स्वातंत्र्य का नासले?

नियतीची गाठभेट भाग-1

शरद जोशी
भारतातील इंग्रजी राज्य अधिकृतरीत्या 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात आले. आता पन्नास वर्षे झाली. भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून ते देशभर साजरे केले जात आहे. दीड शतकाच्या राजकीय दास्यानंतर भारतात स्वातंत्र्याची पहाट उगवली आणि शेकडो वर्षांच्या महानिद्रेतून देश जागा झाला. आपल्या नियतीचा अधिकारी बनला. सगळा देश दारिद्र्य, भूकमार, रोगराई, निरक्षरता, अडाणीपणा, धर्मभेद, जातिवाद, यांनी ग्रासून टाकलेला. परकीयांच्या हातातील सत्ता स्वकीयांच्या हाती आली, आता शतकानुशतकांच्या या समस्या सहज दूर होतील, अशी सर्व भारतीयांची भावना होती.

sharadjoshi121997 साली, म्हणजे पन्नास वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर देशात काय परिस्थिती असेल असे 1947 साली कोण्या नागरिकास विचारले असते तर त्याने 'स्वतंत्र भारत पन्नास वर्षांत सर्व राष्ट्रांच्या शिखरावर आरूढ झालेला असेल,' असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले असते. 'विश्वविजय कर के दिखलाएंगे तब होवे प्रण पूर्ण हमारा' या झेंडागीतात सर्व देशवासीयांची अपेक्षा व्यक्त होत होती.


जुन्या कायदे मंडळाच्या सभागृहात पंतप्रधान म्हणून शपथ घेताना मन हलवणाऱ्या इंग्रजीत पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, “महानिद्रेच्या कालखंडातून भारत जागा होतो आहे. आपल्या 'नियतीशी गाठ' साधण्याची संधी शतकांच्या गुलामगिरीनंतर देशापुढे चालून येत आहे.”

अभद्र भाकिते
त्या वेळच्या या सगळ्या आशांशी विसंगत सूर काढणारे भारतीय त्या काळीही काही थोडे नव्हते.
'अरे, राज्य करावे इंग्रजांनीच. हे नेहरू आणि पटेल, यांना कसले राज्य चालविता येणार? सगळ्या देशात अंदाधुंदी, अराजकता माजेल आणि सगळा बट्ट्याबोळ करुन टाकतील,' हे किंवा अशा प्रकारचे उद्गार काढणारे लोक सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले; रावसाहेब रावबहादुरीच्या ताठ्यात असलेले, आपले राज्य संपले त्यामुळे बोटे मोडीत आहेत, असेच सगळे जण मानत आणि त्याकडे दु्र्लक्ष करत.

इंग्लंडचे युध्दकाळातील पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल हे मुळातच साम्राज्यातील वसाहतींना स्वातंत्र्य देण्याच्या विरुध्द होते. 'इंग्रजी साम्राज्याची वासलात लावण्याकरिता मी बादशहाचा पंतप्रधान झालेलो नाही,' अशी त्यांची दर्पोक्ती होती. साम्राज्यातील वसाहती इंग्रज येण्यापूर्वी मुळी राष्ट्रे नव्हतीच. समाजातील दांडग्यांनी दुर्बलांचे मनसोक्त शोषण करायचे अशी परस्थिती. जातिभेद, अस्पृश्यता, बालविवाह, सती असल्या रानवट चालीरीती असलेल्या भारतात इंग्रज काही संस्कृती आणत आहेत. इंग्रजी साम्राज्य म्हणजे वसाहतीतील कोट्यवधी दीनदुबळ्या, दारिद्र्याने गांजलेल्या लोकांना ईश्वरी कृपेने मिळालेले अतर्क्य वरदान आहे अशी त्यांची निष्ठा होती. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी त्यांनी अशुभ उद्गार काढावे हे समजण्यासारखे होते.

“भारतातील बहुतेक रयत इंग्रजी साम्राज्यात सुखी आहे; तिला स्वातंत्र्य नको आहे; स्वातंत्र्याची मागणी करणारे मूठभर पुढारी स्वार्थापोटी आणि सत्तेच्या लालसेने दंगेधोपे माजविणारे फालतू लोक आहेत. त्यांच्या हाती सत्ता दिल्यास ते देशातील दीन-दुबळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतील. जातिधर्माच्या नावावर दंगे माजतील. रक्ताचे पाट वाहतील. भारतीयांवर दया करा आणि तेथील इंग्रजी सत्ता संपवू नका,” अशी मागणी चर्चिल यांनी केली. पण साम्राज्याच्या विसर्जनाच्या आणि वसाहतींच्या स्वातंत्र्याच्या जल्लोषात त्यांच्या अभद्र वाणीकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही.

अपघाती स्वातंत्र्य  

भारताच्या सीमेवर धडका देणाऱ्या जपानी फौजांना शरणागती स्वीकारावी लागली. पण त्यांच्याशी झुंज देता देता इंग्रजी साम्राज्याचा सिंहही थकून भागून गेला होता. पृथ्वीच्या पाठीवर ज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे इंग्रजी साम्राज्य आता सांभाळणे शक्य नव्हते. हिंदुस्थानसारख्या देशात तसंच सैन्यातही असंतोष होता. नौदलाचे खलाशी तर बंड करून उठले होते. अशा परिस्थितीत भारतावर सत्ता चालवायची म्हणजे महायुद्धाच्याच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हे स्पष्ट होते. यासाठी केवळ पैसा आणि साधनसंपत्तीच नाही तर रक्ताची किंमत द्यावी लागेल हे स्पष्ट होते.

दोन-पाच हजार इंग्रजांनी स्थानिक अधिकारी आणि फौज यांचा उपयोग करून दीडशे वर्षे हिंदुस्थानवर राज्य चालवले, तसे यापुढे शक्य नाही. आता स्थानिक जनतेचा पाठिंबा जवळजवळ राहणार नाही. दिल्लीपासून ते गावापर्यंत सत्ता चालविण्यासाठी इंग्लंडचे सारे लोक तेथे नेऊन बसविले असते तरी साम्राज्य टिकवणे शक्य नाही. जे काही काळ टिकवता येईल त्यासाठी घाम, अश्रू आणि रक्त यांची दुसऱ्या महायुध्दातील काळापेक्षाही जबरदस्त किेंमत द्यावी लागेल आणि असा संघर्ष झाला तर दोस्त राष्ट्रात आणि संयुक्त राष्ट्रसंघात स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणून बसणे इंग्रजांना अशक्य होईल. अशा परिस्थितीत वसाहतींना, विशेषतः भारताला स्वातंत्र्य देणे अपरिहार्य होते. महायुध्दातील जखमी सिंह महात्माजींनी जागे केलेल्या प्रजेला ताब्यात ठेवू शकत नव्हता.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.