EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

महाराष्ट्राचे ‘मोदी’

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2081
  • 0 Comment

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पणजीत काँग्रेसमुक्त भारत निर्माणाची घोषणा केली, तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जमलेले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरलं. निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाल्यावर या मंडळींच्या चेहऱ्यावर तुकतुकी आली होती. काही बडे नेते नाराज झाले आणि नवी दिल्लीस रवाना झाले. मात्र कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक संपल्यावर भाजपचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी क्षेपणास्त्र सोडताच धरणीकंप झाला. त्यामुळं मोदी, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग, अरुण जेटली प्रभृतींचे खुललेले चेहरे एकदम करपून गेले... ‘तेरी दुनिया से होके मजबूर चला, मैं बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूऽऽऽर चला’ असं म्हणणाऱ्या अडवाणींच्या राजीनामानाट्याचे आणि माघारीचे, तसंच विशेषतः मोदींच्या नियुक्तीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणार आहेत.

 

 

आगामी काळात काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीनं पक्षानं एक समिती स्थापन करून तिचं अध्यक्षपद गडकरींकडं द्यावं, असा प्रस्ताव अडवाणींनी दिला होता. प्रचार समितीची धुरा मोदींकडं नसावी आणि तशी ती देण्यात आल्यास एक समांतर यंत्रणा तयार करावी. तिचं नेतृत्व आक्रमक हिंदुत्ववाद्याकडं नसल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नवनवे घटक पक्ष येऊ शकतील आणि सत्तास्थापनेसाठी त्याचा उपयोग होईल, असं अडवाणींचं मत. परंतु हे पद निर्माण करण्यास पक्ष अनुकूल नव्हता. समजा तशी संधी चालून आली, तरी ती अव्हेरण्याचा निर्णय गडकरींनी घेतला. पक्षाध्यक्ष असताना संजय जोशींसारख्या प्रकरणात गडकरींनी मोदींविरोधी भूमिका घेतली आणि नंतर माघार घेतली. ‘आमच्याकडं पंतप्रधानाचे कित्येक कसलेले उमेदवार आहेत’ असं सांगणारे गडकरी, नमोंचा वाढता करिश्मा बघून त्यांच्याशी दोन हात करण्यास बिलकुल तयार नाहीत. जिथं मोदी अडवाणींनाच जुमानत नाहीत, तिथं आपला काय पाड लागणार, असा विचार त्यांनी केलेला असू शकतो.

 

परंतु मोदी आणि गडकरी यांच्या एका बाबतीत मात्र जुळतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोघांचाही स्नेह आहे. मोदींमध्ये राजना ली क्वान यू (सिंगापूरच्या प्रगतीचे शिल्पकार) हे दिसत असावेत. त्यामुळं राजनं गुजरातची स्टडी टूर केली आणि उद्या आपल्याकडं एकहाती सत्ता आल्यास ‘महाराष्ट्राचा गुजरात’ करण्याचा निर्धारही केला. मात्र विकासाचं हे ब्लू प्रिंट अद्याप मनसेच्या ‘शिदोरीत’ बंद आहे! गडकरींना महाराष्ट्राचे ‘पूलकरी’ असं म्हटलं जातं. त्यांच्या कामावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खूश होते. बाळासाहेबांना दैवताप्रमाणं मानणाऱ्या राजची गडकरींशी इतकी दोस्ती की, खडसे-राज खणाखणी झाली, तेव्हा त्यांनीच मध्यस्थी केली. उद्धव आणि राजमध्ये आपण पूल बांधायला तयार असल्याचं वक्तव्य गडकरींनी पुण्यात केलं, तेव्हा उड्डाण पूल बांधण्याएवढं ते सोपं नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली! अडवाणींचं बंड शमवणं आणि त्यांच्यात तसंच पक्षात पुन्हा सेतू बांधणं यामध्ये नितीनभाऊंनी सरसंघचालकांमार्फत महत्त्वाची कामगिरी वठवली हे खरं आहे. परंतु भविष्यात प्रश्न येणार आहे तो नितीनभाऊ आणि मोदी यांच्यातील अंतर कमी करण्याचा. त्यामध्ये राजचा रोल महत्त्वाचा ठरू शकतो...

 

केंद्र स्तरावर अडवाणी-मोदी यांचं विळ्याभोपळ्याचं सख्य आहे, तसं राज्यात गडकरी-मुंडेंचं! त्यामुळं गडकरींचे निकटवर्तीय आशीष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी वर्णी लागली, तर मुंडे गटाचे अनिल शिरोळे यांची पुण्याच्या अध्यक्षपदी! राज्यात सर्वत्र या दोन गटांचं अस्तित्व आहे. गडकरींचा सामूहिक नेतृत्वावर विश्वास आहे, तर संघटनेवर आपला पूर्ण अधिकार हवा, असं मुंडेंना वाटत असल्याची टिप्पणी विधान परिषदेतील भाजप नेते विनोद तावडे यांनी केली होती. ते गडकरी गटाचे म्होरके आहेत. मोदींमुळं राज्यातील लोकशाही आघाडी आणि केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार उखडणं सोपं जाणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. परंतु एकमेकांना उखडण्यासाठी टपलेल्या नेत्यांचा पक्ष हे करू शकेल काय?

 

म्हणजे मोदी आणि फडणविसांना प्रथम गडकरी व मुंडे गटामध्येच पूल बांधावा लागेल. शिवसेनेतही खासदार संजय राऊत आणि आमदार रामदास कदम वेगवेगळ्या सुरात बोलत असतात. विधान परिषदेत काम करताना दिवाकर रावते आणि कदम यांची तोंडं दोन दिशांना असतात. शिवसेनेनं पूर्वी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांना पसंती दिली होती. आता प्रचार समितीप्रमुख म्हणून मोदींची निवड होताच त्यांची कार्यक्षमता आणि प्रचंड लोकप्रियता यांचा संजय राऊत यांना साक्षात्कार झाला आहे. उलट मोदी असोत वा नसोत; सेना-भाजप युती अभंग आहे, असा कडवट सूर सेनेचेच काही खासदार आणि पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

 

लोकशाही आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसनं भाकरी फिरवली असली, तरी ती खायला कोणी तयार नाही. कारण ती करणाऱ्याची प्रतिमा कलंकित आहे. त्यामुळं त्यांची सत्ता जाणारच आहे, याची विरोधी पक्षांना खात्री आहे. परंतु त्यासाठी महायुतीमध्ये मनसेनं आलं पाहिजे, याबाबत गडकरी-मुंडेंचं एकमत आहे. त्यादृष्टीनं मोदी आपलं वजन खर्च करतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईतील गुजराती व्होट बँकेच्या दृष्टीनं त्यांचं महत्त्व आहेच. परंतु बाळासाहेबांविना पोरक्या झालेल्या शिवसेनेलाही एका हिंदुहृदयसम्राटाची गरज आहेच.

 

आज देशातील मध्यमवर्गाचं प्रमाण 35 टक्के असून, शहरीकरणाचं प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे. शहरी, सुशिक्षित, नवोद्योगातील सुखी लोकांचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. हिंदुत्व, विकास, अस्मिता, रिझल्ट ओरिएंटेड हिटलरी नेतृत्वाचं या वर्गास ‘फॅसिनेशन’ आहे. 

त्यामुळं अलीकडंच सांगलीतील कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या तीस सदस्यीय शिष्टमंडळानं गांधीनगरला जाऊन नरेंद्रभाईंची भेट घेतली. एवढंच काय, रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंनीही मोदींची भेट घेऊन त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. मोदींचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असं त्यांनाही वाटत असणार. आठवले तर कसेही आणि केव्हाही चेंज होऊ शकणारे नेते आहेत...

 

मोदींचा अजेंडा उद्योगाभिमुख आहे. निर्बंधमुक्त, करसवलती, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) आणि उद्योगपतींना स्वस्तात जमिनी देणं हा त्यांचा विकासाचा पॅटर्न आहे. टाटा, अंबानी, अदानींसारख्या बड्या उद्योगपतींचे चोचले पुरवणं ही त्यांची शैली आहे. निर्णय त्वरेनं होतात; कारण सामान्य शेतकरी, स्थलांतरित, आम आदमी यांच्या समस्यांपेक्षा कारखानदारांना तिथं प्राधान्य आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करणं, झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवणं यासाठी जो ‘रूथलेसनेस’ लागतो, तो मोदींकडं आहे.

 

अशा या गुजरातचा मानवी विकास निर्देशांकातील क्रमांक देशात सहावा होता, तो नववा झाला आहे. त्या राज्याचं साक्षरतेत 18वं, तर अर्भक मृत्यूदरात 25वं स्थान आहे. स्त्रियांचं प्रमाण दर हजारी 918 इतकं कमी आहे. तमिळनाडू, ओरिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्यं दारिद्र्य घटवण्यात गुजरातच्या पुढे आहेत. उत्तर प्रदेश आणि राजस्थानपेक्षा गुजरातमध्ये भुकेकंगालांचं प्रमाण अधिक आहे.

 

महात्मा गांधी, सरदार पटेल, मोरारजी देसाईंना कोणी गुजरातचे नव्हे, तर देशाचे नेते मानतात. मोदींना राष्ट्रीय नेता बनायचं आहे. तर राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मोदी व्हायचं आहे. लोकशाही आघाडीस 2014ला नव्हे, तर 2019 मध्ये आपणच पर्याय देऊ शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. मोदींची गुजराती तर राजची मराठी अस्मिता, या दोन अस्मितांचं ऐक्य व्हावं, ही भाजपची इच्छा आहे. मोदी हा राजचा आदर्श आहे; परंतु म्हणून त्यांच्याशी ते युती करतील, असं नव्हे!

 

       

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.