जागर पाण्याचा

यशवंत यादव, सोलापूर
दुष्काळावर मात करण्यासाठी नाना प्रयत्न सुरू आहेत. पण या टंचाईवर मात करू शकणारं अफलातून उत्तर शोधलं गेलंय, सोलापुरातल्या अंकोलीच्या माळरानावर. इथं चक्क पाण्याची बँक उभी राहिलीय. या वॉटर बॅंकेचे निर्माते आहेत, प्रा. अरुण देशपांडे नावाचे शेती शास्त्रज्ञ. त्यांच्या या प्रयत्नाची दखल आता सरकारनंही दखल घेतलीय. माळावरच्या या वॉटर बँकेला पर्यटन केंद्राचा दर्जा मिळालाय.
 
प्रवीण मनोहर, अमरावती
मेळघाटाच्या भाळी कुपोषण पाचविला पुजलंय. दारिद्र्य, शिक्षण याबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव त्याला कारणीभूत आहे. वीज नाही म्हणून इथल्या आदिवासी पाड्यांना शुद्ध पाणीपुरवठा करता येत नाही. त्यावर आता प्रशासनानं सौरऊर्जेची मात्रा लागू केलीय. यामुळं जवळपास पन्नासहून अधिक पाड्यांना नळानं शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागलाय. दारात पाणी आल्यानं आदिवासींच्या जगण्याचे संदर्भच बदलले असून, महिलांना मुलाबाळांकडं लक्ष द्यायला वेळ मिळतोय.
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
मराठवाड्यात पसरलेल्या दुष्काळाची झळ आता राज्यभरात चांगलीच जाणवायला लागलीय. दुष्काळामुळं मोसंबीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फळबागांना कुऱ्हाड लावण्याची वेळ आली. पण जिद्द असेल तर काय होऊ शकतं हे औरंगाबादच्या पैठणमधील एका शेतकऱ्यानं आपल्या उदाहरणानं दाखवून दिलंय.
 
शशिकांत कोरे, पुसेगाव,सातारा
दुष्काळी भागातील यात्रा म्हणजे पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव. इथल्या रथोत्सवात येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दहा, शंभर, पाचशे रुपयांचे हार अर्पण करत असतात. लोकांनी सढळ हातानं दिलेल्या या पैशांचा काळजीपूर्वक वापर करून इथल्या देवस्थान ट्रस्टनं जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्यात. याचा फायदा इथल्या भागातील लोकांना होतोय.
 
शशिकांत कोरे, सातारा
सातारा - दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून पाणी कुठून आणायचं, या चिंतेनं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालंय. अशा परिस्थितीत खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पुसेगावला भरणाऱ्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेत ट्रस्टनं सुमारे 50 हजारांहून अधिक जनावरं आणि लाखो भक्तांना नियोजनबद्धरीत्या व्यवस्थित पाणीपुरवठा केला. याकामी गावकऱ्यांनीही मोलाची साथ दिली. राज्यात भरणाऱ्या मोठमोठ्या यात्रांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी हा सेवागिरी पॅटर्न उपयोगी ठरणार आहे.
 
राहुल विळदकर, अहमदनगर
पिवळं पडत चाललेलं ज्वारीचं पीक माना टाकायला लागलंय, सुकाटा-फुफाट्यानं तडकून जमिनीवरच्या भेगांची भगदाडं झालीत, ऐन थंडीत काहिली चाललेली. अशा उजाडवेळी नगर तालुक्यातल्या डोंगरगणचा एक बहाद्दर सीताफळ, डाळिंबाच्या बागा फुलवतोय, एवढंच नव्हे जरबेरासाठी पॉलीहाऊस बांधतोय. स्वप्नवत वाटावी अशी ही गोष्ट साकारलीय दूरदृष्टीनं उभारलेल्या शेततळ्यामुळं...
 
अविनाश पवार, पुणे
शिवनेरी गडावरील टाक्यांना पाणी आहे, तर जवळच सह्याद्रीच्या रांगेत राहणाऱ्या आदिवासींची पाण्यासाठी परवड का, या प्रश्नाचा ध्यास तहसीलदारांनी घेतला. राबून प्रामाणिकपणं काम केलं. त्यांनी कातळात खोदलेली 10 टाकं आज पाण्यानं भरल्यानं इथल्या आदिवासींचं जीवनही भरून पावलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर खडकालासुद्धा पाझर फुटून पाणी उपलब्ध होऊ शकतं, याचं हे उदाहरण.
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
पावसाच्या लहरी स्वभावामुळं शेती करणं दुरापास्त झालं होतं. शेतीत गुंतवलेल्या पैशाचीसुद्धा परतफेड होत नव्हती. सातत्यानं येणाऱ्या तोट्यामुळं शेतीची भिस्त ही पाण्यावरच असल्याचं पांडुरंग इनामे यांना लक्षात आलं. त्यांनी मग बॅंकेत पैसा साठवण्यापेक्षा पाण्याची बॅंकच तयार करण्याचा निर्णय घेतला. इनामे यांनी पाण्याची बॅंक कशी निर्माण केली ते पाहूया...
 
शशिकांत कोरे, सातारा
सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? याची उत्तरं वेगवेगळी मिळतील. पण पाण्यापेक्षा मोठं दान असूच शकत नाही, असा संदेश महात्मा जोतिराव फुले यांनी दिला होता. घरातला पाण्याचा हौद जनतेसाठी खुला केला होता. जोतिरावांचा हाच वारसा चालवतंय साताऱ्याजवळील वनवासवाडी इथलं लोखंडे कुटुंबीय. दुष्काळी जनतेला हे कुटुंब लाखो लिटर पाण्याचं दान करतंय.
 
राहुल विळदकर, अहमदनगर
सौर ऊर्जेच्या मदतीनं चक्क मोटरनं उचललं जातं बोअरमधून पाणी, हापसायची गरजच नाही. मुलं शाळेच्या बागेत सी-सॉ खेळताना करतात पाढे पाठ आणि आपसूक पाण्याच्या टाकीत भरलं जातं पाणी. ही जादू नाही किंवा स्वप्नरंजनही नाही, ही किमया घडवलीय, आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारच्या आदर्श जिल्हा परिषद शाळेनं...