
कडाणपाणी-
नुकताच सातारा जिल्ह्यातल्या खटाव, माण या दुष्काळी तालुक्याचा दौरा करून आलो. पिण्याच्या पाण्याची भयाण स्थिती नोव्हेंबरमध्येच झालीय. आता एप्रिल-मे महिन्यात तर इथल्या लोकांना पाण्यामुळं स्थलांतर करावं लागणार आहे. आता घरातली गुरढोरं सरकारी छावणीत दाखल झालीत. अनेक वस्त्यांवर आत्ताच पिण्याचं पाणी चार दिवसातनं एकदा येतं. शेतातली ज्वारी, घेवडा आणि इतर कडधान्यं हातची गेलीत. लोकं रोजची आपली कामं तेवढ्याच शांतपणानं करताहेत. ना कुणा नेत्याविरोधात ना राजकीय पक्षाच्या विरोधात कुणाच्याही बोलण्यात राग दिसत नाही. ही माणसं एवढी शांत का? पिण्याच्या पाण्यासारखा मूलभूत प्रश्न पण त्यासाठीही आक्रमक होताना इथली माणसं का दिसेनात? एवढी ही शांत कशी? अशा अनेक प्रश्नांच मोहोळ घेऊन मुंबईला परतलोय....
खरं तर गेल्या 30-35 वर्षांपासून ‘पिण्याचं पाणी खटाव आणि माण या तालुक्यांना आणणार’ या आश्वासनावर इथल्या निवडणुका पार पडल्यात. या आश्वासनावर अनेकजण निवडून गेलेत. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही. लोकांनीही पाण्यासाठी रास्ता रोको केल्याचं चित्र दिसलं नाही. शरद पवारांसारख्या नेत्याच्या हाकेला धावून जाणारी ही जनता अजूनही पिण्याच्या पाण्याची वाट पाहतेय.
मराठवाड्यात पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी लोक आक्रमक झाले. त्यांच्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या या दोन तालुक्यांत मात्र पाण्यासाठी आंदोलन होताना दिसेना की त्यावर उपाय लवकर होईल, असंही दिसेना. उरमोडीचं पाणी खटाव तालुक्यातनं सांगली जिल्ह्यातल्या ऊसासाठी चाललंय. इकडे खटाव तालुक्यात मात्र पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडलीय .
विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळातही पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा कुणी करत नाही. एका शेतक-याशी बोलत होतो. राजकीय नेत्यांना आपल्याकडे फिरकू द्यायला नको, असं तुम्हाला कधी वाटत नाही का? त्यावर तो म्हणाला, हे पहा निवडणुकीच्या काळात ‘जिथं अर्धी, तिथं गर्दी’ अशी परिस्थिती दिसतेय. त्याचा अर्थ काय, असं विचारता त्यानं तात्काळ सांगितलं, अहो, ‘अर्धी म्हणजे दारूची अर्धी बाटली. जो नेता देतो त्याच्या मागं जातात सगळी लोकं’...
खरा प्रश्न हाच की, इथल्या सामान्य माणसाच्या वाट्याला येणारी ही परिस्थिती बदलणारच नाही का? त्यांच्या मनातल्या रागाला सामूहिक वाट करून कुणीच देणार नाही का? हा प्रश्न निर्माण होतो. खरं तर एका लोकसभेच्या निवडणुकीत इथल्या लोकांच्या रागाचा फटका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांना बसला होता. त्यावेळी ते निवडणुकीदरम्यान बोलले होतं की, ‘इथली लोकं मेंढरं आहेत. हे कुठं जातायत, शेवटी मलाच मतं देतील...’ त्याच्या विरोधात रान पेटलं आणि प्रतापरावांचा पराभव झाला. तेव्हांपासूनचं मग त्यांच्या राजकारणालाही उतरती कळा लागली.
इथला माणूस हा खरा स्वाभिमानी अन् तितकाच बेनवाडी आहे. त्याच्या मनात काय आहे हे लवकर कळत नाही. तो कधी एखाद्यानं उपकार केले तरी त्याच्या उपकारामुळं दबून जाईलच असं नाही. स्वाभिमान जर डिवचला तर मग घरचं खाऊन अन् गावचं राजकारण करून बड्या नेत्यालाही माती चारू शकतो. पण पिण्याच्या पाण्यासारख्या सामुहिक प्रश्नावर मात्र तो रागावताना दिसत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार जाहीरपणानं सांगतात की, "अनेकजण मला सांगतात की पाण्याचा प्रश्न यावेळी निवडणुकीत अडचणीचा ठरणार आहे. पण मला माहीत आहे, निवडून कसं यायचं ते...”
यातून हेच स्पष्ट होतंय की राजकारण्यांना माहितेय, पाण्यावर इथली जनता काही पेटून उठत नाही. त्यांना फक्त झुलवत ठेवायचं. या माणसांच्या वाट्याला त्यामुळेच ना उद्योग आले ना शेतीसाठी पाणी. आपला भाग बारामती सारखा सुजलाम सुफलाम होईल अशी आशा बाळगून शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिलं. इथं पाणी देणं अवघड आहे, हे या जाणत्या राजानंही जाहीरपणानं सांगायला सुरूवात केलीय. त्यामुळेच इथल्या जनतेला सत्तेचा काही फायदा होताना दिसत नाही. यांच्या आयुष्यात कडाणपाण्याची जागा सत्वयुक्त जगणं कधी घेणार? हा प्रश्न सतत सतत सतावत राहणार.. असाच अनेक वर्षं...
Comments (2)
-
Guest (अनिल पवार)
सुंदर... वाचल्यावर डोक सुन्न होतं.... वाटतं....पाणीप्रश्नांवर फसवणाऱ्या राजकारण्यांना भर रस्त्यांमध्ये गोळ्या घालाव्यात... करावं तर काय.. आंदोलनं करुन हाती काय येत नाही.. खटावची जनता होरपळत असताना.. सांगलीला पाणी... काय करायचं या नेत्याचं... खटावला चार आमदार काय लोणचं घालायचं काय़... कुणीतरी काय तरी करा...आम्ही क्रांतीची मशाल हाती घेऊ
-
Guest (शशि kore)
बेस्ट.