EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

राजबद्दलचा भ्रमाचा भोपळा

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 967
  • 0 Comment

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकणातील सभांना तुफान प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात वाढायचं, तर विदर्भात मर्यादा येतात. तिथं हिंदीचा पहिल्यापासून प्रभाव आहे. त्यामुळं ‘भय्यां’विरोधी त्रागा करून उपयोग होत नाही. मुंबईत परप्रांतीयांविरुद्ध भावनोद्दिपक राजकारण केल्यास मतं मिळतात. मुंबईतल्या मराठी जनांची मुळं कोकणात आहेत हे लक्षात घेऊन मनसेनं कोकणात हातपाय पसरण्यास सुरुवात केलीय. वास्तविक राज आणि नारायण राणे यांचं मेतकूट आहे. दोघांचा समान शत्रू उद्धव ठाकरे हे आहेत. परंतु जनाधार वाढवण्यासाठी राजना राणेंना लक्ष्य करणं भाग आहे. शिवाय सध्या ते शिवसेनेला थेटपणं अंगावर घेण्याचं टाळत आहेत.

 

राजकडं राजकीय धोरणीपणा आहे. पण जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन करण्याची त्यांची भूमिका असून, ती राज्य सरकारची आणि राणे यांची लाईन आहे. कोकणात जैतापूरला विरोध आहे, तसं त्याचं समर्थन करणारा वर्गही आहे. परंतु त्यांची मतं काँग्रेस-राष्ट्रवादीकडं वळतील, तर विरोधकांसाठी शिवसेना आहे. अशा वेळी एकीकडं राणेविरोध आणि दुसरीकडं जैतापूर समर्थन ही मनसेची भूमिका पाहून मतदार गोंधळात पडण्याची शक्यता वाटते. 

सभांना गर्दी झाली, तरी मतं मिळतात असं नाही, असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब असोत की अटलबिहारी वाजपेयी असोत; त्यांच्या सभांना वर्षानुवर्षं गर्दी होत असे आणि तरीही त्यांच्या पक्षांना दीर्घकाळ निवडणुकीत यश मिळत नव्हतं, हे खरंच आहे. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं ते 45 बंडखोरांच्या जोरावर.

मनसेकडं राजसारखा लोकप्रिय चेहरा असला, तरी संघटना नाही. तर शिवसेनेकडं खेड्यापाड्यात पोचलेली संघटना असली, तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडं करिश्मा नाही. उद्धव मतं मिळवू शकले नाहीत, तर शिवसैनिकांचं रूपांतर उद्या मनसैनिकांत होऊ शकेल. बाळासाहेबांनी केलं तसं भावनात्मक, द्वेषाधारित राजकारण प्रभावीपणं करू शकतात ते राज ठाकरेच. परंतु शिवसेनेबद्दल लोकांचा भ्रमनिरास बाळासाहेबांच्याच काळात होऊ लागला, याचं कारण ‘भ्रष्ट काँग्रेसला गाडा’, असं आवाहन करणारी शिवसेना अतिभ्रष्ट असल्याचं युतीच्या कारभारावरून स्पष्ट झालं. आज ठाण्यात शिवसेना - मनसेची अनधिकृत पक्ष कार्यालयं आहेत. तीसुद्धा जमीनदोस्त करावी लागली. मनसेच्या नगरसेवकालाही आज लाचखोरीसाठी अटक होते. म्हणजे शिवसेना आणि तिच्या पोटातून उगवलेली मनसे हे वेगळे नाहीत. सध्या कुणाच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात बिल्डरांना बोलावून निवडणुकीसाठीची आर्थिक पूर्वतयारी वेगात आहे, हेसुद्धा लोकांना ठाऊक आहे. 

मनसेमध्ये पक्षांतर्गत हाणामाऱ्या पुष्कळ आहेत. काही ठिकाणी पक्षाला इंपोर्टेड नेते आणावे लागत आहेत. 2009 मध्ये ‘एकही मारा, लेकिन सॉलिड मारा’ असे उद्‌गार राजनं काढले होते. शिवसेनेची वाट लावल्याचा आनंद होता. बाळासाहेबांनंतर शिवसेना कमकुवत झालीय. अशा वेळी शिवसेनेतील माणसं फोडायचा प्रयत्न होईल. बाळासाहेबांचा द्रष्टेपणा, मनाचा मोकळेपणा, विचारांची स्पष्टता आणि बेधडक वृत्ती सध्याच्या नेतृत्वात नसल्याचं निरीक्षण भाजपचे विधान परिषदेचे नेते विनोद तावडे यांनीही नोंदवलं आहे. उद्धव आणि राज एकत्र येतील, असं भाजपवाले जाहीरपणं म्हणत असले, तरी प्रत्यक्षात ही शक्यता कमी असल्याचं ते खाजगीत सांगतात. 

मराठी मतं फुटू देऊ नका, असं बाळासाहेबांचं सांगणं असे. तोच सूर उद्धव ठाकरे आळवत आहेत. माझा तोच प्रयत्न आहे, पण मनसेच टाळी द्यायला तयार नाही, असं उद्धव सूचित करत आहेत. तर मराठी मतांचा मुद्दाच राज फेटाळून लावत आहेत. 

मराठी अस्मिता की हिंदुत्व असं व्दैत नाही, हे पटवून देण्यासाठी उद्धवजी गुजरातचा दाखला देतात. मोदी गुजरातवादी आणि हिंदुत्ववादी दोन्ही आहेत! 

बाळासाहेबांच्या पहिल्या जयंतीच्या वेळीही उद्धव आपली नवी टीम जाहीर करू शकले नाहीत. पक्षातून होणारी पळापळ रोखण्याची ही चाल असू शकते. तर मनसेला किंगमेकरची भूमिका वठवायची आहे. 2009 मध्येही मनसे नसती, तर कदाचित राज्यात युतीची सत्ता येऊ शकली असती.

उद्या शिवसेना - भाजपबरोबर मनसे गेली, तरी जागावाटप करण्याचं काम अवघड बनेल. भाजपच्या पडणाऱ्या जागा मनसेच्या गळ्यात मारायचा प्रयत्न होईल. मुंबईत मनसेनं मोठं यश मिळवलं असल्यानं इथं जागावाटप खूपच कठीण जाईल. एक आहे की, मनसे शहरांपुरती सीमित आहे. युतीच्या पाठीवर बसून तिला ग्रामीण भागात जाता येईल. युतीच्या मदतीनं मनसेला लोकसभेतही जाणं शक्य होईल. अशी महायुती झाल्यास आघाडीला फटका बसेल. मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, ती संख्या 20 वर जाऊ शकेल.

आजवर काँग्रेसनं मनसेचा उपयोग करून घेतला. उघडपणं मनसेशी निवडणूक समझोता केल्यास देशभर काँग्रेसविरुद्ध बोंबाबोंब होईल. उलट आज दादा आणि राज यांची जुगलबंदी सुरू असली, तरी राष्ट्रवादीचे 90 आमदार आले, तर ते मनसेची मदत घेणारच नाहीत, असं नव्हे. कदाचित काँग्रेसला वगळून राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसेसुद्धा एकत्र येऊ शकतात. 

राजकारणात कोणतीच शक्यता नाकारता येत नाही. सोनिया गांधींविरोधी हल्लाबोल करून स्वतंत्र राहुटी उभारणारे शरद पवार, शेवटी काँग्रेससह केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसले.

त्यामुळं सिंचनापासून दुष्काळापर्यंत विविध विषयांवर राज ठाकरे कितीही टिवटिव करत असले, तरी त्यांचा पक्ष आणि स्वतः ते इतरांसारखेच आहेत. तत्त्वशून्य व्यवहार, तडजोडी त्यांच्या पक्षालाही चुकलेल्या नाहीत. त्यांचे नगरसेवक आणि आमदार प्रश्नांचा पाठपुरावा करत नाहीत. तेसुद्धा सत्ताधाऱ्यांशी फिक्सिंग करतात. काही जण पैसे खातात. प्रश्नांचा अभ्यास करणारे थोडेच आहेत.

खुद्द राज ठाकरे एकच मुद्दा पुनःपुन्हा उगाळतात. राज्यातील जिल्ह्यांचे स्थानिक विषय हातात घेत नाहीत. त्यांच्याबद्दलचा भ्रमनिरासही वेगानं होत आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.