EasyBlog
This is some blog description about this site
सिरोंचा ते सीरिया...
जगणं सोपं करून देणारा माणूस - समीर कुर्वे
- Font size: Larger Smaller
- Hits: 1434
- 2 Comments
कालच वर्ध्यात आलोय. सकाळी अचानक मित्राचा फोन आला. म्हणाला, 'समीर कुर्वे सर आपल्याला सोडून गेले...' फोन कट् झाला. मन सुन्न झालं. काय बोलावं समजेना. समाजाला दिशा देणारा माणूस. असा अचानक का जावा, अजूनही समजत नाहीये. कदाचित त्याचं उत्तर मिळणारही नाही. कुर्वे सरांच्या जाण्याची बातमी मी माजी केंद्रीय मंत्री आणि कुर्वेंसरांच्या निकटच्या सहकारी सूर्यकांत पाटील यांना फोनवरून कळवली. त्यांचा अश्रूचा बंध फुटला. 'ग्रामीण भागात काम करणारा, आपुलकीनं माणसं जोडणारा मोठा माणूस गेला... 'एवढ्याच त्या बोलू शकल्या.
कुर्वेसरांना मी गेल्या सहा वर्षांपासून ओळखतो. त्याचं काम मला अत्यंत जवळून बघता आलं. समजवून घेता आलं. वर्ध्यात आलो की त्यांनी फुलवलेल्या ग्रामीण विज्ञान केंद्रात तास न् तास बसून त्यांच्याशी गप्पा मारणं हा माझा नित्यक्रम. काही मोजकेच पत्रकार सोडले तर या माणसाला फार कमी लोक ओळखायचे. खरं तर वर्ध्याचं दुर्देवच आहे की, आपल्यातली मोठी माणसं या जिल्ह्याला कधी कळलीच नाहीत.
गेली ३० वर्षे समीर कुर्वे नागपूर - वर्धा रोडवरील दत्तपूर इथल्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राच्या कामात विरघळून गेले होते. डॉक्टर देवेंद्र गुप्त यांनी स्थापन केलेल्या या केंद्राचा उद्देश आहे, ग्रामीण भागातील लोकांचं जगणं सुसह्य करणं. त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित करणं. समीर कुर्वेनी गेल्या ३० वर्षात ग्रामीण जीवन समृद्ध करण्यासाठी विविध प्रकारचं तंत्रज्ञान विकसित केलं. हे तंत्रज्ञान विकसित करून ते लोकांपर्यंत पोहचवणं हे त्यांच्या जीवनाचं उद्दीष्टच बनलं होतं. त्यांनी सामान्य लोकांसाठी स्वस्त आणि पर्यावरणपूरक घरं तयार केली. चिखलापासून बनवण्यात आलेली ही आकर्षक घरं सर्व प्रकारच्या हवामानात टिकतात. युनिसेफच्या माध्यमातून ही घरं त्यांनी जगभर पोहचवली. रशिया, सर्बिया, आफ्रिका आणि युरोपमधील अनेक कुटंबं कुर्वेसरांनी बांधलेल्या घरांमध्ये राहतात. त्यांची शून्य डिग्री तापमान रोधक घरांचं मॉडेल देशविदेशात लोकप्रिय झालं.
त्याचं दुसरं मोठं काम आहे, जलसंधारण आणि सांडपाणी प्रक्रियेवर. सरकारनं गावागावांत संडास बांधणं बंधनकारक केलं. पण या संडासांमध्ये पाण्याचा मोठा अपव्यय होतो. आता जिथं दुष्काळी भागात पिण्याचंही पाणी मिळत नाही, तिथं या संडासांमध्ये सोडायलं कुठून पाणी आणायचं? समीर कुर्वे यांनी यावर विचार केला आणि कमीत कमी पाण्याचा वापर होणारं 'लीच' संडास तयार केली.
दोन वर्षापूर्वी सर प्रचंड अस्वस्थ होते. त्यांनी मला फोन केला. त्यांच्या अस्वस्थतेचं कारण होतं, बोल्डावाडी गाव. हिंगोली जिल्ह्यातलं 'इकोटेक' गाव. सहा वर्षे राबून सरांनी हे गाव उभारलं. तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या सहकार्यातून सरांनी या गावात पर्यावरण फ्रेंडली १०२ सुरेख घरं उभारली. बायोगॅस प्रकल्पामुळं गाव उर्जेत स्वयंपूर्ण झालंय. सौर उर्जेवरचे दिवेही गावात लावण्यात आलेत. गावात ३० फूट रुंदीचे दगडी रस्ते बांधण्यात आलेत. बांधकामात कुठंही लोखंडाचा वापर नाही. रस्ते डांबर, सिमेंट विरहीत. प्रत्येक घरासमोर झाड. पाणीटंचाईतही भरून वाहणारे पाण्याचे नळ, असं समृद्ध चित्र गावात दिसतं. महत्त्वाचं म्हणजे विस्थापित आदिवासी बांधवांसाठी हे गाव वसवण्यात आलंय. हे गाव तयार उभारून तयार होतं. पण आदिवासी बांधवांना त्याचं हस्तांतरण होत नव्हतं. त्यामुळं सर प्रचंड अस्वस्थ होते. ते मला म्हणाले, 'हा मुद्दा पत्रकारांनी उचलायला हवा...' मी स्थानिक रिपोर्टरला पाठवलं. त्यानं बातमी केली. ती 'आयबीएन-लोकमत'नं दाखवली. अखेर सरकारनं दखल घेतली आणि गाव गावकऱ्यांना राहायला खुलं झालं. त्या दिवशी सरांचा पुन्हा उत्साहानं फोन आला. ते खूप खूप समाधानी होते...
कुर्वे सरांनी धुरविरहीत चुलीपासून, ते २०० रुपयाला मिळणारं जलशुध्दीकरण यंत्र (water filter,घरगुती स्वस्त फ्रीजपर्यंतची खेडोपाड्यातील सामान्य जनतेला परवडणारी टेक्नालॉजी विकसीत केली. महत्वाचं म्हणजे यातून कुठलाही पैसा कमावण्याच्या किंवा मार्केटींग करण्याच्या फंदात ते कधीही पडले नाहीत. 'टेक्नालॉजी विकसीत करा आणि हस्तांतरीत करा' हा मूलमंत्र त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही दिला. हे तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. उपयोगी वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं.
कुर्वेसर अण्णा हजारे, मेधा पाटकर, पोपटराव पवार, बाबा आढाव, मोहन धारिया या समाजासाठी राबणाऱ्या माणसांच्या संपर्कात असायचे. अण्णांच्या आंदोलनातल्या काही गोष्टी त्यांना खटकायच्या. त्या ते सरळ बोलून दाखवायचे. ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील यांच्या आग्रहामुळे त्यांनी गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचं अध्यक्षपद स्वीकारलं. या पदाला राज्यमंत्र्याचा दर्जा असतो. मात्र कुर्वेसरांनी लाल दिव्याची गाडी नाकारली. मुंबईच्या ऑफिसमध्ये नाही तर वर्ध्यातूनच काम करन, अशी अट घातली. ती मान्यही झाली. मुंबईबाहेर राहूनही किती प्रभावीपणे काम करता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं.
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थीती होती . सर मला सातत्यानं म्हणायचे, 'आपण जलसंधारणचं महत्व शेतकरी आणि सामान्य लोकांना पटवून दिलं पाहिजे. अन्यथा कितीही पैसा खर्च केला तरीही दुष्काळी परिस्थीती कायमच राहील. केवळ सरकारला दोष देऊन फायदा नाही. आपल्यापासून कामाला सुरुवात करायला पाहिजे. ग्रामीण भारत आणि शहरं यांना जोडण्यासाठी आम्ही 'भारत4इंडिया' नावाचं वेबपोर्टल सुरू केलं होतं. तेव्हा वर्ध्यातून विजय जावंधिया आणि समीर कुर्वे सरांना आवर्जून मार्गदर्शनासाठी मुंबईला बोलावलं. सरांनी आमचं मनभरुन कौतुक केलं.
प्रत्येक कामात मी सरांचं मार्गदर्शन घ्यायचो. आशिर्वाद घ्यायचो. त्यांच्याकडून कामाचं कौतुक झालं की धन्य व्हायचो. ते उभारी देणारे शब्द आता ऐकायला मिळणार नाहीत. तो आशीर्वादाचा हात आता पाठीवर असणार नाही. मीच नाही तर ग्रामीण भारताच्या विकासाची तळमळ असणाऱ्या प्रत्येकाला सराचं नसणं ही मोठी पोकळी ठेवणारं आहे...
विनोद राऊत
पत्रकार, मुंबई
८८७९९९३६०१