EasyBlog

This is some blog description about this site

आनंद मार्ग

भारतीय महासत्तेचं स्वप्नरंजन

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2043
  • 0 Comment

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील The Economist या जागतिक साप्ताहिकाची कव्हरस्टोरी होती ''Can India become a great power'' आणि मुखपृष्ठावर एक चित्र छापलं होतं. या चित्रात स्टुलावर बसलेलं मांजर आरशात स्वत:ची प्रतिमा न्याहाळताना, स्वतःला वाघ समजते असं दाखवलं आहे. भारतीय समाज, राजकीय नेते आणि प्रशासकांची अचूक मानसिकता दाखवणारं हे चित्र आहे. सध्या जागतिक महासत्ता होण्यासाठी भारताकडे काय नाही?  जगातील दुसरं सर्वात जास्त असलेलं १२२ कोटींचं मनुष्यबळ, जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था, चौथ्या क्रमांकाचं मोठं लष्कर आणि जगभर पसरलेली मूळ भारतीय वंशाच्या बुध्दिमान आणि कर्तबगार व्यक्तींची मांदियाळी, समृध्द सांस्कृतिक वारसा, टोकाची धार्मिक आणि वांशिक विविधता असूनही गेली ६६ वर्षं सातत्यानं जगातील सर्वात मोठी आणि ज्वलंत (vibrant) लोकशाही म्हणून मिरवणाऱ्या भारताकडे अशा कित्येक जमेच्या बाजू आहेत, पण असं असूनही आज महासत्ता बनण्याच्या स्वप्नाच्या आसपास आपण का जाऊ शकत नाही? The Economistनं याचं छान विश्लेषण केलं आहे आणि त्याचं एकाच वाक्यातील सार म्हणजे - 'विविध क्षेत्रांतील भारताचं कचखाऊ धोरण!'


 
रात्रंदिवस खूप अभ्यास आणि कष्ट करून पूर्ण तयारीनिशी एखादा परीक्षार्थी परीक्षेस सामोरे जातो, पण त्यानं तयारी न केलेला प्रश्न आला की, अवसानघातकीपणामुळं जसा तो गर्भगळीत होतो, त्याच प्रकारची भारताची विशेषत: संरक्षण आणि विदेशी संबंधांबाबतची धोरणं आहेत. स्वत:चं खंबीरपणं संरक्षण करण्यात भारत देश खूपच मागं आहे. गेल्या काही वर्षांत भारताचा संरक्षणावरील खर्च वाढूनही भारतीय नेतृत्त्व आणि प्रशासन, कठोर आणि खंबीर सुरक्षा धोरणाचा पाठपुरावा करत नाही.


परिणामी, कुणीही घुसखोरी करू शकेल असा जगातील एक कमकुवत देश (soft state) म्हणून अनेक दहशतवादी गट भारताकडे पाहतात. भारतीय विदेशी सेवा तर जगातील सर्वात निष्क्रिय सेवा म्हणूनच ओळखली जाते. सिंगापूरची लोकसंख्या आहे ५० लाख आणि भारताची लोकसंख्या १२,२०० लाख. दोन्ही देशांच्या लोकसंख्येत प्रचंड तफावत असूनही भारताच्या जगभरच्या राजदूतांची संख्या सिंगापूर इतकीही नाही. बदलत्या जागतिक स्थितीत आर्थिक संबंध वृध्दिंगत करायचे असतील तर विदेशी सेवा कार्यक्षम आणि प्रभावी केल्याशिवाय गत्यंतर नाही. अजूनही भारताचे नेते, प्रशासक आणि लष्करातील अधिकारी आपापल्या वेगळ्या कोषात वावरतात. त्यांना जगातील परिस्थितीचे बदलते वारे बघून त्यांच्याशी जुळवून घ्यायला खूपच कठीण जातं. नाही म्हणायला गेल्या २० वर्षांत भारतानं नेहरूप्रणीत फेबियन समाजवादाची सोडून आर्थिक प्रगती केली. पण तेच धोरण इतर क्षेत्रात स्वीकारण्यास वेळकाढूपणा करून हातची संधी घालवली आहे.

भारताचं महासत्ता होण्याचं स्वप्न साकार न होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यूहरचनात्मक संस्कृतीचा (strategic culture) अभाव! Ambition without attitude! भारतात अशी संस्कृती नसल्याचा सर्वप्रथम उल्लेख १९९२ मध्ये जॉर्ज टॅनहॉमनं लिहिलेल्या 'Indian Stategic thought' या पुस्तकात आढळतो. त्याच्या मते, भारताचा सांस्कृतिक वारसा समृध्द असला तरी महासत्ता होण्यासाठी जी धोरणात्मक संरचना लागते तिची वानवा असल्यामुळंच भारतास महासत्तेच्या दर्जापासून वंचित राहावं लागतं. किंबहुना गेली अनेक वर्षं सत्तेत असणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या इर्ष्येपोटी देशाला पुढे जाऊ दिलेलं नाही. मार्च महिन्यात CII च्या परिषदेतील भाषणात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, देशातील १२२ कोटी जनतेच्या भविष्याचे निर्णय फक्त ५००० व्यक्तींच्या हातात आहेत. त्यात अधिकारी, पदाधिकारी, काही तज्ज्ञ यांचा समावेश होतो, पण प्रत्यक्ष या ५००० जणांकडे देशाच्या strategic culture ला न्याय देण्याची क्षमता आहे का?  निवृत्त रिअर अॅडमिरल राजा मेनन यांच्या मते, अशी कुवत असणारे दहा जणही या यादीत नाहीत आणि १९९२ ते २०१३ दरम्यान यात यत्किंचितही फरक झालेला नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या लष्कराचा विस्तार झाला असला तरी जगातील या सर्वोत्कृष्ट सैनिकांचा योग्य वापर करणारा एकही नेता भारतात उदयास आलेला नाही. दूरदृष्टीचा अभाव, Kleptocracy घराणेशाही, भ्रष्टाचार, संकुचित दृष्टी, स्वार्थी वृत्ती, मक्तेदारी आणि द्वेषमूलक विचारसरणीला प्राधान्य दिल्यानं देशभर विकसित झालेल्या यंत्रणेला योग्य दिशा देणारं आणि त्याचा राष्ट्राच्या प्रगती आणि हितासाठी वापर करणाऱ्या नेतृत्वाला वावच दिला जात नाही. म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करून प्रशासनात करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्थितीबाबत सतत जागरूक राहिलं पाहिजे. कारण आतापर्यंत देशाच्या वाटचालीत सर्वात मोलाचा वाटा या Steelframe प्रशासनाचा राहिलेला आहे.  या प्रशासकीय यंत्रणेचा इतिहास इतका प्रभावी आहे की, आपल्या शेजारच्या पाकिस्तानसारख्या Failed State (जो देश स्वतःशी युद्ध करण्यात मश्गुल असतो)चे जे सद्य अस्तित्व आहे, ते निव्वळ या प्रशासकीय यंत्रणेमुळंच! अशा या गौरवशाली यंत्रणेचा सदस्य होणाऱ्या उमेदवारांकडे ज्ञानाबरोबरच शहाणपण आणि हुशारीबरोबर हरहुन्नरीपणा (common sense) असला पाहिजे.

जगातील सर्वात जास्त इंग्रजी भाषा बोलू शकणारं मनुष्यबळ असणारा भारत चीनपेक्षा कितीतरी पुढे जाऊ शकतो, पण strategic cultureच्या अभावी आतापर्यंत प्रचंड पैसा खर्च करूनही आपण अनेक  अडथळे पार करू शकलेलो नाही, थॉमसन रूटर्स फाऊंडेशनच्या अलीकडच्या अहवालानुसार 'स्त्री' म्हणून जगण्यासाठी जगातील सर्वात असुरक्षित देश म्हणून भारताला ओळखलं जाते (सौदी अरेबियापेक्षाही निकृष्ट दर्जा ), २०१०च्या पिसा (PISA)  अहवालानुसार शैक्षणिक गुणवत्तेत भारताचा जगात शेवटून दुसरा क्रमांक लागतो. जागतिक बॅंकेनं आर्थिक करारांची अंमलबजावणी करणाऱ्या देशांचा जो क्रम लावलेला आहे त्या १८५ देशांत भारताचा क्रमांक १८४वा म्हणजे शेवटून दुसरा आहे, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या २०१२च्या भ्रष्टाचार निर्देशांकात भारताचा (PCI)  क्रमांक चीनच्या कितीतरी खाली म्हणजे ९५वा आहे. या आणि अशा विपरीत स्थितीत भारताला महासत्ता बनवू शकणारं आशास्थान म्हणजे आजचा युवावर्ग!  या युववर्गानंच राजकारण, अर्थकारण आणि प्रशासनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे. थोडक्यात, महासत्ता होण्यासाठी भारताला विविध क्षेत्रांतील शिथिलता टाळून गतिशीलता आणण्यासाठी, वेळ आणि क्षमतेचं भान ठेवून वाटचाल करायची असेल तर भारतीय युवकांनी पुढील सुभाषितांचा विचार केला पाहिजे-
''There is plenty of knowledwge, but less wisdom,
There is enough intelligence, but less commen sense''
या वाक्यातून ध्वनीत होणारी वस्तुस्थिती मला गेले दोन महिने, स्टडी सर्कलच्या विविध केंद्रांवर UPSC – MPSC परीक्षार्थींच्या ज्या अभिमत मुलाखती घेतल्या गेल्या त्यावेळी जाणवत होती. या दोन्ही आयोगांच्या मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार एका अर्थानं आपल्या देशातील सर्वोच्च दर्जाचं मनुष्यबळ, त्यातील प्रत्येक जण यशाच्या उंबरठ्यावर पोचलेला, मुलाखतीतील कामगिरी चांगली झाली की IAS/IPS होणार, किंवा MPSC द्वारे भरल्या जाणाऱ्या Dy Coll/ Dysp पदावर निवड होण्याची शक्यता असलेला हा तरुण, त्या प्रत्येकाची बुध्दिमत्ता, स्मरणशक्ती, ज्ञान आणि निरीक्षण क्षमता अतिशय उत्कृष्ट, पण एकच उणीव मला अनेक उमेदवारात जाणवत होती आणि ती म्हणजे Lack of common sense.

मुलाखती दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे आणि सदर उत्तरात मला माहीत असलेलं सर्वकाही सांगितलं पाहिजे, असा प्रत्येकाचा दृष्टिकोन!  स्वत:चा बायोडेटा, ज्या पदावर काम करणार त्याची इत्थंभूत माहिती, वैकल्पिक विषय आणि विषयाचं सखोल ज्ञान, चांगलं संवाद कौशल्य, भाषेवरील प्रभुत्व यांसारख्या सर्व बाबीसंबंधी प्रत्येकानं कसून तयारी केलेली! विचारलेल्या प्रश्नांची सांगड घालण्यासाठी प्रत्येकानं जोरदार तयारी केलेली. त्यासाठी अनेक पुस्तकं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलेलं, पण एवढं करूनही त्यांनी अभिमत मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरं फारशी समाधानकारक नसायची. याचं कारण काय असावं? मला वाटतं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेकदा आपण व्यावसायिक प्रशिक्षणाचा अतिरेक करतो, गरज नसताना अनेक बाबतीत नको तेवढे दक्ष राहतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील सहजता, निर्लसता आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक सत्त्व, इतरांचं अनुकरण करताना गमावून बसतो. कदाचित Peer Pressureचा तो भाग असावा. सध्या प्रशासनाला लागणारे अधिकारी हे जास्त संवेदनशील असणारे हवेत. त्यांच्याकडे कर्तव्यदक्षतेबरोबर माणुसकी हवी. त्यातच सध्याच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनशैलीतील महत्त्वाचा शब्द म्हणजे तडजोड किंवा जुळवून घेणं, जग वेगानं बदलत असल्यानं जी स्थित्यंतरं होतात त्याचं आकलन करून त्यांचा सामना करण्यासाठी स्वत:ला सिध्द करण्यातच आधुनिक मानवाचा पुरुषार्थ किंवा कर्तबगारी आहे हे लक्षात घ्यावं. निव्वळ माहिती संकलन किंवा ज्ञानग्रहणाच्या मागे न लागता, संकटावर मात करण्यासाठी,  तसंच प्रगतीसाठी त्यांचा वापर करण्याचं कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. समाजातील विविध घटकांमध्ये वाढलेली जागरूकता लक्षात घेऊन आपली सर्वांप्रती असलेली बांधिलकी जपली पाहिजे. जी काही साधनं आपणास उपलब्ध होतील त्यांचा पर्याप्त वापर करून स्वत:च्या आणि समाजाच्या ऊर्जेचं, बलाचं संवर्धन केलं पाहिजे.

शेवटी अधिकारी म्हणून जर करियर करावयाचं असेल तर फक्त अभ्यास करून चालत नाही, तर अभ्यासातील हुशारी ही अधिकारी म्हणून काम करताना शहाणपणात कशी रूपांतरित होईल हे पाहिलं पाहिजे. The Economist मध्ये एक उल्लेख असा आहे की, भारतात जगाच्या १७ टक्के  लोकसंख्या राहते, पण  ऊर्जेची साधनं जगाच्या फक्त ०.८ टक्के आहेत. भारताच्या प्रगतीतील हा सर्वात मोठा अडथळा आहे, पण माझ्या मते, जगातील १७ टक्के लोकसंख्या हीच आमची खरी ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचा परिणामकारक वापर करण्याची जबाबदारी आपणा सर्व तरुणांवर आहे, हे लक्षात घेतलं की ०.८ टक्के हा भौतिक ऊर्जेचा वाटा इतरांसाठी संख्यात्मकदृष्टया कितीही नगण्य वाटत असला तरी १७ टक्के लोकसंख्येची गुणवत्ता नक्कीच त्यावर मात करू शकेल.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यवसायानं डॉक्टर असलेले आनंद पाटील विविध उच्चपदव्या विभूषित आहेत. 1988-89च्या बॅचमधून 69 रॅकनं त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. विविध संस्थांची उच्चपदं भूषवलेले डॉ. पाटील विविध सरकारी, निमसरकारी आणि खाजगी रोजगार निर्मितीच्या स्पर्धा परीक्षांचं नियोजन करणाऱ्या स्टडी सर्कलचे संचालक आहेत. वाचन आणि फिटनेसची आवड असलेल्या पाटील यांचं खेळामधील कौशल्यही वाखाणण्यासारखं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांत भाग घेऊन त्यांनी त्या यशस्वीपणं पूर्ण केल्या आहेत.