स्वातंत्र्य का नासले?

स्वराज्य आंदोलनातील विविध प्रवाह भाग -1

शरद जोशी
गांधीजी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा झाला हे खरे. परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यात दुसरे काही प्रवाहच नव्हते आणि सर्व जातींचे यच्चयावत समाज गांधीप्रणीत काँग्रेसच्या झेंड्याखाली लढ्यात ठाकले होते, असे म्हणण्यास काही ऐतिहासिक आधार नाही. पारतंत्र्य, गुलामी ही लाजिरवाणी, अपमानास्पद गोष्ट आहे; आपल्या देशावर लांबून आलेल्या परकीयांचे राज्य असावे ही काही फारशी स्पृहणीय गोष्ट नाही; राजकीय दास्यामुळे देशाचे आर्थिक शोषण होत आहे आणि देश कंगाल बनत चालला आहे.

sharad12स्थूलमानाने एवढ्याच विषयावर सगळ्या देशांत सहमती होती. पण स्वातंत्र्यलढ्याची उद्दिष्टे काय, साधने काय, कार्यक्रम काय, वेळापत्रक काय याबद्दल स्वातंत्र्याच्या चळवळीत मतप्रवाह होते.

 

जहाल ' राष्ट्रीय '   
इंग्रजांचे वर्चस्व सर्व देशभर प्रस्थापित झाल्यानंतर सार्वभौमत्व गमावलेले संस्थानिक, नव्या सरकारी न्याय महसूल व्यवस्थेने बांधले गेलेले जहागीरदार- जमीनदार, कायद्याचे राज्य तयार झाल्यामुळे नाखूश झालेले ठग आणि पेंढारी, थोडक्यात, इंग्रज येण्यापूर्वी ज्यांचा अमल देशावर चालला होता असे सर्व घटक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली सरदार, दरकदार जातिबांधव आणि आश्रित मंडळी यांची इंग्रजविरोधी भावना अत्यंत तीव्र होती. इंग्रज आल्यामुळे आपल्या हातातील सत्ता गेली याचे त्यांना परमदु:ख होते आणि इंग्रजांना कोणत्या का प्रकाराने होईना, देशातून काढून लावता आले तर, राजकीय सत्तेचा वारसा पेलू शकणारे या देशात दुसरे कोणीच नसल्यामुळे आपणच पुन्हा सर्व सत्ताधीश बनू, अशी त्यांना मोठी अपेक्षा होती. देश गुलाम का झाला? समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात आपण इतके मागासलेले का राहिलो? हे प्रश्नही त्यांना अप्रस्तुत वाटत होते.

 

आपण सर्वांर्थाने सर्वच दृष्टीनं श्रेष्ठ, सदाकाऴ श्रेष्ठ होतो आणि आहोत. केवळ दुर्भाग्याने किंवा चक्रनेमिक्रमाने आपल्याला वाईट दिवस आले आहेत; इंग्रज येथून निघून गेले की सर्व दुर्भाग्य संपेल अशी या मंडळींची बुद्धी. 1857 च्या बंडाचा उठाव प्रामुख्याने या समाजाने केला. बंडाला सर्वसाधारण जनतेचा पाठिंबा तर नाहीच, सहानभूतीदेखील नव्हती. त्यामुळे सरंजामी लोकांचीही एकजूट होऊ शकली नाही. इंग्रजांना पिटाळून लावले तर नंतर आपल्यापैकी कोणाच्या हाती जाईल काय सांगावे? त्यापेक्षा, 'खाविंद चरणारविंदी मिलिंदायमान' होण्याचा मार्ग अनेकांना प्रशस्त आणि श्रेयस्कर वाटला. साहजिकच बंडाचा बीमोड झाला.

 

पण या बंडाचा धसका इंग्रजांनी इतका जबरदस्त घेतला की, भारतीय समाजव्यवस्थेत हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन खुद्द राणीच्या जाहीरनाम्याने दिले. कंपनी सरकारने दलित आणि मागासवर्गीय जातींना प्रोत्साहन देऊन ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्गांचे वर्चस्व जाणीवपूर्वक कमी करण्याचे धोरण चालवले होते. 'सती'सारख्या प्रथा मोडून काढण्यात कंपनी सरकार व तिचे अधिकारी मोठ्या उत्साहाने जुटत. राणीच्या जाहीरनाम्याने ते धोरण संपवून फक्त तटस्थ तत्त्व लागू झाले. देशातील समाजव्यवस्थेत मागासवर्गीयांना उठून उभे राहता येईल इतकीही ढवळाढवळ न करण्याचे ठरले, म्हणजे जुन्या सवर्णांना आणि धनदांडग्यांना रानच खुले झाले. इंग्रजी अंमल परंपरागत समाजव्यवस्थेच्या उतरंडीला अनुसरूनच म्हणजे सवर्णांच्या माध्यमातूनच होणार होता. दोन-चार पुस्तकांचा अभ्यास करून इंग्रजी अमलाखाली नोकरदारी गाजवण्याची शक्यता तयार झाली. मुंबई- कलकत्त्यासारख्या शहरात नव्याने सुरू झालेल्या व्यापार, गिरण्या यांनीही काहींना सामावून घेतले. इंग्रजी राज्यात मिळालेल्या या फायद्यांनी समाधान न झालेले असेही अनेक होते. या असंतुष्ट सवर्ण समाज्यातूनच बाँब- पिस्तुल यांचे पंथ निघाले. समाजसुधारणेला हात न लावता राजकीय सत्तेचाच पाठपुरावा करण्याचा आग्रह धरणारे जहालपंथी याच परंपरेतले. अर्थकारण, समाजकारण, सर्व बाजूला ठेवून राष्ट्रवादाचा उदो उदो करावा व या घोषांनी बहुजन समाजाला त्यांच्यावरील अन्यायाचा आणि शोषणाचा विसर पडावा अशी राष्ट्रवादी परंपराही याच प्रवाहातून पुढे प्रकटली. आर्य समाज, विवेकानंद, हेडगेवार, हिंदू महासभा, जनसंघ आणि अलीकडची भारतीय जनता पार्टी व शिवसेना, विश्व हिंदू परिषद इत्यादी याच सरंजामी जहाल राष्ट्रवादी परंपरेतील पिलावळ.

 

शहरी काळे इंग्रज
 इंग्रजी अमलाचा जाच होणारा आणखी एक वर्ग होता. इंग्रजी अमलात इंग्रजी शिक्षणाचा, तंत्रज्ञानाचा, व्यापार-व्यवस्थेचा, कारखानदारीचा फायदा घेऊन आपले बस्तान ठाकठीक बसवलेला एक मोठा वजनदार समाज मुंबई, कलकत्ता, मद्रास, अशा मोठ्या शहरात उदयास येत होता. इंग्रजी राज्य नष्ट व्हावे, इंग्रजांनी संपूर्ण स्वराज्य देऊन या देशातून चालते व्हावे हे संभव नाही, फारसे आपल्या हिताचेही नाही. इंग्रजी राज्य हे एक वरदान आहे. त्यामुळे देशात शांतता, सुव्यवस्था, न्याय, व्यापारउदीम यांचे राज्य येत आहे याचा या वर्गाला प्रामाणिक संतोष वाटत होता. इंग्रजी राज्य संपवण्याने वा बाँब - पिस्तुलाचा दहशतवाद पसरण्याने या समाजाचे काहीच भले साधण्यासारखे नव्हते. इंग्रजी वेश परिधान करून गव्हर्नरच्या दरबारी किंवा कलेक्टरच्या घरच्या मेजवानीस निमंत्रण आले की, सर्व पितर स्वर्गात गेल्याची कृतकृत्यता मानणारी ही आंग्लविद्याविभूषित मंडळी. यांचे मागणे लई नव्हते. आय. सी. एस. परीक्षेत भारतीयांना अधिक जागा द्याव्यात, त्यांच्यासाठी वयाची अट ढिली करावी. परीक्षेत बसणे अधिक सोपे व्हावे यासाठी हिंदुस्तानातही परीक्षा घेतली जावी. कर कमी करावेत, आयातीवरील जकात वाढवावी, लष्करावरील खर्च कमी करावा लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जबाबदार कायदेमंडळांची स्थापना करावी; थोडक्यात, इंग्रजी सत्तेच्या छत्राखाली वाढती सत्ता संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा हा वर्ग होय.

 

या वर्गातून काँग्रेसचा जन्म झाला. लोकांचे प्रतिनिधित्व करणारी अशी एक संस्था असावी या कल्पनेला  खुद्द गव्हर्नर जनरल साहेबांचीही सहानभूती होती. दरवर्षी नाताळच्या सुट्टीत कोणत्याही मोठ्या शहरी जमावे, अस्खलित इंग्रजी, सुटाबुटातील विद्वानांनी वक्तृत्व गाजवावे, सरकारकडे शिफारशी पाठवाव्यात, हऴूहळू लोकांच्या प्रतिनिधित्वावर, अनौपचारिक का होईना, हक्क सांगणारी एक प्रतिनिधी संस्था उभी राहावी, असा काँग्रेसचा मवाळ कार्यक्रम.

 

देशात विरोधी पक्षाचे काम करणारा एक मंच असावा ही गोष्ट व्हाईसरॉय साहेबांनाही मान्य होती. काँग्रेसने मंजूर केलेल्या काही शिफारशी सरकार अंमलातही आणत होते. पण लवकरच काँग्रेसच्या प्रातिनिधिक स्वरूपाबद्दल आणि उपयुक्ततेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बहुसंख्य रयतेच्या इच्छा-आकांक्षा तसे पाहिले तर मवाळांच्या कार्यक्रमाशी अधिक जुळणाऱ्या होत्या. इंग्रज अमलात बलुतेदारी बुडाली, शेतीवर टाच आली, राजसत्ता आणि धनसत्ता यांपासून वंचित होऊनही भटशाही माजली. त्यांनी जन पिडले होते, पण तातडीने इंग्रज निघून जावेत यात मवाळांप्रमाणे बहुजन समाजाला काही विशेष स्वारस्य नव्हते. पण मावळ नुसतेच सभा, परिषद भरवायचे. जहाल काहीबाही खटाटोप करीत सरकारविरुध्द धीटपणे उभे तरी राहात, लिहीत बोलत. जहालांना बहुजन समाजात वाढती सहानभूती मिळू लागली. मवाळांचा कार्यक्रम थोड्याफार फरकाने इंग्रजी सत्तेत मान्य होण्यासारखा होता. याउलट, सर्व जहाल चळवळ सर्व मार्गांनी मोडून काढण्याचा त्यांचा निर्धार होता आणि तरीही जहालांची लोकप्रियता वाढत होती. जहाल काय आणि मवाळ काय, दोन्ही फार तर लोकसंख्येच्या 5 % लोकांचे प्रतिनिधित्व करणारे यापेक्षा जास्त नाहीत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.