दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन

राहुल विळदकर

अहमदनगर - भल्या भल्या बहाद्दरांनाही पेलवणार नाहीत अशा तलवारी, तर कुठे नाजूक मुठीच्या कट्यारी असा सगळा नजारा पाहायला मिळाला तो नगरला भरलेल्या दुर्मिळ अशा शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनात. रावसाहेब पटवर्धन स्मारक हॉलमध्ये हे प्रदर्शन 24 ते 29 जानेवारी दरम्यान भरलं होतं. प्रा. गिरीश जाधव हे या शस्त्रांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

shivkalin shashtrapradarshan photo 4
विविध प्रकारचे भाले, ज्यात घोडेस्वाराचा भाला, गजयुद्धात वापरायचे आणि पायदळासाठीचे खास असेही भाले आहेत. शिवाय यात दांडपट्ट्याचेही अनेक प्रकार आहेत. त्यांचं मजबूत रिबेटिंग आणि मेटलर्जी पाहिली तर आजचा अनुभवी इंजिनीयरही तोंडात बोट घालेल. या दांडपट्ट्याच्या पात्यात ९८.५ टक्के लोखंड आणि उरलेल्यामध्ये मॅग्नेशियमपासून ते मॉलिब्लेडनमपर्यंतचे धातू वापरलेत, उगीच नाही त्यात एवढी प्रचंड लवचिकता आलेली. बाजीप्रभूंमध्ये असलेलं दांडपट्टा चालवण्याचं कौशल्य बघूनच शिवरायांनी त्यांना स्वराज्याच्या सेवेत सामावून घेतलं होतं.

 

या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या तलवारींचे प्रकारही अनेक आहेत. इंग्रजी बनावटीच्या, मुघलकालीन बनावटीच्या आणि खाशा मऱ्हाटी तलवारी पाहायला मिळतात. मुघली तलवारी अवघ्या ३ फुटी, तर शिवरायांनी खास बनवून घेतलेल्या तलवारींचं पातंच मुळी ४ फुटांचं. राजा दूरदृष्टीचा होता म्हणतात, तो असा...!

 shivkalin shashtrapradarshan thumbnail

या संग्रहात बरच्या, विटं, पट्टे, गदा, भाले हे तर आहेच, शिवाय हत्तीचा पाय तोडण्याची आणि देहदंड झालेल्यांचं डोकं उडवण्याची बळी-कुऱ्हाडही आहे. या कुऱ्हाडी अस्सल वक्री अशा आहेत. याशिवाय अफजलखानाच्या वधाचा इतिहास ज्यांच्याशिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही, ती शिवरायांनीच अजरामर केलेली वाघनखं आणि बिचवेही प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

 

तोफगोळेही अनेक प्रकारचे आहेत, त्याबरोबरच अस्सल वेताचं आणि प्रचंड लवचिक असं कामटी धनुष्य आणि अणकुचीदार बाणही आहेत. ही सगळी शस्त्रं बघताना मोठ्यांबरोबरच बालचमूही हरखून जातो. कारण फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली आणि प्रत्यक्षात कधीही पाहायला न मिळणारी असा हा शस्त्रांचा संग्रह आहे. नगरच्या हिंदवी परिवार आणि जिवाशी ट्रेकर्सनं याचं आयोजन केलं आहे. ही फक्त संग्रहित केलेली शस्त्रं एवढंच त्यांचं मोल नाही, तर त्याकाळच्या लढाया, युद्धशास्त्र किती प्रगत होतं याचा हा धडधडीत पुरावाच आहे. त्यामुळं अभ्यासकांबरोबरच विद्यार्थ्यांनीही पुढाकार घ्यावा आणि अधिक सखोल, शास्त्रीय अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा संग्राहक गिरीश जाधव यांनी व्यक्त केलीय.

 shivkalin shashtrapradarshan photo

"अफजलखान धाडसी आणि ताकदवान असला, तरी तितकाच कपटी आणि धूर्त आहे, हे शिवराय चांगलेच ओळखून होते. त्याला भुलवून प्रतापगडाच्या पायथ्याशी आणला तर खरा, पण कधी तो दगा करेल, याचा नेम नव्हता. अशा कपटी शत्रूला खलास करण्यासाठी तितकीच छुपी आणि खतरनाक शस्त्रं आवश्यक होती. अर्थातच, वाघनखं, बिचवे आणि कट्यार यांचा उल्लेख असल्याशिवाय प्रतापगडाचा इतिहासच काय, पण एखादा पोवाडाही म्हटला जाऊ शकत नाही...” असं शस्त्रास्त्र संग्राहक आणि अभ्यासक गिरीश जाधव यांनी भारत4इंडियाशी बोलताना म्हणाले.

Tags

   

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.