स्पेशल रिपोर्ट

हा कसला धर्म?

नंदिनी आत्मसिद्ध

इतिस्त्री- 

धर्म हा मानवी जीवनाच्या धारणेसाठी असतो, पण अनेकदा हाच धर्म माणसाच्या जिवावर उठताना दिसतो. आयर्लंडमध्ये सविता हलप्पनवार या मूळ भारतीय वंशाच्या गरोदर तरुणीचा झालेला मृत्यू केवळ धर्मातील नियमाकडे बोट दाखवण्यात आल्यामुळे ओढवला, हे साऱ्या जगानं पाहिलं. मूळची बेळगावची असलेली सविता दंतवैद्य होती आणि प्रवीण हलपन्नवार याच्यासोबत आयर्लंडमध्ये वास्तव्यास होती. 21 ऑक्टोबर 2012 रोजी सविताच्या पोटातील गर्भाबाबत गंभीर व गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी ती 17 आठवड्यांची गरोदर होती. तिला खूप रक्तस्राव झाला व गर्भपात करण्याला पर्याय उरला नाही. सवितानं व तिच्या नवऱ्यानं परोपरीनं गर्भपात करण्याची विनंती केली. तिला अन्य देशात हलवण्यासारखी तिची परिस्थितीही नव्हती. मात्र, पोटातील गर्भाच्या हृदयाचे ठोके चालू आहेत या कारणास्तव गर्भपात करता येणार नाही, कारण आयर्लंडमध्ये गर्भपातास बंदी आहे, असं कारण तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलं. पोटातील मृत गर्भामुळे सविताच्या शरीरात विष पसरून तिचा गेल्या 28 ऑक्टोबरला मृत्यू ओढवला. सविताचा जीव केवळ कॅथॉलिक धर्मानुसार बनलेल्या कायद्यामुळं गेला. तिच्या मृत्यूनंतर जगभर या विषयावर मोठीच चर्चा चालू आहे. आयर्लंडमधील सरकारला भारत सरकारतर्फेही विचारणा करण्यात आली असून, मानवी जीवनाच्या आड येणाऱ्या धार्मिक कायद्यांवर मोठंच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सविताच्या निधनाने खूप खळबळ माजली आणि जगभरातील विविध देशांकडून निषेध नोंदवण्यात आला. कालबाह्य झालेले धार्मिक कायदे हा मुद्दा हिंदू व विशेषतः मुस्लिम धर्मीयांच्या संदर्भात चर्चेला येत असतो. यावेळी ख्रिश्चन धर्मातील सनातनी कॅथॉलिक पंथाच्या जुनाट धारणांवर बोट उचललं गेलं आहे. खरंतर बुरसटलेली मतं आणि जुनाट विचार ही काही कुण्या एका धर्माची मक्तेदारी नाहीच. वेगवेगळ्या धर्मांमध्ये असे विचारप्रवाह आज एकविसाव्या शतकातही दिसतात. कॅथॉलिक देश असल्यामुळे आयर्लंडमधल्या बिगर कॅथॉलिकांनाही तोच कायदा लागू होतो, जो मानवी जीवनापेक्षाही तथाकथित धार्मिक रूढीला प्राधान्य देतो. आता संपूर्ण चौकशी करून या कायद्याबाबत पुनर्विचार करा, असं आयर्लंडला अॅम्नेस्टी इंटरनॅशनल तर्फे सांगण्यात आलं असलं, तरी या प्रकरणी चौकशासाठी नेमलेल्या पॅनेलवर गर्भपातविरोधी प्रतिनिधींचा समावेश असल्यानं प्रवीण हलप्पनवारने सहकार्य करण्यास नकार दिला होता. त्यानंतर या पॅनेलवरील तिघा सदस्यांचा राजीनामा घेण्यात आला. आयरिश कायद्यातील त्रुटींबद्दल गेल्या काही वर्षांपासून वाद-चर्चा सुरू असून, वेळोवेळी महिलांना याचा त्रास होऊनही तेथील वेगवेगळ्या सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. यावेळी तरी कायद्यात योग्य बदल करण्याची सुबुद्धी तेथील सरकारला व्हावी.

धर्माच्या अशा धोरणांमुळे विशेषतः स्त्रियांना नेहमीच त्रास होत असतो आणि तो तसा व्हावा व त्यांनी आपल्या अधीन राहावं यासाठीच तर असे नियम बनवले जात असतात. त्याविरुद्ध आवाज उठवला नाही, तर आहे ती परिस्थिती बदलत नाही. वर्षानुवर्षं तोच अन्याय सुरू राहतो. पुन्हा ती तर आमची प्रथा आहे, आमच्या धर्मात असंच चालतं...अशा तऱ्हेची दर्पोक्ती ऐकायला मिळते. मग हरयाणातली एखादी खाप पंचायत मुलींच्या पोशाखावर बंधनं आणते, तिथली जबाबदार माणसं मुलींची लग्नं 16व्या वर्षी झाली पाहिजेत, नाहीतर बलात्काराच्या घटना वाढतात असं सनसनाटी विधान करतात आणि माजी मुख्यमंत्री त्यास साथ देतात. तर उत्तर प्रदेशात गावपंचायती महिलांना घराबाहेर पडताना मोबाईल बाळगण्यास मनाई करतात. हे खरंतर अजबच आहे, कारण मोबाईल बाहेर वावरतानाच तर अधिक उपयोगी पडतो. जातपंचायतींचा एक मोठा पगडा स्थानिकांवर असल्याने त्यांना विरोध करणं सोपं नसतं. त्यामुळं मग सत्ता हाती असलेल्यांचं अधिकच फावतं. फतवा काढणं हा प्रकार काही विशिष्ट धर्मातच होत नाही, हेही यावरून स्पष्ट व्हावं.

स्त्रियांना फारसं महत्त्व न देणं हा आपला हक्कच आहे, असं अनेक धार्मिक संघटनांना किंवा धर्मगुरूंना वाटतं. स्त्रियांवर म्हणूनच वेगवेगळी बंधनं घातली जातात. धर्माचा, पापपुण्याचा आणि स्वर्गनरकाचा पगडा स्त्रियांच्या मनावर बसावा, अशी सोयच संस्कारांमधून केली जाते. त्याचा परिणाम म्हणून स्त्रिया धर्म सांगेल ते निमूट स्वीकारत जातात. कधी त्या प्रश्नही विचारतात, पण त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. हिंदूंमध्ये विशिष्ट देवळांमध्ये जाण्यास स्त्रियांना मनाई आहे. तसचं गाभाऱ्यात त्यांना जाऊ दिलं जात नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यावरून, तसंच प्रसाद करण्याचं कंत्राट महिला बचत गटाला देण्यावरून मध्यंतरी किती गदारोळ झाला. तिकडे शबरीमलैच्या देवळात कुमारी व मासिक धर्म संपलेल्या स्त्रीलाच जाता येतं. तर महाराष्ट्रात कार्तिकस्वामीचं दर्शन घेण्यास महिलावर्गावर बंदी आहे. अगदी अलीकडे मुंबईतल्या हाजीअली येथील दर्ग्यात कबरीजवळ स्त्रियांना जाऊ दिलं जाणार नाही, अशा फतव्यावरून वादंग उठलं होतं. 

मुस्लिमांमध्ये तोंडी तलाक देऊन विवाहविच्छेद करण्याची प्रथा जुनीच असली, तरी तलाकचे म्हणून जे कायदे असतात, ते गुंडाळून ठेवून विवाह मोडले जातात, असा या धर्मातील अनेकांचं प्रमाणिक मत आहे. अलीकडेच तोंडी तलाकच्या आधारे विवाह मोडण्याच्या प्रकरणांना आळा बसण्यासाठी मुस्लिम कायद्यात बदल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून व महिलांकडून नव्याने होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. अर्थात या गोष्टीचा पाठपुरावा व्हायला हवा आणि त्यासाठी सर्वांनीच आग्रह धरला पाहिजे. एकदा तलाक घेतल्यानंतर त्याच व्यक्तीशी पुनः विवाह करण्याची उपरती होणं हेही अनेकदा स्वाभाविक असतं, कारण अनेकदा पुरुष भावनेच्या भरात तीनदा ‘तलाक’ असं बोलून जातात आणि शादी मोडण्याला तेवढं पुरेसं ठरतं. मात्र एकदा मोडलेलं हे लग्न पुन्हा सावरता येणं कायद्याच्या दृष्टीने जाचक असतं. कारण मुस्लिम कायद्यात तलाक घेतलेल्या स्त्रीशी लगेच पुनर्विवाह करता येत नाही. तिला दुसऱ्या माणसाशी शादी करावी लागते, त्यानंतर त्यांच्यात वैवाहिक नातं प्रस्थापित व्हावं लागतं व त्यानंतर त्यांचा तलाक झाल्यावर पुन्हा मूळ पति-पत्नी परस्परांशी पुन्हा विवाहबद्ध होऊ शकतात. अशा तऱ्हेच्या कायद्याचा गैरफायदा घेण्यात न आला तरच नवलं. या विषयावर यापूर्वी हिंदीत चित्रपटही येऊन गेले आहेत. पैकी ‘निकाह’ हा एक चित्रपट. अशा परिस्थितीवर महाश्वेतादेवींची एक सुंदर कथाही आहे. त्यातली घटस्फोट झालेली स्त्री मात्र, यातून मार्ग काढते. ती नवऱ्याला सांगते की ‘आपण आता पति-पत्नी नाही आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी दुसरी शादी करण्याच्या प्रक्रियेतून जाणंही कठीण आहे. म्हणून आपण गाव गुपचुप सोडू. यापुढे एकत्रच राहू, पण यापुढे तू माझ्यासाठी परपुरुष असशील. एकाच घरात पण परक्यासारखे राहू, काय बिघडलं’? अर्थात दरवेळी असे तोडगे शक्य होणार नाहीत. त्यासाठी ती अन्यायकारक अटच बाद झाली पाहिजे. पण मागणी होऊनही काहीच घडत नाही. काही मुस्लिम देशांमध्येही (बांगलादेशातही) ही अट काढून टाकण्यात आली असून, तलाक झाल्यावरही कुणाला पुन्हा विवाह करून एकत्र यायचं असेल तर ते सहज शक्य आहे.

माणसाच्या जगण्यातील पेच सोडवण्यास हातभार लावणं हे धर्माचं काम आहे; उगाच नसती बंधनं घालणं आणि आयुष्य कठीण करणं हे नव्हे. पण बहुतेकदा धर्म नसत्या अडचणी उभ्या करतो आणि सवितासारख्या निरपराध स्त्रीचा (तेही तिचा संबंधित धर्माशी काहीही संबंध नसताना) बळी जातो. धर्म जर माणसाच्या सुखदुःखाचा आणि जगण्यामरणाचाही विचार करत नसेल, तर तो धर्म कसला? 

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.