EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

पोलिसांची मनमानी कधी संपणार?

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1390
  • 0 Comment

स्त्रियांकडे पूर्वग्रह बाळगून बघू नये, त्यांचा सन्मान राखावा असं नेहमीच म्हटलं जातं. पण ते केवळ बोलण्यापुरतंच राहतं याचाही अनुभव आपण नेहमीच घेत असतो. महिला व मुलींवर ज्या पद्धतीने अत्याचार होत असतात त्यावरून याचं प्रत्यंतर वारंवार येत असतं. त्यातही ज्यांनी सर्वांनाच सुरक्षित ठेवण्याचं काम करणं अपेक्षित असतं त्या पोलिसांकडून तर स्त्रियांबाबत वारंवार आगळीक घडत असते. म्हणूनच पोलिसांमध्ये संवेदनशीलता जागी राहण्याची आवश्यकता आहे, हे वाक्य अलिकडे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळते. आता पोलिसांमधल्या संवेदनशीलतेचा संबंध खरं तर खास करून महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि त्यांचे एकूणच हक्क या बाबींशी जोडलेला आहे. पण प्रत्यक्षात या संदर्भात पोलीस बहुतांशी संवेदनाहीनतेने वागतात असंच दिसून येतं. 

 

 

दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पोलिसांच्या या वृत्तीवर बोट ठेवलं होतं. तर अलिकडे सोनिया गांधी यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात बोलताना, स्त्रियांबाबत होणारा हिंसाचाराबद्दल काळजी व्यक्त करून सिव्हिल सोसायटीने स्त्रियांना सुरक्षितपणे जगता येईल असं वातावरण निर्माण करावं अशी कळकळ व्यक्त केली होती. अर्थातच यासाठी पोलिसांचं सहकार्य व सक्रियता आवश्यक ठरते. पण दिसतं असं की, अनेकदा पोलिसच स्त्रियांना निर्भय वाटेल असं वातावरण निर्माण करायला अपुरे पडतात; एवढंच नव्हे, तर तेच स्त्रियांशी आकसाने, संवेदनाहीनतेने आणि सहानुभूतिशून्यतेने वागतात. पोलिसांच्या संवेदनाशून्यतेची अनेक उदाहरणं देता येतील. अगदी अलिकडे गाझियाबाद पोलिसांच्या संदर्भातली ही घटना बघा. एक तरुणी आपल्या मित्राबरोबर कारमध्ये बसून मद्यपान करत होती. पोलिसांनी त्यांना पकडलं आणि कारवाई सुरू केली. या तरुणीला सूर्यास्तानंतर पोलीस ठाण्यात नेण्याची चूक त्यांनी केली. संकेतांनुसार हे चूक ठरतं. तिथे एका पुरुष अधिकाऱ्याने इतर अनेक महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या तरुणीच्या थोबाडीत ठेवून दिली. त्याशिवाय शहरात कायदेव्यवस्था राखली जावी याबाबत ‘कर्तव्यदक्ष’ असलेल्या एका रहिवाशालाही या तरुणीच्या थोबाडीत मारण्यास वाव दिला. हे सारं थक्क करणारं आहे. पोलिसंना अशा पद्धतीने वागण्याचा आणि आपल्या पद्धतीने अधिकार चालवण्याचा हक्क कुणी दिला? 

 

हे कुणीच नाकारू शकणार नाही की, त्या दोघांनी सार्वजनिक ठिकाणी मद्य पिण्याचा गुन्हा केला होता. अशा रीतीने बाहेर दारू पिण्याची परवानगी आपल्याकडे नसते, तो अपराध ठरतो. पण म्हणून या अपराधाबद्दल कारवाई करताना पोलीस आपली मनमानी रेटू शकत नाहीत. एका तरुणीवर या पद्धतीने शारीरिक बळाचा वापर ते करू शकत नाहीत. डोकं गहाण ठेवून आणि स्वतःला वाटेल तसं वागण्याकडे पोलिसांचा कल वाढता आहे. मध्यंतरी मध्य प्रदेशात उज्जैनला रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी एका महिलेला व तिच्या भावाला चोरीच्या आरोपाखाली अडकवून चोरलेल्या मालाच्या शोधासाठी त्यांना कपडे उतरवणं भाग पाडलं होतं. इंदूर-रतलाम पॅसेंजरमध्ये घडलेला हा प्रकार. तर मंदसौर जिल्ह्यात एका उच्चवर्णीय पुरुषाने 14 वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिला जाळल्याची घटना घडली, तेव्हा पोलिसांनी दावा केला की त्या मुलीने आत्महत्या केली म्हणून... मुंबईत मरीन लाइन्सला सुनील मोरे नावाच्या पोलीस हवालदाराने एका तरुणीवर पोलीस चौकीतच बलात्कार केल्याची घटना घडली होती... या तऱ्हेच्या घटना काय सांगतात?

 

सोळा डिसेंबरच्या दिल्ली घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर लोकांचा उद्रेक झाला. सर्वसामान्य लोक; ज्यात तरुणांचा भरणा विशेष होता, बाहेर पडले आणि निषेध मोर्च्यात सामील झाले. त्यावेळी महिलांबाबतचे गुन्हे व त्यांचे हक्क या संदर्भात पोलिसांच्या प्रवृत्तीबाबतही सवाल खडे करण्यात आले. आताही गाझियाबाद प्रकरणाबाबत पोलिसांच्या संवेदनाहीनतेला दिल्ली कमिशन फॉर विमेनच्या अध्यक्ष बरखा सिंग यांनी एक प्रकारे पाठीशी घालणारी विधानं केली. त्या तरुणीला हाताळताना पोलिसांनी काही गैर केलं असं त्यांना वाटतच नाही. त्या चक्क म्हणाल्या, “आपण आपल्या मुलांबाबत कडक वागायला हवं. आणि जर ती मुलगी प्यालेली होती आणि तिला समज देण्यासाठी पोलिसांना काही पावलं उचलली असतील तर मला नाही वाटत त्यात काही चूक आहे.” 

 

स्त्री पोलिसांकडे काही तक्रार घेऊन गेलीच, तर आधी तिच्याकडेच पोलीस संशयाने बघतात. तिला कायदा जो आधार देऊ करतो, त्याची प्राथमिक अंमलबजावणी पोलिसांना करायची असते. पण ते तिचं नीट ऐकून घेत नाहीत असा अनुभव बरेचदा येत. विशेषतः कौटुंबिक हिंसाचाराची किंवा बलात्कार-विनयभंगाची तक्रार नोंदवताना पोलीस असहकार पत्करतात. त्यांची मानसिकता ही सर्वसाधारण भारतीय पुरुषाप्रमाणेच असते. ती बदलण्याची गरज आहे. खुल्या मनाने आणि उदार विचाराने जर पोलिसच जगाकडे बघत नसतील, तर कसं चालेल! अर्थातच पोलीस प्रत्येक गोष्ट संवेदनशीलतेने हाताळतील अशी अपेक्षा करणं हे खरं तर स्वप्नरंजनच आहे. पण निदान त्यांनी कायदा आहे तसा पाळला तरी खूप गोष्टी सुरळीत होतील. स्वतःला वाटेल तशा पद्धतीने प्रकरण न हाताळता कायदा काय सांगतो ते पाहून पोलिसांनी वागलं पाहिजे. उगाच मॉरल पोलिसिंग करून समाजात दहशत निर्माण करू नये. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.