विकासप्रवाह आदिवासींपर्यंत - भाग-1

ई. झेड. खोब्रागडे

18 मार्च 1985ला अहेरी उपविभागीय अधिकारी म्हणून मी चार्ज घेतला. ही माझी पहिली पोस्टिंग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्यावर पहिल्यांदा मार्च 83मध्ये वर्धा जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी रुजू झालो. 1984मध्ये प्रशासकीय कारणास्तव गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्याचा आदेश मिळाला. ओएनजीसीमधील नोकरीचा राजीनामा दिला होता. मुंबई ते वर्धा आणि आता गडचिरोलीला जावं लागणार होतं. माझे वडील शिकले नव्हते, तरीही ते म्हणायचे,`` ही काय ओएनजीसीची नोकरी करतोस, नायब साहेब, कलेक्टर बन व गरिबांसाठी, वंचितांसाठी कार्य कर.`` या विचारांच्या प्रभावामुळं मी या सेवेकडं आकर्षित झालो. 11 जानेवारी 1984ला गडचिरोलीला जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालो.

त्यावेळी जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड होते. त्यांची भेट झाली. फार बरं वाटलं, सामाजिक जाणीव व उत्तरदायित्वाची भूमिका जोपासून, गरीब व असहाय लोकांना तातडीनं न्याय देण्याची तळमळ असलेले असे ते भारतीय प्रशासन सेवेत असलेले अधिकारी जिल्ह्याला पहिले जिल्हाधिकारी म्हणून लाभले होते. या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली उर्वरित प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याचा आनंद होताच, शिवाय त्यांच्या सरळ व स्वच्छ कार्यप्रणालीमुळे माझ्याही मनात साठवलेली सामाजिक संवेदना व उत्तरदायित्वाची भावना दिवसेंदिवस प्रबळ होत गेली. अधिनियम-नियमांची माहिती कायद्याच्या पुस्तकातून व ऑफिसच्या फाईलमधून घेत असतानाच त्याचा वापर सामाजासाठी कसा करायचा याचं तंत्र व धडे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळत होते. प्रशिक्षण कालावधी संपला व अहेरीचा एसडीओ म्हणून 18 मार्च, 1985ला रुजू झालो. 

आंध्र – मध्य प्रदेशाची सीमा असलेला अहेरी उपविभाग दुर्गम-अतिदुर्गम व अविकसित भाग म्हणून संबोधला जातो. परंतु नक्षलवाद्यांमुळं नक्षलग्रस्त उपविभाग म्हणूनही हा विभाग ओळखला जातो. जिल्हा मुख्यालयापासून 100 किमीवर उपविभागाचं मुख्यालय व तिथून जवळपास 200 किमीवर शेवटचं गाव असा विसृत आदिवासी प्रदेश असलेल्या सहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात वसलेली साडेसहाशे आदिवासी खेडी व वास्तव्यास असलेले दीड लाख लोक असा 80 टक्के आदिवासी आणि 70 टक्के जंगलव्याप्त क्षेत्राचा हा उपविभाग विकासापासून वंचित होता. प्रशासकीय कार्यक्षेत्रातील लोकांपासून नेहमीच दूर राहणारा आदिवासी समाज वैयक्तिक व क्षेत्रिय विकासाबाबतही उदासीन होता.

गडचिरोली जिल्हानिर्मितीमुळं मात्र या परिस्थितीत बदल होण्यास सुरुवात झाली. परंतु तेवढ्याच वेगात नक्षलवादीसुद्धा आपल्या कारवाया वाढविण्याकडे सक्रिय होऊ लागले. सरकारच्या ध्येयधोरणाविरुद्ध आदिवासींची मनं कलुषित करण्याचा, तसंच सशस्त्र क्रांतीसाठी आदिवासी सेना निर्माण करण्यासाठी, स्थानिक आदिवासी युवकांना शस्त्रांचं प्रशिक्षण आणि मार्क्स लेनिनच्या क्रांतीचं विचारमंथन होऊ लागलं. आदिवासींच्या हिताच्या नावाखाली बंदुकीचा धाक दाखवून कायद्याची पायमल्ली करण्याचा व वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होऊ लागला. वर्षाकाठी दोन-चार हिंसक घटना करून आपलं अस्तित्व व भीतीचं वातावरण कायम ठेवण्याचं धोरण नक्षलवाद्यांनी अवलंबलं. अधिकारी व कर्मचारी यांच्यातील सामाजिक जाणीवेचा अभाव, आदिवासींप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेचा अभाव इत्यादी नकारात्मक गोष्टींमुळं हा प्रश्न जटिल झाला होता. अशा बिकट परिस्थितीत आदिवासींची कामं सरळसोप्या मार्गानं त्वरित होतील, अशी प्रशासकीय यंत्रणा सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून कार्यान्वित होण्याची नितांत आवश्यकता होती.

नक्षलवाद्यांचे सात-आठ दल चळवळ उभारणीच्या कार्यात असताना तेवढ्याच वेगानं व तीव्रतेनं काम करणारी संवेदनशील व प्रतिसादात्मक सरकारी यंत्रणा हवी होती. या दृष्टीनं सरकारी यंत्रणा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. एसडीओच्या अधिपत्याखालील `जन समस्या निवारण समिती`च्या माध्यमातून दूरदूरच्या आदिवासी गावांना भेटी देऊन समस्यांचं जागीच निवारण करणं, सरकारी योजना समजावून सांगणं, सरकारबाबतचा गैरसमज दूर करणं, आदिवासींची होणारी पिळवणूक थांबवणं या सर्व मार्गांनी आदिवासींशी जवळीक साधून त्यांची सहानुभूती मिळविण्याचा आणि त्यांना विकासप्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला. 

(क्रमश:)


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.