EasyBlog

This is some blog description about this site

गणराज्य

खेळा जरूर, पण पाहून

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1338
  • 0 Comment

पुणे-नाशिक रस्त्यावर मंचरजवळ एका हॉटेलचं उद्घाटन रविवारी माझ्या हस्ते झालं. घोडेगावच्या काळे कुटुंबीयांनी भागीदारीत हे हॉटेल सुरू केलं आहे. घोडेगावच्या आबासाहेब काळेंनी १९४८ मध्ये त्या गावात न्यू इंडिया नावाचं हॉटेल सुरू केलं होतं. मिसळ, भजी अशा खास मराठी पदार्थांसाठी हे हॉटेल लोकप्रिय आहे. शेती करतानाच सोबत आणखी काही उत्पन्न असावं म्हणून काळे यांनी हॉटेल सुरू केलं. तीन पिढ्यांच्या व्यावसायिक प्रयत्नांमुळं हॉटेल व्यवसायात काळेंना यश मिळालं. रविवारी सुरू झालेलं हॉटेल हे काळे कुटुंबीयांच्या व्यावसायिक यशाचं पुढचं पाऊल आहे. नव्या काळाला अनुसरून अत्यंत आकर्षक आणि आधुनिक रेस्टॉरंट त्यांनी सुरू केलं आहे. शहरी लोकांनाही ते आवडेल. शेतकर्‍यांची मुलं व्यवसायात यशस्वी पावलं टाकत आहेत, हे समाधानकारक चित्र या निमित्तानं दिसलं.

महाराष्ट्रात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी शेतकरी समाज केवळ शेतीवर अवलंबून होता. शिक्षणाची संधी नाही, नव्या जगात काय चालेलं आहे याची माहिती नाही आणि नव्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्याचा मार्ग नाही, अशा कोंडीत राज्यातील शेतकरी समाज सापडला होता. पारंपरिक पद्धतीनं शेती करायची आणि बेभरवशाच्या उत्पन्नावर गुजराण करायची ही समस्या अनेक ग्रामीण कुटुंबांना भेडसावत होती. ही कोंडी फुटली १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्याची जडणघडण झाली. त्यामध्ये शिक्षणाचं सार्वत्रीकरण करून बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. आर्थिकदृष्ट्या मागासांना मोफत शिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यावेळच्या राज्य सरकारनं घेतला आणि त्यामुळं बहुजन समाजासाठी शिक्षणाचा राजमार्ग खुला झाला. ठिकठिकाणी शाळा आणि महाविद्यालयं सुरू झाल्यामुळं ग्रामीण जनतेसाठी शिक्षण आवाक्यात आलं. शिक्षणाच्या संधीची उपलब्धता वाढवण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न चालूच आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी देऊन हवं त्याला इंजिनीअर होण्याची संधी उपलब्ध करणं ही अलीकडची एक मोठी उपाययोजना होती. या सर्वांचा एकत्रित प्रयत्न म्हणून शेतकरी समाजात आता मोठ्या संख्येनं उच्चशिक्षित लोक दिसतात. शिक्षणाच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची मुलं आता सरकारमध्ये उच्च पदांवर आहेत.

केवळ शेतीमध्ये अडकलेल्या बहुजन समाजाची कोंडी फुटून तो उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रांतात गेला. त्यामुळं या वर्गाला निश्चित स्वरूपाचं उत्पन्न मिळू लागलं. शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यानंतर जी कोंडी फुटली त्यामुळं काळाच्या ओघात शेतकर्‍यांची मुलं उद्योग व्यवसायातही गेली. सुरुवातीला ज्या काळे कुटुंबाच्या हॉटेलचा उल्लेख केला त्याच्या सर्व संचालकांचं वकिलीचं शिक्षण झालं आहे. राज्यात आज अशा प्रकारची उदाहरणं अनेक दिसतील. बांधकाम, हॉटेल अशा व्यवसायांबरोबरच तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक व्यवसायांमध्येही शेतकर्‍यांची मुलं यशस्वी धडपड करताना आज दिसतात. गेली काही दशकं राज्यकर्त्यांनी जी पावलं टाकली त्याचा हा एकत्रित परिणाम आहे.

शेतकरी समाजानं उद्योग व्यवसायामध्ये उडी घेण्याचं स्वागत करतानाच एक महत्त्वाचा मुद्दा मांडला पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी पिढ्यान् पिढ्या कष्ट करून जमिनी सांभाळल्या म्हणून आज आपल्याला वारसा लाभला आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेत जमिनीला प्रचंड किंमत आल्यामुळं छोट्या शेतकर्‍यालाही जमीन विकून मोठा पैसा मिळवण्याची संधी मिळाली आहे. काळाच्या ओघात बदलत्या गरजांनुसार काही व्यवहार करणं ठीक आहे, पण आपल्या वाडवडिलांचा हा वारसा आपण तात्पुरत्या गरजांसाठी नष्ट करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जमीन हे एक महत्त्वाचं भांडवल आपल्याकडं आहे, म्हणून आपण त्याचा कसाही वापर करणार का? एक उदाहरण देतो. गावोगावी आजकाल मोठमोठी मंगल कार्यालयं झालेली दिसतात. आपल्याकडे जमीन आहे म्हणून त्यावर भलंमोठं कार्यालय बांधून व्यवसाय सुरू करण्याची हौस दिसते. पण इतकी कार्यालयं बांधल्यावर हा धंदा चालणार का, या बाजारातून कार्यालयाच्या धंद्यात किती उत्पन्न मिळू शकतं, अशा प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे.

शेतकर्‍यांच्या मुलांनी उद्योग व्यवसायात उतरण्याचं स्वागतच केलं पाहिजे. त्यामुळं त्यांना स्वतःला वैध मार्गानं चांगलं उत्पन्न मिळतंच, शिवाय ते रोजगार निर्माण करतात. पण धंद्याच्या बाबतीत 'खेळून पाहू' असं आंधळं धाडस करणं योग्य ठरत नाही. धंदा यशस्वी होण्यासाठी आपण विकत असलेल्या मालाची किंवा सेवेची विक्री होणं आवश्यक आहे. त्यामुळंच आपण जो व्यवसाय सुरू करणार त्यासाठी अनुकूल बाजारपेठ आहे का, बाजारात सध्या किती स्पर्धा आहे, आपण स्पर्धेत कसं यशस्वी होऊ, बाजारपेठेत आपला वाटा मिळवण्यासाठी आपल्याकडे काय युक्ती आहे असा सगळा अभ्यास गरजेचा आहे. केवळ मनात आलं म्हणून मारली उडी, असा दृष्टिकोन धंद्याच्या बाबतीत धोक्याचा असतो. बहुजन समाजातील एका तरुणानं सोन्याचांदीचा व्यवसाय करायचं ठरवल्यानंतर तो व्यवसाय समजून घेण्यासाठी वर्षभर एका प्रसिद्ध दुकानात नोकरी केली होती. त्यानंतर त्या तरुणानं पुण्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपली सोन्याचांदीची दोन दुकानं यशस्वी केली. व्यवसायात पडताना असा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रत्येकानं सुरुवातीला नोकर म्हणून काम करावं, असं नाही, पण आपण ज्या व्यवसायात उडी मारणार त्याच्या खाचाखोचा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी गरज पडली तर प्रसंगी दुसर्‍याकडेही काम करण्याची तयारी हवी.

वाडवडिलांनी जमिनी जपल्या म्हणून आजच्या जगात आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाचं भांडवल आहे. पण भावनेच्या आहारी जाऊन हे भांडवल उधळून टाकू नये. म्हणूनच मला वाटतं की, खेळून पाहण्यापेक्षा पाहून खेळणं महत्त्वाचं !

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित. ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचं नेतृत्व करतात.