EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

तिच्या कामाची ऐशीतैशी

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2276
  • 0 Comment

टाटा समूहाचे अलीकडेच प्रमुख बनलेले सायरस मिस्त्री यांनी समूहातील एका कंपनीच्या भागधारकांच्या बैठकीत अशी इच्छा प्रकट केली की, येणाऱ्या काळात कंपनीत महिलांचा वावर वरिष्ठ आणि इतरही पदांवर वाढलेला बघणं आपल्याला आवडेल. महिलांमुळं कार्यालयातील वातावरण, संस्कृती यात बदल होतो आणि पुरुषांना पूरक ठरेल असं योगदान त्या देत असतात, अशी भावनाही मिस्त्री यांनी बोलून दाखवली. स्त्रियांच्या वावरामुळं कार्यालयांना एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण स्वरूप प्राप्त होतं. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीही अनेकदा आगळ्यावेगळ्या असतात आणि निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्यात असते यावर आपला विश्वास असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

 

 

महिलांना सुखावून जाणारी आणि अभिमानास्पद वाटणारी अशीच ही गोष्ट आहे. अलीकडच्या काळात स्त्रिया विविध क्षेत्रांत आणि पदांवर दिसून येतात. टाटा समूहासारख्या कॉर्पोरेट बॉडीज् स्त्रियांचं महत्त्व ओळखून त्यांच्यासाठी प्रसंगी जादा सवलतीही देण्यास उत्सुक असतात. जगात जर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या निम्मी असेल, तर नोकरीच्या ठिकाणीही ते तशाच प्रमाणात का दिसू येतं, असं वाटल्यास त्यात चूक काहीच नाही. स्त्रिया वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या नोकरीतून बाजूला होणं पसंत करतात. मुख्यतः घराची, मुलांची जबाबदारी हे त्यापैकी महत्त्वाचं कारण असतं. स्त्रियांना घरून पाठिंबा आणि मदत असल्याविना त्यांना घराबाहेर निर्भयपणं काम करता येत नाही. पुरुषांना घरातून सहकार्य मिळतं म्हणूनच तर ते बाहेर काम करू शकतात ना... मग स्त्रियांना तसा पाठिंबा असल्याविना त्या कशा काय काम करू शकतील? टाटा समूहातील अनेक कंपन्यांतून वरिष्ठ पदांवर महिला आहेत. महिलांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांना व्यक्तिगत कारणांसाठी काही काळ घरात अडकून पडावं लागलं, तरी नंतर त्यांना कामाची संधी नाकारली जाऊ नये यासाठी टाटा समूहानं २००८ मध्येच ‘सेकंड करियर इंटर्नशिप प्रोग्रॅम’ असा एक उपक्रम राबवून कामापासून दूर रहिलेल्या महिलांना पुन्हा नवी संधी देण्याची सुरुवात केली. टाटा समूहानं घालून दिलेला हा धडा इतरांनीही गिरवण्यासारखा आहे. मिस्त्री यांच्या भाषणातली कळकळ म्हणूनच खरी वाटते... पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे? असं वातावरण देशात सर्वत्र आहे का, हा प्रश्न पडतो. कारण अलीकडे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसनं प्रसृत केलेली आकडेवारी काही वेगळंच सांगते!

 

या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी १३.९ दशलक्ष इतका रोजगार वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धदर घटला असताना, तसंच जगभरात आर्थिक गती धीमी असूनही हे घडलं. मात्र एकीकडं ही वस्तुस्थिती असताना, दुसरीकडं कामगारवर्गातील महिलांचं प्रमाण सुमारे ६ टक्क्यांनी खाली आलं आहे. २००९-१० दरम्यान पुरुषांची कामाच्या क्षेत्रातली टक्केवारी ५४ टक्के, तर स्त्रियांची १८ टक्के होती. २०११-१२ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ५४ आणि १६ टक्के इतकं होतं. म्हणजे महिलांची संख्या घटली आणि पुरुषांची तेवढीच राहिली. दोन टक्के इतका फरक दिसायला कमी वाटला, तरी प्रत्यक्षात हा आकडा होतो ९० लाख; म्हणजे ९० लाख महिला या दोन वर्षांमध्ये काम गमावून बसल्या. दुसरी गोष्ट, शहरी भागातील काम करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण काही लाखांनी वाढलं असल्यानं स्त्री-पुरुषांतील तफावत आणखी वाढली नाही. अन्यथा ९० लाखांचा आकडा अधिक फुगला असता. शहरी भागात वेतनाचा दरही जास्त असल्याचं दिसून आलं. तसंच मनरेगा योजनेत पुरुषांना दर दिवशी ११२.४६ रु. मिळतात, तर गैर-मनरेगा योजनेत हा दर १२७.३९ रु. आहे. स्त्रियांना मात्र त्याच कामासाठी दर दिवशी १०२-११० रु. असा रोजगार आहे. ही तफावत अन्याय्य आहे.

 

हे चित्र केवळ भारतातच आहे असं नाही. अर्थात, ही काही दिलाशाची बाब नक्कीच नव्हे! जूनच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) प्रसृत केलेल्या फायनॅन्स अॅण्ड डेव्हलमेंट या जर्नलमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या संदर्भातील असमान स्थिती दाखवून देण्यात आली आहे. जगभरात काम करणाच्या वयातील स्त्रियांची संख्या साधारणपणं काम करण्याच्या वयातील पुरुषांच्या निम्मी असली, तरी प्रत्यक्षात काम करणाऱ्या महिला एकूण कार्यबलाच्या एक तृतीयांश इतक्याच आहेत. विशिष्ट कामच स्त्रियांना मिळतं, त्या पुरुषापेक्षा कमी कमावतात आणि पुरुषांच्या तुलनेत त्यांना वरच्या पदांवर जाण्याची संधीही कमी प्रमाणात दिली जाते असं हे जर्नल सांगतं. दुसरीकडं जगभरातच प्रत्यक्षातील एकूण स्त्रियांची संख्याही घटते आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये स्त्रियांचं घटतं प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. काम करण्याच्या वयोगटातील जेमतेम २५ टक्के महिला काम करतात. भारताचा या संदर्भात खालून अकरावा क्रमांक लागतो. शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळं महिलांची कामगारवर्गातील संख्या कमी होत आहे, असाही एक मतप्रवाह आहे. अर्थात, शिकलेल्या महिलांवरही अनेक बंधनं असतात आणि त्यांचं स्वरूप सांस्कृतिक-सामाजिक असतं. भारतात तर घरापासूनच मुलींबाबतच्या भेदभावाला सुरुवात होते आणि अनेकदा जन्मापूर्वीही तिला या भेदाचा तडाखा बसतो. स्त्रियांचं जगणं सुकर आणि तणावरहित बनणं महत्त्वाचं असून, तसं झाल्यास त्या कामाच्या परिघात सहजपणं शिरू शकतात. पंचायत राज्यातील आरक्षणानं महिलांना एक आत्मविश्वास दिला आणि घरातील त्यांच्याकडं बघण्याची दृष्टीही बदलण्यास हातभार लावला. तशाच पद्धतीनं विविध कार्यक्षेत्रांमधील वातावरण बदलण्यासाठी स्त्रीपुरुषांना समान वागणूक देणारी धोरणं, ग्रामीण आणि शहरी भागातही पाण्याची सहज उपलब्धता अशा उपायांमुळं स्त्रियांची घराबाहेर पडून काम करण्याची वाट अधिक सोपी बनेल.

 

आज अशी परिस्थिती आहे की, काम केल्यावाचून जगणं कुणालाही अधिकाधिक दुष्कर बनत जाणार आहे. स्त्री असो की पुरुष; प्रत्येकाला काम हे मिळालं पाहिजे आणि त्याला किंवा तिला काम करता येण्याजोगं पूरक धोरण आणि वातावरणही अवतीभवती असलं पाहिजे. विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीनं या गोष्टींचा अभाव असल्याचं वास्तव नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या आकडेवारीवरून दिसलं. हे फार गंभीर आहे. यात बदल हा व्हायलाच हवा!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.