झाडीपट्टीची 'खडी गंमत' रंगली मुंबईत : भाग - 2

सुखदा खांडगे

मुंबई – आपला महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक लोककलांनी सजलेला आहे. जसा कोकणात दशावतार आणि पश्चिम महाराष्ट्रात असतो तमाशा, तसा विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे झाडीपट्टी आणि तिथल्या वेगवेगळ्या लोककला... त्यातलीच एक अस्सल वऱ्हाडी आणि गावरान लोककला म्हणजे 'खडी गंमत'. याच विदर्भाच्या लोककलेची नुकतीच मुंबईकरांनी मजा लुटली, निमित्त होतं राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित 'खडी गंमत' महोत्सवाचं.

 

Khadi Gammat  9मुंबईतल्या जांभोरी मैदानात 'खडी गंमत' सादर करणाऱ्या कलाकारांचे फडच्या फड आलेले बघायला मिळाले. 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या या महोत्सवात वेगवेगळ्या शाहिरांनी विविध विषयांना हात घालत प्रेक्षकांची मनं जिंकली. ग्रामीण भागातली लोककला मुंबईकरांनी अनुभवावी या उद्देशानं 'खडी गंमत' महोत्सवाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं.

महोत्सवासाठी विदर्भातून सहा फड मुंबईत दाखल झाले होते. शाहीर वैशालीताई रहांगडाले यांनी 'रणरागिणी झाशीवाली' हे नाटक सादर केलं. तर शाहीर अंबादास नागदेवे यांनी 'आई मला वाचव', शाहीर धनराज वाळके यांनी 'मृत्युंजय मार्कंडे', शाहीर विजय चकोले यांनी 'शेतकरी आत्महत्या', शाहीर उर्मिलाताई चौधरी यांनी 'सावित्रीबाई फुले' आणि शाहीर बहादुला बरडे यांनी 'खडी गंमत तमाशाची माय' ही नाटकं सादर केली.

याला म्हणतात 'खडी गंमत'

'खडी गंमत' हा मोगल काळादरम्यान उदयास आलेला लोककला प्रकार. उभ्यानं सादर केली जाणारी लोककला म्हणून या लोककलेला 'खडी गंमत' म्हणतात, असं मानलं जातं. अगदी ढोलकीसुद्धा यात उभ्यानंच वाजवतात. तमाशासारखंच यात गण, गवळण, बतावणी आणि वगही सादर करतात. 

शाहीर लावणी गातो आणि ढोलक्या, चोनक्या, टाळकरी यांची त्याला साथ असते. Khadi Gammat  2

'खडी गंमत' या लोककलाप्रकारात आजही स्त्रीपात्र हे पुरुषच सादर करतात आणि शाहिराच्या गाण्यावर नाचतात. एक विशिष्ट विषय घेऊन सादर होणाऱ्या खडी गंमतला नेपथ्याची गरज नसते. निवडक कलाकारांमध्ये खडी गंमत सादर केली जाते.

गवळण, कृष्ण, पेंद्या आणि गमत्या यांच्या संवादातून विनोद निर्मिती होते आणि रात्रभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं.

दसरा-दिवाळी नंतर सुरू होतात कार्यक्रम

साधारण दसरा-दिवाळीनंतर म्हणजेच सुगीचे दिवस आल्यावर सगळीकडं मनोरंजनासाठी या लोककला सादर केल्या जातात. विदर्भात झाडीपट्टीची नाटकं, दंडार, खडी गंमत असे अनेक लोककलाप्रकार जत्रेच्या निमित्तानं सादर होतात. या कार्यक्रमांसाठी दूर-दूरच्या गावांतून माणसं आपल्या नातेवाईकांकडं खास ही लोककला बघण्यासाठी येतात. विशेष म्हणजे 'खडी गंमत' चे हे कार्यक्रम रात्रभर सुरू राहतात.

'खडी गंमत'नं जपली परंपरा

'खडी गंमत' महोत्सवाच्या निमित्तानं लोककलेचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी सांगितलं, की "गेल्या चार वर्षांपासून हा महोत्सव मुंबईत होत आहे, यामुळं खेड्यापाड्यातल्या लोककला शहरातील लोकांपुढं सादर होतात. 'खडी गंमत' हा प्रकार पश्चिम महाराष्ट्राच्या तमाशाहून जुना आहे. 'खडी गंमत'नं आपली परंपरा अजूनही जपली आहे, आणि म्हणूनच आजही यात पुरुषच स्त्रीपात्र सादर करतात.

Khadi Gammat  3

“ 'खडी गंमत'मध्ये सादर होणारी नाटकं सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी असून समाजात जे काही सुरू आहे त्यावर विचार करायला लावणारी असतात,” असं राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या सहसंचालिका मीनल जोगळेकर म्हणतात. 
"हा महोत्सव गावातील तळागाळातील लोककलावंतांना नागर रंगमंच उपलब्ध करून देतो. 

त्याचप्रमाणं शहरातील लोकांना या कलेचा आस्वाद घ्यायला मिळतो, म्हणूनच याचं आयोजन आम्ही करतो," असंही जोगळेकरांनी सांगितलं.

एकूणच काय, तर अशा महोत्सवातून 'इंडिया'तल्या युवापिढीला 'भारता'तली कला माहीत होते आणि 'भारता'तल्या कलाकारांना 'इंडिया'त कला सादर करण्याची चांगली संधी मिळते, असंच म्हणावं लागेल.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.