EasyBlog

This is some blog description about this site

मराठवाडी तडका

विद्यापीठाचा सुवर्णकाळ

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1153
  • 0 Comment

कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे म्हणजे शैक्षणिक व्हिजन असलेला ‘बापमाणूस’.
अशी शिक्षणाप्रती सकारात्मक दृष्टी असलेली माणसं आज लोप पावत चाललेली आहेत, याचं वाईट वाटतं. हे वाक्य आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं. १७ जुलै २००८ रोजी विद्यापीठाला निमसे यांच्या रूपानं नवे कुलगुरू मिळाले. निमसे यांनी आपल्या ‘व्हिजन शिक्षण’ या मिशनच्या माध्यमातून विद्यापीठाला २० वर्षं पुढे नेलं आहे.

 

निमसे यांनी केलेली नांदेड विद्यापीठासाठीची कामगिरी ऐतिहासिक सुवर्णपानावर नक्कीच लिहिली जाईल. मागास असलेल्या मराठवाड्यात तीन विद्यापीठं आहेत. जसं वेगवेगळ्या क्षेत्रांत असलेलं मागासलेपण मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलंय, तसंच शिक्षणाच्या बाबतीतही. औरंगाबादच्या ‘बामुं’ विद्यापीठानंतर नांदेडच्या ‘एसआरटी’ विद्यापीठाची स्थापना झाली. मराठवाड्यामध्ये असणार्‍या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मिळून हे एक विद्यापीठ देण्यात आलं.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी या विद्यापीठाची मुहूर्तमेढ पहिले कुलगुरू म्हणून रोवली. वाघमारे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक अवघड समस्यांना तोंड देऊन नवनिर्मितीसाठी सातत्य ठेवलं.   आता विद्यापीठाचे सातवे कुलगुरू म्हणून सर्जेराव निमसे यांनी पदभार स्वीकारला. निमसे यांनी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी जवळजवळ ३५ वर्षं संशोधन केंद्र आणि विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या संदर्भात काम केलं आहे. हा सगळा अनुभव त्यांना ‘एसआरटी’ विद्यापीठामध्ये निश्चितच फायद्याचा राहिला. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व क्षेत्रात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिपूर्ण असलेल्या कुलगुरू निमसे यांचा अनुभव निश्चितच विद्यापीठाच्या या साडेचार वर्षांच्या कार्यकाळासाठी नवी दिशा देणारा ठरला.

या साडेचार वर्षांमध्ये कुलगुरू निमसे यांनी जे करून दाखवलं ते काम २० वर्षांच्या पुढचं आहे. निमसे यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर २०२० पर्यंत आपण काय केलं पाहिजे, याचा एक कार्यक्रमच हाती घेतला होता. २०२०ला आणखी सात वर्षांचा कालावधी आहे आणि कुलगुरू निमसे यांचा कार्यकाळ येत्या १७ जुलै २०१३ रोजी समाप्त होणार आहे. २०२० पर्यंतचा जो अजेंडा कुलगुरू निमसे यांनी समोर ठेवला होता तो अजेंडा २०१३ मध्येच पूर्ण झाला की काय, असाच सगळा शैक्षणिक विकास विद्यापीठ आणि विद्यापीठ परिसरामध्ये, विद्यापीठांतर्गत चारही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर नॅशनल सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. सर्जेराव निमसे यांची निवड झाली. यावरूनच एक बाब लक्षात येते की, या व्यक्तीकडं संशोधनात्मक किती व्यापक दृष्टी असेल आणि त्या दृष्टीमुळंच त्यांची भारतातील सर्वोच्च संस्थेच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाली.

निमसे सरांनी जेव्हा कुलगुरू म्हणून या विद्यापीठाचा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांच्या विद्वत्तेविषयी विद्यापीठ आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये फारशी माहिती नव्हती; पण जेव्हा त्यांचा विद्यापीठाच्या सर्व प्रशासनाशी आणि प्राधिकरणाशी सातत्यानं संपर्क वाढला तेव्हा त्यांच्या विद्वत्तेविषयीचे अनेक साक्षात्कार सर्वांनाच झाले. ‘एक माणूस आणि त्याचं २४ तास ठरलेलं काम’ हा एकसूत्री कार्यक्रम निमसे सरांचा अजेंडा महिनाभरापूर्वीच ठरलेला ‘डे प्लॅन’ आणि त्या प्लॅनची काटेकोरपणं अंमलबजावणी हे निमसे सरांच्या बाबतीत सातत्यानं बघायला मिळतं. युजीसीनं विद्यापीठाला एक चौकट ठरवून दिली आहे. त्या चौकटीच्या माध्यमातून आणि विद्यापीठ कायद्याच्या अनुषंगानं योग्य ती पावलं उचलणं, शैक्षणिक धोरणं राबवणं, त्याची अंमलबजावणी करून घेणं, हे काम प्रत्येक कुलगुरूंनाच करावं लागतं; पण यापुढं जाऊन निमसे सरांनी जी काही पावलं उचलली ती कमालीची आश्चर्यचकित करणारी आहेत. चार वर्षं चालणारी कामं जर वर्षभरात होऊ लागली तर निश्चितच त्याचा फायदा उच्च शिक्षणप्रणालीवर झाल्याशिवाय राहणार नाही.

विद्यापीठामध्ये हेच झालं. निमसे यांच्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीमध्ये विद्यापीठात जे काही उभारलं गेलं ते विद्यापीठाच्या इतिहासात नोंद करणारंच होतं. निमसे यांनी कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी मॅकनं विद्यापीठाला ‘सी’दर्जा दिला होता. निमसे रुजू झाल्यावर अवघ्या सहा महिन्यांत विद्यापीठाला ‘बी’ दर्जा मिळाला. या सहा महिन्यांमध्ये निमसे यांनी आपल्या सगळ्या टीमकडून ज्या व्हिजननं वर्क करून घेतलं, त्यामुळं ‘सी’ हा विद्यापीठापुढं लावलेला दर्जा पुसला गेला. ‘सी’ ग्रेड पुसल्यामुळं झालं असं की, विद्यापीठाला ११ व्या प्लॅनिंगमध्ये १५ कोटी रुपये मिळाले, ज्यातून चार नवी वसतिगृहं, स्पोर्ट्सची इमारत, मीडिया सेंटर अशा वेगवेगळ्या इमारतींची कामं पूर्णत्वाकडं गेली. पूर्वी विद्यार्थी संख्या ८०० होती, ती ३००० वर जाऊन पोहोचली.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये अनेक नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले. या उपक्रमांना भविष्याचं मोठं व्हिजन होतं. गुरू-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त अनेक देश-विदेशातील पर्यटक नांदेडला आले. नांदेडचा अभ्यास, इथल्या मराठी संस्कृतीचा अभ्यास या सगळ्यांबाबत त्यांना रुची होतीच. निमसे यांनी तिथंच ही बाब हेरली आणि आपल्या विद्यापीठात परदेशी विद्यार्थी आले पाहिजेत, ते शिकले पाहिजेत, इथल्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, असं धोरण राबवलं. गुरू-ता-गद्दीनंतर दुसर्‍या वर्षापासूनच विद्यापीठात १५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यातून झालं असं की, परदेशी विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठाच्या टिचिंग प्रणालीला एक शिस्त लागली. विद्यापीठाचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढलं. वेगळी परीक्षापद्धती अवलंबणारं विद्यापीठ म्हणून नावलौकिकास प्राप्त झालेल्या या विद्यापीठानं दरवेळी वेगळं पाऊल टाकलं.

निमसे यांनी आपल्या कारकिर्दीत पेपर तपासण्याची झंझटच ठेवली नाही. पेपर तपासणी करणार्‍या मशिन्समुळं आज विद्यापीठात मे महिन्यात परीक्षा संपल्या की, जून महिन्यात निकाल हाती येतो. त्यामुळं परीक्षेबद्दल ना विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत ना पालकांच्या. जशी परीक्षा पद्धतीचा किचकटपणा निमसे यांनी दूर केला, तसाच परीक्षा घेण्याच्या पद्धतीबाबतही करण्यात आला. पहिलं, दुसरं आणि तिसरं सत्र अशी तीन सत्र विद्यापीठात असतात. या तीन सत्रांपैकी पहिली दोन सत्र शॉर्ट पेपर ही थिअरी पद्धती अंमलात आणली गेली. शेवटच्या सत्रात मात्र जुनी दीर्घ प्रश्नांची प्रणाली आजही कायम आहे.

विद्यापीठानं आणखी एक बदल केला की, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महिन्याभरातच परीक्षा घेतल्या जातात. यामुळं झालं असं की, विद्यार्थ्यांचं परीक्षा, निकाल या कारणास्तव वाया जाणारं एक वर्ष वाचलं गेलं. नव्या परीक्षा पद्धतीमुळं निकालावर परिणाम झाला खरा; पण हे सातत्य वाढत गेलं तर भविष्यात निकाल वाढत जाईल.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारा तरुण तडफदार पत्रकार म्हणून ओळख. गेल्या 10 वर्षांपासून संदीप पत्रकारितेत. शिक्षण, राजकारण आणि ग्रामीण विकास हे आवडीचे विषय. 'सर्व शिक्षा अभियानातील घोटाळा', 'बोगस विद्यार्थी संख्या' हे विषय महाराष्ट्राच्या समोर आणले. त्याबद्दल यंदाचा बाबा दळवी पुरस्कार.