EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

प्रशासकीय सेवेत महिलांची भरारी

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1493
  • 0 Comment

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल अलीकडेच जाहीर झाले आहेत. त्यात खास करून महिलांनी जे यश मिळवलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. यंदा पहिला नंबर पटकावणारी हरिता कुमार ही तर याआधी तीनदा या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही, अपेक्षित स्तरावरील यश न मिळाल्यानं ती पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहिली आणि यावेळी ती चक्क पहिली आली. हवी ती उंची गाठण्यासाठी तिनं केलेली धडपड आणि दाखवलेली जिद्द खूप महत्त्वाची आहे. यशा-यशातही गुणवत्तेचा फरक असतो आणि मनानं उभारी घेतली, तर आपल्याला हवं तिथे भरारी घेता येते, हे हरितानं सिद्ध केलंय...

 

यावेळी ९९८ जणांना या परीक्षेत यश मिळालं. त्यापैकी २४५, म्हणजे जवळजवळ २५ टक्के महिला आहेत. अनुसूचित जातींचे १६९, तर अनुसूचित जमातीचे ७७ उमेदवार यंदा या परीक्षेत यश मिळवणारे ठरले. सर्वसामान्य गटात उत्तीर्ण झालेल्यांमध्ये २३ जण शारीरिकदृष्ट्या अपंगही आहेत. अनेक जण घरची पार्श्वभूमी आश्वासक नसूनही यश मिळवून गेले. त्यातही महिलांची संख्या लक्षणीय आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या यशस्वींमध्येही महिलाच टॉपर्स आहेत. टॉपच्या २५ यशस्वी उमेदवारांच्या यादीत १२ महिला आहेत, हेही यंदाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल.


महिलांची संख्या प्रशासनात वाढणं हे सुदृढ आणि निरोगीपणाचं लक्षण ठरावं. पुरुषी चष्म्यातून गोष्टींकडे सातत्यानं पाहिलं गेल्यानं ज्या त्रुटी निर्माण होतात त्या काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता यामुळं वाढते. अर्थात, एखाद्या अधिकारपदावर केवळ महिला आहे म्हणून कारभार उत्तम आणि न्याय्य होईल याची हमी नाही. पण महिलांचा वावर प्रशासन सेवेत वाढला तर एक नवी दृष्टी, संवेदनशीलता त्यात अधिक डोकावेल हे मात्र निश्चितपणं म्हणता येईल. कोणत्याही क्षेत्रात जिथं महिलांचा वावर अधिक आहे, तिथं वेगळ्या जाणिवा रुजलेल्या दिसतात. अर्थात, प्रत्येक ठिकाणी या महिलांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात हेही तितकंच खरं...


अगदी भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षा देतानाही त्यांना आपले इतर व्याप सांभाळावे लागतात. व्यक्तिगत आयुष्यातल्या जबाबदाऱ्या, मग त्या आई म्हणून असोत, गृहिणी म्हणून वा मुलगी म्हणून असोत; त्या आधी पार पाडाव्या लागतात, मगच स्वतःच्या विकासाकडे वळता येतं. हेच एखाद्या पुरुषाबाबत सोपं होऊन जातं. करियरमध्ये त्यानं पुढे जायचं असतं हे गृहीतच असतं. मग त्यासाठी त्यानं इतर गोष्टींकडे कानाडोळा केला तरी ते त्याला माफ असतं. या सेवांमध्ये शिरण्यासाठी असलेली वयाची अट महिलांसाठी शिथिल केली जावी, ही मागणी म्हणूनच योग्य वाटते. कारण आपल्या देशात आजही स्त्रीला आपल्या करियरकडे लक्ष देण्यास अग्रक्रम देता येत नाही. लग्न, घर-संसार, मुलंबाळं यांना प्राधान्य देऊनच स्वतःचा विकास करावा लागतो. लग्नानंतर प्रशासकीय सेवेच्या परीक्षा देण्याची कसरत करणं तिच्यासाठी तितकंसं सोपं नसतं. त्यात वय पुढे सरकलं की वयोमर्यादा ओलांडली जाऊन तिला मग नोकरीचे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. म्हणूनच महिलांसाठी एकीकडे अर्धवेळ नोकरी तर दुसरीकडे सरकारी नोकरीत शिरण्यासाठीची वयाची अट शिथिल करणं अशा बदलांची आवश्यकता आहे. महिलांची कार्यक्षमता वादातीत आहे, पण त्यांना संधी मिळायला हवी. आज अनेक सरकारी आणि खासगी बँकांची धुरा महिला सांभाळताना दिसतात. इतरही अनेक उच्चपदी महिला विराजमान झालेल्या दिसतात. देशाच्या प्रशासनात म्हणूनच अधिकारपदांवरील महिलांची संख्याही वाढणं हे न्याय्य ठरेल. संधी मिळाल्यास, वाव दिल्यास त्या आपली अर्हता आणि गुणवत्ता सिद्ध करतात हे दिसून आलंच आहे.


जिद्द, कष्ट आणि ध्येयावरली निष्ठा याबरोबरच प्रतिकूल स्थितीवर मात करून जाण्याची एक हातोटी स्त्रियांमध्ये असते. तिचं प्रत्यंतर यंदाच्या प्रशासकीय सेवा परीक्षांमधील यशस्वी महिलांकडे पाहिल्यावर येतं. हरिता कुमार ही या अर्थानं प्रतिकूल स्थितीत नसली, तरी आपल्यातील ताकद पुरेपूर ओळखून तिनं उत्तीर्ण होऊनही जिद्दीनं परत परत परीक्षा देण्याचा सपाटा लावला आणि हव्या त्या पायरीवर पोचण्याचं ध्येय तिनं गाठलं. अहमदाबादची कोमल प्रवीणभाई गणात्रा या तरुणीला खासगी आयुष्यात अन्यायाला आणि अत्याचाराला सामोरं जावं लागलं. पण त्यावर मात करून तिनं या परीक्षेत यश पदरात पाडून घेतलं. कोमलचं लग्न पाच वर्षांपूर्वी झालं होतं. पण पंधरा दिवसांतच तिला न्यूझीलंडला राहणाऱ्या आणि अनिवासी भारतीय असलेल्या नवऱ्यानं वाऱ्यावर सोडून दिलं. याला कारण एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असलेले तिचे वडील त्याची अवास्तव हुंड्याची मागणी पुरी करू शकले नाहीत. नवऱ्यानं अन्याय केल्यावर त्याची दाद मागायची तरी तेवढी आर्थिक कुवत नसल्यानं कोमल गप्प राहिली आणि आपल्या अभ्यासावर तिनं लक्ष्य केंद्रित केलं. आता ती भारतीय महसूल सेवेत रुजू होण्याची आकांक्षा बाळगून आहे. यानंतर आपल्या नवऱ्याला आणि सासरच्या मंडळींना कोर्टात खेचून झालेल्या अन्यायाची भरपाई वसूल करण्याची तिची इच्छा आहे. या तऱ्हेच्या व्यक्तिगत आयुष्यातील समस्यांना भिडून, आपलं उद्दिष्ट प्राप्त करणाऱ्या कोमलसारख्या अनेक जणी या देशात असतील...

 

अशीच एक आहे ती रत्नराशी पांडे. मध्य प्रदेशातील भोपाळची असलेली रत्नराशी आयएएससारख्या परीक्षेत यश मिळवणारी नसली, तरी राज्य पातळीवर सरकारी मानसिकतेला आणि चौकटबद्ध नियमांना धडका मारून ती कायद्याची लढाई जिंकली आणि सरकारी नोकरी तिनं पदरात पाडून गेतली. तिच्यासारख्या अनेक जणींना यामुळं न्याय मिळणार आहे. रत्नराशीची कहाणीही अशीच दुर्दैवी आहे. तिचं लग्न वयाच्या १४व्या वर्षी झालं. म्हणजे बालविवाहच. नियमानुसार बालविवाह झालेल्या कुणाही व्यक्तीला सरकारी नोकरीचे अथवा सवलतींचे फायदे मिळत नाहीत. वास्तविक यात त्यांचा काहीच दोष नसतो, कारण अजाण वयात हे विवाह त्यांच्या वडीलधाऱ्यांनी करून दिलेले असतात. त्यातही मुलींना तर काहीच आवाज नसतो. त्यांना मुकाटपणं वास्तवापुढं मान तुकवावी लागते. शिवाय बालविवाह झालेल्या मुलाला शिक्षण आणि खासगी नोकरीच्या वा व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. पण मुलींना अशा संधी सहज मिळत नाहीत. त्यातही अनेकदा झालेलं लग्नही त्यांना सुरक्षित छप्पर आणि आधार देणारं ठरत नाही. मग त्यांच्या आयुष्याची परवड होते. आज ३६ वर्षांची असलेली रत्नराशी याच अनुभवातून गेली आहे. 

 

घटस्फोट झालेल्या तिच्या पदरात आज दोन मुलंही आहेत. तिला मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेलाही बसू दिलं जात नव्हतं. तिचा परीक्षेचा अर्जही स्वीकारायला तयार नव्हते. म्हणूनच ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला की, तिला परीक्षेला बसू दिलं जावं आणि एक पद रिक्त ठेवण्यात यावं. याची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे. अशा तऱ्हेच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यामुळं रत्नराशीच्या मनावर ताण येत राहिला आणि अनिश्चिततेमुळं अभ्यासावर व्यग्रतेनं लक्ष पुरवताना तिला त्रास होत आहे. तिच्यासारख्या अनेक जणी विशेषतः ग्रामीण भागात आहेत. राजस्थान, पंजाब अशा भागांतून मुलींची लग्नं लहान वयात होत असल्यानं तिथंही अशी उदाहरणं आढळली आहेत. बालविवाह केलेल्या किंवा खरं तर झालेल्या मुलींना अशी शिक्षा मिळणं कितपत योग्य आहे? रत्नराशीला मिळू घातलेला सरकारी नोकरीचा अधिकार म्हणूनच खूप महत्त्वाचा ठरतो.


मुली आणि महिलांना संवेदनशील तसंच न्याय्य वागणुकीची गरज आहे. त्यांना आपल्या हक्काची रास्त अंमलबजावणी हवी आहे. त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आणि एकूणच समाजाचीही आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.