काळाघोडा फेस्टिव्हल

सुखदा खांडगे

मुंबई - कला क्षेत्रात विशेषत्वानं उल्लेख केला जाणारा काळाघोडा कला महोत्सव 2 फेब्रुवारीपासून मुंबईतील काळाघोडा परिसरात सुरू आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची उद्या सांगता आहे. या महोत्सवात संपूर्ण भारतभरातून आलेल्या विविध कलाकारांच्या कलेची दालनं उभारण्यात आली असून कला रसिकांचा यास उदंड प्रतिसाद मिळतोय.

 

या वार्षिक कला महोत्सवाची सुरुवात १९९९ला झाली. महोत्सवाचं यंदाचं हे 15वं वर्ष आहे. या महोत्सवात देशाच्या विविध भागांतून कलाकार येऊन आपली कला सादर करतात. त्यामुळं हा फक्त काळाघोडा परिसरातील किंवा मुंबई, महाराष्ट्राचा महोत्सव न राहता खऱ्या अर्थानं राष्ट्रीय कला महोत्सव म्हटला जातो. यामुळं या महोत्सवाची कीर्ती देशाबाहेरही पोहोचलीय. त्यामुळं अनेक विदेशी पर्यटक मुद्दाम या कला महोत्सवाला भेट देतात.

 

यंदाच्या या उत्सवाला साधारणपणं १ लाख ५० हजार लोक हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये ३५० कार्यक्रमांची आखणी असून हे कार्यक्रम ९ दिवसांमध्ये विभागले गेले आहेत. यामध्ये राजस्थानचे बहुरूपी, कठपुतळी, महाराष्ट्रातील गोंधळ, बिनबायकांचा तमाशा इत्यादी लोककलाप्रकार सादर होताहेत.

या वर्षीच्या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलंय ते भारतीय सिनेसृष्टीची शंभरी... त्या निमित्तानं इथं एक खास इन्स्टॉलेशन तयार करण्यात आलंय. दबंग सलमान खान, रेखा, माधुरी दीक्षित या सगळ्या सिनेतारकांचे कटआऊट इथल्या प्रदर्शनीय भागात उभे आहेत. भारतीय सिनेसृष्टीची शंभरी या संकल्पनेवर आधारित या सगळ्या कलाकृती बनवण्यात आल्यायत. तसंच सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंचा पुतळा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या पुतळ्यामागं लावलेला कॅमेरा तसंच या पुतळ्याच्या आजूबाजूला असलेले विविध सिनेतारकांचे कटआऊट महोत्सवास भेट देणाऱ्यांसाठी फोटो काढण्याचं आवडीचं ठिकाण बनलंय.

 

या सगळ्या कलाकृती लाकडाच्या मदतीनं बनवण्यात आल्या असून दादासाहेब फाळकेंच्या पुतळ्यासाठी ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’चा वापर करण्यात आलाय. तर मराठी सिनेसृष्टीतल्या विविध कलाकारांचं दर्शन घडवणारं एक विशेष फिल्मचं एक रिळही इथं तयार केलंय. या सर्व कलाकृती बनवण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ अनेक कलाकार मेहनत घेत होते. या महोत्सवातील कलाकृतींना मिळणारा प्रतिसाद पाहून आलेले हे सर्व कलाकार हरखून गेले होते.

 

टाकाऊपासून टिकाऊ
या महोत्सवात टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू महोत्सवास भेट देणाऱ्यांना आकर्षून घेत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून बनवलेलं इन्स्टॉलेशन, खिळे आणि छत्र्यांपासून बनवलेल्या कवट्या, कोल्ड्रिंक्सच्या कॅनपासून बनवलेला स्तंभ आदी इन्स्टॉलेशन कलांना कलारसिकांचा चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे. कॉलेजच्या तरुण-तरुणींच्या या कलाकृतींसमोर फोटो काढण्यासाठी रांगा दिसून येतात.

 

कलांतून सामाजिक संदेश
महोत्सवातील काही कलाकृती केवळ आकर्षून न घेता सामाजिक संदेशही देत आहेत. उदाहरणार्थ, पर्यावरण, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिवापर आदी समस्यांवर आधारित कलाकृतीतून योग्य संदेश देण्याचंही काम होत आहे.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.