परंपरा फेस्टिव्हल...

सुखदा खांडगे

मुंबई – कोकणातल्या दशावतार पासून ते थेट राजस्थान भापंग अशा संपूर्ण भारतातील लोककला नुकत्याच मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात सादर झाल्या. निमित्त होतं परंपरा महोत्सवाचं... लोककला अकादमीतर्फे आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातल्या लोककलांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.


 

भरला लोककलावंतांचा मेळा    

Dashavtar bharat4india.com

लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. याच लोककलेचं संवर्धन करण्यासाठी नुकतंच मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात 'परंपरा महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 6 ते 8 फेब्रुवारी असे तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते झालं. महोत्सवाच्या उद्घाटनाला गायक शंकर महादेवन, ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, लोक गायिका इला अरुण, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे हे सुद्धा उपस्थित होते. ताश्याच्या, संबळच्या ठेक्यावर, तुरेदार फेटे नाचत नाचत बांधून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालं. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या प्रदेशातील लोककला प्रकार इथं सादर झाले.

 

विविध कलांचं सादरीकरण

राजस्थानचं भापंग म्हणजे आपल्या सहज सोप्या भाषेत, समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणाऱ्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर चकरी, छत्तीसगढचं भरतार गायनामध्ये भोजपुरी गाणी सादर झालीत. तसंच महोत्सवामध्ये विविध प्रकारचं आदिवासी नृत्यही सादर झालं. गुजरातचं सिद्धी धमाल आणि ईस्ट आफ्रिकेतील असलेले नृत्य प्रकारही यावेळी सादर झाले. याशिवाय कोकणातलं दशावतार, झेबा बानो यांची कव्वाली, नंदेश उमपचं जांभुळ आख्यान आणि 'विच्छा माझी पुरी करा' असे अनेक लोककला प्रकार महोत्सवादरम्यान सादर झाले. लोककलेचं जतन करणं आवश्यक आहे, कारण त्यामुळं कलेची परंपरा पुढं सुरू राहते, असं मत ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांनी व्यक्त केलं. तर शास्त्रीय गायन हे मुखातून गायलं जातं, पण लोकगीत हे हृदयातून गायलं जातं, असं म्हणत गायक शंकर महादेवन यानं एक लोकगीतही सादर केलं.

 

कलेच्या संवर्धनासाठी अनुदान

खेडोपाड्यातली लोककला आता मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात पोहोचली असली तरी लोककलांचं संशोधन आणि संवर्धन करण्याची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. त्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं, अशी मागणी यावेळी लोककला अकादमीचे प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांनी केली.
एकूणच काय तर तीन दिवस चाललेल्या या महोत्सवातून लोककलांचा आस्वाद घेण्याची संधी मुंबईकरांना मिळाली.

  

 

 

 

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.