EasyBlog

This is some blog description about this site

मराठवाडी तडका

नंदिग्रामची सावली

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1908
  • 0 Comment

इतिहास घडवणारी माणसं फार कमी सापडतात आणि जी थोडी माणसं असतात ती येणार्‍या पिढीसाठी मार्गदर्शक असतात. नांदेडच्या इतिहासामध्ये अशी माणसं जेमतेम बोटांवर मोजण्याइतकीच झाली आहेत. पुढेही अशी माणसं होतील की नाही, याची शाश्वती नाही. सध्या अस्तित्वात असणारी आणि इतिहास घडवणारी दोन माणसं महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झाली आहेत. एक म्हणजे संतबाबा नरेंद्रसिंगजी कारसेवावाले आणि दुसरे म्हणजे संतबाबा बलविंदरसिंगजी. या दोन संतांनी नांदेडचं जे काही केलं ते आतापर्यंत कुणीच केलं नसेल. या दोघांना नांदेडचा वर्तमान आणि भविष्यकाळ कधीच विसरणार नाही.

 

नांदेड हे संतांची भूमी असलेलं गाव. या गावाला मोठा इतिहास आहे. अन्याय कधीही या गावानं सहन करून घेतला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामाची हुकुमी राजवट नांदेडवरही होती. निजामाशी चार हात करून भोवताली स्वातंत्र्य घेण्यामागं नांदेडकरांचा सिंहाचा वाटा होता. कितीही संकटं आली तरी त्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य नांदेडकरांनी दाखवलं. हा सगळा नांदेडच्या शौर्याचा इतिहास आहे. ज्येष्ठ साहित्यिक नरहर कुरुंदकरांपासून ते आताच्या आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करणारे दीपक कदम यांच्यापर्यंत अनेक नावं घेता येतील. या सर्वांनी जे काही केलं आणि करीत आहेत ते नोंद घेण्यासारखंच आहे. सध्या नांदेडमध्ये काम करणार्‍या दोन संतांचा उल्लेख महाराष्ट्रभर होऊ लागला आहे. एक म्हणजे संतबाबा नरेंद्रसिंगजी आणि दुसरे म्हणजे संतबाबा बलविंदरसिंगजी. या दोघांनी केवळ नांदेड शहरालाच नाही तर शहरापासून आसपास असणार्‍या १५ किलोमीटर गावांना सावली दिली आहे. कुणी विचारलं या सावलीचं स्वरूप कसं आहे? तर उत्तर आल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणारच नाही. होय, या बाबांनी असंच काही काम केलेलं आहे.


१४ लाख झाडं शहरात लावण्याचा संकल्प केला आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत ७ लाख झाडं लावली आहेत आणि ती जोपासली आहेत. १४ आणि ७ लाख हा आकडा जर कुणी ऐकला तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नांदेडकरांना याचं फारसं कौतुक नाही; पण महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय झाला आहे. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडं लावली, असं कागदोपत्री दाखवणारा वन विभाग; त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका आणि वृक्ष लागवडीबाबत वेगवेगळी उपाययोजना राबवणारी यंत्रणा या सर्वांचं काम वर्षानुवर्षांपासून जवळजवळ कागदावरच चाललं आहे. त्या सर्वांना जर हा प्रोजेक्ट आणून दाखवला तर त्यांच्या आयुष्याचं शुद्धीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे सगळी झाडं लावली ती जोपासली गेली आहेत. त्यांचं नीटसं संगोपन केलं गेलेलं आहे. हा प्रोजेक्ट कसा केला गेला? तो नांदेडलाच का केला गेला? त्याचा सगळा इतिहास वाचकांसमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या ग्रीन सिटीचे व्यवस्थापक अमरजितसिंग टाटा सांगत होते की, संतबाबा नरेंद्रसिंगजी आणि संतबाबा बलविंदरसिंगजी यांच्या अत्यंत जवळ असलेले पंजाबचे काही भाविक २००९ला नांदेडला आले होते. भर उन्हाळ्यामध्ये आलेल्या या भाविकांनी दोन्ही संतबाबांजवळ एक कल्पना बोलून दाखवली. ते म्हणाले की, बाबाजी, गुरुद्वारा लंगरपासून ते सचखंड गुरुद्वारापर्यंत मोठमोठी झाडं लावली गेली पाहिजेत आणि त्यातून भरपूर सावली मिळाली पाहिजे. जेणेकरून गुरुद्वार्‍याच्या सौंदर्यामध्येही भर पडेल आणि दर्शनाला येणार्‍या भाविकांना उन्हाची रखरखताही एवढ्या प्रमाणात जाणवणार नाही. बाबाजींच्या डोक्यात क्षणात ‘क्लिक’ झालं. ही उन्हाची तीव्रता सगळ्याच शहरवासीयांना जाणवली नाही तर किती चांगलं होईल? आणि तातडीनं बाबाजींनी याबाबत एक प्लॅन तयार केला. एकूण १४ लाख झाडं लावण्याचा हा प्राथमिक प्लॅन होता. त्यासाठी किती खर्च येणार? रोपं कुठून आणायची? वगैरे वगैरे... हा सगळा प्लॅन कागदावर आला आणि या प्लॅनची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा मुहूर्तही ठरला. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याच हातानं वृक्ष लावून ‘न भूतो न भविष्यति’ अशा कार्याला सुरुवात झाली.


नांदेडमध्ये असणारं गुरुद्वारा लंगरसाहिब या गुरुद्वाराला नुकतीच १०० वर्षं पूर्ण झाली. २४ तास लंगर सेवा देणं, हे या गुरूद्वाराचं मुख्य काम. रोज किमान २५ हजारांपेक्षा अधिक जण लंगरच्या माध्यमातून जेवणाचा आस्वाद घेतात. या जेवणामागं दोन धारणा निश्चितच जडलेल्या आहेत. एक म्हणजे गुरूद्वाराचा प्रसाद आणि दुसरं म्हणजे भुकेला जीव तृप्त करणं. यापलीकडं जाऊन गुरूद्वाराचं आणखी एक काम आहे. ते म्हणजे देश-विदेशातून येणार्‍या भाविकांच्या निवासाची व्यवस्था करणं हे होय. नव्यानं गुरुद्वार बांधणं, इमारती उभ्या करणं आदी कामं या गुरुद्वाराच्या माध्यमातून केली जातात. यापलीकडं जाऊन बाबाजींनी हा ग्रीन सिटीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. १९१२ला या गुरुद्वाराचे संस्थापक असलेल्या संतबाबा निधानसिंगजी यांनी कधी विचारही केला नसेल की, माझ्यानंतर इथली गादी सांभाळणारे संत ग्रीन सिटीसारखा ऐतिहासिक प्रयोग करतील; पण ते आज झालं आणि वास्तव रूपाला आलं आहे. नांदेड शहर, सिडको-हडको, लिंबगाव आणि जवळपासचा किमान १५ ते २० किलोमीटरच्या परिसरामध्ये रखरखत्या उन्हात डौलत राहणार्‍या झाडांकडं बघितलं की, या दोन्ही संतांचा विचार आणि त्यांची काम करण्याची निःस्वार्थी भूमिका किती पवित्र आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. सहज मिळेल तर त्याची किंमत नसते असं म्हणतात. तसंच काहीसं नांदेडकरांच्या बाबतीतही झालं आहे. या दोन संतांनी एवढा मोठा प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवला आहे, याचं कौतुक सबंध महाराष्ट्रभर होऊ लागलं आहे; पण नांदेडला याचं कौतुक आहे की नाही? हा प्रश्न पडू लागतो. दिलीप ठाकूरांसारख्या शिवसेनेच्या एखाद्या सच्च्या कार्यकर्त्याला नांदेडभूषण देऊन दोन्ही संतांपुढं मान झुकवावी असं वाटतं; मात्र इतरांना बाबाजींच्या पुढं मान झुकवून कृतज्ञता व्यक्त करावीशी का वाटत नाही, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.


बाबाजी केवळ झाडं लावूनच थांबले नाहीत, तर ते प्रत्येक झाड कसं उभं राहील, यासाठी त्यांनी योजना आखली. पाणी टाकायला स्वतंत्र माणसं, झाडं राखण्यासाठी स्वतंत्र माणसं, झाडांच्या अवतीभवती स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र माणसं आणि या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र माणसं, टँकरची व्यवस्था, बोअरची व्यवस्था, पाण्यासाठी ना मनपाकडं हात पसरले, ना कुठल्या खाजगी बोअरवाल्यांना विनंती केली की, आमच्या झाडांना पाणी द्या! बाबाजींनी जे काही ठरवलं ते स्वतः केलं, आणि करूनही दाखवलं. आजघडीला ३०० लोक या झाडांच्या जीवांसाठी राब-राब राबत आहेत. त्यांना कधीही आर्थिक टंचाई भासत नाही, ना कधीही कुठल्याही अडचणीला सामोरं जावं लागतं. बाबाजींनी जे ठरवलं ते करून दाखवलं.


आजूबाजूची कुठलीही सरकारी यंत्रणा असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, सा.बां. विभाग असेल किंवा कुठलाही पाणीपुरवठा करणारा विभाग असेल; या विभागानं मदत तर सोडाच, पण नियमित त्रास देण्याची भूमिका वठवलेली आहे. रस्त्यानं चालणार्‍या माणसांनाही या झाडांचं महत्त्व कळत नसावं, म्हणून त्यांनी येता-जाता झाडं तोडण्यास सुरुवात केली. बाबाजींच्या यंत्रणेनं अगोदर त्यांना विनंती केली की, बाबा रे! अशा प्रकारे नुकसान करू नका. हे आपलंच नुकसान आहे; पण काही वाटसरू ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी या झाडांच्या रक्षणासाठी बाबाजींना हातात काठ्या घेऊन गल्लोगल्ली माणसं उभी करावी लागली. तेव्हा कुठे हा खोडसाळपणा थांबला गेला.


चिरंतन विकास ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची सरकारची भूमिका आहे; मात्र ही भूमिका नेहमीच कागदावरच बघायला मिळते. कित्येक मंत्री बदलतात, कित्येक सचिव बदलतात. ही यंत्रणा राबवणार्‍या अधिकार्‍यांचे नवे चेहरे पाहायला मिळतात; पण काम मात्र जुन्याच स्टाईलनं चुकीच्या पद्धतीनं होताना दिसू लागतं. आता दुष्काळ पडला आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत त्याची रखरख जाणवत आहे. अर्धा मराठवाडाही त्यामध्ये सहभागी आहे. बाबाजींसारखा उपक्रम जर मराठवाड्यामध्ये एकदाच राबवला गेला तर असा दुष्काळ पुन्हा कधीच मराठवाड्याला स्वप्नातही पाहायला मिळणार नाही. वास्तविक पाहता बाबाजींसारख्या उपक्रमावर सरकारकडून दरवर्षी कितीतरी कोटी खर्च होतात, ज्याचा आकडाही सांगता येणार नाही. काम मात्र अजिबात दिसत नाही. या दोन्ही बाबाजींनी केवळ नांदेडकरांनाच सावली दिली नाही, तर नांदेडकरांच्या भविष्याला सावली देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला कोटी-कोटी शुभेच्छा!
-----------------------------------------------------------


संतांचं काम लोकांच्या अडचणी दूर करणं असतं. त्यांना चांगल्या विचारांवर घेऊन चालणं असतं. आम्हीसुद्धा यदाकदाचित तेच करू लागलो आहोत. हे आमचं एक-दोघांचं काम नाही, तर यासाठी राबणारे हजारो हात निःस्वार्थीपणं सेवा करू लागले आहेत आणि त्यातूनच हे उभं राहिलं आहे. भविष्यामध्ये या कामाला चालना देण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची नितांत गरज आहे. आजपर्यंत सहकार्य मिळेल आणि पुढंही सहकार्य मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.
- संतबाबा नरेंद्रसिंगजी, संतबाबा बलविंदरसिंगजी

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारा तरुण तडफदार पत्रकार म्हणून ओळख. गेल्या 10 वर्षांपासून संदीप पत्रकारितेत. शिक्षण, राजकारण आणि ग्रामीण विकास हे आवडीचे विषय. 'सर्व शिक्षा अभियानातील घोटाळा', 'बोगस विद्यार्थी संख्या' हे विषय महाराष्ट्राच्या समोर आणले. त्याबद्दल यंदाचा बाबा दळवी पुरस्कार.