EasyBlog
This is some blog description about this site
भारत4इंडिया
जित्राबांचं गाऱ्हाणं
माघ महिना संपेपर्यंत म्हणजेच थंडीचा हंगाम असेपर्यंत जत्रा, यात्रांनी ग्रामीण भागाला एक वेगळीच हुशारी आलेली असते.
कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळची उन्हं अंगावर घेत लोक आपापल्या गावच्या श्रध्दास्थानांना भक्तिभावानं भेटी द्यायला निघालेले असतात.
शहराच्या आश्रयाला आलेले गावकरीसुध्दा याच काळात मग सुट्ट्या टाकून आपल्या गावी जायचे बेत आखतात. यात्रा गावाला फुलवून टाकते. नुकत्याच पुसेगाव, माळेगाव इथल्या यात्रा झाल्या. स्थानिक आदिमाता, खंडोबा आणि ग्रामदेवतांच्या उत्सवाचा हा काळ आहे. अजूनही ग्रामीण लोकजीवन या यात्रांवर बरंचसं अवलंबून आहे. अर्थकारण, बाजारहाट, जात पंचायती आणि गुरांचा बाजार असे समाज व्यवहार याच काळात फॉर्मात चालतात आणि म्हणूनच याच काळात चालायच्या त्या बैलगाडा शर्यती, रेड्यांच्या टकरी, शंकरपटाच्या थरारक शर्यती किंवा हेल्यांच्या सगरी.
पण 'अॅनिमल राइटस्' आणि 'एथिकल अॅनिमल ट्रिटमेंट' असे काही शब्द घेऊन शहरांमधून 'पेटा' सारख्या संस्था पुढे आल्या. शहरांमध्ये भले 'रेसकोर्स' चालोत. भले त्या रेसकोर्सवर घोड्यांना 'डोपिंग' करणारे असोत. शहरी ट्रॅफिकच्या कर्णकर्कश आवाजात हत्तींची फेरी काढणारे असोत वा अगदी मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा प्रश्न असो, ही एक चळवळच उभी राहिली. या चळवळींनी शहरातले हे प्रश्न निकालात न काढता, खेड्यांकडे मोर्चा वळवला. हायकोर्टात पिटिशन्स दाखल झाल्या. सरकारनं म्हणजे कुणा अधिकाऱ्यानं या विषयांचा सखोल अभ्यास न करता जीआर काढले. टकरी आणि बैलगाडा शर्यती बंद झाल्या.
केरळसारख्या राज्यात 'जलैकट्टू' म्हणजे बैलांशी माणसांनी झुंजी करायच्या, असा पारंपरिक खेळ आहे. यावरसुध्दा बंदी आणली. पण गावकऱ्यांनी ही बंदी झुगारून दिली. आजही याच काळात ही 'जलैकट्टू'ची धम्माल केरळच्या गावांमध्ये सुरू आहे. खरं तर महाराष्ट्रातील कुठल्याही परंपरेच्या तुलनेत केरळमधला हा प्रकार जीवघेणा आहे. मात्र तो सुरूच आहे. केरळमधल्या त्या गावकऱ्यांची श्रध्दा म्हणून.
जत्रांच्या निमित्तानं मुक्या प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा राज्यात जवळजवळ बंद झाली तरी काही ठिकाणी 'देवाचा प्रसाद' म्हणून त्या सुरूच आहेत.
हे सगळं विस्तृत मांडण्याचा घाट इथं घातला कारण हे विषय वाटतात तितके सोपे नाहीत. श्रध्दा, अंधश्रध्दा, रीती, परंपरा आणि त्या नावानं विविध समाजांची सांगड यांमध्ये आहे आणि ती गुंतागुंतीची आहे. सरकारनं कशावर बंदी घालावी आणि कशावर घालू नये, याबाबत त्यासाठीच मतभेद आहेत. एक मात्र नक्की, ज्या जिव्हाळ्यानं बळीराजा जित्राबं बाळगतो, शेती आणि संबंधित कामं या जनावरांकडून करून घेताना त्यांना जीव लावतो, त्याची ती संवेदनशीलता लक्षात घेऊन असले 'बंदी'चे निर्णय घेतले जावेत.
शेतकऱ्यांसाठी शिवारात आलेलं सगळ्यात मोठं धन कुठलं असेल तर ही बैल, गाई, म्हशी आणि प्रसंगी बकऱ्यांची मालकी. शेतीसोबत चांगली जातिवंत जनावरं बाळगणं हे वैभवाचं लक्षण. जत्रांमधून भरलेल्या बाजारांमधून अशी चांगली खोंडं निवडायची, गाडीला जोडायची नाही तर पैदासीला वापरायची हा कृषिसंस्कृतीचा अत्यावश्यक भाग आहे. हे या कायदे पंडितांना समजावून सांगण्याची ही वेळ आहे.
ऑलिपिंकमधले अर्धेअधिक खेळ म्हटले तर मानवाच्या आदिम ऊर्मी चाळवणारे खेळ आहेत. तलवारबाजी असो की बॉक्सिंग, हे खेळ त्यातील हिंसा व्यक्त करण्याचा भाग सोडून, इजा करण्याचा भाग सोडून, सुरक्षेचे सर्व नियम कोटेकोरपणं लावून खेळले जातात. त्यांच्यावर बंदी येत नाही ती त्यामुळंच. मग असं असताना ग्रामीण भागातील 'कृषिसंस्कृती'मधल्या माणूस आणि जित्राबं यांच्या नात्यांचा भाग असणारे खेळ एका 'जीआर'मध्ये बंद होतात, त्याला सुसंस्कृतपणा म्हणणं योग्य नाही.
बैलगाडा शर्यतीसारखे खेळ असोत वा शंकरपटासारखे महिला 'जॉकी' असलेल्या विदर्भातील शर्यती. यामध्ये काही आधुनिक नियम आणि नियमावली लागू करून का खेळले जाऊ नयेत, हा खरा प्रश्न आहे. बैलांच्या झुंजींमध्येसुध्दा 'सुरक्षिततेचे' नियम लागू करून हे खेळ सुरू ठेवायला काय हरकत आहे? ग्रामीण भागातील ते सर्व काही अनिष्ट.. या शहरी मानसिकतेमधून हे घडतंय का? याचासुध्दा विचार न्यायबुध्दीनं होण्याची गरज आहे.
जित्राबं, जत्रा आणि ग्रामीण भागातील माणूस यांचा परस्परांमधील संबंध म्हणूनच पुन्हा एकदा डोळसपणे अभ्यासण्याची गरज आहे. हा अभ्यास सरकारनं करण्याची गरज आहे. आपल्याकडे या विषयांवरील मानवशास्त्रापासून ते समाजशास्त्रापर्यंत अनेक तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ग्रामीण समाजाच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक व्यवहारांवर दूरगामी परिणाम करणाऱ्या या अशा प्रकारच्या 'बंदी' घालताना तारतम्यानं निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षा आहे. जित्राबं, जत्रा आणि जनता यांचं नातं 'मॉल'मध्ये 'विंडो' शॉपिंग करणाऱ्यांपेक्षा जास्त घट्ट आहे.
शेतकऱ्याची 'जित्राबं' म्हणूनच खूप महत्त्वाची आहेत. आपापल्या पंचक्रोशीत शेतकऱ्याला 'आत्मसन्मान' मिळवून देणाऱ्या या 'जित्राबां'चं जत्रेच्या या काळात 'गाऱ्हाणं' ऐकणारं कुणी आहे का?