EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

पवारांचं प्रवचन

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1393
  • 0 Comment

महाराष्ट्राचा जाणता राजा, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्यांना आणि महाराष्ट्रातील तमाम राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या. ‘‘लोकप्रतिनिधी विनम्र हवा. सन्मान मागून मिळत नाही, तो वागणुकीतून मिळत असतो... यशवंतराव चव्हाणांचा आदर्श ठेवा, आत्मचिंतन करण्याची हीच वेळ आहे,’’ असे उद्‌गार त्यांनी काढले. आमदारांनी पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या संदर्भात पवार यांनी मार्मिक आणि परखड भाष्य केलं, ते बरंच झालं. पण पुढे काय?

 

२००९च्या विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला, तेव्हा ‘मित्र पक्षावर जाहीर टीका करू नका,’ असं पवारांनी बजावलं होतं. त्यांनी मात्र स्वतः मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना टोमणे मारणं चालूच ठेवलं! 

 

नांदेडमधील एका सभेत प्रकल्पग्रस्तानं अडचणीचे प्रश्न विचारताच, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार चिडले आणि त्यांनी त्यास एकेरीत संबोधलं. दादांनी टगेगिरीचं समर्थन केलं आणि पत्रकारांवरही तोंडसुख घेतलं. त्यांच्या काकांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा, तसंच वाचन वाढवण्याचा उपदेश पुतण्याला केला. पण उपयोग काय झाला? शिवाय ‘‘पन्नाशीच्या घरात आल्यावर वरिष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा नसतो. परवानगीची गरज नाही आणि सत्तेसाठी कोणीही अस्पृश्य नाही,’’ असं विधान अजितदादांनीच २००९च्या विधानसभा निवडणूक निकालांपूर्वी केलं होतं.

 

पवार आज सर्वच लोकप्रतिनिधींना वर्तणूक सुधारण्याचा सल्ला देत असले, तरी त्यांच्या पक्षाचे अनेक नेते उद्दाम आणि बेपर्वा आहेत. जालन्यामध्ये तर नुकतीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं वृद्धेला मारहाण केली आहे. विधानभवनात पोलिसाला बदडण्याच्या घटनेत राष्ट्रवादीच्याही काही आमदारांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मग पवार केवळ मुक्त चिंतन न करता, त्याबद्दल कारवाई का करत नाहीत?

 

एका चॅनेलला दिलेल्या प्रकट मुलाखतीत ‘आता सर्वसाधारण आर्थिक कुवत असलेल्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवणं कठीण झालं आहे,’ असं पवारांनी मोकळेपणानं कबूल केलं होतं. इतर सर्व पक्षांप्रमाणं आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जिंकून घेण्याची क्षमता असलेल्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसही तिकिटं देत असतं. राज्यात विरोधी पक्ष निस्तेज आणि काँग्रेसची देशभर बेअब्रू होत असताना साम, दाम वापरून काहीही झालं, तरी राज्यात अव्वल स्थान मिळवायचं या एकाच ध्येयानं राष्ट्रवादीची पावलं पडत आहेत. गेल्या वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत प्रचंड निधी खर्च करूनच विजय संपादन केला गेला. यशवंतरावांच्या आदर्शाच्या गोष्टी करताना जाणत्या राजाला हे कसं काय चालतं?

 

स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यामध्ये निवडणुकांच्या खटपटींना जोर चढला, तेव्हा म्हणजे १९३७ मध्ये यशवंतरावांनी आत्माराम पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून खटपट केली. अशी खटपट स्वतःकरता करावी, असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. विधानसभा, लोकसभेच्या अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या. या सर्व निवडणुका यशवंतरावांनी साधेपणानं लढवल्या. मनमिळावू, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही त्यांची मोठी शक्ती असे. १९६३ मध्ये त्यांनी लोकसभेसाठी नाशिक जिल्ह्यातून निवडणूक लढवली आणि ते बिनविरोध निवडून आले. त्यामुळं जनतेत प्रचारासाठी जाण्याचं कारण पडलं नाही आणि जनसंपर्क आला नाही, ही त्या निवडणुकीतील उणीव असल्याचं त्यांना वाटलं. ‘भूगोलात कृष्णागोदावरीचा संगम नाही, पण या निवडणुकीनं हा संगम इतिहासात घडून आला,’ असे भावपूर्ण उद्‌गार तेव्हा कवी कुसुमाग्रज यांनी काढले होते.

 

१९५२च्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची रचना होऊन मोरारजी देसाई मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांनी यशवंतरावांचा मंत्रिमंडळात समावेश केला. पुरवठा आणि वनखात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. एकदा यशवंतराव संध्याकाळी आपल्या मलबार हिलवरील बंगल्यावर आले, तेव्हा हॉलमध्ये फळांचे दोन-तीन करंडे ठेवण्यात आले असल्याचं त्यांनी पाहिलं. चौकशी करून ते करंडे ज्यांनी धाडले, त्यांना तत्काळ परत पाठवले आणि पुन्हा असा आचरटपणा करू नका, असंही संबंधितांना सांगितलं.

 

आज अनेक लोकप्रतिनिधी इंडिया बुल्सपासून ते मुकेश अंबानींपर्यंत अनेकांची फळं खात आहेत! रायगड जिल्ह्यात सुनील तटकरेंची, नाशिकमध्ये छगन भुजबळांची आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांची सुभेदारी आहे. तटकरे आणि भुजबळ यांच्या कथित बेहिशेबी संपत्तीबाबत आरोप झाले, तेव्हा पवारांनी हे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांचीच टर उडवली. रायगड जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीचे सौदे कोण करत आहेत, ते तिथले लोक सांगतात. रस्त्यांची कंत्राटं कशा पद्धतीनं दिली जातात, तेही मला ठाऊक आहे. पण तटकरे-भुजबळ यांच्या चौकशीचे आदेश न्यायालयानं दिल्यानंतरच त्यांची नाईलाजानं आणि धीम्या गतीनं तपासणी होते.

 

राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री गुलाबराव देवकर यांना अटक झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळातून गचांडी देण्यात आली नाही. आपण माळकरी असल्याचं आवर्जून सांगणारे आदिवासी कल्याणमंत्री बबनराव पाचपुते यांच्या खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. त्यांची जाहीर कानउघाडणी करावी, असं पवारांना वाटलेलं नाही. राष्ट्रवादीच्या एका आमदारावर बलात्कार केल्याचा आऱोप आहे. त्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं आणि परत घेण्यात आलं. पवनराजे निंबाळकर प्रकरणातील आरोपी ‘आदरणीय’ पद्मसिंह पाटील पक्षाच्या व्यासपीठांवरती अनेकदा दिसतात. राष्ट्रवादीचे बिनधास्त आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फ्लॅट वादग्रस्त आदर्श इमारतीत आहे. 

 

...आणि तरीसुद्धा ही माणसं पवारांच्या निकट वर्तुळात आहेत. सिंचन गैरव्यवहार आणि सामान्यांचं पाणी चोरून ते उद्योगपतींना देणं हा तर लोकांशी केलेला द्रोह आहे. तो करणारा नेता राष्ट्रवादीचा विधिमंडळातील नेता आहे. खेदाची गोष्ट म्हणजे, गुर्मीनं, बेगुमानपणं वागणारे नेतेच निवडून येतात आणि सत्तेवर बसतात. यशवंतरावांचा आदर्श घेऊन ते काय करणार? खुद्द शरद पवारांनी तरी हा आदर्श घेतला आहे काय?

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.