
मी कट्टर शिवसैनिक नाही, की बाळासाहेबांचा समर्थक नाही. तरीही माझं बाळासाहेबांशी एक वेगळं नातं होतं. त्या नात्याला नाव देता येणार नाही. काहीसं धुसर, काहीसं अंधुक असं ते नात आहे. जे एरवी मला जाणवत नव्हतं. परंतु, जेव्हा जानेवारी उजाडायचा आणि माझा वाढदिवस जवळ यायचा, तेव्हा रस्त्यांवरील बाळासाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर मला नेहमीच आकर्षित करायचे. त्यामुळं माझ्याही मित्रांना माझा वाढदिवस असल्याची चाहूल आपसूकच लागायची. हा माझ्यासाठी थोडा वेगळा परंतु खुपचं छान अनुभव असायचा. त्यातल्या त्यात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांची जयंतीही याच दिवशी येत असल्यामुळे मला काहीतरी वेगळं असं जाणवायचं. ह्या दोन व्यक्ती होत्या ज्यांची नावं महाराष्ट्र तसेच देशामध्ये आदरानं घेतली जायची आणि अशा दोन महान व्यक्तींच्या वाढदिवसादिवशी माझा वाढदिवस असल्याकारणाने मला अजूनच अभिमान वाटायचा.
बाळासाहेब एक चांगले व्यंगचित्रकार! आणि मलाही व्यंगचित्रांची, कलांची चांगलीच आवड असल्याकारणाने उगाचच मनाला वाटायचं, की त्यांच्यात आणि माझ्यात बरंच काही साम्य आहे. परंतु मी नेहमी राजकारणापासून दूर राहायचो त्यामुळे हा समज खोटाच असावा हे ही मला कळायचं. असो..
मी आज माझ्या स्वप्ननगरी मुंबईमध्ये काम करतोय. मुंबई म्हणजे स्वप्नांचं घर, आणि माझ्या स्वप्नांचा तर महालचं म्हणायचा. याच मुंबई शहरात एखाद्या राजाप्रमाणे बाळासाहेबांच एक वेगळं असं राज्य. परंतु आज मी इथं काम करत असताना बाळासाहेबांच्या निधनाची बातमी मनास हळहळ लावून गेली. अनेकदा वाटायचं, की या महान व्यंगचित्रकाराला, एका दर्जेदार कलाकाराला एकदा स्वतः जावून भेटावं, त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना शुभेच्छा द्यावा, परंतु हे सर्व काही आता अधुरचं राहिलं... आज त्यांच्या जाण्याने मुंबईसह देशभरात जी शोककळा पसरलीय. माझंही मन सुन्न झालंय होतयं. माझ्या दृष्टिकोनातून व्यंगचित्रकारिता क्षेत्रातील एक दर्जेदार तसेच व्यंगचित्राबाबतची उत्तम जाण असलेला कलाकार आज जगातून गेला याचं खरंच वाईट वाटतयं!
Comments
- No comments found