बाळ केशव ठाकरे ते हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे....1966 ते 2012, शनिवार 17 नोव्हेंबर, अक्षरश: एक झंझावात शमला...मराठी मनाचा मानबिंदू ते हिंदुहृदयसम्राट ही वाटचाल म्हणजे एका व्यंगचित्रकाराच्या आयुष्यात उठलेलं एक वादळ...या वादळात अनेकजण भुईसपाट झाले. अनेकजण ताठ मानेनं उभे राहिले. आणि सलग गेली 45 वर्षांहून अधिक वर्षं अनेक तरुण पिढ्यांवर गारुड करणारा हा कलंदर माणूस आता गेला. तो गेला असला तरीही या जिंदादिल माणसाचा संप्रदाय त्या माणसाच्या आठवणींसह तसाच पुढे वाटचाल करणार आहे.
एका आयुष्यात अनेक प्रतलांमध्ये जगणं तसं अवघड असतं. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं पाहिलं तर कुणालाही तसं जगणं सोपं वाटेल इतकं सहज आयुष्य त्यांनी ठसठशीतपणे अनुभवलं.
बाळासाहेब नावाचा संप्रदाय कधी बनला असावा? हा संशोधनाचा विषय आहे. भगवी वस्त्रं घालून कुणी असा संप्रदाय निर्माण नाही करु शकत. हे रसायन असं अनेकांना भुरळ कसं आणि का पाडत होतं, याचासुद्धा खरा अभ्यास पॉलिटीकल तज्ज्ञांनी करायला हरकत नाही. व्यक्तीश: बाळासाहेबांना नेमकं समजून घेणं कदाचित त्यांच्यासोबत सावलीसारखं असणाऱ्या शिवसैनिकांना वा त्यांच्या शत्रूंनादेखील कधी शक्य झालं असावं, असं मला वाटत नाही. बाळ केशव ठाकरे हा कॅनव्हास खरंच खूप 'व्हास्ट' आणि तितकाच रंजक होता तो त्यामुळंच.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या धगीतून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं पण मुंबई या राज्यात समाविष्ट करण्याबाबत अनेक कुभांडं रचली गेली होती. महाराष्ट्र हे राष्ट्रातील एक राज्य आणि या राज्यात मुंबईच्या समावेशावरुन झालेला बेबनाव असा तो काळ होता. केशव अर्थात प्रबोधनकार ठाकरेंचा वारसदार ते महाराष्ट्राचा तारणहार अशी अपेक्षा आणि आशा बाळ ठाकरे या व्यंगचित्रकारावर त्यांच्याच वडिलांनी जेव्हा सोपवली तेव्हा शिवसेना अस्तित्वात आली.
याच काळात भूमीपुत्र मराठी तरुणांना औद्योगिक मुंबईत नोकऱ्या मिळण्याची संधी असताना देखील डावलणारी एक यंत्रणा कार्यरत होती. मराठी सुशिक्षीत तरुण अपमानीत होत होता. मध्यमवर्गीय मराठी समाज दुखावला आणि गांजला गेला होता. हा समाज बाळ ठाकरे या व्यक्तीच्या मागे उभा राहिला. शिवसेना म्हणजे ठोकशाही आणि नंतर झोटींगशाही अशी जी अवस्था झाली ती का? हा प्रश्न बाळासाहेबांना विचारायचा राहून गेला.
त्या काळी दादर, परळ, लालबाग ही नावं घेतली तर अंगावर शहारा यायचा. मंतरलेले तरुण, भारावलेला नेता असा तो काळ, मराठी माणूस नावाची अस्मिता जन्माला आली होती. मार्मिक आणि नंतर क्वचित 'सामना'मधून ती पुढे आली.
मार्मिक ते सामना हासुध्दा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एक अभ्यास करण्य़ाजोगा काळ. मार्मिक बुद्धीवादी मराठी तरुण आणि मध्यमवर्गीय समाजाचा प्रवक्ता होता. तर सामनामध्ये संघटनेनंतरच्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या मुखपत्राचा ठसा होता. या सगळ्यांपासून बाळासाहेब लांब राहिले नाहीत. बाळासाहेब चालत राहिले. त्यांना कधी पश्चाताप झाल्याचं त्यांनी बोलून दाखवलं नाही.
मी व्यक्तीश: एक पत्रकार आणि एक राजकीय अभ्यासक म्हणून बाळासाहेबांना कधीच एका चष्म्यातून पाहु शकलो नाही. मी ज्या लिबरल, पुरोगामी, सेक्युलर विचारसरणीशी माझी बांधीलकी समजतो त्यात ते बसत नव्हते. पण तरीही बाळासाहेबांची भुरळ पत्रकारीता करताना मातोश्रीवर बाईटस घेताना असायचीच. तेव्हा झी न्यूजमध्ये आम्हाला म्हणजे टीव्ही पत्रकारांना ते दांडेकर म्हणत असत. अनेकांना ते 'पोटावळे' पत्रकार म्हणत. स्वत: पत्रकार असलेला हा माणूस लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असा नेहमीच कातावलेला का असायचा, हा प्रश्न त्यांना विचारायचा राहून गेला याची पत्रकार म्हणून रुखरुख आहे. बाळासाहेबांना असे अनेक थेट प्रश्न अलिकडच्या काळात विचारायचे राहून गेले.
खरं तर बाळासाहेबांबाबत आम्ही ठाणे जिल्ह्यात, कल्याणसारख्या ठिकाणी जन्मलेली माणसं नेहमीच 'भावुक' वा 'बायस' असायचो. आम्ही लहानपणापासून शिवसेना कल्याणच्या दुधनाका परिसरात पाहिली आणि ठाण्यातही अत्यंत जवळून पाहिली. नातेसंबंधीत आणि मित्रपरिवार सगळाच शिवसेनेचा गोतावळा. मुंबईनंतर याच ठाणे जिल्ह्यात शिवसेना रुजली, वडापावच्या गाड्या सत्तेत असताना झुणकाभाकरची केंद्रं आली आणि गल्लीमध्ये उभी असलेली किल्यासारखी शिवसेना शाखा, सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले फळे, शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेच्याच अॅम्ब्युलन्स, हे असे महानगराच्या कोंडीत घुसमटलेल्या मराठी माणसाला आधार देणारे कोपरे आम्ही पाहिले.
झपाटलेली शिवसैनिकांची फौज पाहिली. आनंद दिघेंसारखा त्यांचा तितकाच झपाटलेला नेता पाहिला. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उठलेला हिंसाचार आणि सैरभैर झालेले शिवसैनिक पाहिले. शिवसेनेच्या अस्तित्वाचा भाग असलेला ठोकशाहीचा उग्र चेहरा पाहिला. १९९३च्या दंगलींमध्ये हिंदु-मुस्लिमांमधली माणुसकीला लाजवेल अशी परिस्थिती पाहिली. मायकल जॅक्सनचा शो पाहिला. दिल्लीत फिरोजशहा कोटलाची उखडलेली खेळपट्टी पाहिली. छगन भुजबळ, रमेश प्रभू, गणेश नाईक, सतीश प्रधान, नारायण राणे, राज ठाकरे हे सगळे शिवसेना सोडताना पाहिले. राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्ष होताना पाहिले. या आणि अशा अनेक घटना....
१९९६पासून बाळासाहेबांना या ना त्या निमित्तानं जवळून पाहिलं. बाळासाहेबांचा बॉलीवुडमधला गोतावळा पाहिला. दिलीप कुमार, सुनील दत्त, अमिताभ ते सलमान खान आणि संजय दत्त यांच्याशी असलेला घरोबा पाहिला. बाबासाहेब पुरंदरे असोत की लता मंगेशकर, बाळासाहेबांचा चेहरा, व्यक्तिमत्व हे प्रत्येकासाठी वेगळं होतं.
बाळासाहेबांचा चेहरा आणि स्वभाव त्यामुळंच सतत बदलत राहिला. भूमिका घ्यायची तर त्याच्या बाबतची त्यांनी कधी तमा बाळगली नाही. काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटलांना मराठी म्हणून पाठिंबा देणं असो की राज्यासमोर अनेक अमराठी माणसांना खासदार करणं असो, बाळासाहेबांचा आदेश आला की पुढे काहीच चर्चा नसायची. मराठी भाषा ते हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेबांच्या मागे शिवसैनिक आणि शिवसैनिक नसलेले त्यांचे चाहते कधीही कमी झाले नाहीत.
श्रीकांत ठाकरे, मीनाताई ठाकरे , बिंदुमाधव ठाकरे यांच्या जाण्यानं बाळासाहेब आधीच विद्ध झाले होते. पण बाळासाहेबच्या ठाकरे कुटुंबाच्या पलिकडे त्यांचं एक कुटुंब होतं. असंख्य शिवसैनिक हे त्यांचं हे एक टॉनिक होतं. बाळासाहेब यांचं असं प्रत्येकाशी नातं होतं. त्या नात्याला नाव नव्हतं.
शिवसेना भाजप युती हा बाळासाहेबांच्या आयुष्यातला राजकीय कात्रज घाट होता, असं मला नेहमीच वाटतं. प्रमोद महाजनांच्या सोबत या युतीनं बाळासाहेबांना ९३च्या दंगलीनंतर हिंदुहृदयसम्राट या टप्प्यावर आणून ठेवलं.
कर्मकांडाच्या, थोतांडाच्या विरोधात शड्डू थोपटलेल्या प्रबोधनकारांचा वारसदार हिंदुहृदयसम्राट झाला. शिवसेनाप्रमुख या कॅनव्हासवर खूप काळ रेंगाळले अन्यथा चित्र वेगळं असतं.
या सगळ्याच्या पलिकडे जाऊनसुद्धा बाळासाहेब यांच्याबद्दल लिहिणं बोलणं प्रश्न विचारणं राहून जातं. व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख हा प्रवास म्हणूनच नुसता एका पक्षप्रमुखाचा जीवनप्रवास उरत नाही. त्यांच्याशी वैचारीक मतभेद असलेल्यांच्या हृद्याचेसुद्धा ते सम्राट असायचे. हाच काय तो बाळासाहेबांचा मोठेपणा आहे, असं मला वाटतं. म्हणूनच एक झंझावात शमला असला तरीही बाळासाहेब, तुमचा संप्रदाय अजून तुमच्या आठवणी काढत तसाच या महाराष्ट्रात आणि जगभरात जिवंत असणार आहे.
Comments (12)
-
-
Guest (संजय शेंडे)
सर फारच सुन्दर विश्लेषण.....
-
Guest (Sanjay Savarkar)
डिअर मंदार,
छान लेख . धन्यवाद. -
Guest (vijay waghmare)
superrrrrr
-
Guest (umesh Itraj)
Nostalgic...