EasyBlog

This is some blog description about this site

मराठवाडी तडका

मराठवाड्याचे बाबासाहेब

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1444
  • 0 Comment

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि तेव्हा अत्यंत मागास असलेल्या मराठवाड्याचा संबंध आला नसता तर आज ‘मराठवाडा’ या छोट्याशा विभागाची अवस्था काय झाली असती? हा प्रश्न आज समोर आला तर त्याचं उत्तर अत्यंत गंभीर स्वरूपाचं असेल. मराठवाड्यामध्ये बाबासाहेबांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि गोरगरिबांना स्वाभिमानानं जगण्याचा मंत्रही दिला. आज मराठवाडा हा विभाग ताठ मानेनं जगतो, त्यामागं बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेबांनी मराठवाड्याला ‘बापा’सारखं घडवलं.


 
बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मराठवाड्याच्या आयुष्याला नवं वळण मिळालं आहे. सामान्यांना स्वाभिमानाची वागणूक आणि जीवनाचा मार्ग दाखवेल असं शिक्षण या दोन्ही बाबींचा आणि मराठवाड्याचा तसा फारसा संबंध होताच कुठे? १९१६ ते १९६५ पर्यंत मराठवाड्यात फक्त सहा ते सात खाजगी शाळा निघाल्या होत्या आणि मग मोठ्यांची मुलं या शाळेमध्ये अगदी दिमतीनं जायची. बाकीच्यांना शाळा आणि शिक्षण काय असतं, हे माहीतच नव्हतं.


१९१६ मध्ये परभणीमध्ये नूतन महाविद्यालय निघालं, तर याच औरंगाबादला सरस्वती भुवन ही शाळा निघाली. १९१७ पासून जो शैक्षणिक बाबींना चालना देणारा प्रारंभीचा काळ म्हणून ओळखला जातो त्या काळात मुलींसाठी औरंगाबादला शारदा मंदिर नावाची शाळा निघाली. मग १९२१ मध्ये उस्मानाबाद, १९२७ मध्ये गुंजोटी, १९३७ मध्ये उदगीर, १९३८ मध्ये लातूर आणि सेलू, १९४१ मध्ये उमरगा, १९४२ मध्ये बीड, उमरी आणि नांदेडला १९४६ मध्ये मराठा हायस्कूल सुरू झालं. हे शिक्षणाचं थोडंबहुत पाऊल मराठवाड्यामध्ये बघायला मिळतं; पण चार-दोन बोटांवर मोजण्याएवढ्या शाळा आणि महाविद्यालयं निघाली म्हणजे तिथं सर्वांना शिक्षण मिळेल, असं मुळीच नव्हतं. १९४९-५० या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा मराठवाड्यात आले. प्रसंग होता कन्नडजवळील मकरमपूरच्या सभेचा. चाळीसगावला बाबासाहेबांची सभा झाली आणि तिथून मकरमपूर हा मराठवाड्याचा भाग अगदी जवळ होता. तिथं बाबासाहेबांची सभा झाली. अर्थात, अशा प्रकारची सभा घेण्यासाठी निजामाची बंदीच होती.महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या चळवळीला मग ती शैक्षणिक असो, की दलितांना स्वाभिमानानं वागणूक मिळावी यासाठी उभारली गेलेली चळवळ असो; या चळवळीमध्ये खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब गायकवाड यांचं जसं महाराष्ट्रभर नाव घेतलं जातं, तसंच बाबासाहेबांच्या मराठवाड्यातील चळवळीचे खंदे समर्थक म्हणून भाऊसाहेब मोरे यांचं नाव घेतलं जातं. याच भाऊसाहेब मोरेंनी मराठवाड्यातील गावागावात जाऊन बाबासाहेबांचे विचार पेरण्यास सुरुवात केली. ज्या दलितांचा, गरिबांचा आवाज दबला गेला होता त्या आवाजाला स्वाभिमानाचा सूर निर्माण करून देण्यामध्ये मोरेंचा मोठा वाटा आहे.मकरमपूरच्या सभेनंतर बाबासाहेबांच्या एक बाब लक्षात आली आणि ती म्हणजे मराठवाड्यात शिक्षणाचं जाळं पसरलं पाहिजे. ते जाळं आपण पसरवणार आहोत, याची घोषणाही बाबासाहेबांनी केली होती. ‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ हा बाबासाहेबांचा विचार मराठवाड्यामध्ये १९५९ पासूनच खर्‍या अर्थानं रुजण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यातील अविकसित जनतेला केवळ शिक्षणाचीच नाही तर त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराविरुद्धही कोणीतरी आवाज उठवणारा महामानव असावा, असं क्षणोक्षणी वाटलं होतं. महाराष्ट्रातील सगळे विभाग बघितले तर मराठवाडा हा उशिरा स्वतंत्र झालेला भाग आहे. जसा शिक्षणाचा अभाव होता तशी स्वाभिमानानं जगण्यासाठीही स्वतंत्रपणं मुभाही नव्हती.बोटावर मोजता येतील एवढ्यांच्या हाती सत्तेची आणि हुकूमशाहीची दोर होती, ज्या दोरीच्या माध्यमातून सामान्यांना चिरडण्याचं काम तिथं राजरोसपणं केलं जायचं. १९१८ मध्ये उस्मानिया विद्यापीठाची स्थापना झाली. केवळ मुस्लिमांनीच तिथं शिक्षण घ्यावं, हा त्यामागचा उद्देश होता; पण कालांतरानं या उद्देशाला फाटा देण्यात आला आणि तिथं मुस्लिम नसणारेही काही जण शिक्षण घेत होते. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये १९४५ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. शिक्षण क्षेत्राचं जाळं कसं व्यापलं गेलं पाहिजे आणि त्याचा गरिबांना फायदा कसा झाला पाहिजे, याचा मोठा अनुभव बाबासाहेबांच्या पाठीशी होता आणि हाच अनुभव बाबासाहेबांनी मराठवाड्याच्या लोकांसाठी भरपूर प्रमाणात उपयोगात आणला.औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात झाल्यावर तब्बल एका वर्षानं १/९/१९५१ रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते या महाविद्यालयाच्या कोनशिलेचा शुभारंभ झाला. ‘मिलिंद’च्या माध्यमातून बाबासाहेबांनी एक मोठं काम सुरू केलं, ज्याचा परिणाम मराठवाड्यातील शिक्षणावर झाला. हैदराबाद संस्थानाचं क्षेत्रफळ ८४००० चौरस मैल होतं. त्यांची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. मार्च १९४९मध्ये संस्थानात एकूण १७ कॉलेज होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍यांची संख्या ७ हजार ७१५ होती. या आकड्यांची मुंबई राज्यातील स्थितीशी तुलना केली, तर मुंबई राज्याचा विस्तार ११,५५७० चौरस मैल आहे आणि लोकसंख्या ८६.२३ कोटी.३१ मार्च १९५० रोजी त्या ठिकाणी कॉलेजची संख्या ९० होती आणि तिथं शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ५०,३५६ होती. यावरून एक बाब लक्षात येतं की, हैदराबाद संस्थान शिक्षणाच्या बाबतीत किती मागं होतं? कदाचित हीच बाब बाबासाहेबांना अस्वस्थ करणारी होती. म्हणून त्यांनी तब्बल दहा वर्षं औरंगाबादच्या सान्निध्यात घालवली आणि शिक्षणाची पाळंमुळं जोरदारपणं रोवली. केवळ शिक्षणाचंच काम नव्हे, तर हैदराबादच्या संस्थानाविरुद्ध बंड करण्यामध्येही बाबासाहेबांचं मोठं योगदान राहिलं आहे.१९२७ नंतर हैदराबाद संस्थानाशी डॉ. बाबासाहेबांचा सातत्यानं संबंध येत गेला. मकरकपूरनंतर हैदराबाद संस्थानाच्या सरहद्दीवरच २३/२/१९४१ रोजी तडवळे ढोकी इथं वतनदार महार-मांग परिषदेमध्ये बाबासाहेबांनी निजामाच्या सुरू असलेल्या अत्याचाराविरुद्ध रोष व्यक्त केला होता, चिंता व्यक्त केली होती. बाबासाहेबांची काही वाक्यं आजही इतिहासामध्ये अजरामर आहेत. त्या सभेत बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘वतनदार महारांच्या पोटापाण्याचा प्रश्न समाधानकारकरीत्या अजून सुटलेला नाही. अस्पृश्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय नाही. लाखो एकर सरकारी जमीन रिकामी पडली असून अस्पृश्य लोक उपाशी आहेत. हैदराबाद संस्थानची आर्थिक स्थिती चांगली असताना असं का?’’ असा सवालही बाबासाहेबांनी उपस्थित केला होता.महाराष्ट्रभर दलितांवर सातत्यानं होणारे अन्याय यामध्ये सार्‍या महाराष्ट्राचं प्रमाण एकीकडं आणि मराठवाड्याचं प्रमाण एकीकडं अशी अवस्था त्या काळी होती. शिक्षणातून दलित विचारांची एक प्रगल्भ चळवळ मराठवाड्यामध्ये सुरू झाली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून अनेक पीडितांना, वंचितांना न्याय देण्याचं काम मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. खैरलांजीसारखे प्रकार तेव्हा मराठवाड्यामध्ये सातत्यानं व्हायचे, असा उल्लेख आजही इतिहासात आढळतो. त्याची वाच्यता झाली तर मग आणखीनच त्रास, असं काहीसं चित्र त्या काळी बघायला मिळायचं.बाबासाहेबांनी निर्माण करून दिलेल्या वाटेवर जाणार्‍या अनेकांनी उच्चवर्णीयांच्या त्रासाला वैतागलेल्या अनेकांना समतेची वाट दाखवली. निळा झेंडा घेऊन अनेकांनी गरिबांच्या हितासाठी एक वेगळा पायंडा मराठवाड्यामध्ये पाडला, ज्याचा फायदा दलितांना तर निश्चितच झाला; पण शोषित गरिबांनाही मोठ्या प्रमाणात झाला.१९२४ सालानंतर कामगार चळवळीशी बाबासाहेबांचा प्रत्यक्ष संबंध आला. पुढे व्हॉईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य या नात्यानं १९४२ ते १९४६ या दरम्यान कार्यरत असताना कामगारविषयक सर्व बाबी बाबासाहेबांच्याच अखत्यारीत होत्या. हाच अनुभव बाबासाहेबांनी मराठवाड्यातील कामगारांविषयी वापरला. इथल्या कामगारांच्या हातांना बळ मिळेल, यासाठी बाबासाहेबांनी राबवलेल्या कल्पनांची साक्ष आजही इतिहास देतो. शैक्षणिक, सामाजिक, कामगारविषयक अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं बाबासाहेबांनी मराठवाड्यासाठी ‘न भूतो न भविष्यति’ असं योगदान दिलं आहे. एवढं मोठं योगदान असतानाही बुरसटलेल्या विचारांनी परिपूर्ण असणार्‍या अनेकांनी नामांतराला विरोध केला. ज्या बाबासाहेबांनी शिक्षणाची मुहूर्तमेढच मराठवाड्यात रोवली, त्या मराठवाड्यातील पहिल्या-वहिल्या विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यासाठी तब्बल १७ वर्षांचा लढा द्यावा लागला, ही शोकांतिका आहे.मराठवाड्याच्या पिढ्यान् पिढ्यांना फिटणार नाहीत, असे उपकार बाबासाहेबांनी मराठवाड्यावर केले. मराठवाड्याचं त्यांनी पालकत्व स्वीकारलं आणि ते तडीस नेलं. आजही अनेक जण बापाला बाप म्हणायला तयार नाहीत. त्यांच्या विचारांमध्ये असलेला बुरसटलेपणा जायला तयार नाही. बाबासाहेबांची छाप, त्यांचे विचार, बाबासाहेबांची माणसावर प्रेम करण्याची सृजनशील अदा मराठवाड्यामध्ये आजही पावलोपावली जाणवते.
..............................................'माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये, दडपलेला वर्ग असता कामा नये. ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत आणि तो केवळ ओझ्याचा बैल आहे असे वर्ग समाजामध्ये असता कामा नयेत. समाजाच्या या व्यवस्थेत, पद्धतीत आणि विभाजनात रक्तरंजित क्रांतीची बीजे असतात आणि कदाचित हे दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होईल. वर्गावर्गांत खोलवर रुजलेली फाटाफूट हाच लोकशाहीच्या यशातील सर्वात मोठा अडथळा आहे. जर तुम्ही जगातील वेगवेगळ्या भागांतील लोकशाहीच्या इतिहासाची तपासणी केलीत, तर तुम्हाला असं आढळून येईल की, सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणार्‍या कारणांपैकी एक आहे, याबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही.'
(संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुण्यामध्ये २२ डिसेंबर १९५२ रोजी केलेल्या भाषणातील अंश.)
..................................................जवळजवळ १९५० मध्ये बाबासाहेब औरंगाबादला आल्यावर त्यांनी शिक्षणसंस्था स्थापन करण्याची घोषणा केली. शिक्षणापासून दूर असणार्‍या अनेकांना शिक्षण प्रवाहात ओढण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी दिलेले विचार कितीतरी पिढ्यांना पुरणारे विचार आहेत. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळंच मराठवाड्यातील जनतेनं घेतला.
- प्रा. जयदेव डोळे, ज्येष्ठ अभ्यासक, औरंगाबाद
..................................

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारा तरुण तडफदार पत्रकार म्हणून ओळख. गेल्या 10 वर्षांपासून संदीप पत्रकारितेत. शिक्षण, राजकारण आणि ग्रामीण विकास हे आवडीचे विषय. 'सर्व शिक्षा अभियानातील घोटाळा', 'बोगस विद्यार्थी संख्या' हे विषय महाराष्ट्राच्या समोर आणले. त्याबद्दल यंदाचा बाबा दळवी पुरस्कार.