स्वातंत्र्य का नासले?

आत्मपरीक्षण आणि आत्मवंचना भाग-1

शरद जोशी
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली, समित्या नेमल्या गेल्या आणि खुद्द सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान झालेलेही स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याबद्दल गोंधळलेल्या व्दिधा मन:स्थितीत होते. पन्नास वर्षे झाली, प्रसंग साजरा करायला.  पण नेमके काय करायचे हे कुणीच सांगू शकत नव्हते. आनंद साजरा करणे हा महोत्सवाचा एक हेतू, पण त्याचबरोबर पन्नास वर्षांच्या या स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय मिळवले यापेक्षा भारताची पीछेहाट का झाली, स्वप्ने अपुरी का राहिली याचा विचार अंतर्मुख होऊन करण्याची आवश्यकता आहे. असा सगळ्यांचा सूर होता.

sharad19 ऑगस्ट 1997 रोजी महोत्सवाची सुरुवात मुंबईच्या ऐतिहासिक गोवालिया टॅंक मैदानावर करण्यात आली. 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री संसद भवनात मोठा सभारंभ करण्यात आला. वर्षभर काही ना काही कार्यक्रम चालू राहणार आहेत. वर्तमानपत्रे आणि प्रसारमाध्यमे हे समारंभ प्रचंड उत्साहाने साजरे होत असल्याचे डिंडिम वाजवित राहणार आहेत. उत्सवाला सुरुवात होऊन अजून महिनाही झाला नाही, पण सगळ्यांना कळून चुकले आहे की, हे सारे सोंग आहे. आम भारतीयाचे मन उत्साहाने उचंबळून आलेले नाही.  

       
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी झाल्याचे दु:ख होते. लक्षावधी निर्वासितांचे लोंढे देशाकडे येत होते. जातीय दंगलीतील क्रौर्यकथा मनाचा थरकाप करत होत्या. खुद्द महात्मा गांधी स्वातंत्र्य दिनाच्या
जल्लोषापासून दूर, नौखालीच्या दंगलग्रस्त प्रदेशात वणवण फिरत होते आणि तरीही, मुसळधार पावसाची
तमा न करता कोट्यवधी नागरिक नव्या स्वातंत्र्याच्या स्वागताच्या आनंदात धुंद होऊन हर्षोल्हासात नाचत होते.
     

पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या उत्साहाचा लवलेशही यंदाच्या सुवर्णमहोत्सवात दिसत नाही. पहिल्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा जनतेने केला. पन्नासाव्या स्वातंत्र्याचा उत्सव सारा सरकारी मामला आहे.  

 

जितके वैद्य तितकी निदाने
हे असे का झाले?  स्वातंत्र्य का नासले? याचा ऊहापोह होत नाही असे नाही. स्वातंत्र्यानंतर आलेल्या सत्तेचा लाभ ज्यांना मिळाला नाही, अशी मंडळी अमुक करायला पाहिजे होते, तमुक व्हायला पाहिजे होते, असे सांगत आहेत. कोणी म्हणतो लोकसंख्या आटोक्याबाहेर गेली म्हणून असे झाले.  कोणी म्हणतो भ्रष्टाचार माजला, कोणी म्हणतो आपल्यात राष्ट्रप्रेमच नाही, देशाकरिता त्याग करण्याची तयारीच नाही म्हणून का नासले.

 

देशात लोकशाही आणली हीच चूक झाली, आमच्या लोकांना हुकूमशाहीच सोसते, प्रौढ मतदानानेच सगळे  
वाटोळे केले; तर भाषावार प्रांतरचनेमुळे देश दुभंगला असा सूर कोणी धरतो. आमच्या पूर्वापारच्या परंपरा विसरलो, पश्चिमी देशांच्या निधार्मिकता, लोकतंत्र असल्या संकल्पना मानू लागलो. म्हणूनच देशाचा अध:पात झाला असा काहींचा कोलाहल आहे. कोणी म्हणतो शाळा काढा; कोणी म्हणतो गरिबांचे भले करा, विषमता दूर करा, असा चारी बाजूला गोंगाट चालू आहे. जो तो शहाणपणाच सांगतो आहे.

 

पन्नास वर्षांत बहुतेक काळ ज्यांनी सत्ता गाजविली ते काँग्रेसवाले 'आमच्या हातात सत्ता होती तोपर्यंत
ठीक होते,' असा कांगावा करीत आहेत. काँग्रेस राज्यात नेहरू, गांधी घराण्याला राजवटीत आखलेल्या धोरणांमुळे देशाचे वाटोळे झाले हे ते आपल्या तोंडाने थोडेच कबूल करणार आहेत?  'नेहरूंनी केले ते त्याकाळी योग्यच होते.  समाजवाद, नियोजन याखेरीज त्यावेळी देशाला आता आर्थिक पर्यायच नव्हता. त्याच दिशेने पुढे जाण्यासाठी देश स्वावलंबी, सशक्त बनविण्यासाठी आता आर्थिक सुधारणा आणल्या जात आहेत.' अशा तऱ्हेने त्यांचा युक्तिवाद त्यांना स्वत:लाही पटत नाही, इतरांना समजविण्याचा प्रश्नच नाही.  

 

डावे पक्ष आणि जातीयवादी यांनी एक मोठी विचित्र आघाडी बांधली आहे. एकेकाळी समाजवादाच्या नावाखाली नेहरू ज्या धोरणांचा पाठपुरावा आणि समर्थन करीत त्याच धोरणांचा पुरस्कार एकेकाळी नेहरूंना विरोध करणारी ही मंडळी आता करत आहेत. कोणी जातीच्या नावाखाली, कोणी धर्माच्या  नावाखाली, या बुडत्या घराचे काही वासे आणि विटा आपल्याला लाटता येतील का, अशा चिंतेत आहेत.

 

लोकसभेची खास बैठक        
संसदेचे खास आत्मपरीक्षणाकरिता सत्र आता संपले आहे आणि एक भयाण, दारुण सत्य सर्व जनतेपुढे आले आहे. पण देशाला नवी दिशा दाखवणारे नेतृत्व संसदेच्या सभागृहात येण्याची तिळमात्रही शक्यता नाही.

 

पन्नास वर्षांच्या अवधीत मिळालेल्या स्वातंत्र्याचे वाटोळे केलेला हा देश!  हे असे का झाले आणि यापुढे कोणता वेगळा मार्ग स्वीकारायला पाहिजे यासंबंधी चर्चा करण्याचे भाग्य 550 च्या वर खासदारांना लाभले. चर्चेच्या बहुतेक काळात बहुसंख्य खासदार कॅंटीनमध्ये होते. सभागृहात गणती फक्त पन्नास-शंभरची राहिली. जे बोलले त्यांची इच्छा काहीतरी जबरदस्त, भारदस्त, ऐतिहासिक बोलण्याची होती, पण काय बोलावे याची पंचाईत. शाळकरी मुलांना स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांविषयी निबंध लिहून आणायला सांगितले असते तरी ते खासदारांच्या वक्तव्यांपेक्षाही उजवे झाले असते. भारताच्या अर्थव्यवस्थेवरील कोणत्याही क्रमिक पुस्तकात सहज उपलब्ध होणारी, शेकडो वेळा वापरून गुळगुळीत झालेली आकडेवारी, माहिती आणि आपण काही भलेमोठे सांगत आहोत असा आवेश आणि दंभ! लोकसभेतील सर्व चर्चा अशी उथळ आणि हास्यास्पद झाली.

 

नाव आत्मचिंतनाचे आणि प्रत्यक्षात सगळा बकवास आपल्या आपल्या जुनाट कार्यक्रमांचा आणि पुढे निवडणुका नजरेसमोर ठेवून केलेल्या स्वस्त घोषणाबाजीची अशी स्थिती. कोणी आपल्या मनातील आदर्श हिंदुस्थानच्या स्वप्नांची रसभरीत वर्णने केली, कोणी स्वातंत्र्य मिळूनही आपल्या समाजाला कसा न्याय मिळाला नाही याची रडकथा गायली. कोणी यापुढे आपल्याला काय मिळाले पाहिजे याची यादी ठेवली. 1 सप्टेंबर 1997 रोजी संसदेचे लोकनायकत्व संपुष्टात आले.

 

जो तो शहाणपण सांगतो
महोत्सवाच्या निमित्ताने अक्षरश: गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडला जात आहे. लोकसभेने विशेष सत्र घेऊन स्वातंत्र्यानंतर काय कमावले आणि काय गमावले या विषयावर चर्चा घडवून आणली. गावोगावच्या सार्वजनिक संस्था, व्यापारी, कारखानदारांच्या संघटना, शाळा-कॉलेजांतील मंडळेसुध्दा स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडण्यासाठी भाषणे ठेवीत आहेत. चर्चासत्र, कार्यशाळा भरवित आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेल्या चुका कोणत्या?  याचा शोध घेण्यासाठी 50 वर्षांच्या काळातच सत्तेवर असलेल्या नेत्यांना पाचारण करण्यात येत आहे; सध्या खुर्चीवर असलेल्या पंतप्रधान, मंत्रिगण यांनाही भरपूर मागणी आहे. नियोजकांचा हेतू आत्मपरीक्षणापेक्षा सत्तेशी संपर्क साधण्याचा आहे, हे स्पष्ट आहे.

 

सर्व वर्तमानपत्रांनी 15 ऑगस्ट 1997 च्या आसपास विषेशांक काढले. स्वातंत्र्यानंतरची कामगिरी फारशी स्पृहणीय नाही या विषयांवर सगळ्यांचे एकमत आहे. परंतु स्वातंत्र्याचे स्वप्न कुठे भरकटले या विषयावर जितके लेखक तितकी मते असा प्रकार आहे. झाले गेले जाऊ द्या, यापुढे काय करायला पाहिजे याही विषयावर काहीच समान सूर उमटला नाही. देशात सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे, हा भ्रष्टाचार दूर झाला म्हणजे सगळे काही ठीक होईल, एवढाच काय तो एक मुद्दा या विषयावर बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या सगळ्यांमध्ये समान सापडतो.
 

संसदेपासून गावगन्ना संमेलनांपर्यंत आजपावेतो झालेल्या चर्चा अगदीच निकृष्ट आणि सामान्य झाल्या आशीच सर्वांची प्रतिक्रिया आहे म्हणजेच, स्वातंत्र्याचा जमाखर्च अजून नेटका मांडला गेलेला नाही
याची जाणीव सगळ्यांना आहे. पण जमाखर्च मांडताना नेमकी चूक कोठे होते आहे हे काही केल्या उमजत नाही.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.