EasyBlog
This is some blog description about this site
एल्गार
विद्रोही शाहीर... अण्णा भाऊ
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातल्या वळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात तुकाराम साठे अर्थात, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. जन्मजात गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या मातंग (मांग) जातीत ते जन्मले आणि निवडुंगाच्या फडानं वेढलेल्या मांगवाड्यात वाढले. आईवडील दोघंही शेतमजूर होते. धामधुमीचा काळ होता. सततचा दुष्काळ, अनावर भूक, एकामागे एक येणारे साथीचे रोग, सावकरांची दंडेलशाही, जमीनदारांचे जुलूम आणि ब्रिटिश सरकारची क्रूर नीती यांच्या तावडीत गोरगरीब कष्टकरी भरडला जात होता. अशा वातावरणात अण्णा भाऊ वाढत होते. त्यांचं बालपणही त्या वातावरणात भरडलं जात होतं.
अण्णा भाऊ जसजसे मोठे होऊ लागले तसतसं मैदानी खेळ खेळण्यात त्यांचं मन रमू लागलं. दांडपट्टा हा त्यांचा आवडता खेळ होता. वारणेच्या पाण्यात पोहणं, शिकार करणं आणि डोंगरदऱ्यांत तासन् तास भटकणं त्यांना आवडायचं. दोरखंड वळणं केरसुण्या बनवणं हा मातंग समाजाचा परंपरागत व्यवसाय, शिवाय बलुतेदारीच्या नावाखाली गावच्या पाटील-कुलकर्ण्यांकडून त्यांची पिळवणूक होत असे. पोटाला भाकरी मिळवण्यासाठी लाचारीनं जगावं लागत होतं. हे भोग आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत, असं त्यांचे वडील भाऊ साठेंना आणि आई वालुबाईंना वाटलं. त्यांनी अण्णा भाऊंना शाळेत घातलं, पण जातीयवादी मास्तरांनी त्यांना छडीनं फोडून काढलं. कोवळ्या अण्णा भाऊंच्या मनात घृणा निर्माण झाली. त्यांनी दीड दिवसात जी शाळा सोडली त्यानंतर त्यांनी आयुष्यात पुन्हा कधीही शाळेचं तोंड पाहिलं नाही.
शाळा सोडली आणि त्यांची भटकंती पुन्हा सुरू झाली. काळ पुढे सरकत होता. अशातच एका जत्रेत अण्णा भाऊंनी क्रांतिसिंह नाना पाटलांचं भाषण ऐकलं. त्या ओजस्वी भाषणाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला. हृदयात देशभक्तीची ज्वाला पेटली. आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, जुलमी इंग्रजांना हाकलून लावलं पाहिजे, या विचारांनी प्रेरित होऊन ते नाना पाटलांच्या प्रतिसरकारमध्ये सामील झाले.
पोटाची भूक आणि अन्नावाचून होणारे कुटुंबाचे हाल त्यांना अस्वस्थ करीत होते. आई-वडिलांनी सहकुटुंब मुंबईला जायचं ठरल्यावर अण्णा भाऊ त्यांच्याबरोबर मुंबईला निघाले. १९३२ मध्ये वाटेगाव ते मुंबई हा दोनशे मैलांचा प्रवास उपाशीपोटी आणि अनवाणी पावलांनी केला. पण त्याच अण्णा भाऊंनी १९६२ मध्ये मुंबई ते मास्को हा प्रवास विमानानं केला. अर्थात, या दोन टाकांमधला जीवनप्रवास अत्यंत खडतर होता.
रस्त्यावर खडी टाकण्याचं काम करीत सारं कुटुंब कल्याणला पोहोचलं. कल्याणला वडिलांबरोबर अण्णा भाऊंनी कोळशाच्या गाड्याही भरल्या. मुंबईत आल्यावर भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत खोली भाड्यानं घेऊन त्यात त्यांचं कुटुंब राहू लागलं. इथं आईवडील कष्ट करू लागले, अण्णा भाऊ त्या कष्टांना हातभार लावू लागले. घरगडी, कुत्रा सांभाळणारा नोकर, रंगारी, डोअरकीपर अशी नाना कामं केली. भाऊ साठेंच्या तमाशात नाचले. फेरीवाल्या कापडविक्रेत्याबरोबर हेलकरी होऊन फिरले. बहुरंगी आणि बहुढंगी मुंबईचं अंतरंग जाणायला त्यांनी सुरुवात केली. त्याच वेळी रस्त्यावरचे, दुकानांचे नामफलक वाचायला त्यांनी सुरुवात केली... आणि अक्षरशत्रू अण्णा भाऊंची अक्षरांबरोबर मैत्री झाली.
मोरबाग गिरणीत त्यांना झाडूवाल्याचं काम मिळालं. पुढे शासन विभागात कसवा कारागीर झाले. याच काळात त्यांचा कामगार संघटनेशी संबंध आला. १९३६च्या दरम्यान गिरणी कामगारांचा संप झाला. त्यावेळी अण्णा भाऊंनी 'स्टॅलिनग्राडचा पोवाडा' लिहिला. या संपकाळात त्यांचा कॉ. मोरे, कॉ. डांगे यांच्याशी जवळून संबंध आला. कार्ल मार्क्सनं सांगितलेलं भाकरीचं तत्त्वज्ञान या अठराविश्व दारिद्र्यानं पिचलेल्या, उपाशी माणसाला आवडलं. ते या साम्यवादी विचारांनी प्रभावित झाले. कम्युनिस्ट पार्टीच्या सभा आयोजित करणं, प्रचारपत्रकं वाटणं, मोर्चासाठी घोषणाफलक लिहिणं, भिंतींवर पोस्टर्स चिकटवणं इत्यादी कामं ते आवडीनं करू लागले. याच काळात त्यांनी विपुल वाचनही केलं. त्यामुळे त्यांचं विचारविश्व व्यापक झालं. 'शाहीर' हे बिरुद त्यांना मिळालं ते कम्युनिस्ट पार्टीच्या सभांमध्ये आपल्या धारदार आवाजात पोवाडे गाण्यामुळे. मोरबाग मिल, कोहिनूर मिल, नायगाव मिल अशा विविध मिलमध्ये त्यांनी काम केलं. पण त्यांच्या जीवनाला स्थिरता मात्र मिळाली नाही.
कामगार चळवळीशी नातं जडल्यावर अण्णा भाऊंनी पोवाडा, लावणी, पदं, गण, छक्कड अशा विविध रचना केल्या. १९४० नंतर त्यांची लेखणी सर्वार्थानं तळपू लागली. १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात अण्णाभाऊंनी सक्रिय सहभाग घेतला. डफावर दमदार थाप मारीत ते'लोकशाहीर' म्हणून कामगार मैदानावर तळपले. कधी भूमिगत राहून लपतछपत, तर कधी तुरुंगातून त्यांनी आंदोलन चालवलं. जन चळवळीचा गायक, फर्डा वक्ता, बिनीचा कार्यकर्ता, प्रज्ञावंत लेखक, नायक अशा विविध भूमिका आयुष्यभर कष्टानं चोखपणं पार पाडल्या.
अण्णा भाऊंनी शाहिरी परंपरेच्या लावण्या लिहिल्या, पण रूढ लावणीत त्यांनी नवा आशय भरला. तिला नवं रूप दिलं. शृंगारिक गुलाबी लावणीत अण्णा भाऊंनी क्रांतीची आग पेरली. त्यांच्या लावणीनं शोषितांच्या नसानसात विद्रोह भरून त्यांना अन्यायाविरुद्ध लढा द्यायला प्रवृत्त केलं. लवादाचा ऐका परकार, मुंबईची लावणी, माझी मैना गावाकडं राहिली या त्यांच्या लावण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं. प्रियकर-प्रेयसीचा दुरावा, ताटातूट यांचं वर्णन करता करता-
“तुम्ही चळू नका, कुणी वळू नका,
मागं पडू नका
बिनी मारायची अजून राहिली,
माझ्या जीवाची होतीया काहिली.”
असं म्हणत मराठी जनतेनं एक होऊन आपली संस्कृती जोपासण्यासाठी अंशतः लढा द्यावा, असा संदेश त्यांनी दिला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंनी हिरिरीनं भाग घेतला. तमाशाच्या फडातून डफ-तुणतुणे हाती घेऊन त्यांनी जनजागृतीचं काम आरंभलं. पण शासनानं तमाशावर बंदी आणल्यावर लोकनाट्य असं तमाशाचं बारसं केलं ते अण्णा भाऊंनीच. 'तमाशा म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचं मादक प्रदर्शन आणि लावणी म्हणजे या सौंदर्याचा उन्मादी आविष्कार' ही तमाशा आणि लावणीची तत्कालीन व्याख्याच त्यांनी बदलून टाकली. त्यांच्या खटकेबाज संवादांतून कामगाराची बायको, शेतकऱ्याची बायको साकारू लागली. त्यामुळं तमाशा कलावती या कथानकातील आवश्यक पात्र म्हणून प्रेक्षकांपुढं साकारू लागल्या. लोकरंजन कलेला त्यांनी लोकशिक्षणाचं वाहन बनवलं, आणि मनोरंजनातून समाजप्रबोधन करता येतं हे दाखवून दिलं.
अण्णा भाऊ साठे हे मराठीतले एक महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. पस्तीस कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्याला अधिक समृद्ध केलंय. याद्वारे उपेक्षित समाजाच्या मूक वेदनांना त्यांनी वाचा फोडली. उपेक्षितांच्या जीवनातील समस्या, फड्या निवडुंगासारखं वाढलेलं दैन्य, पोटात थैमान घालणारी क्रुद्ध भूक, भाकरीच्या घासासाठी वास्तवाशी केलेली जळजळीत लढाई, हे सारं त्यांच्या समर्थ लेखणीनं शब्दबद्ध केलं. जात आणि दारिद्र्य यांचा कलंक घेऊन जगणाऱ्या माणसांच्या व्यथा-वेदनांना शब्दबद्ध करून मराठी सारस्वताला माहीत नसलेले वास्तव त्यांच्यासमोर मांडून त्यांना विचार करायला भाग पाडलं. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील ही पात्रं दु:खी आहेत, पण त्या दु:खानं पिचून जाऊन ती हीन-दीन होत नाहीत, तर माणसाला अगतिक बनवणाऱ्या या व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठतात. हाती शस्त्र घेतात, त्यातून विद्रोहाची ऊर्मी प्रकट होते. सावकार, जमीनदार, इनामदार, मठकरी अशा धनदांडग्यांशी ते बेधडक झुंज देतात. वेश्या,देवदासी, तमासगीर कलावंत यांच्या समस्यांवर त्यांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्यांना जशी वास्तवाची धार आहे, तसंच कारुण्य, प्रेम, वैर, संताप, समाजहिताची कळकळ इत्यादी भवनाही आहेत... आणि अण्णा भाऊंनी त्या सकसपणं मांडल्या आहेत.
१९४९ मध्ये पहिली कथा लिहून अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यसेवेला आरंभ केला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते अखंड लिहीत होते. पन्नास वर्षांच्या त्यांच्या संघर्षमय आयुष्यात त्यांनी नव्वद पुस्तकं मराठी साहित्याला बहाल केली. त्यात चौदा लोकनाट्यं,दहा पोवाडे, तेरा गीतसंग्रह, एक नाटक, एक प्रवासवर्णन, सात चित्रपटकथा, तेरा कथासंग्रह आणि पस्तीस कादंबऱ्या आहेत. त्यांच्या'फकिरा' या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. त्यांच्या कादंबऱ्यांवर सात चित्रपट निघाले. फकिरा, वारणेचा वाघ, आवडी इत्यादी काही कथा कादंबऱ्या रशियन, झेक, पोलंड, जर्मन इत्यादी विदेशी भाषांबरोबरच हिंदी, गुजराती, बंगाली तामिळ,मल्याळी, ओदिशा अशा भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत. दौलतीच्या राजा उठिनी सर्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला... अशी निसर्गाच्या लावण्याची भुरळ पाडणारी त्यांची गीतं त्यातील अंगभूत गोडव्यानं रसिकांच्या मनात रेंगाळत राहिली.
1948 मध्ये पॅरिसला शांतता परिषदेला जाण्याचं निमंत्रण अण्णा भाऊंना मिळाले. पण महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळं ते जाऊ शकले नाहीत. त्यांची ही इच्छा 1961 मध्ये पूर्ण झाली. 12 सप्टेंबर 1961ला इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या विद्यमानं अण्णा भाऊ रशियाला गेले. या प्रवासाचं मनोवेधक आणि प्रवाही वर्णन अण्णा भाऊंनी 'माझा रशियाचा प्रवास' या प्रवासवर्णनात केलं आहे. समाजवादानं घडवलेल्या रशियाचं चैतन्य यात अण्णा भाऊंनी नेमकं टिपलं आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी शिक्षण घेतलं नव्हतं. तरीही ते जे शिकले ते जीवनाच्या शाळेत आणि जीवनाच्याच विद्यापीठात... प्रत्यक्ष माणसात वावरताना आणि चळवळी करताना. त्यांना जीवनाचं भान शिकवणारा त्यांचा मोठा गुरू होता कार्ल मार्क्स. अण्णा भाऊंनी मार्क्सवादी प्रेरणेतून लिहायला सुरुवात केली. दैववाद आणि धर्म-पंथातील भाकडकथा त्यांनी नाकारल्या आणि विज्ञानवादी दृष्टी अंगीकारली. 1957 मध्ये त्यांनी दलित साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. आपल्या भाषणात त्यांनी स्वत:च्या साहित्यविचारांची मांडणी केली आणि मराठी साहित्यविश्वाला जीवनाभिमुखतेची दिशा दिली. “पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे,”असं पांढरपेशा समाजाला त्यांनी ठणकावून सांगितलं.
आयुष्याच्या उत्तरार्धात ते आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित झाले. “जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भिमराव”... या काव्यातून त्यांनी दुष्ट सामाजिक रूढींवर घाव घालायला सांगितले. जुन्या ररू-परंपरा बदलून नवमहाराष्ट्राची निर्मिती व्हावी, असं त्यांना वाटलं. भेदाभेदविरहित समाज, समता आणि बंधुता यांची पाठराखण करणारी समाजव्यवस्था निर्माण व्हावी, शासनव्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी काव्यातून व्यक्त केली. स्वत:वर झालेला अन्याय सहन करू नका आणि इतरांवर अन्याय करू नका, असा मूलमंत्र देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून दिली. दलित बांधवांना आणि इतर समाजाला परिवर्तनाचं आवाहन केलं.
उपेक्षित समाजात जन्मलेल्या या सिद्धहस्त लेखकाच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षाच आली. जन्मानं मिळालेल्या दलिततेमुळे त्यांना ही उपेक्षा सहन करावी लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधक विचारांनी त्यांच्या हृदयात विद्रोहाचा अंगार पोचवला असला किंवा कार्ल मार्क्सच्या विचारांतून त्यांना जीवनाचा अर्थ लावणारी वर्गीय दृष्टी मिळाली असली तरी समाजाकडून, शासनाकडून त्यांचा उचित गौरव झाला नाही. जीवघेण्या गृहकलहाला सामोरं जावं लागल्यानं वैवाहिक जीवनातही दु:खच मिळालं. कर्जाच्या खाईत लोटून जिवलग सहकारी दूर झाले. आजार, फसववूक, एकाकीपणा यामुळे जीवनात औदासिन्य आलं आणि दारिद्र्यात पिचतच एका मनस्वी कलावंताचा, एका लोकशाहिराचा अंत झाला.
मराठी साहित्याला समृद्ध करणारं त्यांचं साहित्य आजच्या तरुण पिढीनं वाचायला हवं. त्यांची वास्तवदर्शी लेखनशैली समजून घ्यायला हवी. दलित दु:खाचं त्यांनी कणखरपणं केलेलं चित्रण समजून घ्यायला हवं. त्याची चित्रदर्शी वर्णनं, त्यांचं वेगवान निवेदन, त्यांचे नाट्यपूर्ण संवाद, त्यांची भावशील स्वगतं आणि चिंतनपर भाष्य यांचा विचार आणि अभ्यास व्हायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजानं बदलायला हवं. समाजाला बदलवायला हवं. जातीवर्ग विरहित समाजरचना निर्माण व्हयला हवी. त्यासाठी प्रत्येक माणसानं माणूस म्हणून आपलं योगदान द्यायला हवं. असं करणं हीच अण्णा भाऊ साठे यांना खरी आदरांजली ठरेल.