सत्ताधाऱ्यांच्या याच कचखाऊपणामुळं शिवसेना आणि मनसे वाढली.

 

हे पक्ष एकत्र येण्याची चर्चा जाहीरपणं कशी होईल असे सुचवताना, ‘लग्न करायचं तर मेळावा घ्यायचा नसतो’, अशी टिप्पणी राज यांनी केली आहे. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मुळात लोकशाही, पारदर्शकता, विविध स्तरांवर चर्चा हे काही ठाऊकच नाही. दोन पक्षांनी आपापसात विलीन होणं वा कुठल्याही प्रकारचा समझोता करणं हा विषय पक्षांच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, विधानसभा स्तरावर चर्चिला गेला पाहिजे. पण हे दोन पक्ष मातोश्री आणि कृष्णकुंजवरून प्रोप्रायटरी कन्सर्नप्रमाणं चालवले जातात. त्यामुळं एकत्र यायचं की नाही, याबद्दल उभय पक्षांचे छोटेच काय, बडे नेतेही ब्रसुद्धा काढत नाहीत. काही बोललो आणि साहेबांची खप्पामर्जी झाली तर!

 

खरं तर ‘बाळासाहेबांसाठी एक पाऊल काय शंभर पावलं टाकीन,’ असं राज सार्वजनिकरीत्या म्हणाले होते. मग समझोत्याचीही चर्चा त्यांनी तरी जाहीरपणं का केली? या विधानाचा अन्वयर्थ असा होता की, उद्धवसाठी मात्र मी एकही पाऊल टाकणार नाही... ठाणे महानगरपालिकेत सत्तेसाठी शिवसेनेनं आवाहन केल्यानंतर मनसेन विनाशर्त पाठिंबा दिला होता. त्याआधी कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवलीत मनसेनं सेनेशी सहकार्य केलं होतं-चर्चेचं गुऱ्हाळ न घालता! त्याबदल्यात नाशकात शिवसेना आपल्याला मदत करील अशी मनसेची अपेक्षा होती. परंतु सेनेनं तिथं मनसेचा महापौर येऊ नये अशी धडपड केली. म्हणजे उपकाराची फेड अपकारानं झाली. त्यामुळं मनसेवाले साहजिकच संतप्त झाले. परिणामी ठाणे आणि औरंगाबादमधील जिल्हा परिषदेतली युतीची सत्ता गेली. ठाणे पालिकेत तर इतके गोंधळ सुरू आहेत की, कोण कोणाबरोबर आहे हेच कळेनासं झालंय!

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी असली, तरी तेच एकमेकांचे खरे शत्रू आहेत. परंतु ही लढाई निदान पक्षीय तरी आहे. शिवसेना आणि मनसेचं वैर मात्र व्यक्तिगत आहे. म्हणजे ते उद्धव आणि राज यांच्यातील आहे. ते इगोशी संबंधित आहे. धोरणं, तत्त्व, कार्यक्रम यांच्याशी नव्हे. ‘तू कोण रे आँ? मीच सर्वकाही’! अशा प्रकारचं ते भांडण आहे.

 

बाळासाहेबांची अक्कल आणि नक्कल माझ्याकडं आहे. दादूकडं काही नाही. त्यानं किल्ल्यांचे फोटो काढत बसावं, असं एकाला वाटतं. काकांचा राजकीय वारसा राजकडंच आला आहे, हे सामान्य जनतेलाही वाटत असल्याचं मनसेच्या विस्तारावरून स्पष्ट होतं. आजचा जमाना प्रेझेंटेशनचा आहे. त्यामुळं सांगण्यासारखं काही नसलं, तरी कशा पद्धतीनं ते सांगितलं आहे, यास महत्त्व असतं.
सत्तेचाळीस वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनातील असुक्षिततेच्या भावनेला फुंकर घातली. संयुक्त महाराष्ट्र समिती विस्कटल्यानंतर मराठी अस्मितेला कोणी वाली उरला नव्हता. त्या अस्मितेला कवटाळून सेना विस्तारत राहिली. शिवसेनेचं पुढं काय, असे प्रश्न ‘बाळासाहेबांनंतर काय’च्या धर्तीवर 1970 मध्येही विचारले जात होते. म्हणजे लुंगीवाल्याविरुद्धच्या दंग्यानंतर, सेनेच्या हिंदुत्ववादी राजकारणाच्या वेळी आणि युतीचं राज्य गेल्यानंतरही! परंतु शिवसेना टिकून राहिली, ग्रामीण भागात पसरली. बाळासाहेबांनंतरसुद्धा  शिवसेना जिवंत राहील, असं भविष्य सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीत कोंडी झाल्यास पर्याय शोधून ठेवले पाहिजेत, असं कोणाला वाटल्यास ते समजण्यासारखं आहे. भुजबळांमुळंच शिवसेनेचा ओबीसी जनाधार पक्का झाला, हे वास्तव आहे.

 

उद्धव आणि त्यांचे चिरंजीव आदित्य यांची काळजी घ्या, त्यांना सांभाळा, असं कळकळीचं आवाहन बाळासाहेबांनी केलं होतं. त्यात पित्याची काळजी व्यक्त झाली. परंतु आपल्या पश्चात सेनेचं काय होईल ही चिंता त्यांनाही सतावत असणार. ‘करून दाखवल्या’मुळं आणि जन्मजात वारसा हक्कामुळं उद्धव ठाकरेंना लीडर नंबर वन आपणच, असं वाटलं. तर राज यांना करिष्म्याच्या आधारे आपणच दुसरे बाळासाहेब, असे भास होत असतात. इंदिरा गांधींनी लोकप्रियतेच्या आधारे कामराज - अतुल्य घोष – निजलिंगप्पा - मोरारजी देसाई यांना मागं टाकले. सिंडिकेटचा जसा पालापाचोळा झाला, तशी उद्या शिवसेनेची अवस्था होईल. त्यानंतर बाळासाहेबांना मानणारे सर्व मावळे आपल्या झेंड्याखाली एकत्र येतील. त्यांच्या मदतीनं स्वराज्य मिळवू, अशी राज यांची व्यूहरचना दिसते. तुलनेनं उद्धव अधिक गंभीर राजकारणी आहेत. पण आजकाल आशयापेक्षा स्टाईलवर लोक भाळतात. खरं तर लोकांनी असल्या पोकळ, फिल्मी डायलॉगबाजीच्या राजकारणापासून सावध राहिलं पाहिजे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.