स्वातंत्र्य का नासले?

स्वराज्य आंदोलनातील विविध प्रवाह भाग - 2

शरद जोशी
देशातील बहुजन समाजाचा कोणी ना त्राता,  ना नेता. जातिव्यवस्थेच्या चक्रात पिढ्यान् पिढ्या भरडला गेलेला हा समाज इंग्रजी सत्तेच्या काळात आपली गुलामगिरी संपेल आणि थोडे बरे दिवस येतील, बहुजन समाजाला विद्या मिळाली तर इंग्रजी अमलात ते सुखी होतील, अशा आशेत होता. 1857 च्या बंडानंतर राणीच्या जाहीरनाम्यात परंपरागत जातिव्यवस्थेच्या उतरंडीस जीवदान मिळाले. भटशाही इंग्रजी राज्याचे महत्त्वाचे अंग मिळाले. शेतीवरील कर आणि इंग्रजी व्यापारामुळे उद्ध्वस्त होणारे गावोगावचे बलुतेदार त्यांना वाली कोणीच राहिला नाही. या समाजाची राजकीय भूमिका काय होती?

sharad1इंग्रजांचे राज्य म्हणजे काही अनंत काळ टिकायचे नाही. आ़ज ना उद्या त्यांना येथून जावेच लागेल. पण इंग्रजी अमलाच्या रूपाने येथील शूद्रातिशूद्रांस विद्येचे दरवाजे उघडे होत आहेत. जातिव्यवस्था मोडली पाहिजे, विषमता संपली पाहिजे तरच लोकांचे एकमय राष्ट्र तयार होईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला सुरुवात होईल, तोपर्यंत केवळ 'नॅशनल काँग्रेस' म्हटल्याने काही 'राष्ट्र' तयार होत नाही, परंपरागत सवर्ण समाजाच्या म्होरक्यांनी चालविलेल्या जहाल आणि मवाळ दोन्ही स्वातंत्र्य चळवळींबद्दल बहुजन समाजास आपुलकीची भावना असण्याचे काहीच कारण नव्हते, ही भटांची पोरे विनाकारण शूद्रातिशूद्र मुलांच्या मनात इंग्रजीविषयी अप्रीती निर्माण करून, त्यांच्या हाती पिस्तुल-बाँब देऊन त्यांना चुकीच्या मार्गास लावतात, अशा मार्गांनी स्वराज्य मिळवणे नाही आणि मिळाले तरी तो जुन्या पेशवाईचा नवा अवतार असेल, त्यात बहु्जन समाजाला विकासाचे आणि प्रगतीचे मार्ग बंदच राहतील, अशी बहुजन समाजाच्या धुरीणांची स्पष्ट भूमिका होती.


जोतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या साहित्यात हा विचार स्पष्टपणे मांडला. इंग्रजी राज्य हे हिंदुस्थानला मिळालेले ‘ईश्वराचे अतर्क्य वरदान’ आहे, असे मानणाऱ्या नेमस्तांचीही भूमिका अशीच होती. समाजसुधारणा की राजकारण या टिळक-आगरकरी वादातही मूळ सूत्र तेच आहे. पुढे आंबेडकरी दलित चळवळीतही तथाकथित राष्ट्रीय चळवळीच्या सवर्ण धुरीणांच्या खऱ्याखुऱ्या हेतूविषयी जबरदस्त संशय आढळून येतो. अलीकडे, अरुण शौरी यांच्या लिखाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात इंग्रजांना सोयीस्कर अशी भूमिका घेत असल्याबद्दल टीका आढळते. बाबासाहेबांचे अनुयायी त्या टीकेचा निषेध करतात. यातच बाबासाहेबांच्या चळवळीचा पराभव आहे. जातिव्यवस्था समूळ नष्ट होईपर्यत होणारी स्वातंत्र्याची धडपड ही खरीखुरी राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ असूच शकत नाही. गोऱ्या इंग्रजांच्या हातातील सत्ता थोडीफार आपल्याही हाती यावी याकरिता एतद्देशीय प्रतिष्ठितांनी मांडलेला हा खेळ आहे. अशीच 1936 सालापर्यंत तरी बहुजन समाजाची भूमिका होती. आणि यात शरम वाटण्यासारखे काहीच नव्हते आणि नाही. महात्मा फुले यांनी ही भूमिका स्वच्छपणे मांडली. आंबेडकरवादी महात्मा फुल्यांशी नाते सांगतात, पण बाबासाहेबांचा स्वातंत्र्य आंदोलनाचा मार्ग टिळक, नेहरू यांच्यापेक्षा अलग असल्याचे नाकारतात हे बाबासाहेबांचे दुर्दैव आहे.

 

गांधीजींचा प्रवेश
लोकमान्य टिळकांना मंडालेच्या कारागृहाची शिक्षा झाल्यानंतर जहाल चळवळ मोडीत निघाल्यातच जमा होती, पण मवाळ चळवळीस जहालांच्या घसरगुंडीचा काही लाभ मिळत नव्हता. जहाल आणि मवाळ दोघेही बाजूस सरून बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे स्वातंत्र्याचे एक नवे आंदोलन उभे राहण्याची शक्यता तयार होत होती.

 

एवढ्यात महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून हिंदुस्थानात परतले. स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी त्यांनी नवीन संस्था काढली नाही, काँग्रेसमध्येच प्रवेश केला. सूटबूटधारी काँग्रेसजनांच्या संमेलनात मोहनदास करमचंद गांधी उभे राहिले. इंग्रज शासनाच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून भारतीय परंपरा आणि अध्यात्म, सत्य आणि अहिंसा यांच्या आधाराने स्वातंत्र्य चळवळीची बांधणी, पण त्याचबरोबरीनेच समाजसुधारणेच्या आणि बहुजन समाजाच्या आर्थिक हिताच्या कार्यक्रमांचा आग्रह या गांधीप्रणालीने देशात मोठे चैतन्य निर्माण केले. जहालांची सद्दी संपली आणि काँग्रेस आंग्यवेभाषा-विभूषितांची परिषद न राहता एक आंदोलन बनले. गांधींच्या आगमनाने काँग्रेस तरारून उठली, बहरली, फोफावली आणि विस्तारली. सवर्ण चळवळीच्या धाकट्या नेमस्त पातीचा विजय झाला. जहाल मिटले, मवाळ बाजूस झाले. गांधीजींच्या आध्यात्मिक सत्याग्रही आंदोलनानं बाजी मारली.

 

पण ही सारी उच्चभ्रू समाजातीलच व्दंव्दे गांधींच्या प्रभावामुळे बहुजन समाजाच्या चळवळी निष्प्रभ झाल्या आणि मावळत चालल्या. सरदार वल्लभभाई पटेल इत्यादींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शेतकऱ्यांत जागृती निर्माण केली.  काँग्रेस आदिवासींपर्यंत पोहोचली. अखेरीस, बहुजन समाजाची स्वातंत्र्य चळवळ चालू ठेवणे अशक्य झाल्यामुळे बहुजन समाजाचे नेते फैजपूर काँग्रेसमध्ये स्वतंत्रता चळवळीच्या राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊन गेले. स्वतंत्रता चळवळीच्या या गांधीप्रणीत मध्य प्रवाहात दोन समाज शेवटपर्यंत एकजीव होऊ शकले नाहीत. बहुजन समाजाचे खानदानी नेते काँग्रेसमध्ये जाऊन मिळाले तरी शूद्रातिशूद्रांच्या चळवळीचे बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते काँग्रेसी मध्य प्रवाहापासून दूर राहिले, एवढेच नव्हे तर, वेळोवेळी काँग्रेस आणि दस्तुरखुद्द महात्माजींशीही वादविवाद आणि संघर्ष करत राहिले. गांधीवादी चळवळीबद्दल मुसलमान समाजाच्या मनातही खोलवर रुजलेल्या गंभीर शंका होत्या. तो समाजही बहुसंख्येने स्वातंत्र्याच्या चळवळीपासून दूर झाला. त्याची परिणती देशाच्या फाळणीत आणि पाकिस्तानच्या निर्मितीत झाली.

 

1930 सालचा सत्याग्रह अयशस्वी झाला. प्रतीकात्मक सत्याग्रह, विधायक कार्यक्रम अशा सव्यापसव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवून एका तऱ्हेने गांधीजी खंदकात, काही नवीन दिशा दिसण्याची वाट पाहत होते. याच काळात समाजवादी विचारांचे झंझावात सुटले आणि बहुजन समाजातील प्रश्नांची तड समाजवादी विचारधारा आणि कार्यक्रम यांच्या आधाराने लावू पाहणारे एक नवीन नेतृत्व उदयास येऊ लागले. दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले. महायुद्ध पेटले. त्यात इंग्रजांना विजयही मिळाला, पण त्या प्रयासात साम्राज्याच्या सिंहाची कंबर मोडली. भारतातील साम्राज्य आता भारतीय भद्र लोकांच्या माध्यमातून चालवता येणार नाही हे स्पष्ट झाले. साम्राज्य चालू ठेवायचे तर लाखोंच्या संख्येने इंग्रजी प्रशासक व लष्कर येथे खडे ठेवावे लागेल, आणि तरीही एवढी जबरदस्त किंमत देऊनही साम्राज्य फार काळ टिकणार नाही, हे स्पष्ट झाले. इंग्रजांना देश सोडून परत जाण्याचे ठरविले.

 

सत्तांतराच्या वेळी बहुसंख्य जनतेची प्रतिनिधी म्हणून मान्यता काँग्रेसला होती हे खरे; पण काँग्रेसमध्ये शहरी, व्यापारी, कारखानदार, जमीनदार, शेतकरी, गांधीवादी, समाजवादी अशा अनेक मतप्रवाहांचे मिश्रण होते. बहुजन समाजाच्या हितांचे रक्षण करणारी हिंसाअहिंसेच्या काथ्याकुटाची फारशी पर्वा न करणारी चळवळ कोसळली तर फार झपाट्याने समाजवादी बहुजन चळवळ संघर्षाला खडी होईल आणि मग सत्तेचे हस्तांतरण शांततेत आणि सुव्यवस्थेने करणे दुष्कर होईल हे इंग्रजांनी ओळखले. देशाची फाळणी करून भारतातील सत्ता काँग्रेसमधील आंग्लाळलेल्या भद्र लोकांच्या हाती सोपवणे इंग्रजांच्या आर्थिक, राजकीय हिताचे होते.

 

गांधीविचार पहिला बळी
स्वातंत्र्य आले, पंडित नेहरू पंतप्रधान झाले. इंग्रजी अमदानीत धन, विध्या आणि सत्ता संपादन केलेल्या चामडीचा रंग सोडल्यास सर्वतोपरी इंग्रजी असलेल्या नेतृत्वाकडे सत्ता गेली. महात्मा गांधींच्या जनआंदोलनाच्या सामर्थ्याची आता या शहरी भद्र नेतृत्वास काही आवश्कता राहिली नव्हती. गोडसेने गांधीजींचा देह संपवला. नंतर लगेच नेहरूंनी गांधींच्या अर्थविचारावर आणि राजकीय विचारावर हल्ला चढविला. 'गावकेंद्री अर्थव्यवस्था, शेती आणि ग्रामोध्योगास प्राधान्य आणि न्यूनतम शासन' याऐवजी 'शहरी उध्योगांचा प्रभाव असलेली सर्वंकष सत्ता शासनाच्या हाती एकवटणाऱ्या व्यवस्थे' कडे देशाची वाटचाल चालू झाली. आणि 50 वर्षांत देशावर अनर्थ कोसळला.
 

स्वातंत्र्याच्या चळवळीतील वेगवेगळे प्रवाह, त्यांची प्रकृती आणि इतिहास यांचे विवेचन स्वातंत्र्यानंतर कोसळलेला अनर्थ समजावून घेण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.
 
हजारो वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या बहुजन समाजाला संघटित होऊन आपली भूमिका मांडण्याची संधी इंग्रजी आमदानीत निदान तीनदा आली. कंपनी सरकारच्या उदार धोरणांचा फायदा दिसू लागतो न लागतो तोच चपात्यांच्या बंडाचा डोंब उसळला. आणि बहुजन समाज मागे ढकलला गेला. जहाल चळवळ कोसळल्यानंतर बहुजन समाजाची चळवळ उभी राहू शकली असती, पण तीही संधी गेली. दुसरे महायुद्ध पेटल्यामुळे समाजवादी बहुजन समाजाची चळवळ खुडली गेली. स्वातंत्र्य आले ते जोतिबा फुल्यांच्या भाकिताप्रमाणे पेशवाईचे नवे रूप घेऊन आले. गोऱ्या इंग्रजांची जागा काळ्या इंग्रजाने घेतली. गांधीवादी ग्रामीण अर्थव्यवस्था त्यांना परवडणारी नव्हती. याउलट, समाजवादाच्या नावाखाली सर्व सत्ता हाती घेण्याची शक्यता दिसताच आंग्लाळलेल्या काँग्रेसने गांधीनेतृत्वाचा मुखवटा सहज फेकून दिला. स्वातंत्र्यानंतर 'ब्रा्ह्मणी' समाजवादाचा अवतार आणि आनर्थपरंपरेची सुरुवात झाली.


आत्मपरीक्षणाच्या तीन कसोट्या
स्वराज्याच्या आंदोलनातील अंत:प्रवाह पाहता गेल्या ५० वर्षांतील घडामोडींचे मूल्यमापन करणे किती बिकट आहे याची कल्पना यावी. स्वातंत्र्यानंतरच्या घसरगुंडीचे विश्लेषण करताना तीन प्रकारे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
१. देशाच्या आजाराचे निदान थातूरमातूर असून चालणार नाही.
२. ओळखलेल्या आजारांवर परिणामकारक उपचार झाले, तर देशाचे नष्टचर्य संपण्याची निश्चिती हवी; अशा अभ्यासात कोणत्या व्यक्तीच्या बडेजावाचा अडसर असता कामा नये.
३. अखेरीस स्वातंत्र्य चळवळीच्या प्रकृतीचीही परखड चिरफाड करण्यात हयगय होता कामा नये.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.