EasyBlog
This is some blog description about this site
कडाणपाणी
भाजप-मनसेत कलगीतुरा
विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात झाली ती विरोधकांमधल्या फुटीवरून... सभागृहाबाहेरचा इश्यू, पण वातावरण मात्र तापलं ते विधिमंडळ परिसरातलं... राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केले आणि मग त्याला उत्तर मिळणार हे अपेक्षितच होतं. त्याप्रमाणं खडसेंनी त्याला उत्तर दिलंच... अगदी थेट सेटलमेंट केली असती तर कोहिनूर मिल खरेदी केली असती, असा थेट टोलाही लगावला. या आरोप-प्रत्यारोपांनंतर राजकीय समीकरणं बदलली. मनसेचा आमदारांचा गट विधानसभेत वेगळा बसणार हे स्पष्ट झालं. अखेर भाजप-मनसेमध्ये कडवटपणा निर्माण झाला. आता तो कुठल्या थराला जाणार याची चुणूक दिसायला लागलीच आहे. नाशिक महानगरपालिकेत भाजपचा पाठिंबा मनसेला मिळालाय. त्याचा फेरविचार सुरू झाल्याची चर्चाही विधिमंडळ परिसरात सुरू झाली.
राज ठाकरे हे राजकीय शत्रूंना थेट शिंगावर घेतात, त्याचाच हा अनुभव आता आलाय. खरं तर शिवसेनेनं विधिमंडळात अनेकदा मनसे कसा बाजूला पडेल, हेच पाहिलं होतं. विरोधी पक्षांच्या पंगतीतनं मनसे कसा बाजूला पडेल, याची काळजीही शिवसेनेनं घेतली होती. पण विरोधकांच्या दुफळीचा फायदा सत्ताधारी पक्षांना मिळू नये, यासाठी भाजपनं मनसेला जवळ घेण्याची कृती अनेकदा आपला शिवसेना हा मोठा मित्र नाराज झाला तरी केली होती. आता मात्र थेट खडसेंवरच आघात झाल्यानं भाजप मनसेला दूर ठेवेल हे स्पष्टच झालंय. खरं तर आता मनसेला जवळ करणं पक्ष म्हणून भाजपला परवडणारं नाही. शिवसेना-भाजप-आरपीआयच्या युतीत मनसेला सामील करून महायुती निर्माण करण्याचा प्रयत्नही भाजप नेते मुंडे यांनी केला होता. तो अपयशी ठरल्यानंतर मुंडे गप्प झाले होते.
राज ठाकरे यांनी सध्या तरी अजित पवार यांना अंगावर घेतलं आहे. अगदी हमरीतुमरीपर्यंत हे भांडण गेलं होतं. यापूर्वी त्यांनी अनेकांना अंगावर घेतलंय. त्या अंगावर घेण्याच्या स्वभावामुळं राज ठाकरे हे राज्यात चर्चेत राहिले. त्याचा फायदा काही अंशी त्यांना झाला खरा, पण त्याचा नकारात्मक परिणामही त्यांच्यावर झालाय. पण एखादं भांडण टोकाला गेल्यानंतर त्याची चर्चा बंद करण्याचं कसबही राज यांच्याकडे आहे, त्यामुळंच जेव्हा पुण्यात येऊन दाखवाच, असा एनसीपीनं इशारा देताच त्याला प्रतिआव्हानही त्यांनी दिलं. मात्र जेव्हा मोठ्या पवारसाहेबांनी एनसीपीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले, तेव्हा राज यांनीही आपण पुण्याला जाणार नव्हतो, मात्र मला आव्हान दिल्यानं मला उत्तर द्यावं लागलं, असं सांगत तो वाद तिथंच थांबवला. आता भाजपला अंगावर घेतल्यानं राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला मनसेला पडावं लागेल. मात्र त्याचा फायदा त्यांना जळगावात रिकाम्या झालेल्या राजकीय पोकळीत शिरकाव करताना होईल, असाही काहींचा अंदाज आहे.
खरं तर एका बाजूला नरेंद्र मोदी यांचं गुणगान गात त्यांच्याशी राज ठाकरे यांनी जवळीक साधलीय. तर दुसऱ्या बाजूला राज्यातल्या भाजपच्या नेत्याच्या विरोधात शिंग फुंकलंय. पण भाजपसारखा पक्ष ज्याकडं कुजबुज कार्यकर्त्यांची मोठी फौज राज्यात आहे, त्याचा तोटा होऊ शकतो, याचाही ठाकरे यांनी विचार केला असणारच. पण एक नक्की झालंय, राज्यात दुष्काळ पडलाय, सिंचनासारखे घोटाळे झालेत, त्यात अजूनपर्यंत काही पुढं आलं नाही, अशा वेळी सरकारची कोंडी करण्याऐवजी विरोधकांमधली भांडणं पहिल्याच दिवशी समोर आल्यानं, सत्ताधारी खुशीत गाजरं खात असणार.