EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

पुन्हा एकदा ‘संमती वयाचं बिल’!

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2156
  • 0 Comment

सोळाव्या वर्षी लैंगिक संबंधांना संमती देण्याचा अधिकार मुलींना देण्याचा कायदा आणण्यावरून सध्या वादळ उठलं आहे आणि अनेक उलटसुलट मतं ऐकायला मिळत आहेत. मुळात संमती वयाचं हे बिल नेमक्या कोणत्या उद्देशानं आणलं गेलंय, याबद्दल संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती आणि वक्तव्यं अवतीभोवती आढळत आहेत...

सध्याच्या कायद्यानुसार 18 वर्षं वयाच्या आतील मुलीशी लैंगिक संबंध झाल्यास, मग त्यास तिची संमती असो वा नसो; असा संबंध करणारा पुरुष दोषी ठरतो, कारण अशा परिस्थितीत हे कृत्य हा बलात्कार ठरतो. त्यास कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. याआधी हेच वय बऱ्याच वर्षांपासून 16 वर्षं होतं, ते 18 करण्यात आलं, कारण 16 वर्षांची मुलगी अल्पवयीन असते आणि तिचं शरीरही लैंगिक संबंधांच्या दृष्टीनं तयार नसतं, असं मानलं गेलं. पण कायदा काहीही असला, तरी समाजात लहान वयातल्या मुलींबाबत लैंगिक संबंध हे वास्तव आहे, असं निदर्शनास असून, अलीकडच्या काळात मुली वयात येण्याचं आणि स्त्री रजोनिवृत्त होण्याचं वयही खाली आल्याचं आढळलं आहे. याच कारणानं, 16 वर्षांच्या मुलीला लैंगिक संबंध करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे, अशी सरकारची भूमिका दिसते. तसंच हे संबंध मुलीच्या संमतीनं होत असल्यास, पुरुषाला गुन्हेगार समजता येणार नाही, ही बाबही इथं अधिक महत्त्वाची ठरते. अर्थातच, गोष्ट दिसते तशी सोपी आणि सरळ नाही. त्यात अनेक धागे गुंतलेले आहेत. म्हणूनच त्यावर अधिक ऊहापोह होणं गरजेचं आहे. याचा संबंध बलात्काराच्या कायद्यातील असल्यानं तर फारच गंभीरपणं याकडं पाहायला हवं. या कायद्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचाही धांडोळा घ्यायला हवा. त्यातून समाजात वेळोवेळी झालेले बदल आणि त्या संदर्भातील चर्चा-वादंग समजून येतील आणि स्त्रीच्या संदर्भात समाज कसा विचार करत आला आहे, तेही स्पष्ट होईल.

एके काळी संमतीच्या वयाचं बिल हे महाराष्ट्राच्या राजकारण-समाजकारणातलं वादग्रस्त असं पर्व ठरलं होतं, त्याची आठवण इथं प्रकर्षानं होते. ब्रिटिश काळात बालविवाह होण्याचं प्रमाण समाजात मोठं होतं आणि बालविवाहामुळं लैंगिक संबंध लवकर सुरू होत. शिवाय ‘उच्चवर्णीयांमध्ये’ तर मुलीची मासिक पाळी सुरू व्हायच्या आतच तिचं लग्न झालं पाहिजे, असा नियमवजा संकेत होता. तसंच कुमारी मुलीशी विवाह करण्याचं बंधनही घातलं गेल्यानं मोठ्या वयाच्या विधुर पुरुषाचं लग्नही कन्येशी होत असे. त्यास समाजमान्यताही अर्थातच होती. या साऱ्या पार्श्वभूमीमुळं, कोवळ्या वयातील मुलींवर अपरिपक्व वयात लैंगिक संबंधांना सामोरं जाण्याची वेळ येत असे. कित्येकदा 9-10 वर्षांच्या मुलीही यात सापडत. यातूनच मुलींवर अत्याचार होत आणि बरेचदा त्यांचा मृत्यूही ओढवत असे. बंगालमधील फूलमणी (पुमनी) या कोवळ्या मुलीचा अशाच अत्याचारातून मृत्यू झाला. 1890 मध्ये संबंधित प्रकरण फूलमणी खटला म्हणून गाजलं होतं.

कोण होती ही फूलमणी?
फूलमणी ही बंगालमधली, अल्पवयीन विवाहित मुलगी होती. तिच्या पतीनं तिच्याशी लैंगिक संबंध केला आणि त्यात ती मरण पावली. तिचं वय दहा आणि त्याची तिशी उलटून गेली होती. वयाची दहा वर्षं पूर्ण झाल्यानं फूलमणीवर झालेला अत्याचार कायद्यानुसार गुन्हा ठरला नाही आणि तिचा नवरा हरिमोहन याला फक्त तीन महिन्यांची शिक्षा झाली. वरच्या कोर्टात ही शिक्षा वाढून एक वर्ष सक्तमजुरी झाली. पण या घटनेनंतर सरकारला वाटू लागलं, की संमती वयाची मर्यादा वाढवली पाहिजे. हे वय मग 14 वर्षं करण्यात आलं; ज्यावरून खूप मोठा गहजब आणि वादंग झडलं...

फूलमणीबाबत अत्याचार झाला होता हे स्पष्ट होतं आणि अशा कितीतरी फूलमणी देशात ठिकठिकाणी होत्या हेही सत्य होतं. पण या घटनेपूर्वीपासूनच मुळात वैवाहिक संमतीचा अधिकार स्त्रीला आहे किंवा नाही, याबाबत मोठा खल महाराष्ट्रात झाला होता तो रखमाबाईच्या निमित्तानं. इथं वयाचा प्रश्न नव्हता, तर स्त्रीच्या निवडीचा आणि पसंतीचा सवाल होता.

रखमाबाई ही सोमवंशीय क्षत्रिय समाजातली होती. तिच्या आईचा डॉ. सखाराम अर्जुन यांच्याशी पुनर्विवाह झाला होता आणि रखमाबाई ही आधीच्या लग्नातून जन्मलेली होती. तिच्या तेराव्या वर्षी तिचा विवाह 19 वर्षांच्या दादाजीशी करण्यात आला, पण विवाहानंतर काही काळ रखमाबाई माहेरी राहणार आणि दादाजी या काळात शिक्षण पूर्ण करणार, असं ठरलं होतं. उभयतांत वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. रखमाबाईला आपला नवरा आवडत नव्हता आणि ती त्याच्याकडे नांदायला जाण्यास चालढकल करत होती. तर दादाजीनं तिला कायदेशीर नोटीस पाठवली. रखमाबाईनं मुंबईच्या हाय कोर्टास सांगितलं की ‘मी लहान, नकळत्या वयाची असता माझा विवाह लावून देण्यात आला, तो मला पसंत नाही. शिवाय दादाजीनं शिक्षण घेतलं नव्हतं आणि तो अशक्त होता.' अशी कारणंही रखमाबाईनं हे लग्न अमान्य करताना दिली. पुरुषाची शय्यासोबत मनाविरुद्ध स्त्रीवर लादणं हा असंस्कृतपणा ठरेल, असं मत व्यक्त करून न्यायधीशांनी रखमाबाईच्या बाजूनं निकाल दिला. पुढं दादाजी वरच्या कोर्टात गेला. तिथं मात्र रखमाबाईच्या विरुद्ध निकाल लागला. तिनं दादाजीकडं जावं किंवा मग सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी, तसंच दादाजीला खटल्याचा खर्च द्यावा, असा निकाल देण्यात आला. रखमाबाई जिगरबाज असल्यानं तिनं दुसरा पर्याय स्वीकारला आणि स्त्री हक्काच्या इतिहासाचं एक पान ठळक अक्षरात लिहिलं गेलं! पुढे रखमाबाईंनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि डॉक्टरीही केली.

या खटल्याचे सर्वत्र प्रतिसाद उठले आणि धर्मशास्त्र, स्त्री हक्क, पुरुष वर्चस्व अशा अंगांनी उलटसुलट बरीच चर्चा झडली. सामाजिक सुधारणा म्हणजे धार्मिक सुधारणा, असं मतही तेव्हा प्रथमच आग्रहानं मांडलं गेलं. या प्रकरणाला राजकीय वळणही मिळालं. हा खटला 1884 ते 1887 या काळातला. या खटल्यानं समाजात मुलींच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरू झाली आणि स्वाभाविकपणं संमती वयाकडं वळली. त्यानंतर तीनच वर्षांनी फूलमणी प्रकरण घडल्यानं, समाजातूनही संमती वयाची मर्यादा वाढवण्यासाठीचा दबाव वाढत होता आणि त्यास असणारा विरोधही टोकदार स्वरूप धारण करत होता.

1890 मध्ये, शंभर वर्षांत बलात्काराचे 40 गुन्हे नोंदले गेल्याचं वास्तव समोर आलं तेव्हा हे वास्तव भयंकर नसल्याचं आग्रही प्रतिपादन टिळकांनी आपल्या लिखाणातून केलेलं दिसतं. 100 वर्षांमध्ये दहा वर्षांच्या आतल्या 40 मुली बलात्कारामुळं मृत्यूच्या दाढेत गेल्या याकडं बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी होती, इतकंच म्हणता येईल. त्यावर अधिक भाष्य काय करणार?

आजही आमच्या धार्मिक बाबींमध्ये लक्ष घालू नका, अशी ताकीद दिली जातेच. शिवाय, बालविवाहविरोधी कायदा धाब्यावर बसवून बालविवाह होतातच. दर अक्षय तृतियेला विशेषतः राजस्थानात पाळण्यातल्या मुला-मुलींची सामूहिक लग्नं लावली जातात. त्यास मान्यवरांची उपस्थितीही असते आणि असे विवाह होणार हे माहीत असूनही, त्यावर कारवाई करण्याचं पाऊल उचललं जात नाही, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोळाव्या वर्षी मुलगी लैंगिक संबंधाला संमती देऊ शकते, या कायद्यातील बदलाकडं पाहताना अशा अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. मुलगी अपरिपक्व असल्यानं तिचं संमतीचं वय एके काळी वाढवलं गेलं आणि आज मुली लवकर वयात येतात, असं म्हणून मुलीचं संमती वय कमी करण्याचा पवित्रा घेतला जातो आहे. विवाहाचं कायदेशीर वय मात्र मुलीसाठी 18 आणि मुलासाठी 21 आहे, त्यात बदल झालेला नाही आणि तसा विचारही दिसत नाही. यातून आणखीही बरेच मुद्दे निघू शकतात.

(पुढे चालू...)

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.