गारंबीचा बापू नव्या ढंगात

अपर्णा देशपांडे

ठाणे - श्री. ना. पेंडसेंचं प्रसिद्ध नाटक... डॉ. काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेली व्यक्तिरेखा म्हणजे, गारंबीचा बापू. हाच 'गारंबीचा बापू' पुन्हा नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आलाय. सुशीला एंटरटेन्मेंट निर्मित 'गारंबीचा बापू' हे दोन अंकी नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. दिग्दर्शक संजीव वढावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात बापूची व्यक्तिरेखा साकारतोय युवा अभिनेता अंगद म्हसकर.


 

नवी टीम, नवा जोश

जातीव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारं हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरचं एक क्लासिक असं नाटक आहे. हर्णे बंदराच्या परिसरातच वाढलेल्या 'श्रीनां'च्या कादंबरीवर आधारित या चार अंकी नाटकाचं दोन अंकात रूपांतर करण्याचं काम मिलिंद पाठक यांनी चोखपणं केलंय. 'श्रीनां'ची मानस कन्या म्हणजे राधा. या राधेची व्यक्तिरेखा साकारलीय अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिनं. तर संध्या म्हात्रे, रसिका धामणकर, रमेश रोकडे, राजू पटवर्धन, अरुण पालव, नंदकुमार सावंत हे कलाकारही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. तसंच नाटकात कोकण उभारण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांनी बजावलीय. गीतकार मकरंद सावंत यांनी लिहिलेलं गीत कोकणच्या मातीचा इतिहास सांगतं आणि संगीतकार नंदू घाणेकर यांचं मनाला भावणारं संगीत आपल्याला थेट कोकणात घेऊन जातं.


कोकणाच्या या मातीस थोरला हे इतिहास
पाय धुतो रत्नाकर, उभा डोंगर उश्यास

कोकणाच्या वाऱ्यावर वाहे क्षमाशील नीती
इथं पाणी शिकवतं, कशी जपायाची नाती
माती तापली तरीही, माफ करते उन्हास
कोकणाच्या या मातीस थोरला हे इतिहास

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.