EasyBlog

This is some blog description about this site

सिरोंचा ते सीरिया...

मार्गारेट थॅचर... एक वादळी व्यक्तिमत्त्व

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1993
  • 0 Comment

आर्यन लेडी, मॅगी ऊर्फ मार्गारेट थॅचर यांचं ८७ व्या वर्षी निधन झालं. विन्स्टन चर्चिलनंतर इंग्लंडच्या समाजजीवनावर छाप पाडणारं त्यांचं दुसरं व्यक्तिमत्त्व होतं. म्हणतात की, इंग्लंड दोन भागात विभागता येतो, थॅचरपूर्वीचा आणि थॅचरनंतरचा इंग्लंड. मार्गारेट थॅचर यांचं व्यक्तिमत्त्व वादळी होतं. त्यांच्या निधनानंतर इंग्लंडच्या सर्व आघाडीच्या दैनिकांनी दिलेल्या हेडलाईन्सवर एक नजर टाकल्यास आपल्याला सहज कळेल.


'डेली मिरर' - मार्गारेट थॅचर - देशाला विभागणारी महिला, 'दी सन'चा मथळा फारच एकांगी होता- मॅगी डेड इन बेड, ‘देशाला वाचवणारी महिला’ – 'इंडिपेंडंट', 'दी गार्डियन'- शी बिकम हार्डर दॅन हार्डर, 'मॉर्निंग स्टार'नं लिहिलं - इंग्लंडची फाळणी करणारी स्त्री, मजूर पक्षात त्यांच्याबद्दलच्या तीव्र भावना बघता मजूर पक्षाच्या नेत्यांना घाईघाईनं असं टि्वट करावं लागलं ‘आम्ही आशा करतो की मजूर पक्षाचे सर्व नेते थॅचर यांच्या मृत्यूचा सन्मान राखतील. मात्र तरीही अनेक शहरात तिच्या निधनानंतर उत्सव साजरा केला गेला, जंगी पाटर्यांचं आयोजन झालं, फेसबुक आणि टि्वटरवरून तिला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या गेल्या. ट्राफलगार्ड चौकात तर शनिवारी एका जंगी पार्टीचं आयोजन केलं गेलंय. 'दूध चोरणारी, नोकऱ्या खाणारी चेटकीण मेली' या शब्दात पार्टीचं आमंत्रणं पाठवण्यात आलीत. महत्त्वाचं म्हणजे मजूर पक्षातील कित्येक वरिष्ठ खासदारांनी मृत्यूनंतर थॅचरबाईंना टीका का करायची नाही, असा सवाल वरिष्ठ नेत्यांना विचारत, पक्षादेश धुडकावलाय. खरं पाहता ब्रिटनच्या प्रगल्भ लोकशाहीचा हा उत्तम नमुना आहे. नाही तर भारतात माणसं मेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल केवळ चांगलं आणि चांगलंच बोलायचं, असा प्रघात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर झालेली टीकाही अनेक शिवसेना नेत्यांना पचली नव्हती.


तब्बल ८७ वर्षापूर्वी मॅगीचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, वडिलांचं किराणा मालाचं दुकान होतं. पदवी घेतल्यानंतर १९५० मध्ये त्यांनी हुजूर पक्षातर्फे निवडणूक लढवली, मात्र दोनदा त्या पराभूत झाल्या. १९५९ मध्ये त्या पहिल्यांदा खासदार, १९७० ला शिक्षणमंत्री आणि सुरू झाली मॅगीची वादळी कारकीर्द...


आपल्या कार्यकाळात थॅचरबाईंनी अनेक धाडसी निर्णय घेतले. पहिलाच निर्णय़ होता, शाळकरी विद्यार्थ्यांचं दूध बंद करण्याचा, लहानग्यांचं दूध चोरणारी चेटकीण अशी टीका झाली. १९७९ मध्ये पंतप्रधान झाल्यावर इंग्लंडच्या राष्ट्रीय उद्योगधंद्यांचं खाजगीकरण करण्याचा सपाटा त्यांनी लावला, या निर्णयामुळं कामगारांचा उद्रेक झाला, कित्येक बेरोजगार झालेत, अनेक शहरांत दंगली भडकल्या, १९८२ मध्ये ७००० मैलांवर ब्रिटिश सैन्य पाठवून त्यांनी फॉकलंड बेटावरचा अर्जेंटिनाचा दावा ठेचून काढला. या निर्णयानंतर त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. १९८४ मध्ये आयरीश बंडखोरांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात त्या बचावल्या. युरोपियन युनियनमध्ये इंग्लंडला सहभागी करण्यास त्यांनी प्रखर जोरदार विरोध केला, कदाचित त्यांच्या या निर्णयामुळं आज इंग्लंडची अवस्था ग्रीस, इटली आणि सायप्रससारखी झाली नाही. मात्र त्यांच्या या निर्णयामुळं मंत्रिमंडळात उभी फूट पडली, अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. अखेर १९९० मध्ये त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र त्यांच्यावर त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांविरुध्द कठोर शब्द वापरणं आणि पाणउतारा करण्याचा आरोप झाला, आणि अनेक तज्ज्ञांच्या मते तो योग्य होता. पंतप्रधानपद सोडल्यानंतर थॅचरबाईंचा काळ संपला. तब्बल २२ वर्षांनंतर त्यांची आठवण जगाला आली, ती होती २०१२ मध्ये, आर्यन लेडी या हॉलीवूडपटावरून. मार्गारेट थॅचर यांच्या जीवनावर हा चित्रपट होता. या भूमिकेसाठी प्रसिध्द अभिनेत्री मेरील स्ट्रीपला ऑस्कर मिळालं... आर्य़न लेडी, मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष अशी त्यांची ओळख असली तरी मायेनं आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना स्वतःच्या हातानं चहा बनवून देणारी हळवी पंतप्रधान म्हणून मॅगीची दुसरी बाजू जगापुढं कधी आलीच नाही.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

`भारत4इंडिया`चे इनपूट एडिटर. दहा वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत. विविध वृत्तपत्रांत लिखाण. ई-टीव्ही, मी मराठी, आयबीएन-लोकमत या चॅनेल्समध्ये काम.