EasyBlog

This is some blog description about this site

आनंद मार्ग

युपीएससी परीक्षा आणि बदल

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 4049
  • 0 Comment

युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेतील बदल, महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला 2015 पर्यंत प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी प्रेरक.

युपीएससीनं 5 मार्च, 2013 रोजी नवीन परीक्षा पध्दती जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. काही राजकीय पक्षांनी त्याचा त्यांच्यापरीनं वापर केला. युपीएससीच्या वेबसाईटवर या परीक्षेबाबत जी माहिती प्रकाशित झाली आहे तिचं सविस्तर आकलन केल्यानंतर आणि विविध मराठी वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या उलटसुलट बातम्या वाचल्यानंतर नागरी सेवा परीक्षेत करिअर करण्यासाठी झटणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, ती नाहीशी करण्यासाठी ऊहापोह करणारा हा लेखः

 

सर्वप्रथम परीक्षा पध्दतीत बदल केल्याबद्दल युपीएससीचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण अधिकारी निवडीची प्रक्रिया जास्तीत जास्त सर्वसमावेशक करताना सर्व शाखेच्या उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा आयोगानं केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. सदर सुधारणांसाठी ज्या समितीनं शिफारसी केल्या होत्या तिचे अध्यक्ष युजीसीचे माजी प्रमुख अरुण निगवेकर हे होते.

नोटिफिकेशनमध्ये आयोगानं स्पष्टपणं म्हटलंय की, 'सुधारित परीक्षेचा मुख्य उद्देश हा उमेदवाराकडं असलेली माहिती वा स्मरणशक्ती यांचा विस्तार तपासण्यापेक्षा उमेदवाराची एकूणच बुध्दिमत्ता कौशल्यं आणि एखादा विषय जाणून घेण्याची त्याची कुवत तपासणं हा आहे. मुख्य परीक्षेतील पेपरमधील प्रश्नांचं स्वरूप असं असेल की, सर्वसाधारण पदवी उमेदवाराला विशेष अभ्यास न करताही त्या प्रश्नांची उत्तरं देता येऊ शकतील. नागरी सेवेमध्ये कार्य करताना उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध विषय आणि घटनांबाबत उमेदवार किती जागरूक आहे हे तपासण्यासाठी या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील. तसंच सर्व पेपरमध्ये उमेदवाराची विविध मुद्द्यांबाबतची मूलभूत आकलन क्षमता, विश्लेषण क्षमता, तसंच देशाची सामाजिक -आर्थिक उद्दिष्ठं, ध्येय आणि गरजा इत्यादींबाबत असलेली परस्परविरोधी मतं जाणून घेण्याची कुवत तपासणारे प्रश्न, सदर पेपरमध्ये विचारले जातील. परिणामी उमेदवारानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना सदर उत्तरं ही मुद्देसूद, अर्थपूर्ण आणि विषयाला अनुसरून असतील यावर भर देणं आवश्यक आहे.' यावरून आपल्या लक्षात येईल की, सुधारित परीक्षा पध्दती ही अधिकाऱ्यातील हुशारीबरोबरच त्यांच्यातील शहाणपणा माणुसकीचं मूल्यमापन करण्यावर भर देणारी आहे.

गेल्या वीस वर्षांत भारतात झालेल्या आर्थिक सुधारणांच्या परिणामी समाजाच्या विविध क्षेत्रांत आणि विविध गटांवर त्याचे अनेक बरेवाईट परिणाम झालेले आहेत. अशा वेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांची संवेदनशीलता आणि दैनंदिन जीवनातील समस्यांकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या परिवर्तनाशी मिळताजुळता राहिल्यास शासनाचं
सर्वसमावेशक आणि शाश्वत सामाजिक -आर्थिक विकासाचं उद्दिष्ट आहे ते गाठण्यास अडथळे येणार नाहीत. तसं
पाहिलं तर संपूर्ण जगभरात एका विशिष्ट प्रकारचं संक्रमण होत आहे, अशा संक्रमणात भारतीय नागरिकांचे हितसंबंध जपणं आणि बदलत्या परिस्थितीतील उपलब्ध संधी भारतीयांना कशा उपकारक ठरतील या दृष्टिकोनातून शासनाची धोरणं आखणं आणि ती प्रभावीरीत्या अमलात आणणं हे कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणेमुळंच शक्य होतं. अशी यंत्रणा विकसित करायची झाली तर मग तशा कर्तबगार अधिकाऱ्यांची गरज असते. आणि असे अधिकारी निवडायचे झाले तर प्रचलित परीक्षा पध्दतीत बदल करणं महत्त्वाचं होतं. सुधारित परीक्षा पध्दतीनं या बाबीकडं लक्ष दिल्याचं दिसून येतं.

गेल्या आठवड्यातील काही मराठी वर्तमानपत्रांत प्रसिध्द झालेल्या बातम्यांत बदलत्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपकारक ठरणाऱ्या आणि सकारात्मक बाबींकडं दुर्लक्ष झालेलं आहे. अनेक बाबींबाबत तर संबंधितांना भाषांतराची समस्या असल्यामुळं की काय त्यांनी चुकीचा अर्थ लावून आपली मतं व्यक्त केलेली आहेत. कदाचित परीक्षेबाबतच्या तांत्रिक मुद्द्यांबाबत पुरेशी माहिती न मिळाल्यामुळं असा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वप्रथम नव्या पध्दतीतील सकारात्मक बाबींचा विचार करूया
पूर्वीच्या परीक्षा पध्दतीत मुख्य परीक्षेला एकूण 2300 गुण होते. त्यापैकी भाषा विषयाचे (इंग्रजी आणि उमेदवाराची मातृभाषा) यावरील 600 गुण हे फक्त उमेदवाराची पात्रता ठरवण्यासाठी विचारात घेतले जात नसत. महाराष्ट्रातील सध्या अनेक विद्यार्थी त्यांचं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्यामुळं या परीक्षेत मराठीऐवजी हिंदी किंवा इतर भाषेची निवड करतात, कारण सीबीएससी आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेत त्यांचा हा एक महत्त्वाचा भाषा विषय असे. त्यामुळं त्यांना उत्तीर्ण होण्यास मराठीपेक्षा हिंदी बरं वाटत असे. त्यातच गेली 5-6 वर्षं महाराष्ट्रातून दिल्लीत जाऊन नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही बरीच वाढलेली आहे. एका अंदाजानुसार दिल्लीतील राजेंद्रनगर आणि मुखर्जीनगर या दोन्ही ठिकाणी राहून युपीएससीच्या नागरी सेवेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या ही दरवर्षी पाच हजारपेक्षाही जास्त असते. नव्या परीक्षा पध्दतीत भाषा विषय निवडणं पूर्णपणं रद्द केलेला असून त्याऐवजी 'निबंध आणि इंग्रजी आकलन व सारांश लेखन' असा नवीन विषय समाविष्ट केलेला आहे. हा विषय 300 गुणांसाठी असून त्यामध्ये पूर्वीच्या परीक्षेतील 200 गुणांचा निबंधाचा विषय आणि इंग्रजी भाषेतील आकलन आणि सारांश लेखन यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. शिवाय या पेपरमधील सेक्शन-1 जो निबंधाचा भाग आहे तो विद्यार्थ्यांना मराठी भाषेत लिहिता येणार आहे. फक्त सेक्सन-2 हा इंग्रजी भाषेत लिहावयाचा आहे. मराठी भाषेतून परीक्षा देणारे उमेदवार पूर्वीच्या पध्दतीत निबंधाचा पेपर मराठीत लिहू शकत, नवीन पध्दतीत ही सोय उपलब्ध आहे.

आयोगानं उमेदवारांना सदर परीक्षा एकूण 23 भाषांमध्ये लिहिण्याची सोय पूर्वीपासूनच उपलब्ध केलेली असून त्यामध्ये मराठीचाही समावेश आहे. नव्या पध्दतीत परीक्षेचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी एखाद्या भाषेत सदर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची किमान संख्या ही 25 असण्याची अट घालण्यात आलेली आहे. गेली काही वर्षं महाराष्ट्रातून नागरी लोकसेवा पूर्वपरीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या ही 30 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातून दरवर्षी मुख्य परीक्षेसाठी निवड होणाऱ्यांची संख्या ही नेहमीच 300 ते 400च्या दरम्यान राहिलेली आहे. याबाबतचा अधिक तपशील युपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यावरून दिसून येतं की, किमान 25 उमेदवारांचा निकष मराठी भाषेसाठी लागू पडत नाही. त्यामुळं या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात किंवा  विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात काही अर्थ दिसत नाही.
   
पूर्वीच्या परीक्षेमध्ये 2300 गुणांपैकी 1200 गुण आणि त्यातही मुलाखतीस पात्र ठरण्यासाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या २००० गुणांपैकी १२०० गुण म्हणजेच एकूण २/3 भर हा वैकल्पिक विषयांतील कामगिरीवर असे. नव्या पध्दतीत एकूण १८०० गुणांमध्ये वैकल्पिक विषयास देण्यात आलेला भारांक २७ टक्के इतका आहे. पूर्वीच्या पध्दतीत पहिल्या १०० मध्ये येणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची कामगिरी ही त्यांनी वैकल्पिक विषयात मिळवलेल्या गुणांमुळे चांगली होत असे. मी असे काही विद्यार्थी पाहिले आहेत, की ज्यांना वैकल्पिक विषयांत १२०० पैकी ७५० ते ८०० पर्यंत गुण मिळालेले आहेत. युपीएससीनं मुख्य परीक्षेसाठी दिलेल्या ४८ वैकल्पिक विषयांतील विविध उमेदवारांची कामगिरी ही, कुठलाही फॉर्म्युला वापरला तरी समान पातळीवर आणणं शक्य नाही. त्यामुळं  निव्वळ वैकल्पिक विषयास जास्त भारांक दिल्यानं बऱ्याचदा अधिकारी बनण्यासाठी योग्य व्यक्तिमत्त्व असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असे. नव्या पध्दतीत वैकल्पिक विषयाचं वेटेज कमी केल्यानं अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. तसंच निवडलेल्या वैकल्पिक विषयाची उत्तरं मराठी भाषेत लिहिण्याची सोय उपलब्ध आहे. इथं आयोगानं २३ भाषा वाङ्मयांपैकी एक विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडण्यावर संबंधित उमेदवार त्या वाङ्मयातील पदवीधर असण्याची अट घातलेली आहे. त्यापाठीमागे निगवेकर समितीचा काय उद्देश आहे ते स्पष्ट झालेलं नाही. कदाचित विशिष्ट वाङ्मय विषयातील उत्तीर्ण होण्याचं प्रमाण किंवा संख्या जास्त असल्यामुळं या विषयातील गुणांमध्ये जी तफावत निर्माण होत असे ती नाहीशी करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला असावा. मुख्य म्हणजे दरवर्षी मुलाखतीत पात्र ठरणाऱ्या २००० पेक्षा जास्त उमेदवारांमध्ये हिंदी वाङ्मय घेतलेल्या उमेदवारांची संख्या ही सुमारे ५०० पेक्षा जास्त असतेच, तर अलीकडं पाली वाङ्मय विषय घेऊन पास होणाऱ्यांचं प्रमाणही बरंच वाढलं होतं. त्या वस्तुस्थितीचा विचार करून आयोगानं सर्व भाषांतील वाङ्मय विषयाला समान न्याय देण्यासाठी किंवा इतर बाबींचा विचार करून हा निर्णय घेतलेला असावा.

इथं मराठी वाङ्मय घेऊन मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही दरवर्षी चढउतार होत असल्याची बाब नाकारून चालणार नाही. एखाद् वर्षी ही संख्या ३०पेक्षा जास्त असते, तर अनेकदा ती दहापेक्षा कमी असते. परिणामी अंतिम यादीत मराठी वाङ्मय विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात सातत्य नाही. अलीकडं डीएड पदविका घेऊन प्राथमिक शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मराठी वाङ्मय हा विषय घेऊन नागरी सेवेची तयारी करायची आहे. त्यांना १२वीनंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून या विषयातील पदवी घेण्यासाठी नियोजन करता येतं. सध्या अनेक विद्यार्थी अशा पध्दतीनं परीक्षेची तयारी करून यशही मिळवत आहेत. त्यामुळं युपीएससीच्या नोटिफिकेशनमध्ये सदर मुद्द्यावर जास्त भर देऊन विरोध करणाऱ्यावर शक्ती घालवण्यापेक्षा वरील प्रकारे तयारी करून आपणास इतरांच्या पुढं निश्चितच जाता येतं.

नव्या परीक्षा पध्दतीत सामान्य अध्ययन घटकांचे एकूण चार पेपर समाविष्ट केले आहेत. या चार पेपरचा अभ्यासक्रम बारकाईनं पाहिल्यास एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रमाचा त्यात २/3 पेक्षाही जास्त समावेश झालेला दिसेल. त्यामुळं महाराष्ट्रातील जे विद्यार्थी एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेची जी तयारी करतात, मग ती इंग्रजी माध्यमातील असू दे, की मराठी... त्यांना याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. थोडक्यात, एमपीएससीनं हा अभ्यासक्रम एक वर्षापूर्वी स्वीकारून मराठी विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पूर्वओळख करून दिलेली आहेच. त्यामुळं निदान सामान्य अध्ययन विषयाचं पुरेसं अभ्यास साहित्य उपलब्ध नसल्याची टीका करून त्या कारणावरून आंदोलन करण्याचा इशारा देण्याचं प्रसिध्द झालं आहे. माझ्या मते नवीन अभ्यासक्रमातील सुमारे ७० ते ८० टक्के अभ्यास साहित्य मराठी विश्वकोशाच्या वेबसाईटचा योग्य तो वापर करून विद्यार्थ्यांना निश्तितच या चारही विषयांची तयारी करणं अवघड जाणार नाही. सदर विषयांचं  इंग्रजी माध्यमातील संदर्भ साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. तसंच या विषयांचा अभ्यास करताना उमेदवारानं नेमका कशावर भर द्यावा याबाबत आयोगानं त्यांच्या जाहिरातीत स्पष्टपणं नमूद केलेलं आहे.

सामान्य अध्ययन पेपर चारमध्ये समाविष्ट करण्यात आलेला अभ्यासक्रम हा भारतीय प्रशासकीय अधिकारी कसा असावा, याचं मार्गदर्शन करणारा आहे. या अभ्यासक्रमाचं योग्य आकलन करून त्यातील पैलू जर आपल्या व्यक्तिमत्त्वात विकसित केलं तर फक्त मुख्य परीक्षाच नाही तर मुलाखतीची तयारी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. एवढंच नाही तर सदर परीक्षेत यश नाही मिळालं तरी या विषयाची तयारी केल्यामुळं व्यक्तिमत्त्वात जो सर्वांगसुंदरपणा येतो तो आयुष्यात सर्व क्षेत्रात उपयोगी निश्चितच ठरू शकतो. त्यामुळं एकूणच बदललेली परीक्षा पध्दती ही गतिशील, संतुलित आणि उमेदवारांच्या वैचारिक क्षमतेला चालना देणारी निश्चितच आहे हे कळून येईल.

नागरी लोकसेवा मुख्य परीक्षेतील सुधारणा -
सदर लेखी परीक्षा एकूण १८०० गुणांची असून त्यामध्ये एकूण ७ पेपर असणार आहेत.
- पेपर १ : निबंध आणि इंग्रजी आकलन तसंच सारांश लेखन (इयत्ता १०वीचा स्तर) (३०० गुण)
    सेक्शन (१) - निबंध २०० गुण, सेक्शन (२) इंग्रजी आकलन आणि सारांश लेखन (१०० गुण)
- पेपर २ : सामान्य अध्ययन पेपर १ (२५० गुण)
      भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा इतिहास आणि भूगोल व समाज.
- पेपर ३ : सामान्य अध्ययन पेपर २ (२५०गुण)
    शासन राज्यघटना राज्य व्यवस्था सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध
- पेपर ४ : सामान्य अध्ययन पेपर ३ (२५०गुण)
    तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैविक बहुविविधता, पर्यावरण सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन.
- पेपर ५ : सामान्य अध्ययन पेपर ४ (२५०गुण)
    नीतिमूल्य एकात्मता आणि कौशल्य
- पेपर ६ : वैकल्पिक विषय पेपर १ (२५०गुण)
- पेपर ७ : वैकल्पिक विषय पेपर २ (२५०गुण)
    लेखी परीक्षेचे एकूण     - १८०० गुण
    व्यक्तिमत्त्व चाचणी     - २७५ गुण
    एकूण गुण         - २०७५

पेपर ६ आणि ७ मध्ये असलेल्या वैकल्पिक विषयांतील अभ्यासक्रम हा पदवी स्तरावरील परीक्षांच्या समकक्ष आहे. या अभ्यासक्रमाची व्याप्ती ही पदवीपेक्षा उच्च दर्जाची असली तरी पदव्युत्तर शिक्षणापेक्षा कमी स्तराची आहे. अभियांत्रिकी वैद्यकीय शाखा आणि कायदा या शाखेतील अभ्यासक्रम मात्र पदवी स्तराचा असेल.
मुख्य परीक्षेतील सर्व पेपर हे पारंपरिक स्वरूपाचे (निबंधात्मक) असून उमेदवारांना उत्तरं लिहावी लागणार आहेत.
प्रत्येक पेपरचा कालावधी हा तीन तासांचा आहे.
उमेदवारांना सर्वच्या सर्व ७ पेपरची उत्तरं ही इंग्लिश, हिंदी वा उर्वरित २१ भाषांत लिहिता येऊ शकतात. फक्त पेपर १ मधील सेक्शन २ मधील इंग्लिश कॅाम्प्रिहेन्शन आणि इंग्लिश प्रेसिसची उत्तरं इंग्रजी भाषेमध्ये लिहावी लागतील.
हिंदी आणि इंग्लिशव्यतिरिक्त इतर भाषेत जर उत्तर लिहावयाचं असेल त्यासाठी मात्र त्या भाषेतून उत्तरं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किमान २५ पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. ही अट    घालण्यामागं आयोगानं दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे परीक्षांचा दर्जा आणि गुणवत्ता स्थिर ठेवणं. जर त्या भाषेतील उत्तरं लिहिणाऱ्यांची संख्या २५ पेक्षा कमी असेल तर त्यांना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये उत्तरं लिहावी लागतील.

वर नमूद केलेल्या एखाद्या भाषेत उत्तरं देत असताना उमेदवाराला विशिष्ट संकल्पनेबाबत (त्या संकल्पनेचा इंग्रजी शब्द) लिहू शकतात. मात्र अशा सवलतीचा गैरवापर केल्यास त्याच्या एकूण गुणातून मार्क कमी केले जाऊ शकतात.

मुख्य परीक्षेतील सर्व पेपर हे फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापले जातात. मराठी माध्यमातून उत्तरं लिहिणाऱ्यांना त्या प्रश्नांचं भाषांतर स्वत: करावं लागतं.

उमेदवारांना सर्व पेपरची उत्तरं स्वहस्ताक्षरात लिहावी लागतात. अंध विद्यार्थ्यांना मात्र लेखनिक दिला जातो. तसंच त्यांना प्रत्येक तासासाठी १० मिनिटं जास्त दिली जातात. थोडक्यात, अंध विद्यार्थ्यांना तीन तासांच्या पेपरमध्ये अर्धा तास जास्त दिला जातो. तसंच स्नायू अपंगत्त्व आणि सेरेब्रल पालसी असणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक तासापाठीमागं २० मिनिटं याप्रमाणं तीन तासांसाठी एक तास जादा दिला जातो.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यवसायानं डॉक्टर असलेले आनंद पाटील विविध उच्चपदव्या विभूषित आहेत. 1988-89च्या बॅचमधून 69 रॅकनं त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. विविध संस्थांची उच्चपदं भूषवलेले डॉ. पाटील विविध सरकारी, निमसरकारी आणि खाजगी रोजगार निर्मितीच्या स्पर्धा परीक्षांचं नियोजन करणाऱ्या स्टडी सर्कलचे संचालक आहेत. वाचन आणि फिटनेसची आवड असलेल्या पाटील यांचं खेळामधील कौशल्यही वाखाणण्यासारखं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांत भाग घेऊन त्यांनी त्या यशस्वीपणं पूर्ण केल्या आहेत.