स्पेशल रिपोर्ट

जीवघेण्या व्यसनाचं नागमोडी वळण भाग- 1

नंदिनी आत्मसिद्ध, जीवघेण्या व्यसनाचं नागमोडी वळण

निवांत डोंगरदऱ्यांमध्ये पसरलेला नागालँडचा प्रदेश सौंदर्याचा अनुभव ओंजळीत टाकत होता. हिरवाईनं नटलेले डोंगर आणि पानाफुलांच्या आगळ्यावेगळ्या रंगांनी सुशोभित झाडंझुडपं... पण या सुंदर अशा दुनियेमागं दडली आहे दुसरी एक दुनिया, जी या सौंदर्यासाठी शाप ठरली आहे. इथल्या वातावरणात एक विखार तिनं रुजवायला सुरुवात केली आहे. डोंगरावरल्या हिरवळीची होरपळ करण्याचा डाव ती खेळते आहे. नागालँडसारखा सुंदर आणि निवांत प्रदेश असलेली ही भूमी ठरतेय ड्रग घेणाऱ्या लोकांची आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या एड्ससारख्या जीवघेण्या आजाराची. इथल्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात अनेक दशकांपासून तरुण पिढीला या व्यसनानं विळखा घातला आहे. कधी भरकटल्यामुळं, कधी नावीन्याच्या ओढीमुळं, तर कधी कौटुंबिक वातावरणातील रुक्षतेमुळं तरुण ड्रग्जकडं ओढले जातात. म्यानमारच्या सीमेपलीकडून होणारा अंमलीपदार्थांचा पुरवठा आणि वर्षानुवर्षांपासून रुळलेला हा व्यापार तरुणांच्या आयुष्याला गळामिठी घालून फोफावत आहे. एकदा या व्यसनाची चव चाखली की त्यातून सुटका कठीणच. एकच प्याला असतो तसाच हा प्रकार, त्याहूनही तीव्रतेने शरीराला ग्रासणारा. मनाला वेढून टाकणारा. त्यापासून दूर जायचं तर त्यासाठी मनोबल हवं, वैद्यकीय मदत हवी आणि जवळच्या माणसांची साथही हवी. आपण यातून बाहेर पडायचंय याचा निग्रह करायला हवा. 

 

नागालँडमधल्या या परिस्थितीची आणि व्यसनात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तिथं चाललेल्या प्रयत्नांची पाहणी करण्यासाठी गेल्या वर्षी, म्हणजे 2011 मध्ये सेंटर फॉर अॅडव्होकसी अँड रिसर्च (सीफार) या स्वयंसेवी संस्थेतर्फे एक दौरा आयोजित करण्यात आला होता. डिमापूर, कोहिमा आणि फुत्सेरो अशा तीन ठिकाणी स्थानिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं चाललेल्या पुनर्वसन कामाचं स्वरूप यावेळी जाणून घेता आलं. व्यसनामुळं स्त्रियांच्या जीवनावरही किती खोलवर परिणाम घडत असतो (मग त्या स्वतः व्यसनी असोत की नसोत), हेही तिथं बघायला मिळालं. इंजेक्टिंग ड्रग युजर्सची (आयडीयू) संख्या आणि समस्या गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढली आहे. या मंडळींना अंमली द्रव्यापासून धोका असतोच, पण त्याचबरोबर इंजेक्शनची सुई वारंवार आणि वेगवेगळ्या लोकांनी वापरल्यामुळे एचआयव्हीची; तसंच रक्तावाटे होणाऱ्या इतर स्वरूपाच्या संसर्गाची लागण होण्याचा मोठा धोका संभवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. 

ईशान्येकडच्या मणिपूर, नागालँड, मिझोराम अशा प्रदेशांमधून आयडीयूंची संख्या जास्त आढळते. या सर्वच ठिकाणी अशी जागरूकता यावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशन व मेलबोर्न युनिव्हर्सिटीची नोसाल इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ यांचा संयुक्त उपक्रम असलेला प्रोजेक्ट ऑर्किड यांनी २००४ मध्ये या दृष्टीनं काम सुरू केलं. त्यास बिल अँड मेलिन्दा गेट्स फाऊंडेशनची मदत असलेल्या ‘आवाहन’ या संस्थेचं साह्य आहे. मणिपूर व नागालँडमध्ये आतापर्यंत १३००० आयडीयूंशी संपर्क साधण्यात आला असून, ३५०० फीमेल सेक्स वर्कर्स आणि सुमारे १५०० एसएसएम (मेन हेविंग सेक्स विथ मेन)पर्यंत जागरूकतेचा संदेश पोचवण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. आयडीयूंना डिस्पोझेबल सीरिंजचं महत्त्व पटवून देणं, लैंगिक संबंध ठेवताना कंडोमच्या वापराची आवश्यकता संबंधितांच्या मनावर बिंबवणं, अशा मार्गांचा अवलंब करत एड्सचा धोका कमी करण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. अर्थातच, हे काम तसं सरळ सोपं नव्हतं, कारण मुळात आयडीयूंचा शोध घेणं हेच कठीण होतं. आपण या व्यसनात अडकलेले आहोत हे कबूल करण्याकडं त्यांचा कल नसतो. कारण तसं उघड झाल्यास आपल्याला कलंक लागेल, गुन्हेगार म्हणून शिक्का कपाळी बसेल, अशी भीती या साऱ्यांच्या मनात होती. शिवाय या मंडळींचे एकत्र येण्याचे अड्डे शोधणं हेसुद्धा या डोंगराळ प्रदेशात एक कठीण काम होतं. पण स्थानिकांच्या मदतीनं, आयडीयूंना विश्वासात घेत प्रोजेक्ट ऑर्किडनं पावलं टाकण्यास सुरुवात केली. हळूहळू का होईना, पण या प्रयत्नांना यश मिळण्यास प्रारंभ झाला आहे...

अंमलीपदार्थांच्या व्यसनातून सहजासहजी बाहेर येणं तसं अशक्यच. त्यासाठी विलक्षण अशा मनोधैर्याबरोबरच वैद्यकीय सल्ला व साह्याची गरज लागते. त्यातही नागालँडमध्ये अंमलीपदार्थांचं सेवन तसं पूर्वीपासूनच होत आलं आहे. दारू आणि अफूचा वापर फारच जुना. मग १९८० च्या दशकात हेरॉईन आलं. काही मिळालं नाही, तर विशिष्ट औषधांचा वापर नशापाणी करण्याकडं कल वाढला. आणि १९९० च्या दशकात इंजेक्टिंग ड्रग्जचा वापर इथं रुजला. ही नशा झटकन चढणारी. एक स्टाईल म्हणून, नवीन संस्कृतीचा भाग म्हणून तरुण तिच्याकडं वळले आणि तिच्या पाशात अडकले. त्यातून बाहेर येणं सोपं नव्हतंच, शिवाय अनेकांनी एक सुई वापरल्यामुळं एचआयव्हीची बाधा होण्याचा धोका वाढला तो वेगळाच. या तरुणांना विश्वासात घेऊन त्यांना आरोग्याशी संबंधित असलेले हे प्रश्न समजावून सांगणं, त्यांना डिस्पोझेबल सीरिंज स्वीकारायला लावणं, अशा मार्गांनी त्यांना असलेला एचआयव्ही बाधा होण्याचा धोका कमी करण्याचे प्रयत्न ऑर्किडनं राबवले. खरं तर या मंडळींना व्यसनातून बाहेर काढणं हा अधिक श्रेयस्कर उपाय होता. पण प्रत्येकाला व्यसनापासून परावृत्त करणं अशक्य असल्याचा अनुभव जगभरचाच आहे. म्हणूनच धोका कमी करण्यावर भर देण्याचा मार्ग अनुसरला गेला. दुसरीकडं, व्यसनातून बाहेर काढण्याचे प्रयत्नही सुरूच ठेवण्यात आले. ते करताना व्यसनाधीन माणसाला हाताळण्यासाठी आवश्यक अशा गोष्टींचा अवलंब करण्यात आला. आजाऱ्याला जशी उपचाराची गरज असते, तशीच गरज या मंडळींनाही असते याची जाणीव त्यांच्यासकट त्यांच्या कुटुंबीयांमध्ये रुजवण्याचं समुपदेशनाचं काम हाती घेण्यात आलं. नागालँड हे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असलेलं राज्य आहे. त्यामुळे चर्चचा पाठिंबा आणि मदत असणं आवश्यक होतं. चर्चला या साऱ्या गोष्टी पटवणं हे कठीण काम आहे आणि आयडीयूंबाबत चर्चचा दृष्टिकोन काहीसा बदलला असला, तरी आजही लैंगिक व्यवसायातील स्त्रिया व एमएसएमच्या संदर्भातली भूमिका तीच आहे. पण आयडीयूंना तरी अगदी हेटाळणीची वागणूक आता मिळत नसल्यानं ऑर्किडचं काम थोडं सोपं बनलं आहे. 

शहरात विमानतळ असला तरी डिमापूर हे तसं छोटेखानी शहर. शहराच्या मध्यवर्ती भागात आयडीयूंसाठी उघडण्यात आलेलं क्लिनिक आता इथलं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. ज्यांना यातून बाहेर येण्याची इच्छा आहे अशांना इथं वैद्यकीय मदत पुरवली जाते. इंजेक्टिंग ड्रग्जमधून बाहेर येण्याचा मार्ग तसा खडतरच म्हणायला हवा. आयडीयूला पर्यायी ड्रग देऊन त्या विषारी सुईपासून दूर ठेवलं जातं. मुख्यतः बुप्रेनोफाइन आणि मेथाडोन हे तोंडावाटे दिले जाणारे ड्रग्ज (ओपिऑइड सबस्टिट्यूट थेरपी -ओएसडी) हा इंजेक्टिंग ड्रगचा पर्याय आहे. हेरॉईन, मॉर्फिनसारख्या अवैध आणि धोकादायक द्रव्यांऐवजी योजण्यात येणारी ही एक तऱ्हेची औषधंच आहेत. त्यांचा वापर केल्यामुळं आयडीयूला ड्रग टोचल्यावर येणारा परिणाम जाणवतो, पण धोका यात कमी असतो. शिवाय इंजेक्शनमध्ये असणारा संसर्गाचा परिणामही यात असत नाही. बुप्रेनोफाइनचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीतही आहे. ओएसडी हा जगभरातच एक परिणामकारक आणि हानिविरहित उपचार समजला जातो. अर्थातच, याचा वापर जपून व नियंत्रणातच करावा लागतो. डिमापूरमध्ये ओएसडी घेणाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यावरील उपचारांची माहितीही घेतली. या भागात ओएसडीची सुरुवात २००६ मध्ये झाली. प्रारंभी या गोळ्या आयडीयूंना दिल्या जात, पण बाहेर गेल्यावर अनेकदा काही जण जिभेखाली ठेवलेली गोळी काढून घेऊन ती दुसऱ्याला विकून पुन्हा इंजेक्टिंग ड्रग घेत. आता गोळीची पूड करूनच प्रत्येकाला दिली जाते आणि ती पूर्ण विरघळेपर्यंत त्याला क्लिनिकमध्येच बसवून ठेवलं जातं. हळूहळू या ड्रगची मात्राही कमी केली जाते. हा डोस घेण्यासाठी रोज इथं यावं लागतं. या उपचाराचा लाभ घेण्याकडं अधिकाधिक आयडीयू वळू लागले आहेत. 

डिमापूरच्या क्लिनिकमध्ये अलोअ हा ३९ वर्षांचा तरुण भेटला. गेली वीस वर्षं तो व्यसनात अडकला होता. आईवडील विभक्त झालेले, अवतीभवतीचं वातावरण अस्थिर आणि सामाजिक संस्कृती झपाट्यानं बदलत गेलेली. अशा वेळी अलोअ नशा करणाऱ्या ग्रुपमध्ये आला. गंमत म्हणून त्याने टोचून घेतलं आणि पुरता विळख्यात सापडला. अज्ञानामुळे तरुण यात सापडतात असं तो म्हणाला. ‘आमचे प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही मंडळी आलात त्यामुळे बरं वाटलं,’ अशी त्याची प्रतिक्रिया होती. त्याच्यासारख्या लोकांना व्यसनापासून दूर नेण्याचा आणि त्यातले धोके कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थांबद्दल त्याच्या मनात आज कृतज्ञतेची भावना आहे. अस्थिर कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणात तो या मार्गाला लागला. पण आता ओएसडीमुळे त्याच्यात खूप बदल झाला आहे. ही लत लागली तेव्हा त्यानं घरी चोरीही केली होती. आपण यातून बाहेर पडतोय याचा त्याला आनंद वाटतो. लग्नानंतर त्याला बायकोनं साथ दिली. तिच्यामुळे आपण अधिक खंबीर राहू शकलो, असं त्याला वाटतं. आपल्या मुलांना इतरांनी आपल्यावरून चिडवावं असं त्याला वाटत नाही. मुलं समजती होईपर्यंत आपण पूर्णपणे मुक्त असू, असा विश्वास त्याला वाटतो. औषधांचा पुरवठा करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. अलीकडच्या पालकांना मुलांमधल्या व्यसनाचं भान आलं आहे आणि त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मुलांना आपली मदत आवश्यक असते ही जाणीवही त्यांना होऊ लागली आहे, असं अलोअनं सांगितलं. अलोअ हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. पण सारेच जण त्याच्याप्रमाणे अलगद बाहेर पडतात असं नाही. ओएसडी घेत असताना काही जण अनेकदा विचित्र वागतात, हिंसक बनतात असाही अनुभव येतो. त्यांना समजून घेऊन उपचार करावा लागतो. ओएसडी देणाऱ्या नर्सला असे अनुभव येत असतात. 

याच क्लिनिकमध्ये भेटलेल्या म्हालो या नर्सनं असे अनेक अनुभव पचवले आहेत. उपचारासाठी येणारा माणूस कसाही वागला तरी आपण डोकं शांत ठेवून काम करायचं हे तिला आता जमू लागलं आहे. आज एखादा नीट वागला नाही तरी उद्या तोच त्याबद्दल सॉरी म्हणतो हेही तिनं अनुभवलं आहे. तीन वर्षांपासून इथे ती काम करते आहे. आधीच्या हॉस्पिटलपेक्षा इथे तिला जास्त बरं वाटतं. एकतर तिथल्यासारख्या शिफ्ट इथं नाहीत. इथं येऊन आपण अधिक सहनशील झालो, एका नव्या जगाचं दर्शनच इथं घडलं, असं तिला वाटतं. इथं येणारा माणूस हा रुग्ण आहे, त्याला आपली मदत हवी आहे हे तिनं स्वीकारलं आहे. त्यामुळे ती न चिडता आपलं काम आनंदानं करते. ही एक प्रकारची समाजसेवाच आहे, असं तिला वाटतं. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.