स्पेशल रिपोर्ट

अश्रूंची होतील का फुले?

हेमंत देसाई

भाग - 2

सेनाप्रमुखांच्या निधनाच्या दिवशी मुंबईत पाळल्या गेलेल्या बंदबाबत शाहीन धाडा या तरुणीने फेसबुकवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तिच्या काकांच्या पालघर येथील रुग्णांलयावर हल्ला झाला. या हल्ल्याचं जोरदार समर्थन शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांनी केलं आहे. शिवसैनिकांची ही उत्स्फूर्त भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राऊळांना उध्दवजींनी  उत्स्फूर्तपणे पदमुक्त करावं. 'दहशतवादी' शिवसेना मला नको आहे, हा संदेश त्यांनी मावळ्यांना जरूर द्यावा. मातोश्रीला खूश करण्यासाठीच असले 'पराक्रम' केले जातात.

याच उद्देशानं आता दादर स्थानकास, प्रस्तावित न्हावा शेवा-शिवडी पुलाला, सागरी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली जात आहे. गावोगावी त्यांचे पुतळे, स्मारकं उभारण्याच्या घोषणा होत आहेत. यात शिवसेनाच नाही, तर सेनेचं लांगुलचालन करणारा त्याचा मित्र पक्ष भाजपही पुढे आहे. त्यामुळं शिवाजी पार्कात साहेबांचं स्मारक व्हावं, या मागणीस भाजपचा पाठिंबा आहे. नुसता फुकटचा पाठिंबा देऊन गुडविल मिळवण्यात काय जातं! मात्र मनसेनं हे स्मारक इंदू मिलमध्ये व्हावं, अशी भूमिका घेऊन शिवसेना आणि रामदास आठवले या दोघांचीही खोडी काढली आहे!

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसनंही केला. परंतु एखाद्या निवडणुकीत याचा उपयोग होतो. त्यानंतर तुम्ही काम केलं, तरच लोक मतं देत असतात. खुद्द बाळासाहेबांना पुतळ्याचं राजकारण (तेथे फक्त कावळ्यांची सोय होते असं त्यांचं मत होतं!) मान्य नव्हतं. परंतु पक्षसंघटना म्हणून सेनेनं प्रतीकांचं, भावनांचंच राजकारण केलं आहे. उध्दव ठाकरे हे सर्व बदलतील अशी अपेक्षा आहे.

इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेबांचं स्मारक व्हावं, अशी मागणी केली जात आहे. मात्र डॉ. बाबासाहेब हे बाळासाहेबांच्या तुलनेत अनेक पटींनी मोठे होते. बाळासाहेबांबद्दल अनुदार भावना न बाळगताही हे स्पष्टपणे म्हटलं पाहिजे की, बाबासाहेब महामानव होते. भारतीय लोकशाही, घटना, दलितोध्दार, सामाजिक समता या सर्वदृष्ट्या त्यांची कामगिरी थोर होती.  आणखी बरंच सांगता येईल, पण या घडीला एवढंच पुरे!

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेबांचं निधन झालं, तेव्हा त्यांचे एकेकाळचे सहकारी पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना संसदेत श्रध्दांजली वाहिली. ते म्हणाले, डॉ. आंबेडकरांची ओळख सर्वांना हिंदू समाजातील दडपणुकीशी युध्द पुकारणारा बंडखोर म्हणूनच राहील. हिंदू कोड बिल तयार करणं, हिंदू कायदा सुधारणं यासाठीही त्यांची स्मृती जतन केली जाईल.` 1951 साली डॉ. आंबेडकरांनी अत्यंत कटू भावना मनात ठेवून मंत्रिपदाचा त्याग केला होता. तरीदेखील पं. नेहरूंनी त्यांना श्रध्दांजली वाहताना मानसिक उदारतेची दृष्टीच ठेवली.

आपल्या निधनापूर्वी डॉ. बाबासाहेबांनी 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या नावानं पक्ष स्थापन करण्याचा व या पक्षात सर्व पुरोगामी समाज घटकांना सामावून घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 3 ऑक्टोबर 1957 रोजी त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्ष स्थापला.  परंतु वर्षभरातच हा पक्ष फुटला. एन. शिवराज, बॅ. खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, आर. डी. भंडारेंचा एक गट तर बी. सी. कांबळे, एच. डी. आवडे, दादासाहेब रूपवते यांचा दुसरा गट अशी फूट पडली. म्हणजे नेत्याच्या मृत्यूनंतर अनुयायांमध्ये वाढत्या जबाबदारीची भावना निर्माण होतेच, असं नव्हे.

लोकमान्यांच्या निधनानंतर टिळक पक्ष पोरका झाला आणि गांधीजींच्या राजकारणाशी त्यांचं पटेनासं झालं. काही काळ टिळक गटाने गांधीजींशी जमवून घेतलं. नंतर ते तटस्थ बनले व शेवटी गांधीविरोधी झाले. 'गांधींची' व नंतर 'गांधी-नेहरूंची काँग्रेस' म्हणूनच पक्ष ओळखला जाऊ लागला. आज ही काँग्रेस टिळकांची, गांधींची वा नेहरूंचीही असल्याचा मागमूस आढळत नाही. 'काँग्रेस तो अपनी दुकान है' असे उद्गार मुकेश अंबानींनी काढल्याचं मात्र सामान्य माणसालाही ठाऊक आहे! 

जनसंघाचे अध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. लखनौहून पाटण्याकडे जात असताना त्यांच्यावर मृत्यूनं झडप घातली. मोगलसराय स्टेशनजवळ रेल्वेलाईनवर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या राजकारणात विचारांची बैठक होती व संघटनात्मक कार्याच्या अनुभवाचा आधार होता. एकात्म मानवतावादाचे त्यांचे विचार मौलिक होते. परंतु जनसंघाच्या भाजप या अवतारात तुम्हाला उपाध्याय यांची ग्रामीण विकासाची दृष्टी कुठे दिसते का?

1968 साली अमेरिकन निग्रोंचा थोर नेता आणि मानवतेचा श्रेष्ठ पुजारी डॉ. मार्टिन ल्यूथर किंगचा खून झाला. अमेरिकेतील निग्रोंचा प्रश्न हा एकप्रकारे भारतातील दलितांच्या समस्येसारखाच आहे. या निग्रोंना श्वेतवर्णीयांप्रमाणे समान हक्क मिळावेत म्हणून डॉ. किंग आयुष्यभर झगडले. त्यांच्या प्रयत्नांमुळंच अमेरिकेत समान नागरिकत्वाचा कायदा झाला, तरी वंशश्रेष्ठत्वाची भावना जात नसल्यानं तेथे दंगली, बेछूट गोळीबार या घटना घडतच असतात. तरीही अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा दुसऱ्यांदा निवडून येतात व त्यांना डॉ. मार्टिन ल्यूथर किंग कुठेतरी प्रेरणा देत असतात... नेत्याचा प्रभाव हा असा असावा तर तो असा असावा! 

डॉ. आंबेडकरांनंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना होऊन तो पहिल्यापासूनच विस्कटला गेला. पण एका मोठ्या समाजाला आंबेडकरांचे विचार प्रेरणा देत राहिले. विविध पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांच्या जीवनातही बाबासाहेबांच्या विचारांना मोठं स्थान आहे. 

अण्णा दुराईंचं नेतृत्व तमिळनाडूपुरतंच मर्यादित होतं आणि अनेक विरोधात्मक व विघटनवादी प्रवृत्तींना चालना देऊन ते प्रस्थापित झालं होतं. अधिकारावर आल्यानंतर अण्णा दुराई बदलले व आपल्या अतिरेकी अनुयायांना त्यांनी आवरलं. तमिळी संस्कृतीवर त्यांचं अतीव प्रेम होतं. ते उत्तम वक्ते, लेखक व प्रशासक होते. तमिळ संस्कृतीच्या विकासाआड मद्रास (चेन्नई) मधील पुढारलेला वर्ग व उत्तर भारतीय येत आहेत, अशी त्यांची धारणा होती. हिंदी व उत्तर भारतीय चळवळीस अण्णा दुराईंनी प्रोत्साहन दिलं. पण सामान्यांच्या सुखदु:खांशी ते समरस होत असल्यानं, ते प्रचंड लोकप्रिय होते. अण्णा दुराईंचा वारसा घेऊनच अण्णा द्रमुक व द्रमुक पुढे चालत आलेले आहेत. मात्र दोन्ही पक्ष कमालीचे भ्रष्ट आहेत. अण्णा दुराईंची राहणी साधी होती. उलट तमिळनाडूचं सत्ताधारी व विरोधी नेतृत्व पंचतारांकित आहे. त्यामुळं अण्णा दुराईंची स्मृती पुतळ्यापुरतीच सीमित आहे. असो.

बाळासाहेब ठाकरेंचा मराठी विचार भविष्यात आणखी पुढे न्यायचा, जनतेच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांचा विचार करायचा, की त्यांच्या स्मारकात गुंतून पडायचं हे शेवटी शिवसैनिकांनीच ठरवायचं आहे. अश्रूंची झाली 'फुलं' असं म्हणण्याची संधी जनतेला मिळणार आहे काय ते बघायचं!


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.