EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

मुंडेंची अपेक्षा‘पूर्ती’

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1450
  • 0 Comment

पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. यूपीए सरकारची लोकप्रियता निश्चितपणं घसरणीला लागली आहे. अशा वेळी प्रथम नवी दिल्लीत आणि नंतर महाराष्ट्रात सत्तापालट घडवायचा, तर प्रथम स्वतःचं घर दुरुस्त करावं लागेल, हे भारतीय जनता पक्षाला उमगलेलं दिसतं. त्यामुळंच राजधानीत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांचा ‘गणपती बाप्पा मोरया’ करण्यात आला आणि आता प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाही नारळ देऊन तिथं तरणेबांड नेते देवेंद्र फडणवीस यांना बसवण्यात आलं आहे.

 

एकेकाळी प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे म्हणजेच राज्य भाजप, अशी स्थिती होती. प्रमोद महाजन यांचं निधन झाल्यावर मुंडे राजकीयदृष्ट्या निराधार झाले. प्रदेशाध्यक्षपदी मुनगंटीवार, पुणे शहर अध्यक्षपदी विकास मटकरी अशी गडकरींची माणसं महत्त्वाच्या पदांवर जाऊन बसली. विधान परिषद नेतेपदी पांडुरंग फुंडकरांना हटवून गडकरी समर्थक विनोद तावडे यांना नेमण्याची खेळी झाली, तेव्हा मात्र मुंडेंची सहनशक्ती संपली. त्यांनी बंड पुकारलं. त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि थेट वार्ताहर परिषद घेऊन आपलं मन मोकळं केलं. गडकरींनी तातडीनं आमदारांची बैठक बोलावली तर मुंडे दिल्लीला जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींना, म्हणजे अडवाणी, सुषमा स्वराज आणि जेटलींना जाऊन भेटले. अखेर फुंडकर, तसंच मुंबई शहर अध्यक्ष राज पुरोहित यांचं पद कायम ठेवण्याची मागणी मान्य झाल्यावर मुंडेंनी माघार घेतली.

मात्र त्यानंतरच्या हिवाळी अधिवेशनात फुंडकरांची उचलबांगडी होऊन तावडेंची निवड झाली. गडकरींची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड होणार होती. परंतु ‘पूर्ती’मुळं त्यांची अपेक्षापूर्ती झाली नाही. राजनाथ सिंग अध्यक्ष झाले तरीसुद्धा मुनगंटीवारांनाच आणखी एक टर्म द्यावी, असा गडकरींचा आग्रह होता. उलट ‘तसं घडल्यास मी निवडणुकीत प्रचारच करणार नाही’ असा निर्वाणीचा इशारा मुंडेंनी दिला. कदाचित ते पक्षही सोडतील, अशा पुड्या सोडण्यात आल्या.
 

त्याच वेळी मुंडेंनी चारा छावण्यांत मु्क्काम कर, दुष्काळग्रस्तांसाठी उपोषण कर, चॅनेलवरून मतप्रदर्शन कर, असा जोर लावला. शेवटी गडकरी-तावडेंना नव्हे, तर मुंडेंनाच जनाधार आहे. त्यामुळं मुंडे बाहेर पडल्यास भाजपची अपरिमित हानी होणार, हे वास्तव आहे. तरीसुद्धा मुनगंटीवार नको, तर मग तावडेंना प्रदेशाध्यक्ष करा, असा गडकरी गटाचा प्रस्ताव होता. तेव्हा मुंडेंनी रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं पुढं केली. फडणवीस नागपूरचे असल्यानं त्यांच्या नावावर भर होता. कारण त्यामुळं गडकरींच्या पट्ट्यातच एक प्रतिस्पर्धी तयार व्हावा, अशी ही व्यूहरचना आखण्यात आली. शेवटी देवेंद्रच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं, याचाच अर्थ गडकरी गटानं माघार घेतली. ही तडजोड वाटू नये यासाठी निवडीचे सर्वाधिकार म्हणे गडकरींना देण्यात आले! देवेंद्रच्या नावाची घोषणा गडकरींनीच करून त्यांची मुक्त कंठानं प्रशंसाही केली!
 

फडणवीस यांच्या नियुक्तीद्वारे भाजपमधील जातीपातींचं संतुलन साधलं जाणार आहेच. विरोधी पक्षनेतेपदी खान्देशातील लेवा पाटील असलेले एकनाथ खडसे, विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी कोकणातील मराठा समाजाचे तावडे, निवडणुकांचं नेतृत्व मराठवाड्यातील ओबीसी नेते मुंडे यांच्याकडे आणि प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील ब्राह्मण नेते फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.
 

मात्र देवेंद्र फडणवीस यांना आता गडकरी-मुंडे या दोन्ही गटांना सामावून घेतच काम करावं लागणार आहे; कारण निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, तिकीटवाटप यात गटातटांना नव्हे, तर पक्षहितास प्राधान्य द्यावं लागणार आहे.
फडणवीस यांनी १९९२-९७ दरम्यान नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं. महापौर परिषदेचं दोनदा अध्यक्षपद भूषवलं. १९९९ पासून ते विधानसभेत नागपूरचं प्रतिनिधित्व करत आहेत. अंदाज समिती, गृह आणि नगरविकास कायदा, सार्वजनिक उपक्रम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समित्यांवर त्यांनी काम केलंय. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलंय. देवेंद्र हे सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतील, असे नेते आहेत. विदर्भाचे प्रश्न, दुष्काळ, सिंचन, अर्थव्यवस्था अशा विषयांवर ते अभ्यासपूर्ण बोलतात. परंतु आता विधानसभेत आणि चॅनेलच्या स्टुडिओतच नव्हे, तर राज्यभर त्यांना फिरावं लागेल.
 

मुंडेंनी केंद्रीय कार्यकारिणीवर रागावून पक्षातील सगळ्या पदांचे राजीनामे दिले होते, तेव्हा त्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देण्यास तयार झालेले देवेंद्रच होते. शरद पवार-नितीन गडकरी यांच्यातील मैत्रीपूर्ण व्यवहार, पूर्तीतील घोटाळे हे सारं देवेंद्र यांना पसंत नसल्याची चर्चा होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कट्टरता त्यांच्या व्यक्तित्वात नाही आणि म्हणूनच मुसलमान, दलित, आदिवासी, ओबीसींच्या दृष्टीनं त्यांचं व्यक्तिमत्त्व आश्वासक वाटतं.

 

मुंडे आक्रमक आहेत, तर देवेंद्र संयमी आणि अभ्यासू. गडकरींची नाना फडणविशी चलाखी तावडेंमध्ये उतरली आहे. देवेंद्र हाती घेतलेलं काम पूर्ण करतात; फक्त कधी कधी ते  उगाचच काळी पाचचा सूर लावून बोलतात!
 

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’नं त्यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं आहे. ‘स्नेह्यांच्या घरातील गुंता सुटल्यानं आम्ही स्वतः समाधानी आहोत. मनुष्य बाहेरील शत्रूंशी मुकाबला करू शकतो; पण घरातील भांडणं आणि आदळआपट त्याला असह्य होते. पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवेंद्रच्या नियुक्तीची गुढी उभारली गेली आहे’, अशी प्रतिक्रिया ‘सामना’च्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलीय. मुळात भाजपमध्येच नव्हे, तर सेनेतही कुरबुरी आहेत आणि संजय राऊत-मनोहर जोशींबद्दल तीव्र नाराजी आहे. गडकरी-मुंडेंनी मजबूत विरोधी पक्षाबाबतीत काही आडाखे बांधले होते; पण शेवटी भिंतीवर डोकं आपटून घ्यावं लागलं, असा सूरही मुखपत्रात उतरला आहे.

शिवसेना-भाजप-रिपब्लिकन आठवले गट या युतीत यायला मनसे तयार नाही, याबद्दलची नाराजी अधूनमधून प्रकट होत असते. पण एकनाथ खडसेंचं बिल्डर्सप्रेम वा ठाण्यातील अनधिकृत बांधकामं याबाबतीत मनसेनं तिखट मतं व्यक्त केली आहेत. राज्यात मनसेचा कल चढता, तर सेनेचा उतरता आहे. आघाडीबद्दलची नाराजी वाढली, तर मनसेची वाढती लोकप्रियताच आघाडीस वाचवू शकेल. अशा वेळी विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात नवीन समीकरणं निर्माण होतील. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरील आव्हान म्हणूनच मोठं आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.