स्वातंत्र्य का नासले?

नमनाचे पळीभर तेल

शरद जोशी
स्वातंत्र्यानंतर काय होईल, याची सारी रम्य स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. देशाचा अधःपात अजूनही चालूच आहे. यावेळी सर्व अहंकार, पक्ष, व्यक्तिपूजा सोडून 'चुकले काय?' आणि 'यापुढे कोणता मार्ग धरावा?' याचा विचार कोणास महत्त्वाचा वाटत नाही. नवीन पिढीत कोणा तरुणाच्या मनात भगतसिंग, बाबू गेनू, सुभाषचंद्र बोस यांच्या मनातील चेतना जागृत झाली तर त्या वातीस थोडा आधार मिळावा यासाठी 'स्वातंत्र्य का नासले?' या लेखमालेचा तेल म्हणून तरी उपयोग व्हावा, एवढीच अपेक्षा....


SHARAD JOSHI'स्वातंत्र्य का नासले?' या लेखमालेत स्वराज्य आंदोलनातील वेगवेगळ्या प्रवाहांसंबंधी एक नवीन उपपत्ती आणि मांडणी करण्यात आली आहे. काँग्रेस ही मूळची शहरी, पाश्चिमात्य विचारसरणी आणि जीवनशैली यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्यांची आघाडी, गांधीजींनी तिला अध्यात्म आणि सर्वोदय यांचा मुलामा दिला आणि सत्याग्रहाचे हत्यार दिले. मुसलमान सोडल्यास बाकीच्या राष्ट्राची काँग्रेसप्रणीत आंदोलनास मान्यता मिळाली.

स्वातंत्र्य मिळाले, सारी सत्ता पाश्चिमात्य प्रभावाखाली सवर्णांकडे गेली. त्यांनी 'भटशाही' समाजवाद तयार केला. 40 वर्षे समाजवादाचा उद्घोष झाला. नंतर समाजवादापेक्षा खुल्या व्यवस्थेतून उच्चवर्णीयांचे भले अधिक होण्याची संभावना दिसू लागली. तेव्हा अप्रतिहत व्यवस्थेचा पुरस्कार सुरू झाला. पण, उच्चवर्णीयांत उद्योजकत्वाची धडाडी दाखविण्याची कुवत नाही हे स्पष्ट झाले. स्पर्धेसाठी समतल मैदान असण्याची भाषा सुरू झाली. नोकरशहा, कामगार, गुंड आणि पुढारी एकत्र झाले आणि पुन्हा एकदा सरकारशाहीच्याच मार्गाने जाण्याचा कार्यक्रम बनत आहे.

भाजप, शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या साऱ्या हिंदुत्ववादी चळवळींचा वारसा इंग्रज आल्यावर ज्यांच्या हातून सत्ता गेली अशा हिंदू सवर्ण माजी सत्ताधाऱ्यांपासून होता. गांधींच्या खुनानंतर हिंदू राष्ट्रवाद संपुष्टात आला, असे वाटत होते. शेजारील पाकिस्तानची हिंदुस्तानशी विद्वेष जळत ठेवण्याची राजकीय गरज, कश्मीरचे जळते प्रकरण आणि हिंदुस्थानातील मुसलमान नेत्यांनी मुसलमान समाजाच्या दारुण आर्थिक समस्यांची हेळसांड करून सामाजिक, धार्मिक समस्यांना दिलेले महत्त्व यामुळे या साऱ्या विचारसरणीचे पुनरुज्जीवन झाले आहे. हिंदुत्ववाद्यांतील स्वदेशी तत्त्वांनी सध्या माघार घेतलेली दिसत असली तरी ते पुन्हा डोके वर काढतील आणि स्वदेशी, राष्ट्रवाद, हिंदुत्व अशा नावांखाली सरकारशाहीच मजबूत करून पाहतील.
    
काँग्रेसी प्रवाही समाजवादाच्या नावाखाली सरकारशाही चालू ठेवू इच्छितो आणि हिंदुत्ववादी प्रवाह धर्मराष्ट्रवादाच्या नावाखाली, एवढाच काय तो फरक आहे.
 
बहुजन समाजाच्या नेतृत्वाची स्वातंत्र्याआधीच ससेहोलपट झाली होती. फैजपूर काँग्रेसपर्यंत एक मोठा भाग काँग्रेसमध्ये सामील झाला होता. स्वातंत्र्यानंतर आंबेडकरी प्रवाह सत्तेच्या जवळ गेला, तेथूनही दूर झाला. बौध्द धर्म स्वीकारण्याच्या कार्यक्रमाने ब्राह्मण कर्मकांडासमांतर बुध्द कर्मकांडाचे स्तोम माजले. निवडणुका आणि नोकऱ्या यांतील राखीव जागांमुळे मागासवर्गीयांत एक सुखवस्तूंचा थर तयार झाला. दलितांच्या दुःखाच्या गोष्टी बोलाव्यात आणि दलित सुखवस्तूंच्या अर्थसाधनाचे आणि सत्तासंपादनाचे राजकारण करावे यासाठी मोठा हैदोस सुरू आहे.

स्वतःच्या कष्टाने भाकरी कमावून सन्मानाने जगू पाहणाऱ्या बहुजन समाजाचे सार्वजनिक जीवनात काही स्थान राहिलेले नाही. केवळ मागासवर्गीयांच्या आंदोलनात हे घडले, असे नाही; आदिवासी, मुसलमान, महिला, शेतकरी या साऱ्याच शोषित वर्गीयांच्या आंदोलनाचे पानिपत झाले आहे. सवर्णांनी बाजी मारली आहे, बहुजन समाज आणि राष्ट्र यांना फरफटत फरफटत ते सरकारशाहीकडे आणि आर्थिक संकटाच्या खाईकडे घेऊन जात आहेत.
    
हे काय घडले तरी काय? आणि पुढे आणखी काय भीषण भवितव्य वाढून ठेवले आहे? याचा सारासार विचारही अशक्य झाला आहे. स्वातंत्र्यानंतर काय होईल याची सारी रम्य स्वप्ने धुळीस मिळाली. देशाचा अधःपात अजूनही चालूच आहे. यावेळी सर्व अहंकार, पक्ष, व्यक्तिपूजा सोडून 'चुकले काय?' आणि 'यापुढे कोणता मार्ग धरावा?' याचा विचार कोणास महत्त्वाचा वाटत नाही. नवीन पिढीत कोणा तरुणाच्या मनात भगतसिंग, बाबू गेनू, सुभाषचंद्र बोस यांच्या मनातील चेतना जागृत झाली तर त्या वातीस थोडा आधार मिळावा यासाठी 'स्वातंत्र्य का नासले?' या लेखमालेचा तेल म्हणून तरी उपयोग व्हावा, एवढीच अपेक्षा.

(मा. शरद जोशी यांनी 1998 साली लिहिलेल्या 'स्वातंत्र्य का नासले?' या पुस्तिकेतून साभार)


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.