EasyBlog

This is some blog description about this site

भारत4इंडिया

बाळासाहेब नावाचा संप्रदाय

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1679
  • 3 Comments

बाळ केशव ठाकरे ते हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे....1966 ते 2012, शनिवार 17 नोव्हेंबर, अक्षरश: एक झंझावात शमला... मराठी मनाचा मानबिंदू ते हिंदुहृदयसम्राट ही वाटचाल म्हणजे एका व्यंगचित्रकाराच्या आयुष्यात उठलेलं एक वादळ... या वादळात अनेक जण भुईसपाट झाले. अनेक जण ताठ मानेनं उभे राहिले. आणि सलग गेली 45 वर्षांहून अधिक वर्षं अनेक तरुण पिढ्यांवर गारूड करणारा हा कलंदर माणूस आता गेला. तो गेला असला तरीही या जिंदादिल माणसाचा संप्रदाय त्या माणसाच्या आठवणींसह तसाच पुढं वाटचाल करणार आहे.

 

एका आयुष्यात अनेक प्रतलांमध्ये जगणं तसं अवघड असतं. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं पाहिलं तर कुणालाही तसं जगणं सोपं वाटेल इतकं सहज आयुष्य त्यांनी ठसठशीतपणं अनुभवलं.

बाळासाहेब नावाचा संप्रदाय कधी बनला असावा? हा संशोधनाचा विषय आहे. भगवी वस्त्रं घालून कुणी असा संप्रदाय निर्माण नाही करू शकत. हे रसायन असं अनेकांना भुरळ कसं आणि का पाडत होतं, याचासुद्धा खरा अभ्यास पॉलिटिकल तज्ज्ञांनी करायला हरकत नाही. व्यक्तिश: बाळासाहेबांना नेमकं समजून घेणं कदाचित त्यांच्यासोबत सावलीसारखं असणाऱ्या शिवसैनिकांना वा त्यांच्या शत्रूंनादेखील कधी शक्य झालं असावं, असं मला वाटत नाही. बाळ केशव ठाकरे हा कॅनव्हास खरंच खूप 'व्हास्ट' आणि तितकाच रंजक होता तो त्यामुळंच.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या धगीतून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं, पण मुंबई या राज्यात समाविष्ट करण्याबाबत अनेक कुभांडं रचली गेली होती. महाराष्ट्र हे राष्ट्रातील एक राज्य आणि या राज्यात मुंबईच्या समावेशावरून झालेला बेबनाव असा तो काळ होता. केशव अर्थात प्रबोधनकार ठाकरेंचा वारसदार ते महाराष्ट्राचा तारणहार अशी अपेक्षा आणि आशा बाळ ठाकरे या व्यंगचित्रकारावर त्यांच्याच वडिलांनी जेव्हा सोपवली तेव्हा शिवसेना अस्तित्वात आली.

याच काळात भूमिपुत्र मराठी तरुणांना औद्योगिक मुंबईत नोकऱ्या मिळण्याची संधी असतानाही डावलणारी एक यंत्रणा कार्यरत होती. मराठी सुशिक्षित तरुण अपमानित होत होता. मध्यमवर्गीय मराठी समाज दुखावला आणि गांजला गेला होता. हा समाज बाळ ठाकरे या व्यक्तीच्या मागे उभा राहिला. शिवसेना म्हणजे ठोकशाही आणि नंतर झोटिंगशाही अशी जी अवस्था झाली ती का? हा प्रश्न बाळासाहेबांना विचारायचा राहून गेला.

त्या काळी दादर, परळ, लालबाग ही नावं घेतली तर अंगावर शहारा यायचा. मंतरलेले तरुण, भारावलेला नेता असा तो काळ, मराठी माणूस नावाची अस्मिता जन्माला आली होती. मार्मिक आणि नंतर क्वचित 'सामना'मधून ती पुढं आली.

मार्मिक ते सामना हासुध्दा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एक अभ्यास करण्याजोगा काळ. मार्मिक बुद्धिवादी मराठी तरुण आणि मध्यमवर्गीय समाजाचा प्रवक्ता होता. तर 'सामना'मध्ये संघटनेनंतरच्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या मुखपत्राचा ठसा होता. या सगळ्यांपासून बाळासाहेब लांब राहिले नाहीत. बाळासाहेब चालत राहिले. त्यांना कधी पश्चात्ताप झाल्याचं त्यांनी बोलून दाखवलं नाही.

मी व्यक्तिश: एक पत्रकार आणि एक राजकीय अभ्यासक म्हणून बाळासाहेबांना कधीच एका चष्म्यातून पाहू शकलो नाही. मी ज्या लिबरल, पुरोगामी, सेक्युलर विचारसरणीशी माझी बांधिलकी समजतो त्यात ते बसत नव्हते. पण तरीही बाळासाहेबांची भुरळ पत्रकारिता करताना मातोश्रीवर बाईट्स घेताना असायचीच. तेव्हा झी न्यूजमध्ये आम्हाला म्हणजे टीव्ही पत्रकारांना ते दांडेकर म्हणत असत. अनेकांना ते 'पोटावळे' पत्रकार म्हणत. स्वत: पत्रकार असलेला हा माणूस लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असा नेहमीच कातावलेला का असायचा, हा प्रश्न त्यांना विचारायचा राहून गेला याची पत्रकार म्हणून रुखरुख आहे. बाळासाहेबांना असे अनेक थेट प्रश्न अलीकडच्या काळात विचारायचे राहून गेले.
 
खरं तर बाळासाहेबांबाबत आम्ही ठाणे जिल्ह्यात, कल्याणसारख्या ठिकाणी जन्मलेली माणसं नेहमीच 'भावुक' वा 'बायस' असायचो. आम्ही लहानपणापासून शिवसेना कल्याणच्या दधनाका परिसरात पाहिली आणि ठाण्यातही अत्यंत जवळून पाहिली. नातेसंबंधित आणि मित्रपरिवार सगळाच शिवसेनेचा गोतावळा. मुंबईनंतर याच ठाणे जिल्ह्यात शिवसेना रुजली, वडापावच्या गाड्या सत्तेत असताना झुणका-भाकरची केंद्रं आली आणि गल्लीमध्ये उभी असलेली किल्ल्यासारखी शिवसेना शाखा, सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले फळे, शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेच्याच अॅम्ब्युलन्स, हे असे महानगराच्या कोंडीत घुसमटलेल्या मराठी माणसाला आधार देणारे कोपरे आम्ही पाहिले.  

झपाटलेली शिवसैनिकांची फौज पाहिली. आनंद दिघेंसारखा त्यांचा तितकाच झपाटलेला नेता पाहिला. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उठलेला हिंसाचार आणि सैरभैर झालेले शिवसैनिक पाहिले. शिवसेनेच्या अस्तित्वाचा भाग असलेला ठोकशाहीचा उग्र चेहरा पाहिला. १९९३च्या दंगलींमध्ये हिंदू-मुस्लिमांमधली माणुसकीला लाजवेल अशी परिस्थिती पाहिली. मायकल जॅक्सनचा शो पाहिला. दिल्लीत फिरोजशहा कोटलाची उखडलेली खेळपट्टी पाहिली. छगन भुजबळ, रमेश प्रभू, गणेश नाईक, सतीश प्रधान, नारायण राणे, राज ठाकरे हे सगळे शिवसेना सोडताना पाहिले. राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्ष होताना पाहिलं. या आणि अशा अनेक घटना....

१९९६पासून बाळासाहेबांना या ना त्यानिमित्तानं जवळून पाहिलं. बाळासाहेबांचा बॉलीवूडमधला गोतावळा पाहिला. दिलीप कुमार, सुनील दत्त, अमिताभ ते सलमान खान आणि संजय दत्त यांच्याशी असलेला घरोबा पाहिला. बाबासाहेब पुरंदरे असोत की लता मंगेशकर, बाळासाहेबांचा चेहरा, व्यक्तिमत्त्व हे प्रत्येकासाठी वेगळं होतं.

बाळासाहेबांचा चेहरा आणि स्वभाव त्यामुळंच सतत बदलत राहिला. भूमिका घ्यायची तर त्याच्याबाबतची त्यांनी कधी तमा बाळगली नाही. काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटलांना मराठी म्हणून पाठिंबा देणं असो की, राज्यासमोर अनेक अमराठी माणसांना खासदार करणं असो, बाळासाहेबांचा आदेश आला की पुढे काहीच चर्चा नसायची. मराठी भाषा ते हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेबांच्या मागे शिवसैनिक आणि शिवसैनिक नसलेले त्यांचे चाहते कधीही कमी झाले नाहीत.

श्रीकांत ठाकरे, मीनाताई ठाकरे, बिंदुमाधव ठाकरे यांच्या जाण्यानं बाळासाहेब आधीच विद्ध झाले होते. पण बाळासाहेबांच्या ठाकरे कुटुंबाच्या पलीकडं त्यांचं एक कुटुंब होतं. असंख्य शिवसैनिक हे त्यांचं हे एक टॉनिक होतं. बाळासाहेब यांचं असं प्रत्येकाशी नातं होतं. त्या नात्याला नाव नव्हतं.  

शिवसेना भाजप युती हा बाळासाहेबांच्या आयुष्यातला राजकीय कात्रज घाट होता, असं मला नेहमीच वाटतं. प्रमोद महाजनांच्या सोबत या युतीनं बाळासाहेबांना ९३च्या दंगलीनंतर हिंदुहृदयसम्राट या टप्प्यावर आणून ठेवलं.

कर्मकांडाच्या, थोतांडाच्या विरोधात शड्डू थोपटलेल्या प्रबोधनकारांचा वारसदार हिंदुहृदयसम्राट झाला. शिवसेनाप्रमुख या कॅनव्हासवर खूप काळ रेंगाळले अन्यथा चित्र वेगळं असतं.

या सगळ्याच्या पलीकडं जाऊनसुद्धा बाळासाहेब यांच्याबद्दल लिहिणं, बोलणं, प्रश्न विचारणं राहून जातं. व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख हा प्रवास म्हणूनच नुसता एका पक्षप्रमुखाचा जीवनप्रवास उरत नाही. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असलेल्यांच्या हृद्याचेसुद्धा ते सम्राट असायचे. हाच काय तो बाळासाहेबांचा मोठेपणा आहे, असं मला वाटतं. म्हणूनच एक झंझावात शमला असला तरीही बाळासाहेब, तुमचा संप्रदाय अजून तुमच्या आठवणी काढत तसाच या महाराष्ट्रात आणि जगभरात जिवंत असणार आहे.

People in this conversation

Comments (3)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

'भारत4इंडिया.कॉम' ही मुख्यत्वे संस्थापक संपादक मंदार फणसे यांची संकल्पना. गेली 14 वर्षं ते पत्रकारितेत आहेत. सुरुवातीला 'अल्फा मराठी', त्यानंतर 'झी न्यूज', 'एनडीटीव्ही', 'सीएनएन-आयबीएन,' 'आयबीएन-लोकमत' असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास झालाय. सध्या ते 'जय महाराष्ट्र' या 24 तास न्यूज चॅनेलचे संपादक आहेत. झुऑलॉजी, इतिहास आणि एन्थ्रोपॉलॉजी हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. 'भारत' आणि 'इंडिया'मध्ये असलेली दरी सांधण्यासाठी काय करता येईल, याबाबतचे विचार त्यांच्या मनात बरेच दिवस घोळत होते. त्यातूनच 'भारत4इंडिया.कॉम' या वेबपोर्टलचा जन्म झाला. हे पोर्टल म्हणजे ग्रामीण भारताचं पहिलं न्यूज नेटवर्क आहे. 'भारत' आणि 'इंडिया'तली दरी सांधली गेल्यास देशाचा सामाजिक आणि आर्थिक चेहरामोहरा नक्कीच बदलेल, असा त्यांना ठाम विश्वास आहे. 'ब्रेकिंग न्यूज'च्या पलीकडची दृष्टी ठेवून पाहिलेलं मीडियाचं त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय.