स्वातंत्र्य का नासले?

नियतीची गाठभेट भाग- 2

शरद जोशी
इंग्रजांचे राज्य संपल्याला आता पन्नास वर्षे झाली. नियतीला दिलेल्या वचनाची गोष्ट दूरच राहिली, सर्व जगात सर्वोच्च स्थानी आरूढ होण्याची स्वप्ने कधी साकारणे शक्यच नव्हते, उलट गरिबीचा प्रश्न सुटला नाही, निरक्षरांची संख्या वाढली, महागाई, बेकारी यांनी थैमान घातले. नोकरशाही, काळाबाजार करणारे, तस्कर, गुन्हेगार यांचा अंमल चालू झाला. गुंड नेत्यांना हाती धरू लागले आणि  नंतर नेत्यांना दूर करून स्वत:च राजकारणाच्या आखाड्यात उतरले.

Shri Sharad Joshi111विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या परदेशी झालेल्या प्रगतीमुळे देश निदान पोटापुरते अन्न पिकवू लागला. देवी, कॉलरा, मलेरिया,  प्लेग अशा साथींच्या रोगांचे उच्चाटन झाल्यामुळे जीवनमान वाढले. मोठमोठ्या शहरात कारखानदारी वाढली. पण इंग्रज राहिले असते तरी ती कारखानदारी उभी राहिली नसती, असे काही नाही. जगाच्या तुलनेत हिंदुस्थान स्वातंत्र्यानंतर पुढे प्रगती करून गेला नाहीच, उलट त्याची अधोगतीच झाली. पन्नास वर्षांपूर्वी भारताच्या तुलनेने मागासलेले इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड यांसारखे देश भारताच्या कितीतरी पुढे निघून गेले.  

यासाठी जडजंबाल आकडेवारी दाखविण्याची काही गरज नाही. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दरडोई उत्पन्न रु. 250पेक्षा कमी होते. आता हा आकडा रु. 12000च्या आसपास आहे. 47 सालच्या रुपयाच्या तुलनेत आजचा रुपया त्यावेळच्या तीन पैशांच्या बरोबर आहे, हे लक्षात घेतले तर 50 वर्षांच्या काळात दरडोई उत्पादनात वाढ रु. 250पासून 400 रु.पर्यंतच झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार रुपयांची क्रयशक्ती बघायची झाली तर अमेरिकेत 1348 डॉलर देऊन जेवढे काही विकत घेता येईल तेवढेच आजच्या दरडोई रु. 12000च्या मिळकतीत खरीदता येईल. बांगलादेश (1331) आपल्या काही फार मागे नाही.
 
पाकिस्तान (2154) आपल्या बऱ्याच पुढे आहे. बऱ्याच म्हणजे 60 टक्क्याने पुढे आहे. चीन (2604), श्रीलंका (3277), थायलंड (7104), मलेशिया (8865), कोरिया (10656), सिंगापूर (20987), हे सारे 50 वर्षांपूर्वी हिंदुस्थानच्या तुलनेत मागास असलेले देश पुढे निघून गेले आहेत. युध्दात हरलेल्या देशांपैकी जपानचे दरडोई राष्ट्रीय उत्पादन (211581) पर्यंत भिडले आहे. जर्मनी (19675) आणि इटली (19363) अशी नेत्रदीपक वाटचाल करून गेले आहेत.

काळ्या ढगांच्या रुपेरी कडा
प्रगती कोठे काही झालीच नाही असे नाही. आयुष्यमान जवळजवळ दुपटीने वाढले. स्वातंत्र्य आले तेव्हा देश दुष्काळाच्या जबड्यात होता. तो अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. ईशान्य सरहद्दीवरील काही हजार चौरस मैलांचा प्रदेश आणि पाकिस्तानने आक्रमण करून व्यापलेला काश्मीरचा भाग सोडल्यास इंग्रजांकडून विरासतीत मिळालेला प्रदेश सगळा संघराज्यात टिकला आहे. नियमितपणे निवडणुका होतात. लष्कराने बंडाळी करून कोणी सैनिकाने हुकूमशहा देशावर लादण्याचा प्रयत्नही केला नाही. इंदिराबाईंनी लादलेला आणीबाणीचा काळ सोडला तर प्रातिनिधिक लोकशाही अजून तरी मोडून पडलेली नाही.
   
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळाशी तुलना केली तर आणखीही काही चांगल्या गोष्टींचा उल्लेख करता येईल. गावागावात शाळा झाल्या, निरक्षरतेची टक्केवारी घटली हे खरे. शहरातील उच्च शिक्षणाच्या सोयी आणि संधी वाढल्या हेही खरे, पण त्याबरोबर एकूण निरक्षरांची संख्या कित्येक पटीने वाढली. गावोगावी रस्ते झाले. ए. टी. झाली, टपाल कचेऱ्या झाल्या, पण ग्रामीण भागाचे दारिद्र्य काही संपले नाही.

हजारोंच्या संख्येने निर्वासित खेड्याकडून शहराकडे लोंढ्याने वाहत जातात. मुंबई, दिल्लीसारखी शहरे अफाट फुगली, जिल्ह्याजिल्ह्याची शहरे पसरत चालली. पूर्वी गरीबगुरीब शहरात गेले म्हणजे पत्र्याच्या किंवा सिमेंटच्या चाळीत राहत. आता ते झोपडपट्ट्यांत, गलिच्छ वस्त्यांत, किंवा फुटपाथवर राहू लागले. थोडक्यात, गेल्या 50 वर्षांचा इतिहास अभिमानाने सांगावा अशा गोष्टींनी भरलेला नाही.

स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या प्रेरणेने देशाने समाजवादाची कास धरली. समाजवादी व्यवस्थेचाच नव्हे तर, विचारपध्दतीचाही जगभर पाडाव झाला. खुल्या व्यवस्थेची काही चर्चा झाली, पण ती थोडक्यात खुंटली. आता कोणत्या दिशेने पुढे वाटचाल करायची आहे हे सांगण्याच्या कुवतीचे देशात कुणीच राहिले नाही. स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षी देश कधी नव्हे इतका भांबावलेल्या मन:स्थितीत, कधी नव्हे इतका आर्थिक संकटात दरीवर उभा आहे.


Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.